Ad will apear here
Next
पुण्यातील चार तरुणांच्या पुढाकाराने ८०० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
आयटी क्षेत्रातील चौघांचा सामाजिक बांधिलकीतून उपक्रम


पुणे :
सांगली-कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. त्या वेळी अवघ्या महाराष्ट्राने आपल्या बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला. राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी खाण्याच्या वस्तू, धान्य, कपडे, औषधे अशा विविध प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यात आला. पुण्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन थोडा वेगळा विचार केला आणि शैक्षणिक साहित्याची मदत करायचे ठरवले. सांगलीच्या पलूस तालुक्यातील नागठाणे गावातील सुमारे ८०० विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात आली.

कीर्तिराज काजळे, शंतनू कोंढाळकर, सौरभ पवार आणि सिद्धार्थ शिंदे हे आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले चार हरहुन्नरी तरुण. कोल्हापूर-सांगलीची महापुरामुळे झालेली विदारक अवस्था माध्यमांतून त्यांना कळत होती. इतर लोकांप्रमाणेच आपणही काहीतरी मदत करावी असे त्यांनी ठरवले आणि त्यातूनच ही कल्पना पुढे आली. प्रत्येकाने आपापल्या परीने मदत गोळा करण्यास सुरुवात केली. 

याबाबत सौरभ पवार म्हणाला, ‘माझ्या शाळेतील मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर या चर्चेला पहिल्यांदा सुरुवात झाली. सहज सुरू झालेली चर्चा नंतर प्रत्यक्षात आणण्याचे आम्ही ठरविले. त्याकरिता आम्ही दररोज ऑफिस संपल्यावर भेटत असू.’ 

या कल्पनेबद्दल सांगताना सिद्धार्थ शिंदे म्हणाला, ‘सौरभचे नातेवाईक सांगलीला राहात असल्याने त्यांच्याशी आमचा सतत फोनद्वारे संपर्क होता. तेव्हा त्याच्या भावाच्या बोलण्यातून आम्हाला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे बाकी सगळ्या प्रकारची मदत विपुल प्रमाणात होते आहे; मात्र विद्यार्थ्यांची दप्तरे, वह्या, पुस्तके असे सर्व साहित्य या पुराने गिळंकृत केले आहे. मग आम्ही तेच साहित्य मदत म्हणून द्यायचे ठरविले आणि जोमाने कामाला लागलो.’  कामाच्या वेळा सांभाळून हे सर्व करणे तसे आव्हानात्मक होते. मदत गोळा करताना येणाऱ्या आव्हानांविषयी बोलताना कीर्तिराज काजळे म्हणाला, ‘एखादी गोष्ट कोणाला समजावून सांगणे वेगळे आणि त्याकरिता समोरच्याकडून पैसे जमा करणे वेगळे. सुरुवातीला आम्हाला हे खूपच अवघड वाटले; पण आम्हाला चांगली माणसे भेटली आणि यामागची आमची भावना स्वच्छ होती. आमच्यासाठी एवढेच भांडवल पुरेसे होते. व्हॉट्सअॅपवर सर्वांना मेसेज पाठविताच पहिल्याच दिवशी जवळपास पाच हजार रुपये जमा झाले. त्यामुळे सर्वांनाच आणखी हुरुप आला.’ या चौघांनी मिळून जवळपास साठ हजार रुपये जमा केले. त्या पैशांतून त्यांनी शैक्षणिक साहित्य खरेदी केले व सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील शाळांमध्ये त्याचे वाटप केले. नागठाणे गावातील तीन वेगवेगळ्या शाळांमधील जवळपास ८०० विद्यार्थ्यांना ही मदत देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला वही, पुस्तक, पट्टी, पेन, पेन्सिल व खोडरबर असा संच देण्यात आला. तसेच काही अंगणवाड्यांमध्येही साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळांकडून यासाठी त्यांचे आभार मानण्यात आले. 

‘पुण्यात बसून सुरुवातीला काहीच वाटले नव्हते, मात्र तिकडे स्वतः गेल्यानंतर आम्हाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. अशा संकटाच्या काळात आम्ही केलेली इतकी छोटीशी मदतही किती मोलाची होती, हे त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या आनंदातून लक्षात आले. शिवाय शाळांमधील शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा ऋणी असल्याचा भाव, आपली मेहनत वाया गेलेली नाही हे सांगत होता,’ अशी भावना या चौघांनी व्यक्त केली.‘या मित्रांचे आभार कसे मानावेत हेच आम्हाला समजत नाही,’ असे नागठाण्याचे उपसरपंच धनाजी पाटील म्हणाले. ‘सगळीकडून मदतीचा प्रचंड ओघ होता. एकदा अशी वेळ आली, की आम्हाला महिनाभर पुरेल इतके साहित्य जमा झाले; मात्र पाणी ओसरल्यावर जेव्हा शाळा सुरू करण्याचा दिवस आला, त्या वेळी ही अडचण आमच्या लक्षात आली; पण सौरभ आणि त्याच्या मित्रपरिवाशी सतत संपर्क होता व त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला शैक्षणिक साहित्याची मदत वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पोहोचती केली. अशा संकटकाळी केलेली छोटीशी मदतही लाखमोलाची असते. अशा प्रकारचे विचार असणाऱ्या तरुणांचे आपण कौतुक करायलाच हवे,’ अशा शब्दांत पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi