Ad will apear here
Next
गतजन्म शोधिताना...!
आध्यात्मिक वाटचालीचे सुगम विवेचन
पूर्वजन्म, पुनर्जन्म अशा गोष्टींबद्दल जवळपास प्रत्येकालाच कुतुहल असते. विज्ञान आणि अध्यात्मामधील सीमारेषा हळूहळू पुसली जात असून, जगभर त्या विषयांवर संशोधन होत आहे. पूर्वजन्म, पुनर्जन्म, पंचकोश, नीअर डेथ एक्स्पीरिअन्स, सिल्व्हर कॉर्ड, कर्माचा सिद्धांत, परलोक, तिसरा डोळा, चमत्कारांचे रहस्य असे विविध विषय हाताळले गेलेली चार पुस्तके अत्यंत महत्त्वाची आहेत. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज त्या पुस्तकांची ओळख करून देत आहेत. 
.....
सन १९५६मधील ही गोष्ट. ‘दी थर्ड आय’ नावाचे एक पुस्तक इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाले. लेखकाचे नाव होते टी. लोबसंग राम्पा. ‘हॅरी पॉटर’प्रमाणे आधी अनेक प्रकाशकांनी ते नाकारले होते. पहिली आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतर अल्पावधीतच ते जागतिक ‘बेस्टसेलर’ ठरले. अर्थात अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवादही झाले. मराठीतही ‘तृतीय नेत्र’ नावाने अनेक आवृत्त्या निघाल्या. विषय अध्यात्म आणि गूढविद्या असल्यामुळे प्रथेप्रमाणे त्यावर वादविवादही झाले. लेखकाचा पूर्वेतिहास तपासण्यासाठी गुप्तहेर नेमण्यापर्यंत मजल गेली. मोठी रंजक कथा आहे ती!

इंग्लंडच्या डेव्हॉन राज्यातील प्लिम्टन गावी, एका प्लंबरच्या घरी सहा एप्रिल १९१० रोजी सिरिल हेन्री हॉस्किन या मुलाचा जन्म झाला. तरुण वयात तो रेल्वे खात्यात पोर्टर म्हणून काम करत होता. त्याला एकदा मोठा अपघात झाला. त्या वेळी तिबेटमधील एक लामा त्याच्यासमोर प्रकट झाला. तो म्हणाला, ‘मी ट्यूस्टे (टी.) लोबसंग राम्पा. तिबेटमध्ये माझा अनन्वित छळ झाल्यामुळे मला हा देह लवकरच सोडायचा आहे. तथापि, मला अद्याप काही कार्य करायचं आहे. त्यासाठी तुझं शरीर मी वापरलं तर चालेल का?’ सिरिलने त्याला मान्यता दिली आणि लोबसंगच्या सूक्ष्म देहाने त्याच्या देहात प्रवेश केला. त्यानंतर त्याने आपले पहिले पुस्तक ‘दी थर्ड आय’ हे टी. लोबसंग राम्पा या नावाने प्रसिद्ध केले. तशी एकूण १८ पुस्तके त्याच्याद्वारे लिहिली गेली. त्यात पूर्वजन्म, पुनर्जन्म, जन्म-मरण, ऑरा, तिसरा डोळा, ध्यानधारणा, तप, सिल्व्हर कॉर्ड (सूत्रात्मा), सिद्धी, इत्यादी विषय होते. एका लामाने परकायाप्रवेश करून दुसऱ्या व्यक्तीच्या द्वारे सर्व लेखन केले, हे विदेशी लोकांच्या पचनी पडणे अवघड होते. भारतीयांना त्यात नवीन वाटण्यासारखे काही नव्हते. आपल्या तत्त्वज्ञानाचा तो महत्त्वाचा भाग आहे. सध्या (भारतासह) जगभर संमोहनाद्वारे व्यक्तीचे ‘Past Life Regression’ (गतजन्मांचा शोध) केले जाते.

माणसाच्या दोन भुवयांच्या मध्ये जी जागा आहे. त्याला आज्ञाचक्र म्हणतात. तोच तिसरा डोळा होय. आपल्याला जे ज्ञान प्राप्त होते, त्याचे ते प्रमुख स्थान आहे. ध्यान करताना तिथे लक्ष केंद्रित करतात. प्रयोग करून बघा. एखादी गोष्ट आठवत नसल्यास आपण आपोआप डोके खाजवतो किंवा आज्ञाचक्राच्या जागी स्मरणाचे प्रयत्न सुरू होतात. एक तर हवे ते आठवते अन्यथा आपण बाहेर शोधण्याचे प्रयत्न सुरू करतो. ‘थर्ड आय’ पुस्तकात राम्पाने असे लिहिले आहे, की त्याच्या आज्ञाचक्राच्या जागी एक ‘ऑपरेशन’ करण्यात आले आणि त्यामुळे त्याचा ‘तृतीय नेत्र’ जागृत झाला. त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली, भूत-भविष्यातील गोष्टी दिसू लागल्या. त्याच्या समोर येणारी व्यक्ती स्वभावाने कशी आहे, तिने काय काय ‘कृत्ये’ केली हे त्याला लगेच समजत असे. भारतात, प्राचीन काळापासून अशी शक्ती प्राप्त झालेल्या ऋषिमुनींचे आणि अधिकारी लोकांचे उल्लेख आढळतात. आजही अशा प्रसिद्धीपराङ्मुख अनेक व्यक्ती भोवताली वावरत असतात. प्राणायाम आणि योगसाधनेच्या द्वारे तशा शक्ती (सिद्धी) जागृत होतात. त्यासाठी आज्ञाचक्राच्या जागी शल्यकर्म करावे लागत नाही. त्यामुळे लोबसंग राम्पाचे ‘ते’ कथन वादग्रस्त ठरते.

‘जिथे विज्ञानाची वाटचाल थांबते, तिथे अध्यात्माचा मार्ग सुरू होतो,’ असे म्हणतात. त्याचा अर्थ असा आहे, की अध्यात्मातील विज्ञानाचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यावर जगभरातील शास्त्रज्ञांचा अभ्यास आणि प्रयोग सुरू आहेत. ओंकाराचे परिणाम काय होतात, योगाची फलश्रुती, पूर्वजन्मातील आठवणी सांगणाऱ्या लोकांकडून तपशील गोळा करून त्यावरचे संशोधन, मृत्यूनंतर देहातून काय बाहेर पडते किंवा मृत्यूसमयीचे अनुभव (Near Death Experience - NDE किंवा Out of Body Experience - OBE) अशा अनेक विषयांवर प्रचंड काम सुरू आहे. भारतात हजारो वर्षांपासून ज्ञान-विज्ञानाची परंपरा चालत आलेली आहे, असे कोणी म्हटले की त्याच्या अंगावर धावून जाण्याची ‘पुरोगामी चाल’ आपण नेहमी बघतोच. ‘त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही,’ असे त्यांचे नित्याचे, पण अवैज्ञानिक विधान असते.

‘दी थर्ड आय’ पुस्तकाचा परामर्श घेतल्यानंतर आपण आणखी तीन पुस्तकांचे संदर्भ बघणार आहोत.

खोरशेद भावनगरी यांनी लिहिलेले ‘Laws of the Spirit World’ (लॉज ऑफ दी स्पिरिट वर्ल्ड) हे पुस्तक काही वर्षे प्रसिद्धीच्या झोतात आहे. मराठीत ‘जीवात्मा जगाचे कायदे’ या नावाने, तसेच अन्य भारतीय भाषांमध्येही त्याचे अनुवाद झालेले आहेत. खोरशेद यांची दोन तरुण मुले एकाच वेळी अपघातात मृत्युमुखी पडतात. अर्थातच आईवर दु:खाचा डोंगर कोसळतो. काही दिवसांनी एक व्यक्ती त्यांना भेटायला येते. ती एका गूढविद्याविषयक संघाची सदस्य असते. त्या संघाच्या नियमित बैठका होत असतात. अशाच एका बैठकीत तिथल्या एका सदस्याच्या अंगात खोरशेदी बाईंच्या एका मृत मुलाचा जीवात्मा प्रवेश करतो. तो सांगतो, ‘आमच्या आईला एक निरोप सांगा - आम्ही दोघं आहोत तिथे अत्यंत आनंदात आहोत. आमच्या मृत्यूचं दु:ख करू नकोस. लवकरच तुला तिथली सविस्तर हकिगत सांगू.’ मुलगा पुढे म्हणतो, ‘आईने ठरावीक वेळी कागद-पेन घेऊन टेबलाशी बसावे. मी किंवा भाऊ तिच्या हाताद्वारे वरच्या लोकांतील आमच्या वास्तव्याबद्दल माहिती लिहून काढू.’

त्यानुसार कार्यक्रम सुरू होतो. खोरशेद हातात पेन घेऊन एका जागी बसतात आणि त्यांच्या हातून मजकूर लिहिला जातो. सुरुवातीला अक्षर वेडेवाकडे येते, परंतु हळूहळू त्यात सुधारणा होते. तेच ‘Laws of the Spirit World’ हे पुस्तक. मृत्यूनंतर ज्या ठिकाणी प्रवेश होतो, तिथे एकूण सप्तलोक आहेत. खालचे तीन. एक मधला आणि तीन वरचे. खाली दुष्ट (पापी) जीवात्म्यांची वस्ती असते. वरती पुण्यवान आणि मध्यलोकात साधारण समसमान पापपुण्य असलेले आत्मे राहतात. वरच्या लोकांतून खाली जाता (फिरता) येते; पण खालून वर प्रवेश नाही. कर्माच्या सिद्धांताप्रमाणे सगळी योजना असते. पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवायला एकेक (संरक्षक) दूत वर असतो. त्याचे अस्तित्व लोकांना कळत नाही, तरीही तो आपले काम करत असतो. ज्यांनी इतरांना त्रास दिलेला असतो, त्यांना त्याची शिक्षा (फळ) कशी मिळते याची काही उदाहरणे पुस्तकात दिलेली आहेत. सप्तलोकांतील आत्मे एकाच देवाला मानतात; म्हणजे देवता अनेक नसून, एकच ‘सर्वशक्तिमान’ ईश्वेर आहे. तिथे जातीपातींना स्थान नाही, तर कर्मानुसार तिथली गती असते. या तत्त्वज्ञानावर विश्वानस असो अगर नसो, एक कादंबरी म्हणून हे पुस्तक अवश्य वाचावे.

अनिता मूर्जानीपुढचे पुस्तक आहे अनिता मूर्जानी लिखित ‘Dying to be Me’ (डाइंग टू बी मी). या बाई नवऱ्यासह हाँगकाँगमध्ये राहत असताना त्यांना कॅन्सर होतो. तो सर्वांगावर पसरतो आणि जागोजाग जखमा होतात. अखेरचे क्षण मोजत असताना त्या ‘Near Death Experience’ (मृत्यू समीप आल्याचा अनुभव) घेतात. त्यांचा सूक्ष्म देह भौतिक शरीराच्या बाहेर पडून खाली पाहू लागतो, तेव्हा त्यांच्या मृत्युशय्येजवळ नवरा आणि आई दु:खी अवस्थेत बसलेले असतात. एक अनोळखी डॉक्टर त्यांची तपासणी करत असतो. त्याचे नावही अनिता यांना आपोआप समजते. नाडी तर थांबलेली असते. त्या आणखी उंच अवकाशात जातात. तिथे त्यांचे मरण पावलेले वडील त्यांना भेटतात. ते सांगतात, ‘तुझा अंत अद्याप आलेला नाही. तुझ्या हातून बरंच कार्य व्हायचं आहे.’ अनिता म्हणतात, ‘ते कसं काय शक्य आहे? मी तर कॅन्सरनं जर्जर झालेली आहे.’ त्यावर दोघांत काही संभाषण होते आणि त्या आपल्या देहात परततात. सुमारे ३० तास कोमात असलेली ती रुग्ण स्त्री काही मिनिटांतच शुद्धीवर येते आणि भूक लागल्याचे सांगते. सर्वांची एकच धावाधाव होते. पुढे काही दिवसांतच त्यांच्यात सुधारणा होऊन, अंगावरच्या सर्व जखमा हळूहळू बऱ्या होतात आणि त्या घरी परततात.

आज त्या ६० वर्षांच्या असून, अमेरिकेत स्थायिक झालेल्या आहेत. त्यांच्या अद्भुत अनुभवांवर लिहिलेले ‘डाइंग टू बी मी’ हे पुस्तक बेस्टसेलर ठरलेले आहे. त्या जगभर व्याख्याने देत फिरतात आणि कार्यशाळा घेतात. ‘यू-ट्यूब’वर ते सर्व उपलब्ध आहे. त्यांनी उपचार घेतलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या आजारपणाचे सर्व ‘रेकॉर्ड’ आहे. जगभरातील डॉक्टरांना ‘त्या’ चमत्काराची उकल झालेली नाही. इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. त्याचे प्रकाशन पुण्यातील ‘बुकगंगा इंटरनॅशनल’मध्ये अनिता मूर्जानींच्याच हस्ते झाले. त्या वेळी मी योगायोगाने हजर होतो.

परमहंस योगानंदनंतरचे पुस्तक आहे परमहंस योगानंदांचे आत्मचरित्र - ‘An Autobiography of a Yogi’ (अॅन ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी). कलकत्ता येथे राहणारे योगानंद यांना श्री युक्तेश्वीर गिरी यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा मिळते. त्यांचे सारे जीवन खरोखर विलक्षण आहे. सुरुवातीला त्यांची प्रकृती अत्यंत किडकिडीत असते. एकदा गुरू त्यांना समोर बसवतात आणि आपल्या कृपाळू नजरेने त्यांच्याकडे बघत केवळ तासभरात योगानंदांचे वजन काही पौंडांनी वाढवतात. (आजचे विज्ञान अद्याप तिथपर्यंत पोहोचलेले नाही.) योगानंदांची ध्यानाची पद्धत आणि ‘क्रियायोग’ सर्वत्र जाऊन पोहोचलेला आहे. त्यासाठी ते जगभर फिरले आणि अनेक ठिकाणे अभ्यासकेंद्रे स्थापन केली. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी ‘चमत्कार कसे घडतात’ याचे सुंदर विवेचन केलेले आहे. योगाद्वारे पंचमहाभुतांवर (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) नियंत्रण मिळते आणि अशक्य ते शक्य करता येते. अखिल विश्वायची निर्मिती त्या महाभुतांपासूनच झालेली आहे. प्रत्येक वस्तूंमधील घटकांचे सूत्र (फॉर्म्युला) कळले, की योग्याला आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या पंचमहाभुतांच्या साह्याने ती वस्तू निर्माण करता येते. योगानंदांचे आत्मचरित्र वाचलेच पाहिजे असे आहे. १९५२ साली अमेरिकेतील लॉस एंजलीस येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंतिम समाधी सोहळ्यापर्यंत काही दिवस त्यांचा देह विघटन न होता जसाच्या तसा टवटवीत राहिला होता.

वर उल्लेख केलेल्या चारही पुस्तकांच्या लाखो प्रती खपलेल्या आहेत आणि नवनवीन आवृत्त्या निघतच आहेत. अध्यात्माशी निगडित अनेक विषय आपण त्यात पाहिले. पूर्वजन्म, पुनर्जन्म, पंचकोश, नीअर डेथ एक्स्पीरिअन्स, सिल्व्हर कॉर्ड, कर्माचा सिद्धांत, परलोक, तिसरा डोळा, चमत्कारांचे रहस्य इत्यादी इत्यादी. जगभर त्या विषयांवर गंभीरपणे संशोधन सुरू आहे. विज्ञान आणि अध्यात्मामधील सीमारेषा हळूहळू पुसली जात आहे. ज्या भारतात हजारो वर्षांपूर्वी प्रत्यक्ष अनुभूतींद्वारे अध्यात्माचे निर्दोष सिद्धांत मांडण्यात आले, तिथेच आज त्या विषयांची थट्टा होत आहे, हे आपले दुर्दैव! परंतु त्यातही लवकरच बदल होईल. आपल्या देशाचे त्यातील श्रेष्ठत्व सिद्ध होईल, यात शंकाच नाही.

त्यानंतर शाळा-महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांत ‘अध्यात्म’ आणि तदनुषंगिक विषयांचा समावेश होईल.

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

(या लेखात उल्लेख केलेली पुस्तके 
‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi