Ad will apear here
Next
दूध पिशव्या पुनर्वापरासाठी जमवल्यास रोज ३५ टन प्लास्टिक कचरा घटेल
पर्यावरणमंत्री कदम यांचे प्रतिपादन; प्लास्टिक गोळा करण्याच्या उपक्रमाला ‘अमनोरा’मध्ये सुरुवात


पुणे :
‘राज्यात घेतलेल्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतरही आपण रोजच्या वापरातील ३० टक्के प्लास्टिक वापर थांबवू शकलेलो नाही. सर्व दूध उत्पादकांच्या एक कोटी प्लास्टिक पिशव्यांचा कचरा दररोज तयार होत असतो. ग्राहकांकडून धुतलेल्या दूध पिशव्या परत घेऊन पुनर्निर्मिती साखळीत जमा केल्याने आपण प्रतिदिन ३५ टन प्लास्टिक पिशव्यांचा कचरा कमी करू शकतो,’ असे मत राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.

‘अमनोरा पार्कटाउन’तर्फे टाउनशिपमधील ५५०० कुटुंबांकडून कोणत्याही प्रकारचे वापरलेले प्लास्टिक परत घेण्याच्या उपक्रमाला नुकतीच कदम यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई. रवींद्रन, अमनोरा पार्कटाउन व सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, ‘रीसायकल’ संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य अभय देशपांडे, चितळे डेअरीचे भागीदार श्रीपाद चितळे, अतुल चितळे, गिरीश चितळे, ‘रीसायकल’चे चेतन बारेगर आदी या वेळी उपस्थित होते.

या उपक्रमात अमनोरामधील कुटुंबांकडून धुतलेल्या दूध पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या किंवा खाद्यपदार्थांच्या रॅपरच्या स्वरूपात येणारे प्लास्टिक असे कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक ‘रीलूप’ या अॅपच्या मदतीने गोळा केले जाणार आहे. उपक्रमात गोळा केलेल्या प्रति किलो प्लास्टिकच्या बदल्यात नागरिकांना २० रिवॉर्ड पॉइंट्स म्हणजेच २० रुपये अॅपच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. हे पॉइंट्स नागरिक वेगवेगळ्या २०० ब्रँड्सवर खर्च करू शकणार आहेत. एरव्ही नागरिकांकडून कचऱ्यात फेकले जाणारे सर्व प्लास्टिक गोळा करून पुनर्निर्मिती साखळीत सोडले जावे, असा या उपक्रमाचा हेतू आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या नायनाटाबद्दल घेतलेली भूमिका आनंददायी असून, महाराष्ट्र कायमच या बाबतीत अग्रस्थानी राहील,’ अशा भावना कदम यांनी व्यक्त केल्या.

श्रीवास्तव म्हणाले, ‘प्लास्टिक कचऱ्यात गेल्यास त्यातील पुनर्निर्मितीची संधी वाया जाते. तसेच कचऱ्यातील प्लास्टिक नष्ट करण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया किचकट असते. त्यामुळे प्लास्टिकचा संचय व पुनर्निर्मिती गरजेची आहे.’

‘अमनोरामध्ये २०१०पासूनच प्लास्टिक गोळा करून पुनर्निर्मितीस देण्यास सुरुवात केली असून, अमनोरा टाउनशिपला राज्यातील पहिली प्लास्टिकमुक्त टाउनशिप करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू,’ असे अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले.

अभय देशपांडे म्हणाले, ‘हल्ली सर्वच जण मोबाइल आणि अॅप्सचा वापर करतात. त्यामुळे त्याच्या साह्याने अधिकाधिक नागरिकांना प्लास्टिक जमा करून ते पुनर्निर्मिती साखळीत देण्यासाठी प्रवृत्त करता येईल. हडपसरमध्ये ३०० ठिकाणी चितळे दूध ग्राहकांकडील धुतलेल्या दूध पिशव्या गोळा करण्यास सुरुवात झाली आहे.’

‘चितळे दूध ग्राहकांना धुतलेली दूध पिशवी परत करताना अर्ध्या लिटरच्या पिशवीमागे २५ पैसे व एक लिटरच्या पिशवीमागे ५० पैसे परत दिले जाणार आहेत,’ असे श्रीपाद चितळे यांनी सांगितले.

(प्लास्टिकबंदीसंदर्भातील विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार जाणून घ्या सोबतच्या व्हिडिओतून...)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi