Ad will apear here
Next
जगातील सर्वांत मोठ्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण
तेलंगण, आंध्रसह मराठवाड्याचीही तहान भागणार

मुंबई : महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरी नदीवरील तेलंगण येथील जगातील सर्वांत मोठ्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण २१ जून रोजी होत आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांनाही या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगमोहन रेड्डी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. 

जमिनीखालील १४.०९ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून गोदावरी नदीचे १३ अब्ज घनफूट(टीएमसी) पाणी उचलले जाणार असून, तब्बल १८ लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. जगातील हे सर्वांत मोठे भूमिगत पंपिंग स्टेशन आहे. 

 

‘मेगा इंजीनिअरिंग अँड इन्फ्रा लिमिटेड (एमईईएल) आणि भारत हेवी इलेक्ट्रिक यांनी १८ महिन्यांच्या विक्रमी वेळात हा प्रकल्प उभारला असून, यासाठी जमिनीखाली १४.०९ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात आला आहे,’ अशी माहिती प्रकल्प संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी दिली.


या बोगद्यात एकूण २० लिफ्ट आणि १९ पंप केंद्रे आहेत. या प्रकल्पासाठी चार हजार ६२७ मेगावॉट वीज लागणार असून, दररोज दोन अब्ज घनफूट पाणी उचलले जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ८० हजार कोटी रुपये खर्च आला आहे. विशेष म्हणजे भूमिगत पंपिंग स्टेशन असल्याने या भव्य प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language