Ad will apear here
Next
प्राणिप्रेमातून गवसलं आयुष्याचं ध्येय
एक शहरी मुलगा प्राण्यांमध्येच आपलं मैत्र शोधतो, त्यांच्यातच राहतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो, हे खरं वाटत नाही ना? पण या प्राणिप्रेमातूनच त्याला आयुष्याचं ध्येय गवसलं आणि त्या दृष्टीनं तो अभ्यास आणि काम करू लागला. स्थानिक पशुधनवाढीसाठी त्याचे सुरू असलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज पाहू या हे वेगळं काम करणाऱ्या सजल कुलकर्णी या तरुणाविषयी...
.............
मासवण या आदिवासी भागात मी काम करत असताना जवळपास सगळ्यांच्या घरात कोंबडी, बकरी, मांजर, कुत्रा असे प्राणी पाळलेले बघायला मिळत. घरातली लहान मुलं आणि हे सगळे प्राणी आपसांत खेळत, हितगुज करत. प्राण्यांसाठी राहण्याचं वेगळं ठिकाण नव्हतंच. त्यांचाही घरात तितकाच मनमोकळा वावर होता आणि त्यांना कुठेही फिरायला मज्जाव नव्हता. आज शहरीकरणामुळे फ्लॅट पद्धतीत जिथं जास्त माणसंच सामावू शकत नाहीत, तिथं अशा पाळीव प्राण्यांचा विचार करणं कठीणच गोष्ट आहे. मुलांना शाळेतल्या पोस्टरवरून हम्मा, गाय, कुकू, माऊ असं दाखवून शिकवलं जाण्याचे दिवस आलेत. असं वातावरण असतानाच आपल्यातलाच एक शहरी मुलगा प्राण्यांमध्येच आपलं मैत्र शोधतो, त्यांच्यातच राहतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो, हे खरं वाटत नाही ना? या मुलाचं लहानपण गोठ्यात खेळण्यात गेलं. त्याच्या आई-वडिलांनी कधी त्याला ‘हात-पाय घाण होतील, जनावरं लाथा मारतील’ अशी भीती घातली नाही. या मुलाचं प्राणिप्रेम इतकं, की एके दिवशी हे महाशय चक्क म्हशीवर बसून शाळेत गेले. जणू काही ती म्हैस त्याच्यासाठी हत्तीची भूमिका निभावत होती आणि हा अंबारीतून मिरवणूक निघाल्याचा आनंद लुटत होता.

सजलला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.सजल कुलकर्णी या तरुणाचा प्रवास प्राणिप्रेमातून आयुष्याच्या ध्येयापर्यंत कसा पोहोचला, हे बघण्याकरिता त्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यावं लागेल. सजल बायोटेक्नॉलॉजीचा पदवीधर असून, तो ‘बायफ’ या संस्थेत संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तो डॉक्टरेटदेखील करतो आहे. केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र पशुमंत्री असायला हवा, अशी मागणीही त्यानं केली आहे. सजलला त्याच्या कामाबद्दल, संशोधनाबद्दल ‘युवा संशोधक’सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अर्थातच त्याला या पुरस्कारांचा कुठलाही दंभ नाही. तो आपलं काम करत पुढे चालतो आहे. 

लहान असल्यापासून घरात गायी, कुत्री, पोपट असे पशु-पक्षी पाळलेले असल्यामुळे मोठं झाल्यावर आपण याच विषयावर म्हणजे प्राण्यांचाच अभ्यास करायचा, असं न कळत्या वयात सजलला वाटायचं. शिकत असताना बारावीनंतर डॉक्टर, इंजिनीअर न होता आपण व्हेटर्नरी डॉक्टर (प्राण्यांचं डॉक्टर) व्हायचं, असं सजलनं ठरवलं. मग काय, लागला गडी अभ्यासाला. मुक्या प्राण्यांवरचं प्रेम त्याला या विषयांकडे ओढत होतं. आपण पशुवैद्यकीय शिक्षण घेतलं, तर आपल्याला प्राण्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने काळजी कशी घ्यायची, त्यांना काही दुखलंखुपलं तर त्यांच्यावर कोणते उपचार करायचे, हे कळेल, हेच विचार त्याच्या मनात घोळत होते. 

बारावीचा निकाल लागला आणि अवघे पाच गुण कमी पडल्यानं सजलला ‘व्हेटर्नरी’ला प्रवेश नाकारला गेला. आता पुढे काय करावं हेच त्याला कळेनासं झालं. त्याला दुसरं काहीही करायचं नव्हतं आणि आता तर सगळे रस्ते बंद झाल्यासारखी अवस्था झाली होती. आसपासचे सगळे जण इतर शाखेत प्रवेश घेण्यासंबंधी सल्ले देत होते; पण सजलची मनाची तयारी होत नव्हती. अशा वेळी जैवतंत्रज्ञान या शाखेत आपल्याला संशोधनाची अधिक संधी आहे ही गोष्ट लक्षात येताच सजलनं नागपूरच्या आंबेडकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. 

खरं तर सजलला बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय हेही नीटसं ठाऊक नव्हतं. मग सुरुवात झाली ती त्यातले वेगवेगळे विषय समजून घेणं आणि ते ते विषय कुठेकुठे उपयोगी पडतात तेही जाणून घेण्यापासून. प्रॅक्टिकल करतानाही खऱ्या रोजच्या जगण्यात याचा कुठे आणि कसा उपयोग करता येईल याचाच विचार त्याच्या डोक्यात घोळत असे. अभ्यासात रस घेण्याचा प्रयत्न केला, तरी अभ्यासक्रमातला रुक्षपणा नकोसा वाटे. त्या नीरस पद्धतीच्या अभ्यासक्रमामुळे विषय नीट कळतही नसे. जायचं तर याच वाटेनं होतं; पण वाटचाल सुरळीत चालू नव्हती. 

डॉ. अभय बंग यांच्यासमवेत सजल.त्यातच एके दिवशी सजलला डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘निर्माण’ या उपक्रमाची बातमी वर्तमानपत्रात वाचायला मिळाली. आपण या उपक्रमात सहभागी व्हायचं त्यानं कुतुहलापोटी ठरवलं. हा दोन वर्षांचा सहा-सहा महिन्यांच्या अंतरानं होणाऱ्या चार शिबिरांचा प्रवास त्याला खूपच विलक्षण वाटला. ‘मी’पासून ‘समाजा’पर्यंत पोहेाचण्याचा तो मार्ग होता. सजलनं आपलं कुटुंब, आपले मित्र आणि आपले नातेवाईक या जगापेक्षा दुसरा विचारच आतापर्यंत कधी केला नव्हता. तसंच ‘मी’ म्हणजे काय याचाही विचार त्यानं कधी गंभीरपणे केला नव्हता. ‘निर्माण’मध्ये प्रवेश करताच या ‘मी’नं त्याला अंतर्मुख केलं. आपण कोण आहोत, काय आहोत, आपल्याला काय करायचंय, आपल्या आजूबाजूचं जग कसं आहे, अशा सगळ्या गोष्टींचे प्रश्नच सजलच्या मनाला पडू लागले. या प्रश्नांच्या शोधात निघालेल्या सजलला स्वतःबद्दलची स्पष्टता येत गेली. आपल्यात कोणत्या क्षमता आहेत, कोणत्या मर्यादा आहेत, या गोष्टी त्याला प्रथमच लक्षात आल्या. क्षमतांचा वापर कसा करायचा आणि मर्यादांवर मात कशी करायची याबद्दलचे विचार मग मनात सुरू झाले. सजलमधले हे सकारात्मक बदल घरच्यांनाही जाणवू लागले. 

निर्माण उपक्रमानं फेलोशिप जाहीर केली होती. एक वर्ष आपल्या शिक्षणाचा उपयोग करून आपल्या आवडीचं काम करून समाजाचे प्रश्नल सोडवण्यासाठी तळापर्यंत पोहोचायचं सजलनं ठरवलं. सजलनं ‘बायफ’ या उरुळीकांचन इथं असलेल्या मध्यवर्ती संशोधन केंद्रात पशुसंवर्धनाविषयीची (Semen freezing activity quality testing) फेलोशिप करायचं ठरवलं. दुसरीकडे त्यानं नागपूरच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयातून विज्ञान शाखेतली जैवतंत्रज्ञानाची पदवीही प्राप्त केली. 


‘बायफ’ ही संस्था गांधीजींचे अनुयायी मणिभाई देसाई यांनी पुण्याजवळ उरुळीकांचनमध्ये १९७३ साली स्थापन केली. गांधीजींनी मणिभाईंवर तिथल्या निसर्गोपचार केंद्राचीही जबाबदारी सोपवली. त्या वेळी उरुळीकांचन हे गाव दुष्काळ आणि गरिबी यांनी ग्रासलेलं होतं. गोपालनातून आर्थिक उन्नती कशी होऊ शकेल, याच एका विचारानं मणिभाईंना झपाटलं. या झपाटलेपणातूनच ‘बायफ’ या संस्थेचा जन्म झाला. उरुळीकांचनमध्ये सुरुवातीला देशी गायींचं पालन आणि संवर्धन होत असे; पण नंतर असं लक्षात आलं, की देशी गायींच्या दुग्धोत्पादनात वाढ करण्यासाठी काही तरी प्रयत्न करायला पाहिजेत. मग मणिभाईंनी भरपूर दूध देणाऱ्या गायींच्या प्रजाती विदेशातून उरुळीकांचनला आणल्या. त्या गायींचा संकर करून त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना जास्त दूध देणाऱ्या गायी मिळवून दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होऊ लागला. संकर होण्याच्या प्रक्रियेसाठी कृत्रिम पद्धतीनं रेतन करणं आवश्यक होतं; पण त्याचबरोबर वेगवेगळ्या अवस्थेतून जाणाऱ्या प्रयोगशाळेचीही आवश्यकता होती. मणिभाईंनी तिचीही उभारणी केली. आज या प्रयोगशाळेमध्ये उत्कृष्ट वंशावळीच्या शुद्ध जातींच्या वळूंचं वीर्य गोठीत करून शेतकऱ्यांकडल्या गायींना कृत्रिम रेतनाद्वारे गर्भधारणा केली जाते. त्यामुळे या गायींच्या पोटी चांगली वासरं जन्माला येतात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. आज उरुळीकांचन हा गरिबीनं ग्रासलेला भाग राहिला नसून, मणिभाईंच्या प्रयत्नांमुळे आणि परिश्रमामुळे तो सधन शेतकऱ्यांचा भाग म्हणून ओळखला जातो. हे सगळं घडलं ‘बायफ’ या संस्थेमुळे!

सजलनं उरुळीकांचनला आल्यानंतर लगेचच आपल्या संशोधनकार्याला सुरुवात केली. आसपास असलेली शेतकऱ्यांची घरं त्याला आपलीशी वाटू लागली. त्या त्या घरातल्या जनावरांशी त्याची दोस्ती झाली, इतकी की काही वेळा त्या शेतकऱ्याला दूध काढायला त्याचीच गाय हात लावू देत नसे; पण सजलचा स्पर्श होताच ती निमूटपणे त्याला दूध काढण्यासाठी परवानगीच देत असे. सजल उरुळीकांचनच्या गोठ्यांमध्ये रमला. इथल्या प्रयोगशाळेत त्यानं वळूच्या वीर्यतपासणीवरून वळूची गुणवत्ता तपासायला सुरुवात केली. त्यात त्यानं स्ट्रेस टेस्ट, रिअॅक्टिव्हिटी टेस्ट, क्रोमॅटिन डॅमेज अॅसे अशा टप्प्यांतून अभ्यास केला. 

आपल्या देशात देशी जनावरांची म्हणजेच गायी आणि बैल यांची उत्पादकता वाढवण्यासाठी विदेशी वाण आणून नवी संकरित पिढी तयार केली जाते. सजलला या ‘आर्टिफिशियल इन्सेमिनेशन’चं आणि कृत्रिम बीजधारणेचं म्हणजेच संकरित जनावरांच्या पुनरुत्पादनाचं आणि संवर्धनाचं तंत्रज्ञान कसं असतं, याचं शिक्षण उरुळीकांचनच्या प्रयोगशाळेत मिळालं. आपल्याकडली देशी जातींची जनावरं स्थानिक आणि भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेतात. त्यांना त्या त्या ठिकाणी कसं जगायचं, आहे त्या बदलत्या परिस्थितीत तग धरून कसं राहायचं हे शिकवावं लागत नाही. तसंच शेतकऱ्यांना असलेल्या जनावरं पाळण्याच्या अनेक पिढ्यांच्या अनुभवामुळे त्या वाणाची पुरेशी माहिती असते. विदेशी जनावरांच्या बाबतीत मात्र त्यांना वेगळ्या वातावरणात तग धरून राहणं कठीण जातं. या सगळ्या प्रयोगांचा आनंद त्याला रोजच वेगळ्या तऱ्हेनं मिळत होता. 

सजल नागपूरमध्ये राहून काम करतो. नागपूर शहराला रोज वीस ते पंचवीस लाख लिटर दूध लागतं आणि संपूर्ण विदर्भातले अकरा जिल्हे मिळून जेमतेम सव्वाआठ लाख लिटर दुधाची गंगा वाहते. गंमत म्हणजे तिथल्या स्थानिक गायींचं वाण कुठलं आहे, त्यांची नावं काय आहेत, त्यांच्या क्षमता काय आहेत याविषयी कुठलीही माहिती उपलब्ध नव्हती. केवळ शंभर म्हशी खरेदी करतो म्हणणं आणि एक डेअरी चालवतो म्हटल्यानं पुरेसं ज्ञान मिळत नाही. हे सगळं लोकांचं अज्ञान पाहून सजल कंबर कसून कामाला लागला. सध्या तो विदर्भातल्या गावरान गायींचं वर्गीकरण करतो आहे. सतत आदिवासी भागांत, खेड्यापाड्यात ऊनपावसाची पर्वा न करता फिरतो आहे. त्यांच्यात राहतो आहे, त्यांच्याशी संवाद साधतो आहे. यातून त्याला खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळते आहे. आदिवासी, गोवारी आणि कामाठी यांचं परंपरागत पशुधन काय आहे, ही मंडळी कुठली कामं किती करतात, त्यांच्याजवळच्या गायी-म्हशी किती दूध देतात, त्यांना कुठले आजार होतात, अशा वेळी हे लोक आपल्या प्राण्यांवर कोणते उपचार करतात, लोकसंस्कृतीमध्ये या पशूंचं स्थान काय आहे, अशा अनेक मुद्द्यांवर सजलचा अभ्यास सुरू आहे. 

लवकरच त्याचा हा अभ्यास (डिसेंबर २०१७) पूर्ण होणार असून, ‘नॅशनल ब्यूरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिर्सोसेस’ या संस्थेमार्फत विदर्भातल्या गायी-बैलांची ओळख करून देण्याचा त्याचा प्रयत्न सफल होण्याच्या मार्गावर आहे. सजलच्या प्रयत्नांमधून विदर्भातल्या गायी-वासरांची सरकारपातळीवर दखल घेतली जाऊ शकेल. या सगळ्या प्रयत्नांमुळे जनावरांच्या संवर्धनाचा, आणि पुरेसं स्थानिक पशुधनवाढीचा मार्ग आणखी विस्तारित होऊ शकेल. 

शोध सुरू असताना सजलला विदर्भात काही गायी दिसल्या. इतर गायींपेक्षा त्या वेगळ्या असल्याचं त्याला जाणवलं. तशा प्रकारच्या गायी कुठे कुठे आहेत आणि त्यांना काय नावानं ओळखलं जातं, याचा छडा लावण्यासाठी तो जंग जंग फिरला. जी गाय आतापर्यंत ‘गावरान’ याच नावाखाली ओळखली जायची; पण ती एक वेगळी जात आहे हे त्याच्या लक्षात आलं. पूर्व विदर्भामध्ये गौंड आदिवासींच्या गावांमध्ये एकसारख्या दिसणाऱ्या गायी आढळतात. परंतु त्यांची सरकारदरबारी नोंद होताना मात्र ‘गावरान’ या एकाच गटात केलेली दिसून येते; मात्र प्रत्यक्षात सजलनं आदिवासींशी सातत्यानं संवाद साधल्यावर त्याच्या असं लक्षात आलं, की या गायी गावरान गायींपेक्षा वेगळ्या आहेत. आणि मग यांची जात वेगळी म्हणजे नेमकी कुठली याचा शोध सुरू झाला. तेव्हा त्यानं संयुक्त राष्ट्रांची फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन (एफएओ), तसंच भारतातल्या ‘नॅशनल ब्यूरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसोर्सेस’ यांनी जी पद्धत सांगितलेली होती, ती वापरून या गायींच्या प्रजातीचा जास्त अभ्यास सुरू केला. या पद्धतीवरून एखाद्या भागातल्या पशूंची विशिष्ट प्रजाती आहे की नाही हे समजू शकतं. ती पद्धत वापरल्यावर या गायी गावरान नसून त्या वेगळ्याच जातीच्या आहेत हे सजलच्या लक्षात आलं. त्या गायींच्या गुणवत्ता तपासणीचं काम सजलनं हाती घेतलं आणि शास्त्रीय पद्धत वापरून सजलनं विदर्भातल्या गायींची ‘कठानी’ ही जात शोधून काढली आणि आपलं म्हणणं सिद्ध करून दाखवलं. 

या संदर्भातला शोधनिबंध (शोधनिबंधाचा विषय - मॅनेजमेंट अँड फिजिकल फीचर्स ऑफ ट्रायबल कठानी कॅटल इन विदर्भ) ‘इंडियन जर्नल ऑफ अॅनिमल सायन्स’ या प्रतिष्ठित आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर लगेचच ‘इंटरनॅशनल एन्सायक्लोपीडिया ऑफ लाइव्हस्टॉक’ यांनी सजलच्या या शोधाची माहिती कळताच त्याच्याशी संपर्क साधला आणि या संदर्भात माहिती विचारून त्याच्या या शोधाची दखल घेतली आहे. 

सजलला कविता (विशेषतः ग्रेस आणि सुरेश भट यांच्या) आणि गाणी आवडतात, त्याला संगीत आवडतं आणि नाटकंही आवडतात. वेळ मिळाला, की या गोष्टी त्याला ताजंतवानं करतात. सजल जसा पशुवेडा आहे, तसाच तो जंगलवेडाही आहे. त्याला जंगलात भटकंती करायला आवडतं. सजलनं पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्याबरोबर मेंढा गावाच्या वनसंपत्तीचं मोजमाप करण्यासाठी काम केलं. त्यांना साहाय्य करताना खूप शिकायला मिळाल्याचं तो सांगतो. जंगलांचं संवर्धन व्हावं, यासाठी पूर्वजांनी देवराया निर्माण केल्या, त्यांची जपणूक व्हावी, स्थानिक पशुधनाची वाढ व्हावी, ठिकठिकाणी विकेंद्रित पशुसंशोधन संवर्धन केंद्रं निर्माण व्हावीत, स्थानिक पशूंचं गुणबीज जपणाऱ्या ‘जर्मप्लाझम’ बँका निर्माण व्हाव्यात असं सजलला वाटतं आणि ते होण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. 

जगात सगळ्यात जास्त पशूंची संख्या भारतात असून, उत्पन्नाच्या दृष्टीनंही आपण पशूंचा काहीच उपयोग करत नाही, असं सजलला वाटतं. भारतीय उपखंडात शेती आणि पशुपालन हे व्यवसाय परस्परांवर अवलंबून आहेत. यात स्थानिक जनावरांच्या जातीला खूप मोलाचं स्थान आहे. जैवविविधता संवर्धनात स्थानिक पशूंच्या जाती हा विषय खूप कळीचा आहे. या जाती तयार होण्यात त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांची भूमिका महत्त्वाची समजली जाते. ही मंडळी या जातींचं जतन करतात किंवा संकर करून त्या वाढवतात. खऱ्या अर्थानं ही मंडळी जनुकरक्षक आहेत. त्यामुळे अशा जाती शोधून काढणं आवश्यक आहे असं सजलला वाटतं आणि तो याच कामात मग्न आहे.

सजलला भविष्यात विदर्भातल्या स्थानिक गायींच्या प्रजातींचं संवर्धन आणि संशोधन यावर काम करायचं आहे. तसंच विदर्भातल्या जैवविविधतेचा अभ्यास आणि संवर्धनासाठी प्रयत्न करायचे आहेत. आज भारत जागतिकीकरणाच्या भूलभुलैयात अडकत चालला आहे. चमको आणि ‘यूज अँड थ्रो’ संस्कृतीनं माणसांवर अतिक्रमण केलं आहे. व्यक्तिकेंद्रित समाज आपल्याच कोषात मग्न होत चालला आहे. अशा परिस्थितीत मुळातच असलेली गरीब-श्रीमंत दरी आणखीच वाढत चालली आहे. ही दरी दूर कशी करता येईल हा विचार युवांनी करायची आवश्यकता असल्याचं सजलला वाटतं. गरिबी दूर झाली, तरच आपण शाश्वत विकासाच्या दिशेनं वाटचाल करत असू, असंही त्याला ठामपणे वाटतं. 

संपर्क :
सजल कुलकर्णी 
मोबाइल : ९८८१४ ७९२३९
ई-मेल : sajalskulkarni@gmail.com

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

(‘अनवट वाटेवरचे वाटसरू’  हे सदर दर पंधरा दिवसांनी गुरुवारी प्रसिद्ध होते.)

(एका खासगी वृत्तवाहिनीवर झालेली सजलची मुलाखत पाहण्यासाठी https://youtu.be/FdGDHck-7LI या लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi