Ad will apear here
Next
अरुणास्त!

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (६६) यांचे २४ ऑगस्ट रोजी दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. विद्यार्थिदशेपासूनच कार्यकर्ता म्हणून राजकारणात आलेल्या या नेत्याने आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली. या नेत्याच्या कारकिर्दीचा हा अल्प आढावा..
..................
आर्थिक क्षेत्रांतील अनेक महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात घेतले गेले. ज्यामुळे देशभर प्रचंड खळबळ माजली ते निश्चलनीकरण (नोटाबंदी) आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करणे, हे दोन त्यांपैकी महत्त्वाचे निर्णय. अरुण जेटली अर्थमंत्री असल्याने हे दोन्ही निर्णय त्यांची, त्यांच्या मुत्सद्देगिरीची, धैर्याची कसोटी पाहणारे ठरले; मात्र सौम्य व्यक्तिमत्त्व असलेल्या जेटली यांनी ठामपणा, प्रभावी वक्तृत्व आणि बुद्धिमत्ता यांच्या बळावर हे निर्णय कसे आवश्यक होते हे जनतेला पटवून दिले. त्यामुळे मोदी सरकारमधील त्यांचे आधीच महत्त्वाचे असलेले स्थान अधिक महत्त्वाचे झाले. 

जनधन, उज्ज्वला योजना, पंतप्रधान कृषी विमा योजना, आयुष्मान भारत योजना अशा अनेक योजना आणि निर्णयांची घोषणाही त्यांच्याच कार्यकाळात करण्यात आली. अरुण जेटली हे मोदी सरकारचे संकटमोचक होते. पंतप्रधान मोदींचे ते अत्यंत विश्वासू सहकारी आणि चांगले मित्र होतेच; पण ‘मोदी यांचे कान आणि डोळे’ अशी त्यांची ओळख होती. भाजपची रणनीती आखण्यातही जेटली यांची महत्त्वाची भूमिका होती. 


त्यामुळेच, केंद्रात भाजप दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सत्तेत आल्यानंतर जेव्हा जेटलींनी सरकारमध्ये नवी जबाबदारी स्वीकारता येणार नसल्याचे पत्र पंतप्रधानांना लिहिले, तेव्हा त्याची मोठी चर्चा झाली होती. त्यावरून, जेटलींच्या आजाराची तीव्रता आणखी अधोरेखित झाली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील शेवटचा (अंतरिम) अर्थसंकल्पही ते मांडू शकले नव्हते. ती जबाबदारी पीयूष गोयल यांनी सांभाळली होती आणि जेटली त्या वेळी उपचारांसाठी परदेशात गेले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाचीही शस्त्रक्रिया झाली होती. ते सरकारमध्ये नसले, तरी सरकारच्या निर्णयांबद्दल ब्लॉग आणि समाजमाध्यमांतून भाष्य करत होते; मात्र अखेर त्यांची कर्करोगाशी झुंज अयशस्वी ठरली. सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात केलेल्या या नेत्याने आपल्या कर्तृत्वाने अनेक उंच शिखरे गाठली.


त्यांच्या राजकीय प्रवासाला विद्यार्थिदशेपासूनच सुरुवात झाली होती. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद भूषवतानाच आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला होता. विद्यार्थी नेते ते केंद्रीय अर्थमंत्रिपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले. अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, कायदा मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. त्यांचे प्राथमिक आणि उच्च शिक्षण दिल्लीतच झाले. कॉमर्स शाखेतील पदवी घेतल्यानंतर कायद्याची पदवी घेऊन वडील किशन महाराज जेटली यांच्याप्रमाणेच अरुण जेटलीही वकील झाले. कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ देशातील अनेक उच्च न्यायालयांत वकिली केली. १९९०मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकिलाचा दर्जा दिला. 

आणीबाणीत तुरुंगवास 
१९७५-७७मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. आणीबाणीत त्यांना आधी अंबाला आणि नंतर दिल्लीच्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची ‘अभाविप’च्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी आणि ‘अभाविप’च्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 
जेटली हे भारतीय जनता पक्षातील एक मुरब्बी नेते होते. भारतीय जनता पक्षाच्या प्रसारातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतीय जनता पक्षाचे सरकार जेव्हा जेव्हा आले, त्या त्या वेळी त्यांनी सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या १९९९ ते २००४ या काळात जेटली यांनी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री आणि कायदा व न्याय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. 


मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात तर एकाच वेळी अर्थमंत्री, संरक्षणमंत्री आणि वाणिज्य व्यवहारमंत्री अशी तीन खाती यशस्वीरीत्या सांभाळण्याची किमया त्यांनी करून दाखवली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारीही त्यांनी काही काळ सांभाळली. मोदी सरकारमधील ते सर्वांत प्रभावशाली मंत्री होते. राजकीय, कायदा क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रांतही त्यांचा जनसंपर्क मोठा होता. विरोधी पक्षातील नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते. 

बोफोर्स घोटाळ्याचे पुरावे

बोफोर्स तोफांच्या खरेदीतील भ्रष्टाचाराप्रकरणी योग्य पुरावे, कायदेशीर दस्तऐवज तयार करण्याचे काम जेटली यांनीच केले होते. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील म्हणून, तसेच १९८९ ते ९० या काळात अतिरिक्त महाधिवक्ता (अॅडिशनल सॉलिसिटर जनरल) म्हणूनही त्यांनी काम केले होते. लालकृष्ण अडवाणी, माधवराव सिंधिया, शरद यादव असे बडे नेते त्यांचे अशील होते. राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात अमली पदार्थ आणि मनी लाँडरिंग कायद्याबाबत प्रस्ताव करून घेण्यातही जेटलींनी मोलाची भूमिका बजावली होती. 

कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे :

- २८ डिसेंबर १९५२ रोजी जन्म
- नवी दिल्लीच्या सेंट झेवियर्स शाळेत प्राथमिक शिक्षण 
- नवी दिल्लीच्याच श्रीराम कॉलेजमधून कॉमर्स शाखेची पदवी 
- नवी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी
- विद्यापीठात शिकत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय प्रवासाला सुरुवात.
- विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड.
-  १९९१पासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य.
- १९९९मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री; निर्गुंतवणूक खात्याचें राज्यमंत्रिपदही सांभाळले.  २००० साली विधी, न्याय मंत्रालयाचा कार्यभार. 
- २००९पासून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून उल्लेखनीय कामगिरी.
- २०१४मध्ये उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले. 
- मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात २०१४ ते १६ या कालावधीत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कारभार जेटलींनी सांभाळला. 
- २०१४ ते २०१७ या कालावधीत त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता.
- २४ ऑगस्ट २०१९ रोजी निधन

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language