Ad will apear here
Next
मौखिक आरोग्याविषयी जागरूकतेची गरज
दंतरोग तज्ज्ञांचे मत
पुणे : लहान मुलांना गोड खायला नेहमीच आवडते. त्यामुळे देशातील १० पैकी आठ मुलांमध्ये दातांच्या समस्या निर्माण झाल्या असून, रोज गोड खाणाऱ्या मुलांपैकी ८१ टक्के मुलांना दातांना कीड लागण्याचा धोका निर्माण झाल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे. पालकांमध्ये मुलांच्या मौखिक आरोग्याविषयी अपेक्षेप्रमाणे जागरूकता नाही, त्यामुळे याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे मत दंतरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

‘कोलगेट पामोलिव्ह इंडिया लिमिटेड’साठी ‘कांटर आरएमआरबी’ने देशभरात सर्वेक्षण केले. त्यात दाताच्या आरोग्याविषयी विविध निष्कर्ष पुढे आले आहेत. सर्वेक्षणात दिल्ली, चंडिगड, लखनौ, मुंबई, अहमदाबाद, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता, भुवनेश्वर आणि पाटणा या शहरांमधील २०३० प्रौढांनी आणि १०८० लहान मुलांनी भाग घेतला होता.

या सर्वेक्षणानुसार, देशातील १० पैकी आठ मुलांमध्ये मौखिक आरोग्याच्या समस्या आहेत. त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या काही समस्यांमध्ये प्लाक जमा होणे, दातांवरील पांढरे डाग किंवा कीड लागणे, हिरड्यांना सूज येणे, श्वासाला दुर्गंधी येणे, तसेच‍ हिरड्यांतून रक्त येणे यासारख्या समस्या उद्भवल्याचे दिसून आले. सुमारे ४४ टक्के मुलांना दात काढून टाकणे, रूट कॅनाल, रिस्टोरेशन असे उपचार करण्याची वेळ आली आहे.  
मुलांचे मौखिक आरोग्य आणि त्यांच्या पालकांनी केलेल्या अपेक्षा यामध्ये मोठी तफावत आहे. १० पैकी आठ पालकांना मुलांचे दात निरोगी आहेत, असे वाटते; पण दातांच्या तपासणीवेळी ८० टक्के मुलांमध्ये मौखिक आरोग्याची समस्या आढळली. बहुतांश मुले दोन वेळा दात घासणे किंवा नियमितपणे दातांची तपासणी करीत नाहीत. १० पैकी आठ मुलांमध्ये रोज गोड खाण्याने समस्या निर्माण झाल्याचे आढळले. त्यामुळे मुलांच्या दातांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दंतरोग तज्ज्ञांनी दिला आहे. 

‘बाळाला दुधाचे दात आल्यापासून दातांची काळजी घ्यावी लागते, याची माहिती देशातील बहुतांश पालकांना नाही. हे दात लहान मुलाच्या एकंदर वाढीवर परिणाम करतात. ज्या वेळी मुले अन्नपदार्थ चावून खातात, त्या वेळी जबड्याचीही वाढ होत असते. मोठ्या प्रमाणावर कीड आणि मौखिक आरोग्याच्या समस्येमुळे दुधाच्या दातांच्या मुळांवर परिणाम होतो,’ असे ‘इंडियन सोसायटी ऑफ पीडोडेंटिस्ट अँड प्रीव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री’च्या (आयएसपीपीडी) सदस्या डॉ. मीनाक्षी खेर यांनी सांगितले.

इंडियन असोसिएशन ऑफ पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. व्ही गोपालकृष्णन् म्हणाले, ‘या अभ्यासातून देशभरांतील मौखिक आरोग्याची समस्या अधोरेखित होते. हे वाढते प्रमाण लक्षात घेता लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज आहे. मधुमेह, बाळाची पूर्ण वाढ न होणे आणि वजन कमी असणे, तसेच ऑथोरोस्केलोसिस अशा आजारांमुळेही हे घडू शकते. दातांच्या समस्यांचे व्यवस्थापन आणि चांगले मौखिक आरोग्य यामुळे दात मजबूत होऊन व्यक्तीचे एकंदरीत जीवन चांगले होण्यास मदत होते.’

सर्वेक्षणातील निष्कर्ष

- देशातील १० पैकी आठ मुलांमध्ये मौखिक आरोग्याची समस्या.

- देशातील तीनपैकी दोन मुलांच्या दातांना कीड किंवा ती होण्याचा धोका.

- केवळ सात टक्के पालक मुलांच्या मौखिक आरोग्याविषयी जागरुक.

- १० पैकी सात मुलांनी वर्षभरात दंतवैद्यांकडे जाऊन तपासणी केलेली नाही. त्यांच्यापैकी ८१ टक्के मुलांना मौखिक आरोग्याच्या मोठ्या समस्या.

- रोज गोड खाणाऱ्या ८१ टक्के मुलांच्या दातांमध्ये समस्या, त्यापैकी ६८ टक्के मुलांच्या दातांमध्ये कीड होण्याचा धोका.

- सर्वेक्षणातील बहुतांश मुले दिवसातून दोनदा दात घासत नाहीत. दिवसातून एकदाच दात घासणाऱ्यांपैकी ८२ टक्के मुलांमध्ये मोठ्या मौखिक आरोग्याच्या समस्या. त्यातील ६९ टक्के मुलांच्या दातांमध्ये कीड.

- रोज गोड खाणाऱ्यांपैकी ८१ टक्के मुलांमध्ये मौखिक आरोग्याच्या मोठ्या समस्या असून ६७ टक्के मुलांच्या दातांमध्ये कीड आहे किंवा ती होण्याचा धोका आहे.

प्रौढांमधील निष्कर्ष

- सर्वेक्षणातील १० पैकी नऊ व्यक्तींमध्ये मौखिक आरोग्याच्या मोठ्या समस्या

- ७६ टक्के नागरिकांमध्ये दातांना कीड अथवा ती होण्याचा मोठा धोका

- १० पैकी सात नागरिकांना त्यांचे दात आरोग्यपूर्ण आहेत, असे वाटते. त्यापैकी ८९ टक्के जणांमध्ये मौखिक आरोग्याच्या समस्या आहेत.

- दिवसातून एकदा दात घासणाऱ्या ९५ टक्के लोकांमध्ये मौखिक आरोग्याची समस्या आहे. त्यातील ८३ टक्के लोकांच्या दातांना कीड आहे.

- सर्वेक्षणातील १० पैकी सहा व्यक्तींनी गेल्या वर्षभरात दंतरोग तज्ज्ञाला भेट दिलेली नाही. त्यातील ९० टक्के लोकांमध्ये मौखिक आरोग्याच्या समस्या.

- प्रौढ व्यक्तींना दातांच्या समस्यांमुळे रिस्टोरेशन, रूट कॅनाल किंवा दात काढून टाकण्याच्या उपचारांची गरज   
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language