Ad will apear here
Next
अमित पंघल बॉक्सिंग ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’च्या अंतिम फेरीत जाणारा पहिला भारतीय
अमित पंघल

नवी दिल्ली :
भारताचा मुष्टियोद्धा अमित पंघल याने इतिहास रचला आहे. वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप अर्थात जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होणारा पहिला भारतीय पुरुष मुष्टियोद्धा बनण्याचा विक्रम त्याने केला आहे. ५२ किलो फ्लायवेट प्रकारात कझाकस्तानच्या साकेन बिबोस्सिनोव्ह या खेळाडूसोबत झालेल्या चुरशीच्या उपांत्य लढतीत त्याला हरवून अमित अंतिम फेरीत दाखल झाला आहे. २१ सप्टेंबर रोजी उझबेकिस्तानच्या शाखोबिदिन झॉयरोव्हशी त्याचा सामना होणार आहे. बिलाल बेन्नामा या फ्रेंच मुष्टियोद्ध्याला हरवून झॉयरोव्ह अंतिम फेरीत दाखल झाला आहे. रशियात ही स्पर्धा सुरू आहे.   

दरम्यान, याच स्पर्धेत ६३ किलो वजनी गटातून भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या मनीष कौशिकला उपांत्य सामन्यात क्यूबाच्या अँडी गोमेझ क्रूझकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या खात्यात आतापर्यंत सहा पदके असून, त्यापैकी पाच कांस्यपदके आहेत.

भारताला आतापर्यंत जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत एकाच वेळी एकापेक्षा अधिक कांस्यपदके आतापर्यंत कधीही मिळालेली नाहीत; मात्र हा इतिहास या वर्षी अमित आणि मनीषच्या कामगिरीने बदलला आहे. यापूर्वी विजेंदरसिंह (२००९), विकास कृष्णन (२०११), शिव थापा (२०१५) आणि गौरव बिधुरी (२०१७) या खेळाडूंनी या स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवलेले आहे.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजयी होऊन अमित सुवर्णपदक मिळवतो का, याकडे भारतीयांचे लक्ष लागलेले आहे. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही अमितकडून चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा आहेत.

अमितची प्रेरणादायी वाटचाल
अमितचे वडील चौधरी वीरेंद्रसिंह पंघल हे शेतकरी आहेत. १६ ऑक्टोबर १९९५ रोजी हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मायना गावात जन्मलेल्या अमितला भाऊ अजय याच्याकडून बॉक्सिंगची प्रेरणा मिळाली. त्याचा भाऊ हौशी मुष्टियोद्धा होता. आता लष्करात असलेल्या अजयमुळेच आपण या खेळात आल्याचे आणि तोच आतापर्यंत आपल्याला लाभलेला सर्वोत्तम प्रशिक्षक असल्याचे अमित सांगतो. 

‘अजय मला चालींचे मार्गदर्शन करतो आणि प्रत्येक सामन्यापूर्वी मी त्याच्याशी बोलतो,’ असे अमितने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पूर्वी सांगितले होते. दोन्ही मुलांच्या प्रशिक्षणाचा खर्च कुटुंब पेलू शकत नसल्याने अजयने स्वतः मागे राहून अमितला या खेळात आणले. अमितने हा विश्वास सार्थ ठरवला. २०१७मध्ये राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेपासून त्याची कारकीर्द सुरू झाली. या पहिल्याच स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळवले. २०१७मध्येच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्यानंतर त्याचे नाव प्रसिद्ध झाले. 

आशियाई स्पर्धेतील त्या पदकामुळे जागतिक स्पर्धेची दारे त्याच्यासाठी उघडली गेली; मात्र त्या वर्षी उपांत्यपूर्व सामन्यात हसनबॉय दुस्मातोव्हकडून पराभाव स्वीकारावा लागला. त्यानंतर २०१८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावले. तसेच, त्यानंतर २०१८मध्येच बँकॉकला झालेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळवले होते. 

ऑलिम्पिकमधून ४९ किलो वजनी गट काढून टाकण्यात आल्यामुळे अमितला गटात बदल करावा लागला. त्यामुळे आता तो ५२ किलो वजनी गटातून खेळतो.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi