Ad will apear here
Next
जागतिक चित्रसृष्टीची पंढरी गाठणारा विठ्ठल
दोन हॉलिवूडपटांमध्ये झळकणार असलेल्या सोलापुरातील युवकाशी गप्पा
'तुकाराम' चित्रपटातील 'विठ्ठल काळे'वर चित्रित एक दृश्य

चंदेरी दुनियेत झळकण्याची स्वप्ने अनेक जण पाहतात; मात्र ती प्रत्यक्षात आणणे खूप अवघड असते. सोलापुरातल्या पानगाव या छोट्याशा गावातील विठ्ठल काळेने मात्र अभिनयकौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर थेट हॉलिवूडमध्ये झेप घेतली आहे. सुरुवातीला लघुपट, नंतर मराठी चित्रपटांत केलेल्या ताकदीच्या भूमिकांच्या जोरावर त्याला जागतिक चित्रसृष्टीची पंढरी असलेल्या हॉलिवूडमध्ये संधी मिळाली आहे. त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्या निमित्ताने, मानसी मगरे यांनी त्याच्याशी साधलेला हा संवाद...
..............
विठ्ठल काळेछोट्या गावात शिक्षण, तिथून लघुपट आणि आता चित्रपट हा प्रवास नेमका कसा झाला? 
- शालेय शिक्षण पानगावला (ता. बार्शी, जि. सोलापूर) पूर्ण केल्यानंतर पदवी शिक्षणासाठी बार्शीला आलो. आई-वडील दोघेही शेती करत असले, तरी सुदैवाने ते आम्हा भावंडांच्या शिक्षणाबद्दल जागरूक होते. पुढे इंग्रजी विषयातून एमए करण्यासाठी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. खरे तर माझ्या विषयाचा आणि चित्रपट क्षेत्राचा तसा काहीच संबंध नव्हता. या काळात ‘डीसीएस’मधील (डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीज) काही मुलांशी मैत्री झाली. हळूहळू त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून ते करत असलेल्या विविध विषयांवरील माहितीपट, लघुपट यांमध्ये त्यांच्यासोबत मी रमू लागलो. पुढे त्यांनी विचारल्यावर काही माहितीपटांमध्ये आणि लघुपटांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. तेथीलच काही मित्र नंतर ‘एफटीआयआय’मध्ये (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) दाखल झाले आणि मग मराठी, इंग्रजी यांच्याबरोबरच बिहारी, नागपुरी अशा भाषांमध्येही अनेक लघुपट केले. हे करत असतानाच एकाने ‘तुकाराम’ चित्रपटासाठी ऑडिशन्स सुरू असल्याची माहिती दिली. तिथे गेलो आणि तिथे थेट चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासमोरच माझी ऑडिशन झाली आणि माझी निवडही झाली. ‘लक्ष्मण लोहार’ अशा नावाचे ते पात्र होते. ते मी साकार केले. अशा तऱ्हेने चित्रपटसृष्टीत माझा प्रवेश झाला. 

'माझं गाव' लघुपटातील एक दृश्यमराठी चित्रपट आणि लघुपट यांपैकी कशात जास्त रमलास?
- आत्तापर्यंत तरी लघुपटांतच रमलोय. कारण ती या सगळ्याची सुरुवात होती. लघुपटांमुळेच अभिनयाची पातळी उंचावत गेली. वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळी माणसं अशा मुक्त वातावरणात आजवर १०७ लघुपट केले आहेत. त्यापैकी ‘आरण्यक’ व ‘औषध’ या दोन लघुपटांना राष्ट्रीय पारितोषिकेही मिळाली आहेत. हा आनंद नक्कीच खूप मोठा होता. माझे गाव, रिंगण, बीयाँड दी हिल, परीघ, कांती, क्षुद्राज, सर या लघुपटांतही मी काम केले आहे. त्यानंतर ‘तुकाराम,’ ‘सैराट,’ ‘आजचा दिवस माझा’ अशा मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये काम केले. परंतु त्यातल्या माझ्या भूमिका छोट्या होत्या. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘राक्षस’ चित्रपटातील भूमिका त्या मानाने मोठी आहे, उल्लेखनीय आहे. यादरम्यानही अनेक चांगल्या चित्रपटांत काम केले. परंतु त्यातले काही अजून प्रदर्शित झालेले नाहीत. 

मराठी चित्रपटांतून थेट हॉलिवूडपर्यंतची उडी कशी मारता आली?
- हे माझ्यासाठीही आश्चर्यकारकच होते. चित्रपटांच्या ऑफर्स आणि त्यांसंदर्भात येणारे ई-मेल्स यांना केवळ प्रतिसाद म्हणून उत्तर देत राहायचे, हा माझ्या दिनक्रमाचा भाग झाला होता. असेच एकदा एका मित्राने फोन करून एक ई-मेल पाठवल्याचे सांगितले. माझ्या सवयीनुसार तो नीट न पाहताच त्याच्या ऑडिशनसाठीचे आवश्यक ते साहित्य त्यांना ई-मेलने पाठविले. काही दिवसांनी कंपनीवाल्यांचा फोन आला. त्यांनी ऑडिशनला बोलावले होते. खरे तर तिथे जाईपर्यंत मला हे ठाऊकच नव्हते, की ते एक अमेरिकेचे प्रॉडक्शन हाउस आहे आणि तिथे माझी भेट एका ऑस्ट्रेलियन दिग्दर्शकाशी होणार आहे. तिथे ऑडिशन झाली आणि माझी निवडही झाली. एका हॉलिवूडपटासाठी माझी निवड झालीय आणि त्याच्या शूटिंगसाठी मला महिनाभर ऑस्ट्रेलियाला जायचे आहे, हे समजल्यावर तर माझा आनंद गगनात मावेना. 

या हॉलिवूडपटाचा विषय काय आहे? तिथे काम करतानाचा अनुभव कसा होता? 
- मुंबईतील ‘ताज हॉटेलवर झालेला २६/११चा हल्ला’ या विषयावर आधारित ‘हॉटेल मुंबई’ या नावाचा हा हॉलिवूडपट आहे. ‘अँथनी मार्स’ या ऑस्ट्रेलियन दिग्दर्शकाने तो दिग्दर्शित केला आहे. चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नसल्यामुळे त्यावर मला फार काही बोलता येणार नाही; पण या हॉलिवूडपटाबाबत मी उत्सुक असण्याचे आणखी एक कारण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग हा खरेच खूप वेगळा अनुभव होता. अर्थात सुरुवातीला खूपच उत्सुकता होती या सगळ्याची. महिनाभर परदेशात राहण्याची तशी माझी पहिलीच वेळ होती. या चित्रपटात मी मुंबईतील पोलिसाच्या भूमिकेत आहे. संवाद फार नाहीत. त्यामुळे भाषेवर फारसे काम करावे लागले नाही. ‘हॉटेल मुंबई’बरोबरच ‘दी फिल्ड’ नावाच्या फ्रान्सच्याही एका लघुपटात काम करण्याची संधी मिळाली. विशेष आनंदाची बाब म्हणजे हे दोन्हीही हॉलिवूडपट मानाच्या ‘टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाले आहेत.

- अभिनयासोबतच लेखनही तुला आवडते का? एखाद्या लघुपटाची स्क्रिप्ट वगैरे असे काही लेखन केले आहे का?
- मी लेखनही केले आहे; पण फारसे नाही. आतापर्यंत जे काही लिहिले आहे, ते केवळ माझ्यापुरतेच लिहिले आहे. व्यावसायिक स्तरावर तसे अजून काही लिहिलेले नाही. या क्षेत्रातील एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली, तर आज इथल्या दर पाच माणसांपैकी चार जणांकडे स्टोरी आहे; पण मुद्दा असा आहे, की त्यातल्या खूप थोड्याच शेवटपर्यंत टिकतात. असे असले, तरी मी नव्याने लेखनाची सुरुवात करणार आहे. एक चित्रपटकथा लिहिण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजवर जे काही काम केले आहे, त्याच्या अनुभवातून खूप काही शिकता आले. अनेक नवीन गोष्टी मी केल्या. लेखन ही त्यापैकीच एक गोष्ट असेल. पाहू या जमतंय का ते...!

(विठ्ठल काळेच्या अभिनयाची झलक दाखवणारा आणि त्याचा मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language