Ad will apear here
Next
ग. दि. माडगूळकर
‘अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव, पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव; बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी, ‘मम प्रीति आहे जडली तुजवर राणी’ अशी अत्यंत तरल हळुवार प्रेमभावना आपल्या ‘जोगिया’ या विलक्षण कवितेतून मांडणारे आणि जणू साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले महाराष्ट्राचे अत्यंत महान कवी आणि गीतकार गजानन दिगंबर माडगूळकर यांचा एक ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्याविषयी...
................ 
मराठी जनमानसात विशेष आदराचं स्थान मिळवलेले सिद्धहस्त, प्रतिभावंत कवी आणि गीतकार गजानन दिगंबर माडगूळकर ऊर्फ ‘गदिमा’ यांची आज जयंती. अत्यंत सहजस्फूर्त अप्रतिम भाषारचना आणि शब्दांची नेमकी आणि अचूक निवड हे त्यांच्या गीतांचं वैशिष्ट्य. ‘गीतरामायण’सारख्या अलौकिक रचनेबद्दल त्यांना लोकांनी प्रेमाने ‘महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी’ अशी उपाधी बहाल केली होती. 

एक ऑक्टोबर १९१९ रोजी सांगली जिल्ह्यात जन्मलेल्या ‘गदिमां’नी लौकिकार्थानं शिक्षण घेतलं नसूनही साक्षात सरस्वतीच्या वरदहस्तामुळे मिळालेल्या असामान्य प्रतिभेच्या बळावर एकाहून एक सरस काव्यं आणि गीतं रचली आणि मराठी भावगीतांच्या आणि चित्रपटगीतांच्या क्षेत्रात न भूतो न भविष्यति असं प्रचंड काम करून ठेवलं. चित्रपटक्षेत्रात त्यांनी कथा, पटकथा, संवाद आणि गीतांच्या जोडीनं अभिनयसुद्धा केला. त्यांची काव्यप्रतिभा एवढी विलक्षण होती, की त्यांच्या लेखणीतून चित्रपटातल्या प्रसंगानुरूप आवश्यक ते भाव, त्या प्रसंगातल्या गीतांमधून अत्यंत अचूकपणे आणि नेमकेपणे प्रकट होत असत. ‘फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार’ किंवा ‘इंद्रायणीकाठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची’यांसारखी अत्यंत प्रासादिक आणि रसाळ भक्तिगीतं असोत किंवा ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू’ सारखं वीररसानं भरलेलं स्फूर्तिगीत असो, ‘नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी’सारखं प्रेमाची हळुवार चाहूल देणारं प्रेमगीत असो, ‘बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला गं जाता साताऱ्याला’ सारखी नखरेल, नटखट लावणी असो किंवा मग ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती कुश-लव रामायण गाती’ने सुरू होणारं गीत रामायणासारखं अद्भुत आणि विलक्षण काव्य असो – ‘गदिमां’च्या लेखणीला कोणताही काव्यप्रकार अशक्य नव्हता. साक्षात सरस्वतीचं वरदान लाभलेले ‘गदिमा’ हे शीघ्रकवीही होते.
 
त्यांचं विशेष आणि विलक्षण ट्युनिंग जमलं ते संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्याशी आणि या जोडीनं मराठी मनांवर गारूड केलं आणि त्यांच्या शेकडो गाण्यांनी मराठी मनावर जे राज्य केलं ते आजतागायत! किंबहुना माडगूळकर-फडके जोडीच्या काळाला मराठी चित्रपटसृष्टीचं सुवर्णयुग मानलं जातं यातच सर्व काही आलं!

एकीकडे भक्तिगीतं, चित्रपटगीतं, लावण्या, भावगीतं, स्फूर्तिगीतं लिहिणाऱ्या ‘गदिमां’नी लहान मुलांचं भावविश्व जाणून घेऊन त्यांच्यासाठीसुद्धा एकाहून एक सरस बालगीतं लिहून तो काव्यप्रांतसुद्धा श्रीमंत केला आहे. ‘नाच रे मोरा’, ‘शेपटीवाल्या प्राण्यांची’, ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’, ‘ झुक झुक झुक झुक आगीनगाडी’, ‘चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी’  अशा त्यांच्या कित्येक बालगीतांनी आपल्या सर्वांचंच बालपण समृद्ध केलंय. 

त्यांच्या प्रतिभेचा एक विलक्षण मनोरम आविष्कार म्हणजे ‘जोगिया’ ही कविता -

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहिले देठ, लवंगा, साली
झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलुनि तू दार दडपिलें पाठी
हळुवार नखलीशी पुन: मुलायम पान
निरखिसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते?- गौर नितळ तव कंठी -
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.
साधता विड्याचा घाट उमटली तान,
वर लवंग ठसता होसी कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने,
‘का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?’
त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा
‘मी देह विकुनीया मागून घेते मोल,
जगविते प्राण हे ओपुनीया ‘अनमोल’,
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा,
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा.
शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम,
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान...तो निघून गेला खाली
अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव;
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
‘मम प्रीति आहे जडली तुजवर राणी’
नीतिचा उघडिला खुला जिथें व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हांसून म्हणाल्यें, ‘दाम वाढवा थोडा...
या पुन्हा, पान घ्या...’ निघून गेला वेडा!
राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात,
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत,
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला?
तो हाच दिवस, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत,
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला.
हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान,
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा ‘जोगिया’ रंगे.

(ग. दि. माडगूळकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. गदिमा आणि त्यांचे साहित्य, तसेच अन्य विषयांवरील साहित्य वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi