Ad will apear here
Next
‘झगमगाट नसलेली आपलेपणाची दिवाळी’


‘कोकणातील मुख्य पीक असलेला भात दिवाळीच्या आधी तयार होत असल्याने त्या वेळी कोकणात दिवाळीच्या पहिल्या दिवशी सर्व प्रकारचे पोहे खायची पद्धत होती. एकंदरीत दिवाळीत झगमगाट नव्हता; पण ती आपलेपणाची होती...’ सांगत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर... ‘आठवणीतली दिवाळी’ या सदरात...

........
डॉ. श्रीरंग कद्रेकरमाझा जन्म १९२८ सालचा. मला आठवतेय ती १९३५च्या आसपासची दिवाळी. तेव्हा आम्ही मराठी शाळेत जात असू. दिवाळीची चाहूल आम्हाला आठ-दहा दिवस आधीच लागायची. कारण प्रत्येक घरामध्ये त्या वेळी पोहे कांडले जायचे. कांडणे हा एक विशिष्ट शब्द आहे. कोकणात पिकणाऱ्या भात या पिकापासून हे पोहे कांडले जात. भाताचे दाणे रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी ते गरम करून तीन ते चार बायका ते उखळीत टाकून मुसळीने कांडत असत आणि मग त्याची पाखडणी होऊन गरम गरम पोहे तयार होत असत. हा सर्व प्रकार आठ-दहा दिवस आधीपासून सुरू व्हायचा.

नरक चतुर्दशीच्या दिवशी भल्या पहाटे थंडीतून उठून घरी तयार केलेले उटणे, गोदरेजचा सुगंधी साबण लावून आम्ही अभ्यंगस्नान करायचो. साधारण आठ ते साडेनऊ वाजेपर्यंत एकत्र बसून फराळ करायचो. पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढून केळीच्या पानावर फराळ दिला जायचा. त्यात मुख्यत्वेकरून गूळ पोहे, दूध पोहे, कांदे पोहे असे निरनिराळे प्रकार असायचे. गोडाचा पदार्थ म्हणून कोकणात प्रामुख्याने बोरे केली जायची. बोरे म्हणजे शंकरपाळ्यांचाच प्रकार, फक्त त्यांचा आकार गोल असायचा. ही बोरे त्या वेळी खूप प्रसिद्ध असायची. कोणाची कडक असायची, तर कुणाची नरम असायची. याशिवाय चकली, करंजी असायचीच; पण लाडू हा प्रकार क्वचित असायचा. कारण गावात सर्वसामान्य कुटुंबे होती. त्यामुळे या गोष्टी परवडत नव्हत्या.

संध्याकाळी देवळात जाऊन देवाचे दर्शन घ्यायचो. त्यानंतर घरी स्वतः बनवलेला कागदाचा कंदील लावला जायचा. त्या वेळी वीज नसल्याने त्यात पणती ठेवली जायची. पणतीची फार काळजी घ्यावी लागायची. आमच्या घराला व्हरांडा होता. तिथेही पणत्या लावल्या जायच्या, असा आमचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम असायचा.

आताची दिवाळी म्हणाल, तर सगळी रेडीमेड आहे. घरातली स्त्री दिवसभर ऑफिसमध्ये असल्याने तिला घरात फराळ करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे विकतचा फराळ आणून दिवाळी साजरा करण्यावर भर दिला जात आहे. आज बाजारात हरतऱ्हेचे आकाशकंदील उपलब्ध आहेत. रोषणाईची पद्धतही बदलली आहे. लायटिंगवर भर दिला जात असल्यामुळे पणती काही ठिकाणीच दिसते. पूर्वी संपूर्ण आरास पणत्यांनी केली जायची. आता लायटिंगमुळे झगमगाट मोठा होतो. हे दिवस अमावस्येचे असल्याने पणतीच्या मंद प्रकाशात परिसर उजळून निघत होता. आजच्या या दिखाव्याच्या झगमगाटात आपलेपणा कमी होतो आहे.

(शब्दांकन-व्हिडिओ : कोमल कुळकर्णी-कळंबटे)


(‘आठवणीतली दिवाळी’ या दिवाळी अंकातले सर्व लेख एकत्रितरीत्या येथे उपलब्ध होतील.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language