Ad will apear here
Next
जोकर : कल्पित आणि वास्तवाच्या सीमारेषेवरचा गूढ व रंजक अस्वस्थानुभव!


नुकताच, दोन ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला ‘जोकर’ हा अमेरिकन सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमा म्हणजे कल्पित आणि वास्तव जगांच्या सीमारेषेवर सुरू असणारा एक गूढ आविष्कार आहे. ‘डीसी कॉमिक्स’च्या जगातलं ‘जोकर’ हे अतिशय वेगळं आणि महत्त्वाचं पात्र. त्याची मनोभूमिका शक्य तितकी उलगडण्याचं काम हा नवा सिनेमा अतिशय तपशीलवार पद्धतीनं करतो. त्या सिनेमाचा हा रसास्वाद...
................
‘डीसी कॉमिक्स’च्या जगातलं ‘जोकर’ हे अतिशय वेगळं आणि महत्त्वाचं पात्र. हे पात्र आपण ‘डीसी’च्या कॉमिक स्ट्रिप्समध्ये बघितलेलं आहे, ‘डीसी’च्या अॅनिमेटेड सिनेमांमधून पाहिलेलं आहे आणि ख्रिस नोलनच्या ‘डार्क नाइट’मध्ये बॅटमॅनच्या समोर उभा असणारा ताकदीचा व्हिलन म्हणूनही अनुभवलेलं आहे. या जोकरची सायकी, त्याची मनोभूमिका शक्य तितकी उलगडण्याचं काम हा नवा सिनेमा अतिशय तपशीलवार पद्धतीनं करतो आणि प्रेक्षकाला थक्क करून सोडतो. 

साधारणपणे ७०चं दशक संपताना आणि ८०चं दशक सुरू होताना ‘जोकर’ची कथा आकार घेते. ८०च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकन अर्थव्यवस्था प्रचंड प्रमाणात डळमळीत अवस्थेत होती. उद्योगधंदे डबघाईला आलेले होते. याची तीव्रता आधीच्या वर्षांपेक्षा बऱ्यापैकी अधिक प्रमाणात होती. बेरोजगारीचा दर झपाट्याने वाढू लागला होता. लोक कामाच्या शोधार्थ हिंडत होते. एकंदरीत सगळीचकडे परिस्थिती फारशी चांगली नव्हती. जोकर चित्रपट सुरू होतो त्या सुरुवातीच्या प्रसंगामध्ये रेडिओवर बातम्या ऐकू येत असतात. बाहेरची हलाखीची परिस्थिती, शहरात सगळीकडे लागलेले कचऱ्याचे ढीग आणि सर्वत्र माजलेली अनागोंदी या संदर्भातल्या बातम्या ऐकू येत असताना आर्थर फ्लेक (वाकीन फिनिक्स) मात्र जोकरचा मेक-अप करून आरशात बघत असतो. दोन बोटं तोंडात घालून ओठ पसरून चेहरा हसरा ठेवायचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतो. या पहिल्याच प्रसंगापासून आर्थर फ्लेक हा चारचौघांसारखा नाही, हे दिग्दर्शक अधोरेखित करतो. पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून आर्थर एका संस्थेत काम करत असतो. या संस्थेतर्फे जोकर पुरवण्यात येतात. आर्थरवर त्याच्या वयोवृद्ध आईची जबाबदारी असते. आर्थरला मानसिक आजार असतो. एका सरकारी संस्थेतर्फे त्याला औषधांची आणि समुपदेशनाची मदत मिळत असते. एके ठिकाणी जोकरचं काम करत असताना, काही तरुण मुलं खोडसाळपणा करून त्याच्या हातातली वस्तू चोरतात, त्याला वाईट रीतीने मारतात आणि गॉथम शहरातल्या कचऱ्याच्या ढिगाने भरलेल्या एका अरुंद गल्लीत आर्थर असहायपणे पाय पोटाशी घेऊन पडून राहतो. खोडसाळ मुलांकडून अशा रीतीने झालेला अपमान, कमकुवत मनःस्थिती, बॉसकडून पगार कापण्याबाबतच्या धमक्या, सततची गरिबी, आईची जबाबदारी आणि बाहेर असणारी आर्थिक मंदी अशा सगळ्या गोष्टींच्या एकत्रित परिणामांमुळे आर्थरची मानसिक स्थिती दिवसेंदिवस ढासळू लागते. स्व-संरक्षणाकरिता म्हणून एक सहकारी आर्थरला पिस्तुल देऊ करतो. आर्थर ते बाळगतो आणि एका मोठ्या, अभेद्य अश्या चक्रव्यूहाकडे जाणाऱ्या अनाम वाटेवर पाऊल ठेवतो. 

कामाहून घरी परत येत असताना आर्थरवर एक हल्ला होतो. त्यातून वाचण्याकरिता तो जवळच्या पिस्तुलाचा वापर करतो आणि त्यातून अनर्थ घडतो. एका लाचार, दुबळ्या आणि सामान्य जोकरचं एका मनोविकृत, ताळतंत्र सुटलेल्या व्यक्तीमध्ये होणारं हे रूपांतर, सुरुवातीच्या एका प्रसंगामध्ये, आर्थर विकट हास्य करत असताना बॉसच्या केबिनमधे जाण्याआधी अचानक हसायचं थांबतो तेव्हा त्याच्यात अचानक होणारा बदल जसा घाबरवून टाकतो, त्याहून कैकपट अधिक थरकाप उडवणारं आहे. भुयारी ट्रेनमध्ये चित्रित केला गेलेला हा प्रसंग, हा आर्थरच्या मनात अनेक वर्षांपासून चाललेल्या खळबळीचा प्रकट परिणाम आहे. पुढच्या प्रसंगांची नांदी म्हणून येणारं हे दृश्य प्रेक्षकाला एक जबरदस्त धक्का देतं, त्याची मनोभूमिका हळूहळू तयार करतं. अतिशय काळजीपूर्वक लिहिलेल्या पटकथेमध्ये बरेच सारे बारकावे असले, असंख्य जागी सबटेक्स्ट असली, तरीही ती प्रेक्षकाला उगीच बुचकळ्यात टाकत नाहीत. याउलट, मनोरुग्ण असणाऱ्या आर्थरच्या मनात, मेंदूत नेमकं काय चाललं आहे, तो जी कृत्यं करतो आहे, त्यामागचा त्याचा उद्देश, कार्यकारणभाव लक्षात यावा, याकरिता पटकथालेखक आग्रही आणि प्रयत्नशील असल्याचं दिसून येतं. तुम्हाला डीसी, त्याच्या कॉमिक्समधलं जोकर हे पात्र, बॅटमॅन, डार्क नाइट, ही सारी पार्श्वभूमी माहीत नसली, तरीही तुम्हाला हा सिनेमा समजून घेण्यात अडचण येत नाही. ‘जोकर’ या ‘डीसी’च्या महत्त्वाच्या पात्राची ही मूलकथा आहे. अनेकदा आपल्याला दिसून येतं, की प्रेक्षकाला काही गोष्टी माहीत असायला हव्यातच, अशा काही चित्रपट अथवा काही दिग्दर्शकांच्या अपेक्षा असतात. उदाहरणार्थ, नुकताच येऊन गेलेला ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड.’ शेरॉन टेट किंवा पॉप कल्चरसंदर्भातल्या गोष्टी जर प्रेक्षकाला माहीत नसतील, तर या चित्रपटातल्या बऱ्याच जागा प्रेक्षकाला समजणार नाहीत अथवा त्यातल्या दृश्यांचा संदर्भ काय ते उमगणार नाही. ‘जोकर’ हा नवा चित्रपट मात्र अशी कोणतीही अपेक्षा प्रेक्षकाकडून ठेवत नाही. प्रेक्षक मनाची पाटी पूर्णतः कोरी ठेवून गेला, तरीही त्याला हा चित्रपट संपूर्णपणे कळेल. बॅटमॅन बिगिन्स आणि डार्क नाइट हे गाजलेले सिनेमे तुम्ही पाहिले असतील, तर ‘जोकर’मध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रसंगांशी तुम्ही अधिक जोडले जाल. बॅटमॅन आणि जोकर या दोन्ही पात्रांना सांधणारे महत्त्वाचे दुवे लेखक टॉड फिलिप्स आणि स्कॉट सिल्व्हर अतिशय खुबीने पटकथेत पेरतात. बॅटमॅन या पात्राची निर्मिती एक प्रकारे ‘जोकर’मुळे झाली असं म्हणायला हे प्रसंग चालना देतात. दोन पात्रांमधला हा पूल उत्तमरीत्या बांधला गेला आहे आणि बॅटमॅन आणि जोकरच्या परस्पर संबंधांना एक वेगळी मिती यामुळे प्राप्त होते. जोकरचं संकलन उत्कृष्ट आहे. एकरेषीय पद्धतीचं आणि किंचित संथ भासणारं हे एडिट प्रेक्षकाला चित्रपटाचं एकंदर वातावरण समजून घेण्यासाठी मदत करतं. उत्तरार्धात सिनेमा अधिकाधिक गडद रंग धारण करू लागतो. आर्थर फ्लेकची आई, तिचं पूर्वायुष्य, सध्याचे गॉथम शहराचे मेयर थॉमस वेनशी असणारा तिचा संपर्कधागा, आर्थरच्या समुपदेशकाशी बोलण्यातून कळणारे संदर्भ, थॉमस वेनशी होणारी आर्थरची भेट, हॉस्पिटलमधून आईसंदर्भात आर्थरने मिळवलेली माहिती इत्यादी गोष्टी समोर आणत लेखक-दिग्दर्शक एकेक पापुद्रा बाजूला करत-करत आर्थरच्या मनोभूमिकेशी प्रेक्षकाचा जवळून परिचय करून देत जातात. वरवर पाहता सोप्या वाटणाऱ्या गोष्टींचा तळ किती गहिरा आणि गडद आहे, हे जाणवू लागतं. खोडसाळ मुलांनी जोकरला मारण्याच्या प्रसंगानंतरचं दृश्य, मेयरवर झालेल्या हल्ल्यानंतरचं दृश्य आणि आर्थर फ्रीजरमध्ये बसतो त्या प्रसंगातली कॅमेऱ्याची हालचाल अभ्यासण्याजोगी आहे. हॉस्पिटलमधल्या प्रसंगात, बॉसची बोलणी खातानाच्या प्रसंगात, सहकारी घरी आलेले असतानाच्या प्रसंगात आणि मुरेच्या टॉक-शोच्या वेळी आर्थरच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव विशेष आहेत. आर्थरनं स्वतःच्या बचावाखातर केलेल्या निर्घृण कृत्याला एका चळवळीचं स्वरूप येणं अतिशयच भयावह. टॉप अँगलनं लावलेल्या एका शॉटदरम्यान बेडवर झोपलेला आर्थर, शेजारी उशी आणि साइड टेबलवर पडलेल्या सिगारेट्स, पिस्तुल आणि टेबल लॅम्प ही फ्रेम आणि मुरेच्या शोकरिता आमंत्रण येतं तेव्हा जिन्याच्या पायऱ्यांवर नाच करतानाचा प्रसंग कमालीचा बोलका आणि संवादाविना अनेक गोष्टी सांगणारा आहे. 

या चित्रपटामध्ये केलेला रंगांचा वापर वैशिष्ट्यपूर्ण आहे. बऱ्याचशा फ्रेम्समध्ये पिवळा आणि निळा रंग दिसतो. त्यातही पिवळा रंग चित्रचौकटीच्या एका कडेला, तर निळा त्याच्या विरुद्ध टोकाला अशी रचना पाहायला मिळते. उत्तरार्धात हे रंग अधिकाधिक गडद होत जातात. लाल रंगाचा वापर सुरू होतो आणि शेवटाकडे वाढत जातो. सर्वांत शेवटच्या दृश्यात पांढऱ्या रंगाचं विचारपूर्वक राखलेलं प्राबल्य पाहायला मिळतं. संपूर्ण चित्रपटभर आपल्याला आर्थरच्या नजरेतून घटना दिसत राहतात. औषधोपचार आणि समुपदेशन बंद झाल्यावर, नोकरी गेल्यानंतरचा आर्थर आमूलाग्र बदलत जातो आणि त्याची कृत्यं, प्रेक्षकाला मुळापासून हादरवू लागतात. त्याच्या वैचारिक आणि तात्त्विक बैठकीला धक्के देऊ लागतात. वास्तव आणि कल्पितातल्या घटना बेमालूम पद्धतीने जोडायची किमया दिग्दर्शक आणि संकलक पार पाडतात आणि प्रेक्षकाला एका अनामिक, गूढ जाळ्यात गुरफटवतात. 

कल्पित आणि वास्तव जगांच्या सीमारेषेवर सुरू असणारा हा गूढ आविष्कार साकार होत असताना, चित्रचौकटींमध्ये असणारी अंधार-उजेडाची, तसेच वॉर्म्थ आणि कोल्डनेसची अनुक्रमे पिवळ्या आणि निळ्या रंगांचा वापर करून केलेली मांडणी अक्षरशः थक्क करून सोडते. यातल्या रंगांच्या आणि अंधार-उजेडाच्या वापरामागे सखोल विचार आहे. ‘जोकर’मधल्या सर्वांत शेवटच्या दृश्यानं मला सर्वाधिक शॉक दिला. जोकरचं वेड या सीनमध्ये सर्वोच्च पातळी गाठतं. त्या दृश्यात जोकरच्या अंगात असणारा पांढरा वेश, हॉस्पिटलच्या अरुंद पॅसेजच्या पांढऱ्याधोप भिंती, समोरच्या खिडकीमधून आत येणारा प्रखर सूर्यप्रकाश, सूर्यप्रकाश म्हणजे सात रंगांचं एकत्र असणं, सगळ्या रंगांचा समुच्चय असणाऱ्या, दूरवरून आत येणाऱ्या त्या प्रकाशाकडे जोकरचं चालत जाणं हे सगळंच अफाट आणि अचाट आहे. आधीच्या सर्व दृश्यांमध्ये रंगांचा जो विचारपूर्वक केलेला वापर आहे, त्याला हा शेवटचा सीन एलेव्हेट करतो, पुष्टी देतो, स्पिरिच्युअल टच देतो, एक स्ट्राँग स्टेटमेंट करतो आणि सिनेमाला उंचीवर घेऊन जातो. हा प्रसंग पाहताना स्कोरसेसे आणि क्युब्रिकची आठवण आल्याखेरीज राहत नाही. सिनेमाभर जोकर जे कारनामे करतो, ते एकीकडे आणि सर्वांत शेवटी येणारा हा सीन दुसरीकडे. या शेवटच्या सीनमध्ये विचलित करणारं प्रत्यक्ष दृश्य अजिबात न दाखवता, प्रेक्षकाला शक्य तितकं हादरवून सोडण्याचं दिग्दर्शकाचं कसब अफाट आहे. 

प्रॉडक्शन डिझाइन आणि अव्वल दर्जाचं पार्श्वसंगीत या गोष्टीही आवर्जून अभ्यासण्याजोग्या आहेत. ८०चं दशक आणि गॉथम शहर अतिशय प्रभावीपणे साकारलं आहे. त्यामुळे काळ नेमका उभा राहतो आणि प्रेक्षकाला त्या एकूण वातावरणाशी समरस होण्याकरता मदत होते. वाकीन फिनिक्सचा अभिनय अफलातून आहे. त्याच्या विविध भावमुद्रा, कायिक अभिनय, टायमिंग, आवाजातले चढ-उतार, चालणं, बसणं, उठणं, वेडसर हास्याची विशिष्ट लकब, हे सारंच त्याने अतिशय मेहनतीने उभं केलं आहे. इतर कुणाही अभिनेत्याला इतका ताकदीचा अभिनय जमणार नाही याबाबत खात्री वाटते. या वर्षीचं ऑस्कर पारितोषिक फिनिक्सला मिळायला हवं. फिनिक्सचा अफलातून अभिनय, टॉड फिलिप्सचं अप्रतिम दिग्दर्शन, टॉड फिलिप्स आणि स्कॉट सिल्व्हरनं मिळून लिहिलेली आशयपूर्ण कथा-पटकथा, लॉरन्स शेरचं अप्रतिम, विषयाला न्याय देणारं छायांकन, हिल्डरचं ताकदवान पार्श्वसंगीत, कलर पॅलेट, लाइट अँड साउंड वर्क, अशा सर्वच बाबी या चित्रपटात जमून आलेल्या आहेत. सर्वच विभागातलं इतकं उत्तमरीत्या जमून आलेलं काम एकत्रितपणे पाहायला मिळणं, ही गोष्ट दुर्मीळ स्वरूपाची असते. सध्या जगभर असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर ‘जोकर’ चित्रपटाचं प्रदर्शित होणंदेखील मला विशेष महत्त्वाचं वाटतं. मनोरुग्णाच्या अस्वस्थ मनोभूमिकेतून घटनांकडे पाहणं, हे अतिशय भेदरवणारं आहे. आर्थरची सायकी उलगडताना, फिनिक्स आणि दिग्दर्शक टॉड फिलिप्स प्रेक्षकाच्या मेंदूचा ताबा घेतात आणि त्याला एका अवघड वळणावर आणून सोडून देतात. या वळणावर दिसणारं जोकरचं रूप पाहून हा प्रश्न किती गंभीर आणि हादरवणारा आहे याची जाणीव अत्यंत प्रखरपणे होते. जोकर हा चित्रपट बराच काळ स्मरणात राहणार यात शंका नाही. नुकताच प्रदर्शित झालेला हा सिनेमा पाहणं अजिबात चुकवू नका. हा केवळ एक चित्रपट नाही, तर ती एक अनुभूती आहे. 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi