Ad will apear here
Next
पुणेकरांसाठी अस्सल जर्मन नाटकाची मेजवानी
१४ ते १६ जुलैदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन
जर्मन नाटक ‘पॅराडाइज’मधील एक क्षण

पुणे : ‘तरुण मुले दहशतवादाकडे का वळतात’ या विषयावर ‘टुवर्ड्स पीस’ या परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि मॅक्सम्युलर भवन यांच्या वतीने १४ ते १६ जुलै २०१९ या कालावधीत ही परिषद होणार आहे. यात या संकल्पनेवर आधारित ‘पॅराडाइझ’ या नाटकाबरोबरच श्रीरंग गोडबोले व विभावरी देशपांडे लिखित, दिग्दर्शित ‘वाय’ या नाटकाचा प्रयोग परिषदेच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १४ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. याशिवाय चर्चासत्र, रॉक कॉन्सर्ट, लघुपट स्पर्धा, स्मरणिका प्रकाशन असे विविध कार्यक्रम या वेळी होतील, अशी माहिती प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले व महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले यांनी दिली.

या परिषदेचे उद्घाटन १४ जुलैला सकाळी १०.३० काश्मिरी गायिका प्रज्ञा वाखलू व गंधर्व अमीन यांच्या ‘पीस’ या रॉक कॉन्सर्टने होणार आहे. प्रज्ञा वाखलू या गायक, संगीतकार व सामाजिक कार्यकर्त्या असून, त्यांच्या कामातून त्या अनेक सामाजिक विषयांवर प्रकाश टाकत सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करत असतात. गंधर्व अमीन हे बासरीवादक आहेत. या निमित्ताने परिषदेच्या संकल्पनेवर आधारित आयोजित केलेल्या पोस्टर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा होईल.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, १५ जुलैला सायंकाळी पाच वाजता ‘यूथ रॅडिकलायझेशन’ (तरुण दहशतवादाकडे का वळतात) या विषयावरील लघुपट दाखविण्यात येणार आहेत. यानंतर या विषयावर तज्ज्ञांचे चर्चासत्र होईल. यात प्रगती लीडरशिपचे संचालक व प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण वाखलू, ‘मंत्रया’चे संस्थापक अध्यक्ष शांती मॅरिएट डिसूझा, जर्मनीतील प्रसिद्ध नाटककार लुट्झ ह्युबनर, नवी दिल्ली येथील ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन’शी संलग्न असलेले व काश्मीर वाद, विद्रोह आणि सीमा दहशतवाद या विषयावर संशोधनात्मक अभ्यास असलेले खालिद शाह यांचा समावेश असेल. ज्येष्ठ पत्रकार राहुल चंदावरकर हे त्यांच्याशी संवाद साधतील.  

पुण्यातील पुरोगामी नाट्यरसिक आणि जर्मन भाषाप्रेमी यांच्यासाठी खास आयोजित ‘पॅराडाइज’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. ‘तरुण दहशतवादाकडे का वळतात’ या विषयावर आधारित असलेले हे नाटक रसिकांना १६ जुलैला सायंकाळी ५.३० वाजता टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात बघायला मिळणार आहे. डुसेलडॉर्फ येथील ‘डी-हाउस’ या नाट्यसंस्थेतर्फे सादर केले जाणारे हे जर्मन भाषेतील हे नाटक तेथील प्रसिद्ध नाटककार लुट्झ ह्युबनर व सारा निमिट्झ यांनी लिहिलेले असून, मीना साल्हेपोर या नाटकाच्या दिग्दर्शिका आहेत. नाटकास विनामूल्य प्रवेश असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर तो दिला जाणार आहे.

जर्मन नाटकांचा आणि तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित विविध कार्यक्रमांचा रसिकांनी मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language