Ad will apear here
Next
‘अर्जुनाच्या ‘लक्ष्या’प्रमाणे विधानसभा निवडणुकीत काम करा’
शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : ‘अर्जुनाचे संपूर्ण लक्ष त्या पोपटाच्या डोळ्यावर होते त्याप्रमाणे या विधानसभा निवडणुकीत काही झाले, तरी पक्षाला यश देणारच अशाप्रकारे सर्वांनी काम करा,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालयात नुकतीच झाली. या वेळी महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय महिलाध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विद्या चव्हाण, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उषा दराडे, माजी प्रदेशाध्यक्षा सुरेखा ठाकरे आदींसह पक्षाच्या नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


‘लोकसभा निवडणुकांच्या निकालांमुळे संघटनेत एक अस्वस्थता होती. त्यामुळे हा मेळावा बोलावला आहे. असा निकाल लागणार, असे अपेक्षित नव्हते; मात्र पराभव मिळाला म्हणून खचून जायचे नसते. जय मिळाला म्हणून हवेत रहायचे नसते. जय-पराजय हा भाग असतोच. निकाल आपल्या बाजूला लागला नाही म्हणून निराश होऊ नका,’ असा सल्ला पवार यांनी दिला. 

‘एक काळ होता तेव्हा आम्हाला ५४ लोकं सोडून गेले होते. फक्त सहा जण उरले होते; पण आम्ही जोमाने काम केले ६० जणांना निवडून आणले आणि सोडून गेलेल्या ५१ लोकांचा कार्यक्रम केला. आता आपल्याला पुन्हा त्याच जिद्दीने लढायचे आहे. काँग्रेस आघाडी करण्यावर ठाम आहे. आणखी समविचारी लोकांना एकत्र घेऊ आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाऊ,’ असा आत्मविश्वास त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला. 

‘लोकसभा निवडणुकीत मोदींनी प्रखर राष्ट्रवाद जनतेसमोर मांडला आणि लोक भुलथापांना बळी पडले. त्यामुळे देशात असा निकाल लागला. विधानसभा निवडणूक वेगळी असते. महाराष्ट्रात भाजपकडे चेहरा नाही. महाराष्ट्रात पर्याय कोण देऊ शकतो, असा लोकांना प्रश्न आहे. त्यामुळे आपण लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय द्यायचा. त्यासाठी आपण लोकांपर्यंत पोहोचायला हवे,’ असे पवार यांनी सांगितले. 

या वेळी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘जो पॅटर्न बारामतीत होता तोच पॅटर्न शिरूरमध्ये लावला. लोकांशी थेट संवाद साधला म्हणून हे शक्य झाले. विधानसभेतही लोकांशी थेट संवाद साधा. माझ्या विजयाचे श्रेय प्रत्येक कार्यकर्त्याला जाते.’ 

प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील म्हणाले, ‘काही महिने तुम्ही पक्षासाठी काम करा, जीवाचे रान करा. जेवढा प्रभावी संपर्क राहील तेवढे आपले यश निश्चित असून, प्रतिकूल परिस्थितीत आपण साथ द्या. सत्ता आली, तर नक्कीच तुम्हाला त्याचे श्रेय दिले जाईल आपण काय काम केले ते लोकांना सांगणे गरजेचे आहे. तुटपुंजी कामे करून मोदींनी क्रेडिट घेतले मग आपण १५ वर्षे कामे केले ते आपण का सांगू नये. प्रदेश जे काम देईल ते महिला पदाधिकाऱ्यांनी पूर्णत्वास नेले पाहिजे.’ 

या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार वंदना चव्हाण, आमदार विद्या चव्हाण यांनीही आपले विचार मांडले. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language