Ad will apear here
Next
पुणे येथे लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन
पुणे : ‘अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे २४ व २५ नोव्हेंबर २०१८ रोजी मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिप येथे महाअधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनात होणाऱ्या उद्योजकता संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती अधिवेशनाचे अध्यक्ष कैलाश वाणी यांनी दिली.

उद्यमशीलता, उच्चशिक्षण, सद्विचार आणि एकत्रित कुटुंब ही पारंपरिक मूल्ये जपत समाजाने नवा विचार व नवी दिशा आत्मसात करावी या प्रमुख उद्देशाने हे अधिवेशन आयोजित केले आहे. राजकारण व समाजकारणातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती आणि समाजातील तरुणांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध व्यवसाय क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींची व्याख्याने हे या अधिवेशनाचे आकर्षण आहे; तसेच एकत्र कुटुंब पद्धतीची जोपासना, सामाजिक सुधारणा आणि सामाजिक विकासाबद्दल या अधिवेशनात काही सामाजिक ठराव देखील करण्यात येणार आहेत.

शनिवारी (ता. २४) दुपारी १२.३० वाजता फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनातील उद्योजकता संमेलनाचे उद्घाटन होईल. तत्पूर्वी सकाळी ९.३० वाजता अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रदर्शनाचे उद्घाटन केले जाईल. याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचा समारोप होईल.

रविवारी सायंकाळी पाच वाजता कैलाश वाणी यांचे अध्यक्षीय भाषण होणार असून, अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार राजू शेट्टी, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार मेधा कुलकर्णी, लक्ष्मण जगताप उपस्थित राहणार आहेत.

या दोन दिवसीय अधिवेशनात तरुणांचे प्रबोधन करण्यासाठी विविध मार्गदर्शन सत्रे होणार आहेत या सत्रांत बांधकाम, विपणन, शेती, फार्मास्युटिकल्स, उद्योजकता आणि सामाजिक एकीच्या माध्यमातून विकास या विषयांवर भर दिला जाईल २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० पासून सुरू होणाऱ्या सत्रांमध्ये ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतीश मगर, ‘जेएलएल इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, ‘अॅनारॉक’चे अध्यक्ष अनुज पुरी, ‘क्रिसालिस ग्रुप’चे अध्यक्ष मनीष गुप्ता, अन्न व औषध विभागाचे माजी सहसंचालक संजय पाटील, ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव, ‘एन्टोड फार्मा’चे व्यवस्थापकीय संचालक किशोर मासुरकर उपस्थितांना मार्गदर्शन करतील.

‘२५ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून होणाऱ्या सत्रांमध्ये गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे, ‘बीव्हीजी इंडिया’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा हे मार्गदर्शन करतील,’ असे वाणी यांनी सांगितले.

महाअधिवेशनाविषयी :
कालावधी : २४ व २५ नोव्हेंबर २०१८
वेळ : सकाळी ९.३० वाजता
स्थळ : लाइफ रिपब्लिक टाउनशिप, मारुंजी, पुणे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language