Ad will apear here
Next
‘विद्यार्थिदशेतच समाजभान निर्माण व्हावे’
मिलिंद वैद्य यांचे मत; वंचित विकासतर्फे ‘आपुलकी’ पुरस्काराचे वितरण
आपुलकी पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी (डावीकडून) विलास चाफेकर, मिलिंद वैद्य, श्रीराम ओक, किरण कांबळे, माधुरी अभ्यंकर, मीना कुर्लेकर आदी.

पुणे : ‘विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शालेय ज्ञानाबरोबरच चांगले संस्कार द्यायला हवेत. विद्यार्थिदशेतच त्यांच्यातील समाजभान जागृत झाले, तर समाजासाठी योगदान देण्याची मनोवृत्ती विकसित होईल. माणसांशी आपुलकीने वागत परस्परांतील दुरावा कमी केला, तर समृद्ध समाज आपल्याला मिळू शकेल,’ असे मत उद्योजक मिलिंद वैद्य यांनी व्यक्त केले.

वंचित विकास संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त जाणीव संघटना आणि वंचित विकास यांच्या वतीने ससून रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्ते किरण कांबळे यांना ‘कै. सुचिता नाईक आपुलकी’ पुरस्काराने, तर पत्रकार कार्यकर्ता श्रीराम ओक यांना ‘कै. अरुणकुमार कोंडेजकर उत्तम कार्यकर्ता’ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी माधुरी अभ्यंकर, वंचित विकासचे संस्थापक प्रा. विलास चाफेकर, संचालिका मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, चैत्राली वाघ, ज्योती जोशी आदी उपस्थित होते.
 
मिलिंद वैद्य म्हणाले, ‘पूर्वी शिक्षक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देत असत. त्यामुळे विद्यार्थ्याला समाजभान आणि ज्ञान मिळायचे. ते विद्यार्थी समाजात चांगले कार्य करत असायचे. आजही तसे घडायला हवे. आपण प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे. माणुसकीच्या भावनेतूनच समाजकार्य घडत असते.’

किरण कांबळे म्हणाले, ‘वंचित विकासमुळे अनेक रुग्णांना सहकार्य मिळाले आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये ससून रुग्णालयाची परिस्थिती बदललेली आहे. एखाद्या खाजगी रुग्णालयाला लाजवेल अशा अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने हे रुग्णालय सज्ज झाले  आहे. रुग्णालयाच्या आधुनिकीकरणामुळे राज्यभरातील गोरगरीब रुग्ण त्याचा फायदा घेताहेत.’

श्रीराम ओक म्हणाले, ‘माणसांमध्ये गुण-अवगुण दोन्ही पाहायला मिळत असतात; परंतु त्यातील चांगले हेरून त्याकडे सकारात्मकपणे पाहिले पाहिजे. वंचित विकासमुळे अनेकांना चांगले संस्कार मिळाले. अनेकजण घडले. समोरच्या व्यक्तीचे दुःख समजून घेऊन त्यांना आनंद देण्याचे काम केले पाहिजे.’

माधुरी अभ्यंकर म्हणाल्या, ‘ससूनला लहान मुलांसोबत काम करण्याची संधी मिळाली. समाजकार्यात वेळ आणि पैशाचा त्याग करावा लागतो. समाज हेच माझे कुटुंब आहे, असे समजून काम करावे लागते. आपल्यापेक्षाही इतरांचा अधिक विचार करून त्यांचे दुःख कमी करण्यासाठी आपण हातभार लावला पाहिजे.’

देवयानी गोंगले यांनी सूत्रसंचालन केले. मीना कुर्लेकर यांनी आभार मानले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language