Ad will apear here
Next
फेसबुक दिंडीत यंदा अवयवदानाविषयी जनजागृती

पुणे : समाजाभिसरणाचे अनोखे उदाहरण आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेल्या पंढरपूरच्या वारीचा घरबसल्या अनुभव देणाऱ्या फेसबुक दिंडीचे ई-वारकरी दर वर्षी वाढतच आहेत. या माध्यमाचा वापर करून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. या वेळी ही दिंडी अवयवदान जागृतीचा उपक्रम राबवत आहे. २४ जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र देहूवरून प्रस्थान ठेवणार आहे. तेव्हापासून या फेसबुक दिंडीलाही प्रारंभ होणार आहे.
 
याबाबत अधिक माहिती देताना या फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे म्हणाले, ‘दर वर्षी फेसबुक दिंडीद्वारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवल्यापासून पंढरपूरला पोहोचेपर्यंतचे फोटो, व्हिडिओ अपडेट्स देण्याबरोबरच आम्ही सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवतो. या वर्षी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ३३४वे वर्ष असून, यंदा फेसबुक दिंडीचे नववे वर्ष आहे. यंदा अवयवदानाविषयी जनजागृती घडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. धन्वंतरी ऑर्गनायझेशन फॉर सोशिओ-हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन आणि मुंबईतील ‘दोस्त’ या संघटनेच्या मदतीने ‘देह पंढरी’ हा उपक्रम राबवणार आहोत. ‘मरावे परी देहरूपी उरावे’ असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अवयवदान करण्यासाठी लोकांनी पुढे यावे असे आवाहन आम्ही करत आहोत. त्यासाठी https://fbd.infinityits.in ही वेबसाइट तयार करण्यात आली असून, त्यावर अवयवदानाचा अर्ज भरता येईल. दर वर्षीप्रमाणे यंदाही फेसबुक दिंडीच्या ‘देह पंढरी’ मोहिमेला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळेल, असा आमचा विश्वास आहे.’ 


‘जगभरातील वारकरी या फेसबुक दिंडीतून वारीचा घरबसल्या अनुभव घेतात. लाखो लोक या फेसबुक दिंडीचे इ-वारकरी आहेत. २०११पासून सुरू झालेल्या या उपक्रमाने नवनवीन टप्पे पार केले आहेत. फेसबुकच्या माध्यमातून सुरू झालेली ही दिंडी गेल्या तीन वर्षांपासून अॅपद्वारे लोकांपर्यंत पोहोचली आहे. फोटो, व्हिडिओ, थ्री डी, अॅनिमेशन, चित्रे यांच्याद्वारे प्रत्यक्ष वारीत सहभागी झाल्याचा अनुभव देणारी ही अत्याधुनिक दिंडी अधिकाधिक लोकोपयोगी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी फेसबुक दिंडीचे सदस्य मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, ओंकार महामुनी, अमोल गावडे अथक प्रयत्न करत आहेत,’ असेही स्वप्नील मोरे यांनी सांगितले.   


हेही जरूर वाचा :

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language