Ad will apear here
Next
तू जिंदा है, तू जिंदगी की जीतपर यकीन कर
अनंत झेंडे यांच्या वसतिगृहातली ही मुलं... जगण्याची नवी दिशा सापडलेली...

समाजातले बहुतांश लोक मळलेल्या वाटांवरूनच चालणं पसंत करतात; पण काही जणांना मात्र नव्या वाटा धुंडाळण्याची आस असते. त्या वाटा साहजिकच काट्याकुट्यांनी भरलेल्या असतात. तरीही जिद्दीनं ते त्या अनवट वाटांवरून चालतात आणि अनेकांच्या जगण्याची वाटचाल सुखकर करतात. नव्या वाटा शोधणाऱ्या अशा काही व्यक्ती आणि संस्थांच्या मार्गक्रमणाच्या स्फूर्तिदायी गोष्टी सांगणारं, प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांचं ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ हे विशेष पाक्षिक सदर आजपासून सुरू करत आहोत. आजची पहिली गोष्ट श्रीगोंद्यातल्या अनंत झेंडे या तरुणाची...
..............

तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे 
जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे
हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती 
सापडेना वाट ज्यांना, हो तयांचा सारथी 

साधारणपणे दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गुरू ठाकूरने लिहिलेली ही प्रार्थना गुणगुणत मी प्रवास करत होते. मी आणि अच्युत गोडबोले नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदे इथल्या एका महाविद्यालयात व्याख्यानासाठी गेलो होतो. जाताना आमच्यासोबत अनंत झेंडे नावाचा त्या महाविद्यालयाचा शिपाई होता. प्रवास सुरू असताना अनंत झेंडेशी गप्पा मारल्या आणि साधासुधा, थोडासा गाववाला दिसणारा, फारसा न शिकलेला एक तरुण किती उत्तुंग काम करतोय, याचा पडताळा आला.

अनंत झेंडेआज भारतात सर्वशिक्षा अभियानांतर्गत सर्वांना शिक्षण उपलब्ध झालं आहे; मात्र आजही समाजात काही घटक असे आहेत, की त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात दाखल करून घेताना त्यांच्याकडे संशयानं बघितलं जातं. त्यापैकीच एक फासेपारधी ही जमात! पालावर राहणारे, भटके असलेले हे लोक फिरून उदरनिर्वाह करताना आढळतात. यांच्याकडे कायम गुन्हेगार म्हणूनच बघितलं जातं. त्यामुळे कुठेही गुन्हा घडला, की पहिल्यांदा या लोकांना ताब्यात घेतलं जातं. बाप तुरुंगात आणि आई दारोदार भिक्षा मागत फिरते आहे असं जर दृश्य असेल, तर या कुटुंबातली मुलं शिकणार कशी? शिकण्याची प्रेरणा त्यांना मिळणार कुठून? या मुलांसाठी एक तरुण पुढे सरसावला आणि अशा अनेक मुलांना त्यानं हक्काचं घर मिळवून दिलं. या तरुणाचं नाव अनंत झेंडे!

२००८मध्ये श्रीगोंदा इथं महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेची स्थापना झाली. या संस्थेला आजही शासनाचं अनुदान नसताना विमुक्त भटक्या मुलांसाठी ही संस्था निवासाची, शिक्षणाची, वाचनालयाची, त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेऊन काम करते आहे. या संस्थेचा संस्थापक आणि चालक आहे अनंत झेंडे! हो. तिथल्याच महाविद्यालयात शिपाई असणारा एक तरुण!

अनंतला अशी संस्था का काढावीशी वाटली, त्याचा हा प्रवास कसा झाला, हे सगळं खूपच विलक्षण आहे. पाटलाच्या सधन घरात अनंत या मुलाचा जन्म झाला. अनंत जन्मला आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या आईचा मृत्यू झाला. आईविना पोरगा म्हणून मग मावशी असो वा आत्या...सगळ्यांनी त्याला खूपच लाडाकोडात वाढवलं. त्याचाच परिणाम म्हणजे अनंत फारसं शिकला नाही. दहावी नापास झाला. त्यानंतर पुन्हा परीक्षा देऊन कसाबसा पास झाला. अनंतानं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, या हेतूनं त्याच्या आत्यानं प्रयत्न सुरू केले; पण इतकं कमी शिकलेल्या मुलाला नोकरी तरी कोण देणार? अखेर शिपायाची नोकरी अनंतला मिळाली; पण आपण पाटलाच्या तालेवार घराण्यातले, आपण शिपाई म्हणून काम करणार या विचाराचीदेखील अनंतला सुरुवातीला लाज वाटायची. नोकरीत रुजू झाला तरी त्याचं मन तिथे लागायचं नाही. 

खरं तर अनंतच्या घराला एक सामाजिक वारसा लाभलेला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनंतचे आजोबा उतरले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबरोबर त्यांचा विशेष स्नेह होता. घरात सतत ‘स्व’पेक्षा इतरांचा विचार करण्याचं वातावरण होतं. कुठेतरी हे सगळं अनंतमध्ये रुजलं होतं; पण अजून बाहेर पडायला अवकाश होता. 


अनंत एकदा अहमदनगरच्या गिरीश कुलकर्णी यांनी उभारलेल्या ‘स्नेहालय’ या संस्थेत गेला आणि तिथलं काम बघून तो चकितच झाला. गिरीश कुलकर्णींनी त्याच्या मनात नव्या इच्छेचे अंकुर रुजवले. अनंत शनिवार-रविवार असा सुट्टीच्या दिवसांत दर आठवड्याला ‘स्नेहालय’ला जाऊ लागला. तिथे अनेक स्त्रिया येत आपली दुःखं गिरीश कुलकर्णींना सांगत. त्या स्त्रियांना गिरीश कुलकर्णींचा विश्वाेस वाटे. तेही अनंतला जवळ बसवून घेत आणि यामुळेच तिथे कशा प्रकारे काम चालतं याचे धडे अनंतला मिळू लागले. अनंतचं मन स्नेहालयात रमू लागलं. अशातच एकदा तो श्रमसंस्कार छावणीच्या शिबिरासाठी आनंदवनात जाऊन पोहोचला. तिथे गेल्यावर मात्र त्याला आपण वेगळ्या जगात आल्याची जाणीव झाली. बाबांचं कुष्ठरोग्यांबद्दलचं काम पाहून अनंत स्तिमित झाला. ऐकणं आणि प्रत्यक्ष अनुभव घेणं यातला फरक तो डोळ्यांनी पाहत होता. आपणही बाबांसारखं काम केलं पाहिजे, आपलं आयुष्य चांगल्या कामासाठी लागलं पाहिजे असं त्याला वाटायला लागलं. तसं तो विकास आमटे यांच्याजवळ बोलला. आपल्या संस्थेचं नावही बाबा आमटेच ठेवायचं असं त्याला वाटू लागलं. आपल्या मनातले विचार बोलून दाखवताच विकासभाऊ त्याला म्हणाले, ‘अनंत, तुझा विचार चांगला आहे; मात्र हे काम वाटतं तितकं सोपं नाही. मार्गात दुःख आणि वेदना यांचाच सतत सामना करावा लागेल.’ अनंतची त्यासाठी तयारी होती; मात्र काय आणि कसं करायचं याचं उत्तर अनंतजवळ नव्हतं. पगारच मुळात तीन हजार रुपये. त्यात संसाराचा गाडा ओढायचा. अशा वेळी आर्थिक बळ, मनुष्यबळ, शिक्षण, ज्ञान सगळ्यांचीच वानवा होती; मात्र अनंतच्या मनात दुर्दम्य इच्छाशक्ती होती. 

मुलांशी संवाद साधताना अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख.आनंदवनातून आलेल्या अनंतानं नंतर मात्र झपाटल्यासारखी अनेक कामं श्रीगोंद्यामध्ये सुरू केली. त्याला विद्यार्थी सहायक समितीचं काम उभारणाऱ्या अच्युतराव आपटेंप्रमाणे काम करायचं होतं. याच काळात त्याला नगरमध्ये असलेले जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, विश्वाअस नांगरे-पाटील आणि पोलिस सुपरिटेंडंट कृष्णप्रकाश यांच्या कामानं प्रेरित केलं. ते त्याचे ‘आयडॉल’ बनले. सरकारी योजना समजावून घेणं आणि मग गावात हागणदारीमुक्ती योजना असो, वा स्वच्छता अभियान असो, या सगळ्यांत अनंत सहभागी होऊ लागला. एकटाच हातात खराटा घेऊन गावातली गल्ली न् गल्ली झाडू लागला. सुरुवातीला लोक अनंतला वेडा म्हणून हसू लागले; पण नंतर गावासाठी तो कसा झटतोय हेही त्यांच्या लक्षात आलं. आपल्या लाघवी स्वभावानं त्याला ऑस्कर या परदेशी मित्रानं मदत केली आणि गावात बोअरवेल आणि पाण्याची टाकी होऊन पाण्याची सोय झाली. 

कृष्णप्रकाश यांच्या कार्यानं प्रभावित झालेल्या अनंतला गावात प्रबोधनपर व्याख्यानमाला सुरू करावी, असं वाटू लागलं. त्यानं त्यांच्याशी संपर्क साधला आणि तीन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली. कृष्णप्रकाश येणार ही वार्ता पसरताच लोक व्याख्यानाच्या तारखेची वाट बघू लागले आणि नेमकं कृष्णकुमारांना काही अडचण आल्यानं ते येऊ शकत नसल्याचं त्यांनी कळवलं. जिथे तीन हजार लोक जमणार होते, तिथे २५ लोकही व्याख्यानासाठी जमले नाहीत. अनंत रडकुंडीला आला, त्या वेळी मात्र गिरीश कुलकर्णी पुन्हा खंबीरपणे त्याच्यामागे उभे राहिले आणि अपयशातूनच यशाचा रस्ता जातो हे त्याला सांगितलं. अनंत पुन्हा उठला....त्यानं धीर सोडला नाही आणि पुढे कृष्णप्रकाश यांच्याशी संपर्क करून ती व्याख्यानमाला घडवून आणली. या वेळी मात्र खरोखरच तीन हजारांच्या वर लोक जमले. अतिशय उद्बोधक, प्रबोधनपर व्याख्यान झालं. व्यासपीठावर बसण्यासाठी आणि श्रेय लाटण्यासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा अनंताचं वेगळं रूप लोकांना दिसलं. इतकं सगळं करूनही तो सर्वसामान्य लोकांप्रमाणे प्रेक्षकांमध्ये बसला होता. 

मुंबईच्या गिरीश नीळकंठ कुलकर्णी नावाच्या गृहस्थांचा एक वाडा श्रीगोंद्यामध्ये असून, ते परदेशी राहत असल्यानं त्यांना तो चांगल्या कामासाठी द्यायचा आहे, असं कळल्यानं एके दिवशी गिरीश कुलकर्णी आणि अनंत मुंबईला जाऊन पोहोचले. हा वाडा ताब्यात आला, तर तिथे गरजू गरीब मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा अनंतचा मानस होता; मात्र निघताना गिरीश कुलकर्णी यांची मुलगी आजारी पडली. अनंतला काय करावं सुचेना. त्या वेळी गिरीश कुलकर्णी म्हणाले, ‘माझ्या एकट्या मुलीची चिंता करू नकोस, वसतिगृहात येणाऱ्या त्या १०० मुलांची चिंता कर.’ आणि ते दोघं मुंबईला पोहोचले. त्या दानशूर व्यक्तीनं वाड्याची चावी आणि विजेच्या थकीत बिलापोटी २० हजार रुपयांचा धनादेश गिरीश कुलकर्णींच्या हाती सोपवला. गिरीश कुलकर्णींनी अनंतला वाड्याची चावी देऊन ‘आता कर तुझं काम सुरू’ असं म्हटलं. 

अनंतनं गावात येताच वाडा बघितला. तो पडझड झालेल्या अवस्थेत होता. तिथे कोणी राहणं ही अशक्य गोष्ट होती. अशा वाड्याला अनंतनं केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर नीट केलं. कधी कुठली मदत मिळवली, तर कधी स्वतःच भिंतींची डागडुजी करत राहिला. वाडा तयार झाला. गरजू विद्यार्थ्यांसाठी १०० रुपये नाममात्र शुल्कावर त्यानं विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहाप्रमाणे वसतिगृह सुरू केलं. हळूहळू मुलं येऊ लागली. तीन मुलांची ३० मुलं झाली. अशातच एक गरीब ऊसतोड कामगार महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलाला घेऊन अनंतकडे आली आणि या मुलाला त्यानं आपल्याकडे ठेवावं, असं ती म्हणाली; पण अनंतला वाटलं या इतक्या लहान मुलाची जबाबदारी अपण कशी घेणार? त्यानं तिला ‘नाही’ म्हणून सांगितलं. ही गोष्ट जेव्हा गिरीश कुलकर्णींना समजली तेव्हा त्यांना अतिशय वाईट वाटलं. त्यांनी अनंतची कानउघाडणी केली आणि त्या गोष्टीनं अनंतला आपली चूक लक्षात आली. 

एके दिवशी गिरीश कुलकर्णींना ४० मुलांचं वसतिगृह बंद करणाऱ्या एका कार्यकर्त्याचा फोन आला. आता या मुलांचं काय होणार, या चिंतेनं त्यानं तो फोन केला होता. गिरीश कुलकर्णी यांनी अनंतला ‘या मुलांचा पालक होणार का’ असं विचारलं. अनंतनं होकारार्थी मान डोलावली आणि गिरीश कुलकर्णींनी ती ४० मुलं गाडीत घालून अनंतच्या सुपूर्त केली. सहा ते १० वयोगटातली ती फासेपारधी समाजाची मुलं-मुली जेव्हा आली, तेव्हा अनंत त्यांच्याकडे बघतच रिाहला. त्या मुलांच्या अंगावरचे कपडे धड नव्हते, त्यांची अवस्था अतिशय दयनीय होती. त्या मुलांना बघताच वसतिगृहातली म्हणजेच वाड्यात राहणरी ३० मुलं घाबरली आणि त्यांच्यापैकी २७ मुलं चक्क निघून गेली. 

अनंतला सुरुवातीला या मुलांच्या सवयी बदलण्यासाठीच खूप संघर्ष करावा लागला. मुलांना अनेक सवयी नव्हत्या. त्यामुळे ती कुठेही घाण करत, कशीही राहत. पळून जात. रात्र रात्र अनंत त्यांना शोधत राही. स्वच्छतेपासून ते बोलण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये अनंतला त्यांची आई व्हावं लागलं. राहिलेली तीन मुलंही अनंतला मदत करू लागली. या मुलांची नावं खूप विचित्र होती. कैदी, सतुऱ्या, पिस्तुल्या वगैरे....अनंतनं त्यांची गुन्हेगारीचा शिक्का बसलेली नावं बदलली. अर्जुन, रणबीर, मानसी अशी नावं देत त्यानं त्यांचं कायदेशीर पालकत्व घेतलं. याच काळात महिला बालकल्याण विभागातर्फे त्याला नोटीसही आली आणि त्यानं हे अनधिकृत काम ताबडतोब बंद करावं असं सांगण्यात आलं. या मुलांना आधार दिला नाही, तर ही मुलं गुन्हेगारीकडे वळतील हे सरकारला का कळत नाही, या विचारानं अनंत अस्वस्थ झाला; पण यातूनही मार्ग निघाला आणि त्याला संस्थेच्या कामाची रीतसर परवानगी मिळाली. 

संस्थेच्या नव्या जागेचं भूमिपूजन करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, विकास आमटे आणि अन्य मान्यवर.२०१३ साली अनंतचं लग्न झालं. त्याची पत्नी शुभांगी हीदेखील त्याच्या कामात बरोबरीनं झटतेय आणि काम करतेय. हे लग्नही खूप अनोख्या पद्धतीनं झालं. अनंतनं आहेर आणि इतर गोष्टींना पूर्ण फाटा दिला आणि या लग्नात अशा महिलांना निमंत्रित केलं, की ज्यांना कोणीही मानानं कधी बोलावत नाही. पारधी समाजाच्या  ४० महिलांना पालावर जाऊन त्यानं निमंत्रणपत्रिका दिली. त्या सगळ्या महिला आपल्या घरातलं लग्न असल्यासारख्या आनंदानं आल्या. या लग्नात या ४० महिलांचा ‘गीताई’ देऊन सत्कार करण्यात आला. अनंतची संस्थेतली ४० मुलं सुटाबुटात लग्नमंडपात फिरत होती. आपल्या मुलांमधला इतका बदल बघून या महिलांचे डोळे पाणावले.

नऊ वर्षांत अनंतनं या संस्थेतल्या मुलांचा कायापालट केला आहे. या संस्थेत दाखल झालेला मुलगा आज पदवीधर होऊन बाहेर पडलाय. एका पडक्या वाड्यात सुरुवात झालेली ही संस्था आता लवकरच साडेचार एकरच्या जागेत जाईल. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात अनंताच्या संस्थेवरचा लेख प्रसिद्ध झाला आणि त्याच्यासाठी ३८ लाखांची मदत येऊन पोहोचली. याच पैशातून त्यानं संस्थेसाठी ही जागा खरेदी केलीय. आज अनंतनं संस्थेतर्फे अनेक उपक्रम सुरू केले आहेत. श्रीगोंदा इथल्या अण्णा भाऊ साठे चौकात असलेल्या दलित वस्तीत त्यानं साधना बालभवन सुरू केलंय. तिथे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या मुलांसाठी काम सुरू आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या मुलांसाठी संस्थेनं शिक्षणासाठी मदत देऊ केली आहे. या बालभवनामध्ये ८० मुलं सहभागी होऊन संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे गिरवताहेत. इथूनच १५ किलोमीटर अंतरावर दौंड-नगर रस्त्यावरच्या काष्टी या गावात ‘आरंभ बालनिकेतन’ची स्थापना संस्थेनं केली असून, तिथे डोंबारी समाजाच्या मुलांसाठी ही संस्था काम करते आहे. आजही डोंबारी समाजाचं जगणं हलाखीचं असून, दारोदार फिरून भीक मागणं, अंधश्रद्धेच्या विळख्यात असलेल्या या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्था धडपडते आहे. या डोंबारी समाजाची अनेक मुलं या ‘आरंभ निकेतन’मध्ये दाखल झाली आहेत आणि शिक्षण घेत आहेत. तरुणांसाठी अभ्यासिका, संगणक वर्ग, वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा केंद्र संस्थेनं सुरू केलंय. 

आजही अनंत महाविद्यालयात आपली शिपायाची नोकरी इमानेइतबारे करतो आहे आणि संस्थेचा वाढलेला व्यापही तितक्याच समर्थपणे सांभाळतोय. त्याचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. म्हणूनच त्याचं काम पाहून या ओळी आठवतात...

तू जिंदा है तू जिंदगी की जीतपर यकीन कर,
अगर कहीं है स्वर्ग, तो उतार ला जमीन पर....

हा स्वर्ग अनंतनं आपल्या प्रयत्नांनी जमिनीवर निर्माण केलाय!!!!

अनंतचं काम बघायला जरूर जा आणि शक्य असल्यास त्याला या कामासाठी साह्यही करा. 
पत्ता : अनंत झेंडे, महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्था, श्रीगोंदा, जि. अहमदनगर. 
मोबाइल : ९४०४९ ७६८३३, ९८८१५ २३७३३. ई-मेल : vssanant@gmail.com
वेबसाइट : http://www.babaamtevss.org/


- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi