Ad will apear here
Next
पुण्यात सुरू झाले मूकबधिर व्यक्तींनी चालवलेले कॅफे हाउस
कॅफेच्या १४ सदस्यांसोबत मागील रांगेत डावीकडून महेश ठाकूर, श्रीजा ठाकूर, नेव्हिल पोस्तवाला आणि अनुराधा आपटे.

पुणे :
‘पुण्यात डेक्कन जिमखान्यासारख्या मोक्याच्या ठिकाणी  मूकबधिर व्यक्तींनी चालवलेल्या पहिल्या कॅफे हाउसचे उद्घाटन करताना मला विशेष आनंद होत आहे. तरुणांना कौशल्य शिक्षण देऊन रोजगार निर्मिती करण्याचा जो प्रयत्न देशात सुरू आहे, त्याला या कॅफेच्या माध्यमातून पाठबळ मिळणार आहे.  हा प्रकल्प सर्वांनाच दिशादर्शक ठरेल,’ असा विश्वास ‘हर्बिंजर ग्रुप ऑफ कंपनीज’च्या सीएसआर विभागाचे प्रमुख नेव्हिल पोस्तवाला यांनी व्यक्त केला. 

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात ‘बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिसेस’च्या शेजारील ‘बेक एन डाएट सायलेंट कॅफे हाउस’चे उद्घाटन २२ डिसेंबर २०१८ रोजी पोस्तवाला यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हर्बिंजर ग्रुपच्या सीनिअर कन्सल्टंट (इंजिनीअरिंग एक्सलन्स) अनुराधा आपटे, सीएसआर सल्लागार महेश ठाकूर, ‘क्रिएटिव्ह पीपल’च्या प्रकल्प प्रमुख श्रीजा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. 

श्रीजा ठाकूर यांनी अनुराधा आपटे यांना केक भरवला. सोबत नेव्हिल पोस्तवाला.

आदिवासी विकास प्रबोधिनीतर्फे चालवल्या जाणाऱ्या क्रिएटिव्ह पीपल या उपक्रमाचा भाग म्हणून १४ मूकबधिर व्यक्तींना गेल्या तीन वर्षांपासून प्रशिक्षण देण्यात येते. क्रिएटिव्ह पीपल प्रकल्पाच्या संचालिका श्रीजा ठाकूर यांनी या मूकबधिर व्यक्तींना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे, तसेच बेकरी उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून बेक एन् डाएट सायलेंट कॅफे हाउस सुरू झाले असून,  ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या १४ मूकबधिर व्यक्ती ते चालवणार आहेत. पोस्तवाला म्हणाले, ‘या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न करून मूकबधिर व्यक्तींना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. श्रीजा ठाकूर यांनी त्यांना केक, पेस्ट्री यांसारखे बेकरीचे पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले आहे. त्यामुळे या १४ जणांना आपल्या कौशल्याचा वापर करता येणार आहे. त्यांच्या कौशल्याच्या सादरीकरणासाठी आम्ही मार्ग शोधत होतो. अनुराधा आपटे यांनी पुण्यातील डेक्कनसारख्या ‘प्राइम लोकेशन’ला कॅफे सुरू करण्याची कल्पना मांडली आणि स्वत:ची जागाही उपलब्ध करून दिली. या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आज हे कॅफे हाउस सुरू झाले आहे. पुणेकर नक्कीच त्याला जोरदार प्रतिसाद देतील.’कॉफी आणि बरंच काही...
कॅफे हाउस सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अनुराधा आपटे म्हणाल्या, ‘मूकबधिर व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम उत्तमरीत्या चालल्याबद्दल आम्हाला आनंद वाटत होता; पण चिंता एवढीच होती की, त्यांच्या कौशल्यातून त्यांना रोजगार मिळायला हवा होता. मला कॅफेची कल्पना सुचली ती माझ्या सहकाऱ्यांसमोर मांडली आणि ती क्लिक झाली. त्याचे नावही आम्ही ‘बेक एन डाएट सायलेंट कॅफे’ असे ठेवले आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्याच्या सुरुवातीलाच असलेल्या या कॅफेमध्ये डाएटवर असलेल्यांसाठी पान, स्ट्रॉबेरी पेस्ट्री, नाचणी, अक्रोड केक आणि अर्थातच, कॉफीचा आस्वाद लुटता येणार आहे. या रस्त्यावर येणारी तरुणाई आणि पेस्ट्री-कॉफीचे शौकीन आमच्या कॅफेला नक्की भेट देतील, असा मला विश्वास आहे.’या वस्तूही उपलब्ध...
टाकाऊ वस्तूंपासून या १४ मूकबधिर व्यक्तींनी तयार केलेली बर्ड हाउस, मल्टिपर्पज होल्डर, वॉल क्लॉक्स, टायर सीटिंग, मोबाइल होल्डर, मल्टिपर्पज रॅक, जेल कँडल, मोमेंटोज, पेन स्टँड, फोटो फ्रेम, की होल्डर, पेंटिग्ज, विंड चाइम्स या वस्तूही या कॅफेमध्ये विकत घेता येतील. सीझननुसार गणपती मखर, सजावट साहित्य, आकाशकंदील, तसेच आता नाताळसाठी ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज व इतर सजावटीचे साहित्यही कॅफेत उपलब्ध आहे. 


श्रीजा ठाकूर म्हणतात...
तीन वर्षे या सर्वांना प्रशिक्षण देण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या श्रीजा ठाकूर म्हणाल्या, ‘मी मूळची शिक्षिका आहे; पण मला मूकबधिरांची भाषा येत नाही. या व्यक्तींसाठी काहीतरी करण्याची तळमळ मला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे वारज्यात आम्ही १७ नोव्हेंबर २०१५ रोजी हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले. सुरुवातीला एखादी गोष्ट समजून सांगणे प्रचंड कठीण जात होते; पण शब्दांची भाषा ऐकता येत नसली, तरीही ही सगळी मूकबधिर मंडळी मनाची भाषा आपल्यापेक्षा उत्तम समजतात हे लक्षात आल्यावर काम सोपे झाले. कारच्या टाकाऊ टायरपासून बसायच्या खुर्च्या, टाकाऊ लाकडापासून घरात वापरता येईल अशी सुबक रॅक अशा अनेक गोष्टी मी यांना शिकवत गेले. काहींचे पेंटिंग चांगले होते, त्यांनी पेंटिंग केले. हळूहळू त्यांची आणि माझी एकरूपता साधली आणि वस्तू आकाराला आल्या. सगळ्यांना बेकरी उत्पादने तयार करायला शिकवले; पण त्यातील तिघींनी ही कला लवकर आत्मसात केली. त्यांना आता पेस्ट्री तयार करण्याचे, कणकेपासून केक तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या मूकबधिर व्यक्तीच हे कॅफे हाउस संपूर्णपणे चालवणार आहेत. या माध्यमातून १४ कुटुंबांना रोजगाराची संधीही उपलब्ध झाली आहे.’ अशी आहे टीम...
पहिल्यांदा पाहिल्यानंतरच त्या विकत घ्याव्यात, अशी भुरळ पाडणाऱ्या वस्तू आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीची पेस्ट्री आणि केक तयार करणाऱ्या १४ जणांच्या टीममध्ये दत्तात्रय गुरव, श्रुती गुरव, विकास गायकवाड, मृण्मयी गायकवाड, संदीप कुसळकर, नीलिमा कुसळकर, राखी दुधाणे, अश्विनी उडगे, रूपाली ठाकूर, प्रीतिका लोखंडे, सुवर्णा पवार, अमोल शिंदे, सागर केंडे, राजेंद्र केदारी यांचा समावेश आहे. ‘क्रिएटिव्ह पीपल’च्या महानंदा बोधनकर, अजिंक्य खारतोडे आणि वैभव पाटील यांनी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सहकार्य केले आहे.बेक एन डाएट सायलेंट कॅफे हाउसचे स्थळ आणि वेळ :
डेक्कन जिमखाना परिसरात बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिसेसच्या शेजारी असलेले हे कॅफे हाउस सध्या सायंकाळी चारपासून रात्री नऊपर्यंत उघडे असेल. नंतर ते सकाळ-सायंकाळ सुरू राहील.

संपर्क :
श्रीजा ठाकूर : ९६०४५ ३१३३९
अनुराधा आपटे : ८३७८९ ८९८३९
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language