Ad will apear here
Next
‘भीक देऊन परावलंबी करण्यापेक्षा मदत करून स्वावलंबी बनवा’
डॉ. अभिजित सोनावणे यांचे आवाहन; पूजा घनसरवाड यांना दुर्गा पुरस्कार
हिंदू महिला सभेच्या वतीने आयोजित नवरात्र महोत्सवात यंदा ‘दुर्गा पुरस्कारा’ने पूजा घनसरवाड यांचा डॉ. अभिजित सोनावणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी (डावीकडून) सुप्रिया दामले, पूजा घनसरवाड, डॉ. अभिजित सोनावणे व डॉ. मनीषा सोनावणे.

पुणे : ‘आयुष्यात कोणालाही भीक देऊ नका; पण मदत मात्र नक्की करा. भीक देणे म्हणजे समोरच्याला आपल्यावर अवलंबून राहण्यास प्रवृत्त करणे आणि मदत करणे म्हणजे स्वावलंबी बनविणे. भिकारी भीक मागतात याला भीक देणारेच उपाय करू शकतात. भीक देणे बंद केले तरच ते पोटापाण्यासाठी पर्याय शोधतील. म्हणूनच भीक देऊन परावलंबी करण्यापेक्षा मदत करून स्वावलंबी बनवा,’ असे आवाहन भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे व सोहम ट्रस्टचे डॉ. अभिजित सोनावणे यांनी केले.

डॉ. अभिजित सोनावणे
चितेच्या प्रकाशात अभ्यास करून दहावीत घवघवीत यश मिळवणाऱ्या पूजा घनसरवाड यांचा हिंदू महिला सभेच्यावतीने दुर्गा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सोनावणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले, डॉ. मनीषा सोनावणे, गुरुनाथ ट्रॅव्हलच्या रोहिणी नामजोशी पांढरे, कथाकथनकार वसुधा मेहेंदळे आदी उपस्थित होते. या नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यात शहीद जवानांच्या तीन मुलींचे कुमारिका पूजनही करण्यात आले.

या वेळी सोनावणे म्हणाले, ‘माझ्या आई-वडिलांनी खूप कष्टाने शिकवून डॉक्टर केले. त्यामुळे पुढे मार्ग माझा मी शोधायचा ठरवला. मी गावोगावी जाऊन पाठी-पोटी, खांद्यावर अशा चार-चार बॅगा घेऊन लोकांचे दरवाजे ठोठावून त्यांना सेवा हवी का म्हणून विचारत असे; पण लोक विश्वास ठेवत नसत. एका गावात एक भिक्षेकरी बाबा होते त्यांनी मला खूप काही शिकविले; पण ते त्या वेळी समजले नाही. पैसा हेच माझे ध्येय होते. पुढे १४-१५ वर्ष हेच ध्येय ठेऊन जीवापाड मेहनत करून देशाचे प्रतिनिधित्व करायला अमेरिकेलाही गेलो. महिन्याला अडीच लाख रुपये पगार कमावत होतो; पण त्या वेळी मागे वळून पाहताना ते बाबा आठवले. त्यांना वैभव दाखवावे म्हणून त्या गावी गेलो, तर ते बाबा हयात नव्हते. मग त्यांनी सांगितलेला ‘गेम ऑफ सपोर्ट’ आठवला. मी तुला मदत केली, तर तू ती मला परत न करत पुढच्याला दे. हाच गेम खेळायचा ठरवून ती नोकरी २०१५ मध्ये सोडली आणि पुन्हा अंगावर चार-चार बॅगा घेऊन या भिक्षेकऱ्यांची सेवा सुरू केली.’

डॉ. सोनावणे देवाला वाटून दिलेल्या वारांप्रमाणे त्या-त्या मंदिरांबाहेर बसलेल्या भिक्षेकऱ्यांची सेवा करतात. त्यांच्या या कुटुंबात ११०० लोक आहेत असे ते सांगतात. त्यांनी आजवर २०० ते २५० भिक्षेकऱ्यांची नेत्र शस्त्रक्रिया केली आहे. १४ मुले भीक मागणे सोडून शिक्षण घेऊ लागली आहेत. सुमारे १५ म्हाताऱ्या भिकाऱ्यांना वृद्धाश्रमात ठेवले असून, ५७ भिकाऱ्यांना व्यवसाय सुरू करून दिले आहेत.

पूजा घनसरवाड
दुर्गा पुरस्काराच्या मानकरी पूजा घनसरवाड म्हणाल्या, ‘माझे कुटुंब स्मशानात प्रेताच्या अंत्यविधीसाठी आलेल्यांना लाकूड, पाणी आदी वस्तू पुरविण्याचे काम करते. आई-वडील अशिक्षित आहेत. वडिलांना थोडी अक्षर ओळख असल्याने त्यांना आम्हा मुलांना शिकवून मोठे करण्याची दृढ इच्छा होती. आई सुया, फुगे, पिना विकायची. शाळेतली मुले चिडवायची; पण मला लाज वाटायची नाही कारण आम्ही मेहनत करून खात होतो. आमच्या समाजात कोणी शिकत नाही; पण आम्ही पाचही भावंडे शिकत आहेत. मी डी. फार्मसी केले आहे. माझे वडील कायम म्हणतात, जे आहे त्यावर रडण्यापेक्षा त्यातून मोठे होण्याचा प्रयत्न करा. चिता जाळायला येणारे लोक त्या मृत व्यक्तीच्या चांगल्या गोष्टीला आठवतात. म्हणून आपण कायम चांगले काम करायचे हे फार लवकर समजले. परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हाच एकमेव उपाय आहे.’
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi