Ad will apear here
Next
सुपोषण बागेसाठी किफायतशीर सूक्ष्म सिंचन पद्धत विकसित
नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रातील अभिनव प्रयोग यशस्वी


नंदुरबार :
पाण्याचे दुर्भिक्ष्य व जागेच्या अभावी एखादेच पीक घेता येणे या कारणांमुळे अल्पभूधारक शेतकरी कायम अडचणीत सापडतो. अशा वेळी स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारा भाजीपालादेखील तो पिकवू शकत नाही. यावर उपाय म्हणून नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने अत्यंत सुलभ व कमी खर्चातील, ड्रम किट पद्धतीवर आधारित सूक्ष्म सिंचन यंत्रणा विकसित केली आहे. दुर्गम भागातील पाण्याची कमतरता असणाऱ्या शेतकरी बांधवांना, तसेच शहरात छोट्या जागेत लागवडीची आवड असणाऱ्यांना याद्वारे सुपोषण बाग तयार करता येऊ शकेल.

कृषी विज्ञान केंद्रातील गृह शास्त्रज्ञ आरती देशमुख, भाजीपाला व फळबागतज्ज्ञ आर. एम. पाटील आणि जलतज्ज्ञ जयंत उत्तरवार यांनी याबाबतची माहिती दिली. ‘या पद्धतीने लागवड करणे अतिशय सोपे आहे. लागवडीच्या चार ओळी तयार करून एक फूट खोल व एक फूट रुंद असे पाच मीटर लांबीचे चर करून शेणखत, कम्पोस्ट खत वापरून वाफे तयार करावेत. स्वयंपाक घरातील ओला कचरादेखील यात वापरता येतो. ड्रमला चार लॅटरल्स जोडून सूक्ष्म सिंचन नलिकेद्वारे पिकांना पाणी दिले जाते. वेलवर्गीय, शेंगावर्गीय, फळभाज्या, पालेभाज्या आदी सर्वांची लागवड करता येते. पिकाच्या कालावधीत गरजेनुसार दोन वेळा पाण्याचा ड्रम भरावा लागतो. ही यंत्रणा किमान चार वर्षे वापरता येते,’ असे तज्ज्ञांनी सांगितले. 

छोट्या शेतकऱ्यांना किंवा शहरातील ज्यांना छोटी बाग फुलवायची आहे, त्यांना सूक्ष्म सिंचनाची संपूर्ण यंत्रणा विकत घेणे परवडणारे नसते. त्या ठिकाणी ही यंत्रणा किफायतशीर ठरू शकते.


या पद्धतीत साधारणतः पाच ते सहा महिन्यांपर्यंत सातत्याने पौष्टिक उत्पादन देणाऱ्या पिकांचा (उदा. गिलकी (घोसाळी), दोडकी, कारली, टोमॅटो, वांगी, मिरची, गवार, भेंडी) प्रामुख्याने समावेश केल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकेल, असे या तज्ज्ञांनी नमूद केले.

त्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, याबद्दलही तज्ज्ञांनी सांगितले. ‘ओळीने पिके घेताना उंचीनुसार भाजीपाला पिके पश्चिमेकडून लावावीत. यामुळे दुपारनंतरच्या उष्णतेपासून पिकांचे संरक्षण होऊ शकेल. भाजीपाला पिके लावताना फळवर्गीय किंवा दुधी भोपळ्यासारख्या वेलवर्गीय पिकांना मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध होईल या पद्धतीने लावावीत. गवार, वाल यांसारखी शेंगवर्गीय पिके पाण्याचा निचरा होणाऱ्या ठिकाणी लावावीत. वेलवर्गीय पिकांचा आधार मिळेल अशा अनुषंगाने लागवड करावी. सावलीच्या ठिकाणी पालेभाज्या घ्याव्यात,’ असे सांगण्यात आले.५० लिटरचा ड्रम किट सेट साधारणतः पाचशे ते साडेसहाशे रुपयांपर्यंत उपलब्ध होतो. हा संच किमान चार वर्षांपर्यंत वापरता येऊ शकतो. ग्रामीण व अतिदुर्गम भागांत भाजीपाला सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण अधिक असते. त्यावर ही पद्धत उपयुक्त आहे. शहरी भागातदेखील या पद्धतीने परसबाग छान फुलवता येऊ शकेल, असे स्पष्ट करण्यात आले. 

अधिक माहितीसाठी संपर्क : 
जयंत उत्तरवार : ९४०३६ ४७२९५
आर. एम. पाटील : ९८५०७ ६८८७६
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language