Ad will apear here
Next
पेनप्रेमींनी एकत्र येत उलगडले पेनाविषयीचे भावविश्व
पुण्यात दुसरा ‘पेलिकन हब’ महोत्सव साजरा
पुण्यातील ‘पेलिकन हब’ या पेन महोत्सवात आपापल्या पेनांसोबत पेन प्रेमी.

पुणे : एका ‘नॉब’ने बदलणारी निब, सोन्याचे टोक असणारे निब, खटक्याचे फाउंटन पेन, पेनाला जोडलेले वैविध्यपूर्ण शाईचे पंप, अगदी २५ रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंतचे शाईचे प्रकार... त्याच्या वैशिष्ट्यांविषयी, प्रकारांविषयी भरभरून होणारी चर्चा आणि त्या वैशिष्ट्यपूर्ण पेनांना एकदा तरी स्वतः स्पर्श करून, त्याने लिहून बघण्याचे कुतूहल... अशा भारावलेल्या वातावरणात पुण्यातील ‘पेनप्रेमींची’ शुक्रवारची संध्याकाळ रंगली होती. निमित्त होते व्हिनस ट्रेडर्सच्या सुरेंद्र करमचंदानी यांच्या पुढाकाराने पुण्यात आयोजित ‘पेलिकन हब’ या पेनविषयक विशेष कार्यक्रमाचे. 


‘पेलिकन’ या जर्मनीतील प्रसिद्ध पेन कंपनीने खास ‘पेनप्रेमीं’साठी जगभरात ‘पेलिकन हब’ या नावाने महोत्सव सुरू केला आहे. हा महोत्सव जगभरात सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी तेथील स्थानिक वेळेनुसार सायंकाळी साडे सहा वाजता साजरा केला जातो. यंदा हा महोत्सव जगभरात ४८ देशांतील १९९ शहरांमध्ये एकाच दिवशी साजरा करण्यात आला. भारतात दिल्ली, कलकत्ता, बंगळूरू, चेन्नई, अहमदाबाद, मुंबई, पुणे अशा एकूण १० ठिकाणी साजरा झाला. पुण्यात या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष होते. यात पुण्यातील २५ ‘पेनप्रेमीं’नी आपल्या वैविध्यपूर्ण पेनांचे संग्रह प्रदर्शित करून त्यावर चर्चा केली. या वेळी व्हिनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदानी, एम. जी. काळे पेन्सचे मकरंद काळे, मानस काळे, मंदार काळे, पेनप्रेमी अरुण जुगदर, दीपेश मेहता, विजय निंबरे आदी उपस्थित होते.

पुण्यातील प्रसिद्ध ‘एम जी काळे पेन्स’ यांचा सन्मान पुणेकर पेन प्रेमींकडून करण्यात आला. या वेळी (डावीकडून) सुरेंद्र करमचंदानी, मानस काळे, मकरंद काळे, अरुण जुगदर, मंदार काळे.

त्याचप्रमाणे पुण्यात १९६० ते ८० च्या काळामध्ये सर्वांना सुपरिचित असलेले एक नाव म्हणजे ‘एम. जी. काळे पेन्स’. या पेनाचा दर्जा, निब, शाई आणि त्यामुळे उमटणारे सुवाच्य आणि आकर्षक अक्षर यामुळे बहुतेक पालक व विद्यार्थ्यांचा हे पेन घेण्याकडे विशेष ओढा असे. त्याकाळात पेन ‘असेम्बल’ करून देणारे व पेनवर तब्बल पाच वर्षांची ‘गॅरंटी’ देणारे हे पेन विक्रेते होते. त्यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. हा सन्मान काळे कुटुंबातील मकरंद काळे यांनी व्हिनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदानी यांच्या हस्ते स्वीकारला. सन्मानपत्र, पुणेरी पगडी, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.

‘हस्ताक्षर ही आपली ओळख आहे आणि ते सुंदर असायला हवे, असे मानणाऱ्या पेनप्रेमी विजय निंबरे यांच्याकडे विविध प्रकारच्या पेनांबरोबरच विविध प्रकारच्या शाईंचे संकलन आहे. ते म्हणाले, ‘शाळेत असताना माझे अक्षर  खूप सुंदर होते. हस्ताक्षर स्पर्धांमध्ये मला बक्षिसे मिळाली होती. पुढे बॉल पेन वापरायला लागल्यावर ते बिघडले आणि एकदा मित्रांनीच मला याची जाणीव करून दिली. त्या वेळी मी ठरवले की, आपण परत फाऊंटन पेन वापरायला लागायचे. तेव्हापासून माझे हे संकलन सुरू झाले. गेल्या पाच वर्षांत माझ्याकडे ३०-४० पेनांचा संग्रह आहे. सुरुवात ‘एएसए थ्री इन वन’ या पेनापासून झाली. पेन प्रेमींचे व्हॉटसअॅप, फेसबुक ग्रुप आहेत. त्यातून अधिक माहिती मिळत गेली. जर्मन, इटालियन, जपानी व अमेरिकन पेनांना खूप मागणी आहे. त्यांचा दर्जाही तसा उत्तम आहे. त्यामुळे त्या त्या पेनाला त्याच ब्रँडची शाई वापरली, तर पेनाचे आयुष्य वाढते. शाईची एक बाटली २५ रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत अशा मोठ्या रेंजमध्ये मिळते.’

पेनप्रेमी दीपेश मेहता यांच्याकडे साधारण ५०० ते ६०० पेनांचे संकलन आहे. त्यांचे आजोबा, मामा यांच्याकडून त्यांना ही पेन संकलनाची आवड मिळाली. त्यांच्याकडे तीन रुपयांपासून ते ५० हजारांपर्यंतचे पेन आहेत. यातील ‘पायलट जसटस ९५’ हा त्यांचा सर्वात आवडता पेन आहे. तो कधी साध्या निबेचा फाउंटन पेन म्हणून आणि लवचिक निबेचा पेन म्हणून अशा दोन प्रकारे वापरता येतो. फाईन, ब्रॉड, डबल ब्रॉड, मिलीमीटर स्टब, १.५ मिलीमीटर स्टब अशा सुमारे ३६ ते ८० प्रकारच्या निब असतात,’असेही मेहता यांनी सांगितले.


या वेळी काळे पेनाचा इतिहास सांगताना मकरंद काळे म्हणाले, ‘एम. जी. काळे म्हणजे माझे वडिल मुरलीधर गोपाळ काळे. त्यांनी १९७० मध्ये हे फाउंटन पेनचे दुकान सुरु केले होते. हे पेन मुख्यतः विद्यार्थ्यांना डोळ्यापुढे ठेऊन बनविलेले असत. तरी प्राध्यापक, प्राचार्य, बरेच अधिकारी लोक हा पेन वापरत असत. इतर आमच्या पेनाला दर्जा होता, म्हणूनच आम्ही यावर ‘गॅरंटी’ देत असू. शिवाय त्या काळात एकतर निळी किंवा काळी अशा दोनच रंगात शाई मिळे. पण आम्ही निळी-काळी एकत्र अशी गडद निळ्या रंगाची नवी शाई सुरु केली, जी आम्ही घरीच स्वतः बनवत असू. उत्तम दर्जा ही आमच्या पेनाची खासियत होती. पण १९८०च्या सुरुवातीला बॉल पेन सुरू झाले. ते तुलनेने स्वस्त आणि वापरण्यास सोपे होते त्यामुळे आमच्या पेनांचा खप कमी होऊ लागला. आम्हाला आमचा दर्जा कमी करायचा नव्हता त्यामुळे ते परवडेनासे झाले, परंतु आता जुनी आठवण म्हणून पेन प्रेमींचा हे पेन परत आणण्यासाठी फार आग्रह होत आहे. त्यामुळे लिमिटेड एडिशन स्वरुपात काळे पेन बाजारात आणण्याचा विचार करत आहोत,’ असेही काळे यांनी सांगितले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi