Ad will apear here
Next
‘कुलकर्ण्याचा दवाखाना’ या पुस्तकाचे डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन
डॉ. संजय कुलकर्णी लिखित पुस्तकाचा उदगीर येथे प्रकाशन सोहळा


उदगीर (लातूर) :
‘आजार व उपचारपद्धतींबरोबरच मनाला आनंद देणारे मानवी स्वभावाचे अनेक पैलू डॉ. संजय कुलकर्णी यांनी ‘कुलकर्ण्याचा दवाखाना’ या पुस्तकातून मांडले आहेत. यात प्रसंगानुरूप छोटे लेख असले, तरी मोठा अर्थ व्यक्त करणाऱ्या मुक्त लेखनाचा हा चांगला नमुना आहे,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. डॉ. संजय कुलकर्णी लिखित ‘कुलकर्ण्याचा दवाखाना’ या पुस्तकाच्या उदगीर येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या.

पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे, माजलगाव येथील साहित्यिका स्नेहल पाठक, नगर येथील साहित्यिका डॉ. लीला गोविलकर व लेखक डॉ. संजय कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, ‘डॉ. कुलकर्णी हे प्रथमतः एक सहृदय, संवेदनशील मनाचे माणूस आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांचे उदगीरच्या बोलीभाषेत लेखन झाले आहे. सहजता हे ललित लेखनाचे वैशिष्ट्य असते. हे वैशिष्ट्य ‘कुलकर्ण्याचा दवाखाना’ या पुस्तकात पाहावयास मिळते.’

डॉ. लीला गोविलकर म्हणाल्या, ‘डॉ. संजय कुलकर्णी यांचे पुस्तक म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील ‘आत्मकथुली’ होय. मानवी स्वभावाचे अनेक पदर या पुस्तकात पाहावयास मिळतात. त्यामुळे सर्वांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.’

प्रा. स्नेहल पाठक म्हणाल्या, ‘या पुस्तकात रुग्ण आणि डॉक्टरांचे नातेसंबंध व्यक्त झाले आहेत. सर्जनात असलेली सृजनशीलता, संवेदनशीलता या लेखनातून समोर येते. मानवी जीवनातील विसंगती अचूकपणे शब्दबद्ध करण्याचे कार्य डॉ. कुलकर्णी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.’

प्रकाशक अरुण जाखडे म्हणाले, ‘हे पुस्तक म्हणजे वैद्यकीय आत्मचरित्र होय. उदगीरच्या बोलीभाषेचा व सामाजिक जीवनाचा दाखला देणारे हे पुस्तक आहे. डॉ. कुलकर्णी यांनी अत्यंत सहजतेने लेखन केले आहे. ते वाचकांना अंतर्मुख करणारे आहे.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक डॉ. संजय कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन श्रीपाद सिमंतकर यांनी केले, तर आभार डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी मानले.

(‘कुलकर्ण्याचा दवाखाना’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language