Ad will apear here
Next
अमेरिकेत मराठीपण टिकवणारा देखणा सोहळा!

अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १९वं अधिवेशन टेक्सास राज्यातील डॅलस येथे ११ ते १४ जुलैदरम्यान मोठ्या थाटामाटात साजरं झालं. भारतापासून हजारो मैल दूर राहूनही, आपलं मराठीपण जपणाऱ्या माणसांचा हा सोहळा होता. या अधिवेशनाला उपस्थित असलेल्या ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या लेखिका आणि संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार मधुवंती पेठे यांनी लिहिलेला अधिवेशनाचा हा वृत्तांत...
.............
उत्तर अमेरिकेत महाराष्ट्र मंडळं सुरू होऊन आता ३८ वर्षं झाली. या ठिकाणी आता ६०पेक्षा जास्त महाराष्ट्र मंडळं आहेत. ती आपापल्या शहरात, वर्षभर निरनिराळे सण साजरे करतच असतात; पण आपल्या मातृभाषेचा धागा घट्ट करण्यासाठी, सर्व महाराष्ट्र मंडळांचे सभासद, दर दोन वर्षांनी एकत्र येतात. या अधिवेशनाला चार हजार लोक उपस्थित होते. सध्या मी डॅलसलाच असल्यानं या अधिवेशनात सहभागी होण्याचा योग  आला. बीएमएम असं त्याचं इथलं सुटसुटीत नाव.

शालू-पैठण्या, झब्बे-फेटे असे पारंपरिक पोशाख आणि दागिने यांनी नटलेले, सर्व वयोगटांतले स्त्री-पुरुष पाहून, आपण पुण्या-मुंबईतल्याच कुठल्या समारंभाला तर आलो नाही ना, असं मला वाटलं. जेवणातही खास महाराष्ट्रीय पदार्थांची रेलचेल होती. परंतु याबरोबरच आपली सांस्कृतिक भूक भागवण्याचा प्रयत्न मला या आनंदसोहळ्यात जास्त दिसला. महाराष्ट्रातल्या विविध शहरांमधून येऊन, इथल्या मातीशी जुळवून घेत, चाळीस पन्नास वर्षं राहिलेल्या मराठी बंधू-भगिनींशी आणि त्यांच्या पुढील पिढ्यांशी मला संवाद साधता आला. ‘तुम्ही या सोहळ्याला कशासाठी येता’ असं मी विचारल्यावर अनेक कारणं सांगितली गेली. त्यातलं.. ‘चार दिवस मनसोक्त मराठी बोलता येतं’, हे कारण तर मला खूपच आवडलं. रोजच्या व्यवहारात इतर भाषा बोलणारी ही मंडळी, आपल्या घरात मराठीच बोलतात; पण असं दिवसभर सतत मराठी बोलणं,  याचं अप्रूप त्यांच्याशिवाय कोणाला असणार..?

मधुवंती पेठेइंटरनेटच्या जमान्यात, नेटवर सर्व काही उपलब्ध असताना, इथे येऊन वेगळं काय मिळतं, असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं, की दिग्गज कलाकारांचं शास्त्रीय संगीत, सुगम संगीत प्रत्यक्ष ऐकायला मिळतं, मराठी नाटक पाहता येतं. कलाकारांना प्रत्यक्ष भेटता येतं. साहित्य, आरोग्य, भारतीय अध्यात्म अशा क्षेत्रातल्या नामांकित व्यक्तींचे विचार ऐकता येतात. विचारांची देवाण-घेवाण करता येते. याहूनही अधिक समाधान या मंडळींना मिळतं, ते म्हणजे त्यांनाही यात सहभागी होता येतं, आपली कला सादर करता येते. या वर्षी प्रथमच झालेल्या शास्त्रीय, सुगम संगीत स्पर्धेतील बाल आणि युवा कलाकारांचं गायन वादन ऐकून, तर मला खूपच आनंद झाला. इथे जन्मलेली, वाढलेली मुलं.. गदिमा आणि बाबूजींची गाणी म्हणतात, गायन वादनातून रागसंगीत सादर करतात, पुलं - वसंत कानेटकरांची नाटकं पेलतात, सावरकरांच्या गीतांवर, संतसाहित्यावर नृत्यनाट्यं सादर करतात, हे पाहून माझं मन आनंदानं, अभिमानानं भरून आलं. महाराष्ट्रात राहून, ‘ट्रॅडिशनल डे’ साजरा करण्याची वेळ आलेली असताना, ‘बहुभाषिक असलेली, पण आपल्या मातृभाषेला तितकच जपणारी ही अमेरिकेतील मराठी मंडळी पाहून आनंद वाटला,’ असे गौरवोद्गार, संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या अरुणाताई ढेरे यांनी काढले. ‘बहुभाषकत्व आणि मातृभाषेचं जतन, या दोन्ही गोष्टी आजच्या काळाची गरज आहेत. परंपरेचं स्वरूप कालानुरूप बदलून, जुन्यातील नको ते टाकून आधुनिक ते स्वीकारून पुढे जा,’ असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. 

‘सूर गुंजती अभिनवतेचे, फुलवित नाते परंपरेचे’, हे या वेळेच्या अधिवेशनाचं बोधवाक्य होतं. उद्घाटनप्रसंगी डॅलसच्या महाराष्ट्र मंडळानं सादर केलेल्या अप्रतिम कार्यक्रमानं हे बोधवाक्य सार्थ ठरवलं. खास या अधिवेशनासाठी लिहिलेला पोवाडा आणि भारतातील आपल्या लहानपणाच्या स्मृती जागवणारं त्यांचं सादरीकरण मनाला स्पर्शून गेलं. याशिवाय निरनिराळ्या व्यावसायिक कलाकारांच्या कार्यक्रमांनी रसिकांना तृप्त केलं.


सुबोध भावेसंजय मोने, मयुरी देशमुख यांचं ‘डिअर आजो’ हे नवीन नाटक सादर झालं. या नाटकाचा व्यावसायिक दर्जाचा सेट, इथल्याच १५ जणांच्या टीमने तयार केला होता, हे विशेष. आपल्या निरनिराळ्या भूमिकांमागचा विचार सांगताना अभिनेता सुबोध भावेच्या मनोगतानं सर्वांना अडीच तास खिळवून ठेवलं. संगीतकार अशोक पत्कींचा ‘सप्तसूर माझे’ हा कार्यक्रम माधुरी करमरकर आणि मंदार आपटे यांच्या गीतगायनानं रंगतदार झाला. देवकी पंडित आणि विजय कोपरकर यांच्या शास्त्रीय - उपशास्त्रीय गायनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. हृषीकेश रानडे, आर्या आंबेकर यांनी हिंदी-मराठी चित्रपटगीतं गाऊन बहार आणली. याशिवाय अरुणा ढेरे यांचं कविता सादरीकरण, धनश्री लेले यांचं मेघदूत रसग्रहण, डॉ. संजय उपाध्ये यांचं ‘मन करा रे प्रसन्न’, दीपाली केळकर यांचं ‘शब्दांच्या गावा जावे’, कार्टूनिस्ट चारुहास पंडितांचं ‘चिंटू तुमच्या भेटीला’, मकरंदबुवा रामदासी यांचं कीर्तन, जगन्नाथ दीक्षित यांचा डाएटविषयक कार्यक्रम हे कार्यक्रमदेखील होतेच. याव्यतिरिक्त निरनिराळ्या ठिकाणच्या महाराष्ट्र मंडळांनी सादर केलेल्या कार्यक्रमांची विविधता तर कौतुकास्पद होती. 

‘अलिखित पानांची कहाणी’ - नृत्यनाट्य (ऑस्टिन), युवा कलाकारांनी देशी-विदेशी वाद्यांवर साधलेला ‘शब्देविण संवादु’ (ऑस्टिन), गदिमा, सुधीर फडके आणि पुलं यांच्या स्मृती जागवणारा ‘सृजन त्रयी’ (ह्यूस्टन), संतसाहित्यावर आधारित ‘आम्हां घरी धन’ (अटलांटा), ‘पुलं’ची ‘बटाट्याची चाळ’ (न्यू जर्सी), ‘प्रेमाच्या गावा जावे’ नाटक (कान्सास), ‘स्टेजिंग फ्रेम्स’, दीपाली विचारेंच्या कलाकार शिष्यांनी सादर केलेले नृत्यप्रकार (बे एरिया), सावरकरांच्या गीतांवर नृत्याविष्कार ‘अनादि मी अवध्य मी’ (सिॲटल), उभ्या उभ्या विनोद – ‘स्टॅंड अप कॉमेडी’, शुभदा सहस्रबुद्धे - सँड आर्ट, नाट्यसंगीत - अश्विनी गोरे देशपांडे, पुरुषोत्तम ठाकरे – ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’. असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या संमेलनात झाले. याशिवाय शास्त्रीय - सुगम गायन, ढोलताशा, फोटोग्राफी, पेंटिंग अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे वधू-वर मेळावा, पुस्तक प्रकाशन, गौरव यात्रा हीदेखील या संमेलनाची वैशिष्ट्ये होती.


चार दिवसांच्या संमेलनाची सांगताही वैशिष्ट्यपूर्ण होती. या संमेलनासाठी हृषीकेश जोशी यांनी खास ‘भेटीत गुप्तता मोठी’ हे विनोदी प्रहसन लिहून सादर केलं. त्यात स्वत: हृषीकेश जोशी, समीर चौगुले, विशाखा सुभेदार, स्पृहा जोशी, मकरंद अनासपुरे, संकर्षण कऱ्हाडे, हेमांगी कवी यांनी धमाल उडवून दिली. संमेलनाचं उत्तम आयोजन आणि सर्वांचं उत्तम आदरातिथ्य केल्याबद्दल डॅलस महाराष्ट्र मंडळाला धन्यवाद देत, तृप्त मनानं रसिकांनी निरोप घेतला.

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(मधुवंती पेठे यांचे ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी 'बाइट्स ऑफ इंडिया'वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language