Ad will apear here
Next
मुंबई पर्यटन : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

‘करू या देशाटन’
सदरात सध्या आपण मुंबईतील पर्यटनाची माहिती घेत आहोत. आजच्या भागात पाहू या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व आजूबाजूचा भाग....
.........
एखाद्या चित्रपटातील हिरो खेड्यातून रेल्वेने निघतो व एकदम मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवरच आलेला दिसतो आणि कथेला सुरुवात होते. त्यामुळे अनेक चित्रपटांत ब्रिटिश शैलीतील या अतिभव्य इमारतीचे दर्शन होते. राज्यभरातून आणि देशभरातून मुंबईत आलेल्यांना याच जागतिक वारसास्थळाचे दर्शन पहिल्यांदा होते. 

नाना शंकरशेट यांचा पुतळाजगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट : मुंबईचे भारताशी दळणवळण खऱ्या अर्थाने १८५३मध्ये सुरू झाल्याने मुंबईचा झपाट्याने विकास झाला. बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली रेल्वे धावली. या रेल्वेतून प्रवास करणारे, इंडियन रेल्वे संघ स्थापन करणारे, तसेच रेल्वे बोर्डाचे पहिले भारतीय संचालक जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांचे स्मरण केल्याशिवाय पुढे जाणे अशक्य आहे. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट मुरकुटे यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे १० ऑक्टोबर १८०० रोजी झाला व निधन ३१ जुलै १८६५ रोजी मुंबई येथे झाले. ते मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सभासद होते. व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालय निर्मितीमध्येही त्यांचा सहभाग होता. त्यांनी अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. अनेक अरब, अफगाण, तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेट यांच्या हवाली करीत. त्यांनी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला, तसेच सार्वजनिक कामांकरिता खर्च करून टाकला. (नाना शंकरशेट यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

रेल्वेचा इतिहास : बोरीबंदर ते ठाणे ही पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. हा टप्पा ३३ किलोमीटरचा होता. १४ डबे असलेल्या या रेल्वेत ४०० प्रवाशांनी (निमंत्रित अतिथी) पहिला प्रवास केला. या रेल्वेच्या ऐतिहासिक प्रवासात आमंत्रित प्रतिष्ठित लोकांचे भव्य स्वागत करण्यात आले होते. त्याच्या चहा-नाश्त्याची खास व्यवस्थाही ट्रेनमध्येच केली होती. या गाडीला साहिब, सिंध आणि सुलतान अशा नावांची तीन इंजिन होती. या वेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली. रेल्वेमुळे ब्रिटिशांना भारतावर नियंत्रण करणे व राज्यविस्तार करणे सोपे झाले. ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (जीआयपी रेल्वे) या कंपनीने ही सेवा सुरू केली. भारतीय रेल्वेच्या प्रगतीचा प्रवास खूपच रंजक आहे. खरे तर २२ डिसेंबर १८५१ रोजी रुरकी ते कालियारदरम्यान १० किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाची चाचणी झाली होती; पण तांत्रिक अडचणीमुळे ती रोज सुरू होण्यास बराच कालावधी लोटला. जीआयपी रेल्वेनंतर सात वर्षांत देशात आणखी आठ रेल्वे कंपन्या स्थापन झाल्या. १८५४पर्यंत बोरीबंदर-ठाणे ही रेल्वे कल्याणपर्यंत वाढविण्यात आली. 

पूर्वेकडे हावडा ते हुगळी मार्गही १५ ऑगस्ट १८५४ रोजी सुरू झाला. (लांबी ३६ किलोमीटर)

दक्षिणेकडे तीन मार्च १८५९ रोजी चेन्नईजवळील व्यासरपडी ते अर्काट हा रेल्वेमार्ग सुरू झाला. (लांबी १०० किलोमीटर). 

उत्तरेकडे १९ ऑक्टोबर १८७५ रोजी हाथरस रोड ते मथुरा हा मार्ग कार्यान्वित झाला. 

मुंबई-पुणे मार्गातील खोपोलीपर्यंतचे काम १८५६पर्यंत पूर्ण झाले होते. 

पुण्याकडून मुंबईकडे खंडाळ्यापर्यंतचे काम सन १८५८मध्ये पूर्ण झाले. कोकणातील पळसदरी ते खंडाळा हे अवघड काम १८६२मध्ये पूर्ण झाले व मुंबई जोडली गेली. १८७१मध्ये पुणे-रायचूर मार्ग पूर्ण झाला. त्याच वेळी अर्कोणमकडूनही रायचूरपर्यंत काम पूर्ण झाले व मुंबई चेन्नईपर्यंत रेल्वेने जोडली गेली (अंतर १२८१ किलोमीटर). 

याच वेळी पूर्व-उत्तर बाजूकडूनही कामे चालूच होती. मुंबईहून कलकत्त्यापर्यंतचा थेट प्रवास सात मार्च १८७० रोजी सुरू झाला. या ट्रॅकचे उद्घाटन तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड मेयो यांच्या हस्ते झाले. सन १८८०पर्यंत १३ हजार ५०० किलोमीटर व २००३च्या आकडेवारीप्रमाणे ६३ हजार १४० किलोमीटरचे काम पूर्ण झाले. ‘गदिमां’च्या कवितेतील ‘झुक झुक झुक आगीनगाडी’च्या धुरांची रेषा कधीच विरून गेली. त्याची जागा डिझेल व बरोबरीने विद्युत इंजिनांनी कधी घेतली ते कळलेच नाही. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस :
हे भारतातील सर्वांत जुने आणि सर्वांत सुंदर रेल्वे स्टेशन आहे. सुरुवातीला ‘बोरीबंदर’ किंवा ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ किंवा व्हीटी म्हणून ओळखले जाणारे हे स्टेशन २००६मध्ये ‘युनेस्को’कडून जागतिक वारसा म्हणून घोषित केले गेले. 

फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्सया इमारतीच्या आराखड्याचे संकल्पचित्र आर्किटेक्ट फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी केले आहे. यासाठी त्यांनी १६.१४ लाख रुपये शुल्क आकारले होते. शिवाय अतिरिक्त पाच हजार रुपयांची मागणी केली होती. ही गोष्ट सन १८८८मधील आहे. या भारतातील पहिल्या रेल्वेस्थानक बांधण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला (१८७८ ते १८८८). 

रेल्वेने जाणारा माणूस रेल्वेत जागा पकडण्यात व आलेला माणूस घर गाठण्यात व्यस्त असतो. त्यामुळे ही इमारत प्रवाशांनी जाता येता पाहिली असली, तरी तिचे बारकावे फार थोड्या लोकांना माहीत आहेत. जगातील वारसास्थळांमध्ये समाविष्ट असलेली ही इमारत बारकाईने बघितल्यावर यातील अनेक सुंदर गोष्टी नजरेसमोर येतात. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - १९१०मधील फोटो

इमारतीच्या दर्शनी भागात मधोमध ब्रिटिश गॉथिक शैलीतील वैशिष्ट्यपूर्ण घुमट दिसून येतो. यावरील कमानी व छोटे मनोरे या इमारतीची शोभा वाढवितात. स्टेशनच्या मुख्य इमारतीच्या घुमटावर पांढऱ्या रंगामध्ये महिलेची मूर्ती आहे. सुमारे १८ फूट उंचीच्या या पुतळ्याला ‘दी लेडी ऑफ प्रोग्रेस’ म्हणतात. तिच्या डाव्या हातात एक चाक आहे, जे प्रगती किंवा गतिशीलता दर्शवते. तिच्या उजव्या हातात ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’प्रमाणे जळत असलेली मशाल आहे. या मनोऱ्याकडे आतील बाजूने जाणारा लाकडी जिना सुंदर नक्षीकाम केलेला आहे. तेथील दरवाजे एखाद्या शाही महालात असावेत असे आहेत. खिडकीची तावदाने सुंदर रंगविली आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बुकिंग हॉलचे छतएका खिडकीवरील मोराचे उठावचित्र लक्षवेधक आहे. त्यामध्ये जवळून पाहिल्यास एका खिडकीच्या तळाशी एक शिल्प, दिसते. भारतातील लोकांची विविधता दाखविणारे १४ वेगवेगळ्या पगड्या घातलेले लोक येथे दिसून येतात. या स्थानकाच्या बाहेर सिंहाच्या दोन सुंदर प्रतिमा आपले स्वागत करतात. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस असलेल्या कक्षामध्ये एक छोटे संग्रहालयासारखे दालन असून, यात रेल्वेचा इतिहास सुंदर रीतीने मांडला आहे. 

रेल्वे सुरू झाली त्या वेळची वेळापत्रके, जाहिराती बघताना मजा येते. त्या वेळी लोकांनी रेल्वे, टपाल या गोष्टी सहजपणे स्वीकारल्या नव्हत्या. त्यासाठी हरतऱ्हेच्या जाहिराती करण्यात आल्या होत्या. डेक्कन क्वीनची जाहिरातही अत्यंत कल्पतेने केलेली दिसून येते. त्या वेळच्या ‘बॉम्बे टाइम्स’मधील दिलेली रेल्वेची वेळापत्रके व जाहिराती येथे पाहायला मिळतात. 

जेथे आपण तिकीट काढतो, तेथे मानेला थोडे कष्ट देऊन वर पाहावे. तेथे जणू चमकणारे आकाश आहे, असे वाटेल अशा पद्धतीने छताचे काम केलेले दिसेल. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - घुमटदादाभाई नौरोजी रोडच्या बाजूला उपनगरी गाड्या सुटतात व येतात. त्यानंतर बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या सुटतात. सध्या या रेल्वे स्टेशनवर १८ प्लॅटफॉर्म्स आहेत. येथून मध्य रेल्वेच्या गाड्या पुणेमार्गे चेन्नई, हैदराबाद व बेंगळुरूकडे जातात. कल्याण, भुसावळमार्गे नागपूर, कोलकाता, तसेच दिल्ली, जम्मू, वाराणसी, पाटणा, दिब्रुगड येथेही जातात. कोकण रेल्वेच्या गाड्या दिवा, पनवेलमार्गे रत्नागिरी, गोवा, त्रिवेंद्रमकडे जाणाऱ्या गाड्याही येथून सुटतात. येथून संपूर्ण भारतात कोठेही जाता येते. 

मुंबई महापालिका : मुंबई महापालिकेची स्थापना १८६५मध्ये झाली. त्या वेळी आर्थर क्रॉफर्ड हे पहिले नगरपालिका आयुक्त होते. २०११च्या जनगणनेनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ ४८०.२४ चौरस किलोमीटर इतके असून, एक कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ इतकी लोकसंख्या या महानगरामध्ये सामावलेली आहे. भारताचा एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार, सरकारी महसूल यामध्ये या महानगराचा मोठा वाटा असून, शिक्षण, वैज्ञानिक व तंत्रज्ञान संशोधन, तसेच प्रगतीमध्ये हे आघाडीचे केंद्र बनले आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकानऊ डिसेंबर १८८४ रोजी लॉर्ड रिपन यांनी मुंबई पालिकेच्या इमारतीच्या पायाचा मुहूर्त केला. इमारत १८९३मध्ये पूर्ण झाली. या इमारतीसाठी दोन संकल्पचित्रे (डिझाइन्स) विचारात घेण्यात आली होती. त्यातील एक गॉथिक शैलीतील डिझाइन फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी सादर केले होते. दुसरे संकल्पचित्र इंडो-सारासेनिक शैलीमध्ये रॉबर्ट फेलो चिशोल्म यांनी सादर केले होते. अखेर फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी सादर केलेल्या डिझाइनची निवड केली गेली. ही इमारत तिच्या २५५ फूट उंच टॉवरसाठी ओळखली जाते. याचे मुख्य आर्किटेक्चरल वैशिष्ट्य म्हणजे २४४ फूट उंचीचा मध्यवर्ती घुमट. पंख असलेल्या स्त्रीचा आकर्षक पुतळा त्यावर आहे. घुमट बांधण्याची जुनी शैली येथे पुनरुज्जीवित करण्यात आली आहे. 

शहराच्या हवामानानुसार गॉथिक आर्किटेक्चरमध्ये खिडकीच्या कमानी आणि घुमटाच्या टोकापर्यंत असलेले टोकदार मनोरे आकर्षक पद्धतीने बांधले आहेत. जुन्या ब्रिटिश शैलीतील भव्य सभागृहही बघण्यासारखेच आहे. इमारतीवर पंख असलेल्या सिंहाचीही देखणी प्रतिमा आहे. 

फिरोजशहा मेहता पुतळामहापालिकेच्या इमारतीसमोर दादाभाई नौरोजी मार्ग व मुंबई महापालिका मार्ग जेथे मिळतात, तेथे फिरोजशहा मेहता यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. फिरोजशहा मेहता यांची १८७३मध्ये मुंबई पालिकेचे कमिशनर म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच ते मुंबई पालिकेचे चार वेळा अध्यक्षही होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक होते. 

कसे जाल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे मध्य रेल्वेच्या उपनगरी व मुख्य रेल्वेमार्गावरील कोणत्याही ट्रेनने येता येते. मुंबईतील कोणत्याही भागातून येथे जाण्यासाठी बेस्टच्या बसेस उपलब्ध आहेत. तसेच टॅक्सी सेवाही उपलब्ध आहे. 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language