Ad will apear here
Next
मुले रमली ‘गोष्टीच्या गावा’त
सुश्री फाउंडेशन व वंचित विकास आयोजित उपक्रम

पुणे : मोबाइलच्या जगात हरवून जाणारी मुले...गोष्ट वाचताना, त्यातील नाट्य उलगडताना हरवून गेली होती. निमित्त होते, सुश्री फाउंडेशन, वंचित विकास व नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित ‘गोष्टींचा गाव’ या विशेष कार्यक्रमाचे.

वीस वर्षांपूर्वी जादूच्या गोष्टीची निर्मिती करून भारतासह अमेरिकेतील लोकांना जादूच्या गोष्टीत रमवणारे प्रकाश पारखी यांनी मुलांच्या या गोष्टींच्या गावात आठवणींना उजाळा देत मैफल रंगवली. आजकालची लहान मुले मैदानी खेळ खेळताना, गोष्टीची पुस्तके वाचताना दिसत नाहीत. मोबाइलच्या दुनियेत गोष्टी ऐकल्या जातात. मात्र, त्यांचे वाचन होत नाही. गोष्टीची पुस्तके वाचण्याची मजा ते आज गमावून बसलेली दिसत आहेत, अशावेळी हा कार्यक्रम मुलांचे क्षितिज विस्तारणारा ठरला आहे. मुलांनी कथांचे अभिवाचन केले, तर नाट्यसंस्कारचे विश्वस्त प्रकाश पारखी यांनी ‘जादूचे घर'’ दाखवले.

वंचित विकास संस्थेच्या अभिरुची गटातील मधुमिता सोनवणे, उमेश लोहार, आयेशा शेख, प्राजक्ता क्षीरसागर, प्रणिता गाडे यांनी ‘निर्मळ रानवारा’ या मासिकातील काही कथांचे अभिवाचन केले, तर नाट्यसंस्कारच्या वेदांत गोळवलकर, आयुष परांजपे, अवनी ताम्हाणे यांनी ‘खारीच्या वाटा’ या कथेच्या संपादित अंशाचे अभिवाचन केले. श्रीजय देशपांडेंनी नाट्यछटा सादर केल्या. या वेळी ‘निर्मळ रानवारा’ या बालमासिकाच्या ‘नाट्यछटा’ विशेषकांचे प्रकाशन करण्यात आले.

वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका सुनीता जोगळेकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी ‘खारीच्या वाटा’चे लेखक ल. म. कडू, निर्मळ रानवाराचे व्यवस्थापक स्नेहल मसालिया, सल्लागार ज्योती जोशी, सरोज टोळे, ललितगौरी डांगे, सुप्रिया जोगदेव आणि लहान मुले व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम ओक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला होता. त्याचे प्रास्ताविक ओक यांनी केले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language