Ad will apear here
Next
वैभवशाली साताऱ्याची सफर – भाग ६
शिखर शिंगणापूर - शंभू महादेव मंदिर (फोटो : महादेव साप्ते)

‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण सातारा जिल्ह्यातील फलटण व आसपासचा परिसर पाहिला. आजच्या भागात पाहू माण आणि खटाव तालुक्यातील ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनस्थळे. त्यात शिखर शिंगणापूर, गोंदवले आदी ठिकाणांचा समावेश आहे. 
...........
माण आणि खटाव तालुका हा सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग. सातारा-पंढरपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विस्तारलेला हा दुष्काळी पट्ट्यातील भाग आहे. माणगंगा कुळकजाई येथे उगम पावते व भीमा नदीस जाऊन मिळते. या नदीमुळेच माण हे नाव गावाला पडले. या भागाचा ज्ञात इतिहास चौथ्या शतकापासून आढळून येतो. या भागात राष्ट्रकूट, शिलाहार नंतर यादव, बहामनी, विजापूर, मुघल, मराठे आणि अखेरीस ब्रिटिश अशा राजवटी होऊन गेल्या. खरे महत्त्व आले ते यादवांपासून. कोल्हापूरच्या भोज राजांशी लढत असताना सिंधणदेवाने शिंगणापूर येथे छावणी केली होती. यादवांमुळे त्यांचे सरदार या भागाच्या संपर्कात येऊ लागले. देवगिरी राजवटीपासूनच शिंगणापूर हे अनेक घराण्यांचे कुलदैवत आहे. निजाम, तसेच विजापूरचा आदिलशहा व मराठे यांच्यामध्ये सतत चाललेल्या कुरघोडीमुळे या भागास खूप महत्त्व आले. शिवाजी महाराजांनी या भागात नव्याने किल्ले बांधले, तसेच जुन्यांचे नूतनीकरण केले. शिखर शिंगणापूर, गोंदवले, पुसेगाव, म्हसवड या श्रद्धास्थानांमुळे या भागाला धार्मिक महत्त्वही आहे. या भागात द्राक्षे, डाळिंबे, पेरू यांचे उत्पादन घेतले जाते. उरमोडी धरणाचे पाणी लवकरच सर्वत्र पोहोचेल. डोंगराळ भागात अनेक ठिकाणी पवनचक्क्या विद्युतनिर्मिती करीत आहेत.

शिवाजी महाराजांच्या काळातील सरलष्कर प्रतापराव गुर्जरही याच भागातील. डॉ. शिवाजीराव भोसले, त्यांचे बंधू बॅ. बाबासाहेब भोसले यांच्यासारखी माणसे या भागातीलच. ‘घरात हसरे तारे’ हे गीत लिहिणारे डॉ. द. वि. केसकर म्हसवडचे. 

शिखर शिंगणापूर

पोर्तुगीज घंटा, शिंगणापूर

शिखर शिंगणापूर :
महादेवाच्या डोंगररांगेतील शिखरावर असलेले शिंगणापूर दहिवडीपासून २० किलोमीटरवर आहे. वाईजवळील जांभळी खोऱ्यापासून निघालेली डोंगराची एक शाखा म्हणजे महादेवाचा डोंगर. याच शाखेमध्ये रायरेश्वर, केंजळगड, मांढरदेव, पांडवगड, वारुगड व सगळ्यात शेवटी येते शिखर शिंगणापूर. शिंगणापूरहून फलटण, माळशिरस, म्हसवड, दहिवडी येथे सतत वाहतूक चालू असते. शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्री पाडव्यापासून चैत्र पोर्णिमेपर्यंत असते. चैत्र शुद्ध द्वादशीला महादेवाला अभिषेक करण्यासाठी अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून अनेक कावडींतून पाणी आणले जाते. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे खूप जिकिरीचे असते. मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी मारतात. ‘हे म्हाद्या, धाव, मला सांभाळ’ अशी हाक मारतच कावड नेली जाते आणि महादेवाला अभिषेक करण्यात येतो. चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर व पार्वती यांच्या विवाहाचा मुख्य सोहळा असतो. 

शिंगणापूर - शिवकालीन इमारती

शिंगणापूर मंदिर कळस (फोटो : महादेव साप्ते)महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्रसपाटीपासून ३४५० फूट उंचीवर आहे. संपूर्ण मंदिराला तटबंदी आहे. हेमाडपंती शैलीतील मंदिर खूप सुंदर तर आहेच; पण वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुनाही आहे. मंदिराच्या परिसरातील दीपमाळा लांबूनच लक्ष वेधून घेतात. मोठ्या घंटा हे मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य. या घंटांपैकी एक घंटा पोर्तुगीज बनावटीची आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. त्यांनाच शिव-पार्वतीचे प्रतीक मानतात. मंदिराची स्थापना यादवराज सिंधणदेव याने केली. गावही त्यानेच वसविले. ‘शंभू महादेव’ हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे भाविकांचे, यात्रेकरूंचे होणारे हाल पाहून मालोजीराजे भोसले यांनी इ. स. १६००मध्ये येथे ‘पुष्करतीर्थ’ नावाचे एक मोठे तळे बांधले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी शिंगणापूर येथे देणगी देऊन विहीर बांधल्याचे सांगितले जाते. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. १९७८मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला. 

गुप्तलिंग, शिंगणापूरमंदिराच्या मागील बाजूस दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्ज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून आकर्षक रंग देण्यात आला आहे. साधारण पाच-सहा किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात ‘गुप्तलिंग’ परिसर आहे. येथे गेल्यावर खूप शांतता वाटते व समाधान मिळते. 

कारखेल : शिंगणापूरहून म्हसवडला जाताना कारखेल गाव लागते. छत्रपती राजाराम महाराजांचे गनिमी काव्याने लढणारे सेनापती संताजी घोरपडे यांची येथे बेसावध असताना हत्या झाली. त्यांची समाधी सांगलीजवळील कुरुंदवाड येथे आहे. म्हसवड शहराला पाणीपुरवठा करणारी साठवण टाकीही येथे आहे. 

भूषणगड
भूषणगड : सिंधणदेव यादवानेच भूषणगडाची निर्मिती साधरण इ. स. १२१० ते १२४८ यादरम्यान केली. त्यानंतर हा किल्ला बहामनी राज्यात गेला. त्यानंतर विजापूर आदिलशाही, मराठे, संभाजी महाराज, औरंजेब यांच्यानंतर हा किल्ला पुन्हा शाहू महाराजांच्या ताब्यात आला आणि अखेरीस ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला २९५० फूट उंचीवर आहे. वडूजच्या दक्षिणेस पुसेसावळी मार्गावर हा किल्ला आहे. पायथ्याशी असलेल्या भूषणगड गावापर्यंत गाडीरस्ता आहे. तेथून ३० ते ३५ मिनिटांत गड चढून जाता येतो. या किल्ल्यावरून बऱ्याच लांबचा पल्ला दिसतो. हा किल्ला टेहळणीसाठी महत्त्वाचा असावा. गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम केले आहे. भक्तांच्या अर्थसाह्यातून हा मार्ग व गडाची देवता हरणाई मातेचे मंदिर नव्याने बांधले गेले आहे. दोन बुरुजांमध्ये दरवाजा आहे. त्याची कमान पडली आहे. तटबंदी बऱ्यापैकी दिसून येते. 

म्हसवड : सातारा जिल्ह्याचे पूर्व टोक म्हणजे म्हसवड. म्हसवड नगरपालिका जुन्या नगरपालिकांपैकी एक आहे. या गावाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. येथील सध्याच्या माने घराण्याचे संबंध राष्ट्रकूट राजांपर्यंत दिसून येतात. राष्ट्रकूट राजवंशाचा संस्थापक मानाङ्क, तसेच येथील परिसरात माण, माणपूर, माणदेश, माण नदी अशी साधर्म्य असलेली नावे प्रचलित आहेत. शिवाय या भागातील माने लोक ‘माण नदीच्या काठावर राहणारे मानीं (अभिमानी) लोक म्हणून ‘माने’ हे आडनाव,’ असे माने आडनाव निर्मितीचे कारण अभिमानाने सांगताना दिसतात. राष्ट्रकुटांनी जिथे मंदिरे उभारली, तिथे त्यांनी हातात आणि पायाखाली प्रत्येकी दोन नाग दाबलेला आक्रमक गरूड कोरलेला दिसतो. शिवाय माने कुळाचे देवकदेखील गरूड अर्थात गरूडपंख किंवा गरूडवेल असे आहे. माने कुळातील बहुसंख्य लोक आजही गरूड असे आडनाव धारण करून वावरताना दिसतात. यावरून मराठ्यांच्या ९६ कुळांतील माने/गरूड हे कूळ राष्ट्रकूट राजवंशाचे वंशज कूळ असावे असे समजले जाते. 

येथील रतोजीराव माने हे विजापूर दरबारातील मातब्बर सरदारहोते. त्यांचे पुत्र नागोजीराव माने हेसुद्धा तितकेच पराक्रमी शूरवीर होते. छत्रपती राजारामराजेंना जिंजीच्या वेढ्यातून सुटण्यास नागोजीराव यांनी मदत केली होती. नागोजीराव माने यांचा दहिगाव येथील भाळवणी या संस्थानचे नाईक-निंबाळकर यांच्या कन्या राधाबाई यांच्याबरोबर विवाह झाला होता. 

सिध्दनाथ, म्हसवडम्हसवड हे सिद्धनाथ मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील अनेक लोकांची कुलदेवता आहे. येथील रथोत्सव खूप प्रसिद्ध आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही लोक या उत्सवाला हजेरी लावतात. म्हसवड भागात १३व्या शतकात शिराळशेट नावाची धनाढ्य व्यक्ती होऊन गेली. त्यांनी दुष्काळात बैलगाडीतून गावोगाव जाऊन धान्य वाटप केले होते. बिदरच्या सुलतानाला हे कळल्यावर त्याने त्यांना बोलावून घेतले. ‘तुला पाहिजे ते माग’ असे सांगितल्यावर त्याने स्वतःसाठी काही न मागता देवस्थानच्या जमिनी, स्थावर मालमत्ता बादशहाने खालसा केल्या होत्या, त्या परत द्याव्यात, अशी इच्छा त्याने व्यक्त केली. बादशहाने लगेचच फर्मान जारी केले व अशा जमिनी परत दिल्या. तेव्हापासून शिराळशेटची श्रावण शुद्ध षष्ठीस (श्रीयाळ षष्ठी) पूजा करण्याची प्रथा दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात सुरू झाली. 

पिंगळी तलाव : दहिवडी गावात जाण्याअगोदर पिंगळी तलाव दिसून येतो. हा ब्रिटिशकालीन तलाव गाळाने भरला आहे. जवळच मेष पैदास केंद्र आहे. दहीवडी गाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. 

जांभुळणी : म्हसवडजवळच जांभुळणी येथे भोजलिंग देवस्थान आहे. हे ठिकाण निसर्गरम्य डोंगरावर आहे. 

वारुगड देखावा (फोटो : महादेव साप्ते)

वारुगड :
महादेव डोंगराच्या रांगेतील हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक टेहळणी किल्ला. सुमारे ३००० फूट उंचीवर हा किल्ला असून, दहिवडी-फलटण रस्त्यावर तोंडले गावाच्या पश्चिमेस हा किल्ला आहे. जाधववाडा हे वारुगडाच्या पायथ्याचे गाव. येथूनच गडावर जाणाऱ्या पायवाटेची सुरुवात होते. प्रवेशद्वाराची रचना नेहमीप्रमाणेच दरवाजाचे संरक्षण करणारी आहे. दरवाजाची तटबंदी व किल्ल्याची तटबंदी आजही बऱ्यापैकी शाबूत आहे. बालेकिल्ल्याची तटबंदीही मजबूत आहे. किल्ल्यावर  पाण्याची दोन-तीन टाके आहेत. समोर सीतामाईचा डोंगरही दिसतो. तसेच संतोषगडावरून सीतामाईच्या डोंगरातून एक वाट वारुगडावर येते. येथे कारखानीस नावाचे किल्लेदार होते व त्यांच्या दिमतीला रामोशी लोकांची शिबंदी होती. माचीवर भैरोबाचे जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते. संपूर्ण माची फिरण्यास दोन तास लागतात. 

भैरोबा मंदिर, वारुगड (फोटो : महादेव साप्ते)

टोकेवाडी :
येथे डोंगरावर संतोषा देवस्थान असून, हे ठिकाण तोंडले गावाजवळ दहिवडी-फलटण मार्गावर आहे. येथे भाविकांची गर्दी असते. 

संतोषा देवस्थान, टोकेवाडी

राजेवाडी तलाव :
राजेवाडी तलावाची निर्मिती ब्रिटिश सरकारने १८७३ साली केली. तलावाचे धरण आटपाडी व माण तालुक्याच्या सीमेवर आहे व जलाशय माण तालुक्यात आहे. या तलावात राष्ट्रकुटांची राजधानी ‘मानपूर नगरी’चे अस्तित्व संपले. तथापि त्या ठिकाणी जवळच शंभू महादेवाचे प्राचीन सुरेख मंदिर असून, त्यात कोरीव कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला नंदी पाहायला मिळतो. त्यास नांगरतास असे नाव आहे. 

गोंदवलेकर महाराज संस्थानातील श्रीराम मंदिर

गोंदवलेकर महाराज संस्थानश्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजश्री क्षेत्र गोंदवले : महाराष्ट्रातील संतपरंपरेतील एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील संत श्री ब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज यांचे हे जन्मठिकाण. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ. स. १८४५) या दिवशी झाला. सातारा-पंढरपूर रस्त्यावरील हे ठिकाण आध्यात्मिक अभ्यासाचे प्रमुख ठिकाण आहे. महाराजांनी लोकांना चांगल्या वर्तणुकीची शिकवण दिली. ते स्वतः गुरुशोधार्थ उत्तर भारतात हिंडले. शेवटी रामदास स्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्री रामकृष्ण हे गोंदवलेकर महाराजांना भेटले आणि त्यांनी त्यांना नांदेडजवळील येहळेगाव या गावी श्री तुकारामचैतन्य यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार गोंदवलेकर महाराज हे तुकारामचैतन्य यांच्याकडे गेले. तेथे नऊ महिने राहून त्यांनी एकनिष्ठेने गुरुसेवा केली आणि ते देहबुद्धिविरहित व पूर्ण ज्ञानी झाले. 

तुकारामचैतन्यांनी ‘ब्रह्मचैतन्य’ असे त्यांचे नाव ठेवले आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली. त्यांच्या आदेशानुसर गोंदवले येथे राहून ते प्रवचन-कीर्तन यांद्वारे लोकांना अध्यात्माची शिक्षण देऊ लागले. श्रीरामभक्ती हा त्यांचा प्रमुख भक्तिमार्ग होता. मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) या दिवशी त्यांनी गोंदवले मुक्कामी देह ठेवला. त्यांच्या पश्चात त्यांच्या अनुयायांनी त्यांचे उचित स्मारक उभे केले. महाराष्ट्रात शेगाव संस्थानानंतर या ठिकाणाचे नाव घ्यावे लागेल, एवढी स्वच्छता व शिस्त येथे आहे. रोजचे विनामूल्य अन्नदान आजतागायत चालू आहे. एका वेळेस ५०० लोक टेबल-खुर्चीवर बसून महाप्रसाद घेतात. येथील स्वयंपाकघर, भंडारगृह, भक्तनिवास, समाधीमंदिर, गोशाळा यांचे व्यवस्थापन उत्तम असते.  

कसे जाल या भागात?
गोंदवले, शिंगणापूर येथे जाण्यासाठी सध्याचे जवळचे रेल्वे स्टेशन सातारा (८० किलोमीटर). लवकरच फलटण हे रेल्वे स्टेशन होत आहे. जवळचा विमानतळ पुणे - ११० किलोमीटर. मार्च ते जूनअखेरपर्यंत या भागात कडक उन्हाळा असतो. या भागात हॉटेल्स आहेत; पण संख्या कमी आहे. मुक्कामासाठी सातारा हे ठिकाण चांगले. साताऱ्याहून या भात एका दिवसाची ट्रिप होऊ शकते. 

(या भागातील लेखासाठी काही छायाचित्रे महादेव साप्ते यांनी उपलब्ध करून दिली.)

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language