Ad will apear here
Next
‘गांधी मरते नहीं!’


राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांनी समाजकारण, राजकारण, अहिंसक सत्याग्रह, व्याख्याने, लेखन आणि पत्रकारिता या सर्व क्षेत्रांत केलेले अलौकिक कार्य बघताना थक्क व्हायला होते. त्यांची १५०वी जयंती नुकतीच साजरी झाली. त्या निमित्ताने ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी ‘किमया’ सदरात गांधीजींबद्दल लिहिलेला हा लेख...  
...............
महात्मा गांधीजींचे स्मरण करताना सारे जग नतमस्तक होते. भारताच्या भूमीवर महापुरुष जन्माला येणे, ही हजारो वर्षांची परंपरा आहे. गांधीजी हे विसाव्या शतकातील एक थोर पुरुष ठरतात. समाजकारण, राजकारण, अहिंसक सत्याग्रह, व्याख्याने, लेखन आणि पत्रकारिता या सर्व क्षेत्रांत त्यांनी केलेले अलौकिक कार्य बघताना आपण थक्क होऊन जातो. ‘कर्मण्येवाऽधिकारस्ते...’ हा गीतेचा उपदेश आपल्या ७९ वर्षांच्या आयुष्यात अखंड पाळणारे ते श्रेष्ठ कर्मयोगी ठरले. त्यांची १५०वी जयंती दोन ऑक्टोबरला सर्वत्र विविध प्रकारे साजरी झाली. त्या निमित्ताने विविध प्रकारचे उपक्रम ठिकठिकाणी सुरू आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे अनमोल योगदान होते. 

गुजरातमधील पोरबंदर येथे १८६९ साली त्यांचा जन्म झाला. इंग्लंडला जाऊन त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तोच पेशा स्वीकारून त्यांनी दक्षिण आफ्रिकेत सुमारे २० वर्षे काढली. त्या काळात वर्णभेदाविरुद्ध शांततापूर्ण लढा देऊन, मूलभूत मानवी हक्कांसाठी सत्याग्रहाचा अनोखा मार्ग स्वीकारला. सामाजिक कार्याचे नवनवे प्रयोग केले. प्रसंगी शारीरिक आणि मानसिक त्रासही सहन केला. सन १८८३मध्येच त्यांचे सहा महिन्यांनी मोठ्या कस्तुरबांशी लग्न झालेले होते. भारतात ब्रिटिशांविरुद्ध लढा देणाऱ्या व्यक्तींमध्ये लोकमान्य टिळक अग्रेसर होते. ‘केसरी’तून त्यांचे जहाल लेखन प्रसिद्ध होत असे. सन १९१५मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिका सोडून भारतात परतले. 

त्यांना गुरुस्थानी असलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सूचनेप्रमाणे देशाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी बापूजींनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. आगामी कार्याची दिशा ठरली. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर (१९२०) राजकीय नेतृत्व त्यांच्याकडे आपोआप चालत आले. गावोगाव जनतेला जागृत करणारी व्याख्याने आणि प्रभावी लेखनाच्या द्वारे त्यांनी सारा देश एकत्र जोडला. १९२१मध्ये काँग्रेसची धुरा सांभाळण्यास त्यांनी सुरुवात केली. जनतेला मिळणारी कमी प्रतीची वागणूक, अन्याय्य कर, दडपशाही आदी प्रश्नांविरुद्ध त्यांचा अहिंसक लढा सुरू झाला. मिठाचा सत्याग्रह अर्थात दांडीयात्रा जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाली. साधी राहणी व शाकाहार हे गांधीजींनी अंगीकारलेले व्रत होते. स्वदेशी उद्योग-व्यवसायांना प्राधान्य-प्रोत्साहन, तसेच खादी आणि चरखा या गोष्टी त्यांनी घराघरांत नेऊन पोहोचवल्या. शस्त्राच्या द्वारे ब्रिटिशांविरुद्ध लढणे शक्य नव्हते. त्यामुळे ‘अहिंसा व कायदेभंग’ ही दोन अत्यंत प्रभावी शस्त्रे गांधीजींनी जनतेच्या हाती दिली. सत्य, अहिंसा, स्वदेशी आणि सत्याग्रह ही त्यांची चतु:सूत्री होती. पाचवे व्रत म्हणजे अपरिग्रह - दुसऱ्याकडून कुठलीही गोष्ट न स्वीकारणे. 

सुरुवातीला कट्टर पुराणमतवादी असलेले गांधीजी पुढे उदारमतवादी, जाती-धर्माच्या भिंती मोडून टाकणारे नेते ठरले. कस्तुरबांनी त्यांना आयुष्यभर साथ दिली. प्रसंगी पतीच्या विरुद्ध बंडखोरी करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. बाबा आमटे साधनाताईंबद्दल म्हणत, ‘The Sanction behind me is She!’ त्याप्रमाणे ‘बा’ या बापूंचा कणखर आधार होत्या. म्हणूनच १९४४मध्ये त्या गेल्यावर गांधीजी म्हणाले होते, की ‘माझ्यातील शुद्धता, पावित्र्य आज लयाला गेले.’ त्यांना हरिलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास अशी चार मुले होती. सुरुवातीला टाय-सुटात वावरणारे गांधीजी पुढे धोतर-पंचा नेसू लागले. अगदी इंग्लंडमधल्या गोलमेज परिषदेला आणि युरोपमध्ये प्रवास करतानाही त्यांचा तोच वेश कायम राहिला. साधेपणा, नम्रता, सौजन्य हे त्यांच्या अंगी मुरलेले विशेष गुण होते. ते ‘मातृहृदयी’ होते. शाळांमधले शिक्षकही विद्यार्थ्यांच्या बाबतीत तसेच असावेत, अशी त्यांची अपेक्षा होती. निर्भयता ही त्यांची फार मोठी शक्ती होती. भक्कम आध्यात्मिक पायामुळे मृत्यूची भीती कधीच नष्ट झालेली होती. आयुष्यभर अहिंसेची शिकवण देणाऱ्या गांधीजींची अखेर ३० जानेवारी १९४८ रोजी हिंसेतून झाली, हा केवढा दैवदुर्विलास! आणि सशस्त्र क्रांतीचे उद्गाते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘प्रायोपवेशन’ करून आपले प्राण सोडले, हेही विशेष! ‘युनो’च्या प्रस्तावानुसार दोन ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिन गेली १२-१३ वर्षे ‘अहिंसा दिन’ म्हणून जगभर साजरा होतो. 

लेखन आणि पत्रकारिता हे गांधीजींचे अपार सामर्थ्य होते. शिवाय, भारतभर होणाऱ्या त्यांच्या भाषणांना लाखो लोकांची उपस्थिती असे. सन १९०९मध्ये त्यांनी ‘हिंद स्वराज’ हे पुस्तक गुजरातीत लिहिले. लगेच त्याचे हिंदी-इंग्रजीत अनुवाद झाले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक ‘बौद्धिक आराखडा’ असे त्याचे स्वरूप होते. ‘या पुस्तकाला कोणतेही स्वामित्व अधिकार नाहीत,’ असे त्यात सुरुवातीला छापले होते. गांधीजींनी अनेक नियतकालिकांचे संपादन केले, ती अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध होत. ‘इंडियन ओपिनियन’, ‘यंग इंडिया’, ‘नवजीवन’, ‘हरिजन’ अशी त्यांची नावे होती. त्याशिवाय देशातील अनेक वृत्तपत्रांना आणि वैयक्तिक अशी पत्रे दररोज मोठ्या प्रमाणावर ते पाठवत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. जगभर त्यांचे अनुवाद होत गेले. 

‘माझे सत्याचे प्रयोग’ ही त्यांची आत्मकथा खूपच गाजली. ‘दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह’, ‘इंडियन होमरूल’ ही त्यांची अन्य पुस्तके आहेत. त्यांनी सुमारे ५० हजार पृष्ठांचे लेखन केले. शाकाहार, आरोग्य, धर्म, सामाजिक सुधारणा, भारतीय अर्थव्यवस्था या विषयांवरही त्यांचे लेखन सातत्याने प्रकाशित होत राहिले. भारत सरकारने १९६०च्या दरम्यान गांधींजींचे समग्र वाङ्मय १०० खंडांत प्रसिद्ध केले. 

देशोदेशींच्या नेत्यांना आणि राजकीय चळवळींना ‘गांधी विचारा’ने प्रभावित केले. गौतम बुद्धानंतर गांधीजी हेच पहिले ‘शांतिदूत’ ठरले. सन १९२४मध्ये रोमा रोलाँ यांनी इंग्रजीत ‘महात्मा गांधी’ या नावाने लिहिलेल्या पुस्तकाद्वारे त्यांचे तत्त्वज्ञान साऱ्या जगभर जाऊन पोहोचले. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनीही गांधीजींच्या सत्य-अहिंसेची प्रशंसा केली. अमेरिकेतील ह्यूस्टन (टेक्सास) राज्यातील एका जिल्ह्याला ‘महात्मा गांधी’ असे नाव दिलेले आहे. 

‘टाइम’ या इंग्रजी नियतकालिकाने १४वे दलाई लामा, लेक वालेसा, मार्टिन ल्यूथर किंग, सीझर चावेझ, आँग सॅन स्यु क्यी, बेनिग्नो अक्विनो, डेस्मंड टुटू (ज्यु.) आणि नेल्सन मंडेला या सर्वांचा ‘गांधीजींचे सुपुत्र’ असा उल्लेख केला आहे. ते सर्व बापूंच्या अहिंसा आणि अध्यात्माचे वारसदार मानले गेले. ‘टाइम’ने १९३० मध्ये गांधीजींना ‘मॅन ऑफ दी इयर’ जाहीर केले. त्याच नियतकालिकाने त्यांचा जगातील आजवरच्या २५ आदर्श राजकीय नेत्यांमध्ये समावेश केला (सन २०११). गांधीजींचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाच वेळा पुढे आले. परंतु त्यांना तो मिळू शकला नाही. नोबेल समितीने त्याबद्दल खेदही व्यक्त केला. ‘गांधीजींचे त्या पुरस्कारावाचून काही बिघडत नव्हते; परंतु आमच्या समितीपुढे त्यांच्याइतकी लायक व्यक्ती दुसरी कोणी आली आहे का?’ अशा शब्दांत त्यांनी पुढे आपली चूक कबूल केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर रेडिओवर २८ एप्रिल १९४४ रोजी बोलताना गांधीजींचा ‘राष्ट्रपिता’ असा उल्लेख प्रथम केला होता. तीच आदरार्थी ‘पदवी’ पुढे रूढ झाली. गांधीजींवर सुमारे पाच तासांचा माहितीपट १९६८मध्ये तयार झाला. रिचर्ड अॅटनबरोंचा ‘गांधी’ हा चित्रपट हिंदी-इंग्रजीत १९८२ साली प्रदर्शित झाला. रोहिणी हट्टंगडी यांनी त्यात कस्तुरबाजींची भूमिका केली होती. गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील जीवनावर १९९६मध्ये ‘दी मेकिंग ऑफ महात्मा’ हा चित्रपट बनला. हिंदीतल्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मैंने गांधी को नहीं मारा’ या चित्रपटांत गांधीजींच्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. काही गांधीविरोधी चित्रपट आणि नाटकेही आहेत. गांधीजींचे चरित्र आणि कार्य यांचे चित्रण करणारी हजारो पुस्तके आजवर प्रसिद्ध झालेली आहेत. चलनी नोटांवर गांधीजी झळकलेले आहेत. भारतामधील बहुतेक सर्व लहान-मोठ्या शहरांत ‘महात्मा गांधी रस्ता’ आणि ‘महात्मा गांधी उद्यान’ आहे. शाळा, महाविद्यालये, खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये त्यांचे फोटो लावलेले दिसतात. तितकेच पुतळेही गावोगाव आहेत. 

महात्मा गांधीजींचे सारे जीवनच क्रांतिकारी आणि प्रेरणादायी होते. त्यांच्या शतकोत्तर सुवर्ण-महोत्सवाच्या निमित्ताने आपण त्यांनी लिहिलेला ‘एक तरी ग्रंथ वाचावा.’ गांधी वाङ्मय सर्वत्र सवलतीत उपलब्ध आहे. गांधी विचारांचा प्रचार-प्रसार शेकडो संस्था करत आहेत. तिथल्या ग्रंथालयांतही पुस्तके उपलब्ध असतात. गांधी तत्त्वज्ञानावर अभ्यासक्रमदेखील तयार केलेले आहेत. त्यातील एखादा निवडल्यास त्या निमित्ताने अभ्यास होऊ शकेल. 

एकच सत्य आहे, की - ‘गांधीजी मरे नहीं, गांधी मरते नहीं!’

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

(महात्मा गांधीजींची आणि त्यांच्याबद्दलची विविध पुस्तके आणि ई-बुक्स ‘बुकगंगा डॉट कॉम’वर सवलतीत उपलब्ध आहेत. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi