Ad will apear here
Next
‘हाउडी मोदी?’; ‘सगळे छान चालले आहे!’
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्यूस्टनमधील सभेला अभूतपूर्व प्रतिसाद
ह्यूस्टन : ‘१३० कोटी भारतीयांच्या आदेशानुसार काम करणारा मी एक सामान्य माणूस आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा ‘हाउडी मोदी’ (मोदी, तुम्ही कसे आहात) असा प्रश्न विचारता, तेव्हा तो प्रश्न साऱ्या भारतीयांसाठी असतो. म्हणूनच त्या प्रश्नाचे उत्तर मी साऱ्या भारतीयांच्या वतीने देतो आहे. भारतात सगळे छान चालले आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना केल्या.

अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्यूस्टनमधील एनआरजी स्टेडिअममध्ये २२ सप्टेंबरला झालेल्या ऐतिहासिक सभेच्या वेळी ५० हजार भारतीय-अमेरिकी नागरिकांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. ‘हाउडी मोदी’ या प्रश्नाचे उत्तर केवळ इंग्रजी आणि हिंदीतच नव्हे, तर तमिळ, तेलुगू, गुजराती, मराठी अशा अनेक भारतीय भाषांमध्ये देऊन पंतप्रधानांनी अमेरिकेच्या भूमीवर भारताच्या विविधतेतील एकतेचे दर्शन घडविले. ‘शेअर्ड ड्रीम्स, ब्राइट फ्युचर्स’ असे घोषवाक्य असलेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपापल्या भाषणांतून परस्परांचे, परस्परांच्या देशांचे आणि तेथील नागरिकांचे कौतुक केले आणि परस्परसहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याच्या आणाभाका घेतल्या. दोन्ही देश एकमेकांना पूरक कसे आहेत आणि दहशतवादासारख्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर लढण्यासाठी दोन्ही देशांना एकमेकांचा कसा उपयोग होणार आहे, याचा उच्चार दोन्ही नेत्यांनी केला. पंतप्रधान मोदींनी हिंदीतून भाषण केले. आपल्या सरकारने केलेल्या कामांचा धावता आढावाही त्यांनी घेतला.

‘हिस्ट्री’ आणि ‘केमिस्ट्री’
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘या इथे दिसणारी प्रचंड गर्दी, ऊर्जा हे भारत-अमेरिकेतील वाढत्या मैत्रीचे द्योतक आहे. आज नवा इतिहास (हिस्ट्री) आणि मैत्रीचे नवे समीकरण (केमिस्ट्री) तयार होत आहे. अध्यक्ष ट्रम्प, तसेच डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते इथे माझे अभिनंदन करण्यासाठी उपस्थित आहेत. हा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना, तसेच १३० कोटी भारतीयांना केलेला सलाम आहे.’विविधतेत एकता
‘भारतात विविध भाषा, विविध प्रकारच्या संस्कृती वर्षानुवर्षे सुखेनैव नांदत आहेत. विविधतेत एकता हा आमचा वारसा आहे, तेच आमचे वैशिष्ट्य आहे आणि तेच आमच्या लोकशाहीचे वेगळेपण आहे. तीच आमची ऊर्जा आणि तीच आमची प्रेरणा आहे. आम्ही कुठेही गेलो, तरी विविधता आणि लोकशाहीची तत्त्वे आमच्यासोबत घेऊन जातो,’ असे मोदींनी सांगितले.

‘अलीकडेच झालेल्या लोकशाहीच्या मोठ्या उत्सवात म्हणजेच लोकसभा निवडणुकीत ६१ कोटी मतदारांनी मतदान केले. यंदा सर्वाधिक महिला मतदारांनी मतदान केले आणि सर्वाधिक महिला उमेदवार निवडूनही आल्या. हे सगळे मोदीमुळे नव्हे, तर साऱ्या भारतीयांमुळे घडले आहे,’ असे पंतप्रधानांनी नमूद केले.

‘आम्ही बदलत आहोत’
‘आज भारतीय बदलत आहेत, बदल घडू शकत नाही असे म्हणणाऱ्या आव्हान देत आहेत. आम्ही उच्च ध्येये ठेवत आहोत आणि ती साध्यही करत आहोत,’ हेही मोदींनी अभिमानाने सांगितले. ‘इज ऑफ लिव्हिंग’ (जगणे सुलभ करणे) याला आपल्या सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.  

‘माहिती हे नवे सोने’
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत घेत असलेल्या आघाडीबद्दल आणि डिजिटल होण्याच्या दिशेने चाललेल्या वाटचालीबद्दलही मोदींनी भाष्य केले. ‘डेटा इज द न्यू ऑइल असे म्हटले जाते. मी असेही म्हणेन की ‘डेटा इज दी न्यू गोल्ड.’ (डेटा हे नवे सोने आहे) चौथी औद्योगिक क्रांती डेटाच्या माध्यमातूनच होणार आहे. भारतात सर्वांत स्वस्त डेटा उपलब्ध आहे. एक जीबी डेटा केवळ २५ ते ३० सेंट एवढ्या कमी किमतीत उपलब्ध आहे,’ असे मोदी म्हणाले. 

कलम ३७० हटवल्याबद्दल सर्व खासदारांचे कौतुक
कलम ३७० हटविण्याची उत्कृष्ट कामगिरी भारताच्या सर्व खासदारांनी केल्याबद्दल मोदींनी कौतुकोद्गार काढले. ‘अनेक वाईट गोष्टींना आम्ही निरोप दिला. त्यात काश्मीरसाठीच्या कलम ३७०चाही समावेश होता. या कलमामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना विकासापासून दूर राहावे लागले. फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांनी या कलमाचा फायदा घेतला. आता मात्र हे कलम हटविल्यामुळे या भागातील नागरिकांनाही इतर भारतीयांप्रमाणेच सर्व अधिकार मिळाले आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी या मुद्द्यावर अनेक तास चर्चा केली आणि ती साऱ्या जगाने थेट पाहिली. राज्यसभेत आमच्या पक्षाला बहुमत नव्हते, तरीही दोन्ही सभागृहांनी दोन-तृतीयांश बहुमताने तो ठराव मंजूर केला. त्यामुळे देशाच्या साऱ्या खासदारांचे कौतुक करायलाच हवे,’ असे मोदी म्हणाले. उपस्थितांनी साऱ्या खासदारांना उभे राहून मानवंदना (स्टँडिंग ओव्हेशन) द्यावे, असे आवाहन मोदींनी केले.

महाशक्तीसमोर पाकिस्तानला इशारा
पाकिस्तानचे नाव न घेता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमोर दहशतवादाविरोधातील लढाई तीव्र करण्याचा मुद्दा पंतप्रधानांनी ठामपणे मांडला. ‘जे स्वतःचा देशही सांभाळू शकत नाहीत, ते भारताच्या या कृतीमुळे अडचणीत आले आहेत. भारताबद्दल द्वेष पसरवणे हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. ते दहशतवादाला बळ देतात, दहशतवाद्यांना पोसतात. केवळ तुम्हीच नव्हे, तर सारे जगच जाणते, की हे लोक कोण आहेत! अमेरिकेतील ९/११ चा हल्ला असो किंवा मुंबईवरील २६/११चा हल्ला असो, त्याचे कर्तेधर्ते कुठे आहेत, हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे दहशतवादाविरोधात आणि दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांविरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे,’ असे मोदी म्हणाले. या सगळ्याविरोधात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठामपणे उभे आहेत, त्याबद्दल त्यांना उभे राहून मानवंदना द्यावी, असे आवाहन मोदींनी केल्यानंतर सारे सभागृह उभे राहिले.

‘ट्रम्प मला टफ निगोशिएटर (ज्यांच्याशी वाटाघाटी करणे अवघड जाते, अशी व्यक्ती) म्हणतात; पण करार करण्याच्या बाबतीत ते स्वतः माहीर आहेत. मी स्वतः त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत आहे,’ असेही मोदींनी नमूद केले. 

मोदींची कविता
वो जो सामने मुश्किलों का अंबार है,
वही तो मेरे हौसलों की मीनार है।
आपल्या कवितेच्या या दोन ओळी पंतप्रधान मोदींनी सादर केल्या. त्यातून देशवासीयांच्या जिद्दीचे वर्णन त्यांनी केले.

भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. त्यात शास्त्रीय संगीत आणि नृत्याचाही समावेश होता. जन्मतःच ‘ब्रिटल बोन डिसीज’ हा असाध्य विकार असूनही संगीत क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारा स्पर्श शाह या मुलाने राष्ट्रगीत सादर केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ओळख करून देऊन त्यांना भाषणासाठी निमंत्रित केले. त्या वेळी मोदींनी त्यांचे कौतुक केले. ‘अब की बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणाही त्यांनी दिली. ‘भारतासोबत काम करण्यास उत्सुक’
ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे सर्वांत महान आणि सर्वांत निष्ठावान मित्र आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विकसित होत असल्याचे सारे जग पाहते आहे. त्यांच्या विकासाभिमुख धोरणांमुळे ३० कोटींहून अधिक नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत आणि हा मोठा आकडा आहे. भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक आमच्या देशाला बळकट करण्यासाठी मोठा हातभार लावत आहेत. दोन्ही देश समृद्ध करण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.’

‘नोव्हेंबरमध्ये दोन्ही देशांच्या लष्कराच्या तिन्ही दलांचा संयुक्त सराव होणार असून, ‘टायगर ट्रायम्फ’ असे त्याचे नाव आहे. त्यातून आपल्या संरक्षणविषयक भागीदारीची नाट्यमय प्रगती दिसून येईल,’ असेही ट्रम्प म्हणाले. 

भारताची अमेरिकेतील गुंतवणूक वाढली
‘भारताने आजपर्यंत अमेरिकेत एवढी गुंतवणूक कधीही केलेली नाही, जेवढी आज केली जात आहे,’ असे सांगून ट्रम्प यांनी ‘जिंदाल स्टील’चे नाव घेतले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय कंपनीचे नाव भाषणात घेतले जाण्याची वेळ अत्यंत दुर्मीळ होती. ओहियोतील बंद पडलेला स्टील उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी सज्जन जिंदाल यांच्या जेएसडब्ल्यू ग्रुपने ५०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ‘आम्हीही भारतात गुंतवणूक करत आहोत,’ असेही ट्रम्प यांनी सांगितले.

पाकिस्तानला सज्जड दम
‘सीमांचे संरक्षण हा मुद्दा आमच्यासाठीही महत्त्वाचा आहे आणि भारतासाठीही. मूलतत्त्ववादी इस्लामिक दहशतवादापासून सामान्य नागरिकांचे, स्वातंत्र्याचे संरक्षण करणाऱ्या दोन्ही देशांच्या लष्करी जवानांचा आम्ही सन्मान करतो,’ याचा ट्रम्प यांनी आवर्जून उल्लेख केला आणि पाकिस्तानला नाव न घेता सज्जड दम दिला. त्यांनी मुंबईत होणार असलेल्या एनबीए बास्केटबॉल स्पर्धेला येण्याची तयारी दर्शविली. 

कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा हात हातात घेऊन संपूर्ण स्टेडिअममध्ये फेरी मारली. जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांनी हातात हात घेतले, तर काय घडू शकते, याची चुणूक या सभेत पाहायला मिळाली.
  
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये :
- अमेरिकेच्या भूमीवर दुसऱ्या देशाच्या लोकनियुक्त नेत्याच्या (पोपव्यतिरिक्त) कार्यक्रमाला ५० हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती हा एक विक्रम असल्याचे मानले जाते. 

- तसेच, अमेरिकेच्या भूमीवर परदेशी पंतप्रधानांसाठी त्याच देशाच्या नागरिकांनी आयोजित केलेल्या भव्यदिव्य कार्यक्रमाला साक्षात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उपस्थित राहण्याचा प्रसंग अतिदुर्मीळ मानला जातो.

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणत्याही कार्यक्रमात भाषण करत असतील, तर त्यांच्यासमोरील डेस्कवर (लेक्टर्न) अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे चिन्ह (प्रेसिडेन्शियल सील) असते. ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात मात्र यात बदल केला गेला. ट्रम्प यांच्यासमोरील लेक्टर्नवर ‘भारत-अमेरिका मैत्री’चे चिन्ह प्रदर्शित करण्यात आले होते. भारतीय वंशाच्या सुमारे चाळीस लाख नागरिकांचे अमेरिकेसाठीचे योगदान किती महत्त्वाचे आहे, तसेच भारत-अमेरिका मैत्री किती पुढच्या टप्प्यावर आली आहे, याचे हे निदर्शक आहे.

- मोदी यांचे ह्यूस्टनच्या सभेत झालेले जोरदार स्वागत आणि तेथे उपस्थित असलेल्या प्रचंड मोठ्या जनसमुदायाचे व्हिडिओ परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी ट्विट केले होते. ते डोनाल्ड ट्रम्प यांनी रिट्विट केले. दी यूएसए लव्हज् इंडिया आणि इन्क्रेडिबल अशा प्रतिक्रिया ट्रम्प यांनी त्या व्हिडिओवर व्यक्त केल्या आहेत. या कार्यक्रमाची किती मोठी दखल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली, याचे हे आणखी एक उदाहरण.


 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi