Ad will apear here
Next
स्वच्छतेचा दीपस्तंभ : वेंगुर्ले पॅटर्न
जागतिक वसुंधरा दिन नुकताच पार पडला. वसुंधरेच्या रक्षणासाठी सध्या अनेक जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे; मात्र त्यातील किती उपक्रम गांभीर्याने आणि कायमस्वरूपी राबवले जातात आणि किती उपक्रमांचे उद्दिष्ट साध्य होते, याचे उत्तर फारसे समाधानकारक नाही. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापनाचा एक आदर्श असा पॅटर्न घडवला आहे. शहरातील डम्पिंग ग्राउंडवर आता पर्यटनस्थळ विकसित झाले असून, प्लास्टिक कचऱ्यापासून रस्ते तयार करण्यात येत आहेत. साहजिकच या उपक्रमाला अनेक पुरस्कारही मिळाले असून, त्याची अंमलबजावणी विनाखंड होत आहे, हे महत्त्वाचे. अशा या उपक्रमाची माहिती देणाऱ्या लेखाचा हा पहिला भाग...
...........
स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची २०१५पासून सुरुवात केली. त्या अनुषंगाने कोकण विभागाची कार्यशाळा २९ मे २०१५ रोजी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झाली. त्याच दिवशी वेंगुर्ले नगर परिषदेने नागरिकांना १०० टक्के शौचालयाचा वापर करण्यास प्रवृत्त करण्याचा निर्धार केला. त्या अनुषंगाने वेंगुर्ले शहर हागणदारीमुक्त घोषित करण्याकरिता दोन ऑक्टोबर २०१५ ही कालमर्यादा निश्चित करण्यात आली. त्यानंतर प्रथम प्रसारमाध्यमांतून या अभियानाला प्रसिद्धी देण्यात आली. यातून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या स्वच्छतेच्या सप्तपदीबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात आले. 

नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना स्वच्छ भारत अभियानाच्या शासन निर्णयाबाबत माहिती देण्यात आली. पाच जून २०१५ रोजी संकल्प दिनाचे औचित्य साधून दोन ऑक्टोबर २०१५ रोजी नगर परिषदेने शहरातील शहर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला. यासाठी कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा राबवण्यात आल्या. कृती आराखडा तयार करण्यात आला. त्याचबरोबर दारोदार फिरून आठ जून २०१५ रोजी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. या सर्व लाभार्थ्यांचे एक जुलै २०१५ रोजी पुन्हा सर्वेक्षण करून लाभार्थ्यांची संख्या २०४ एवढी निश्चित करण्यात आली. 

लाभार्थ्यांचे सर्वेक्षण झाल्यानंतर त्यानुसार वॉर्डनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या. वैयक्तिक शौचालय बांधण्याच्या कामाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या स्वच्छता समितीत स्थानिक नगरसेवकांची दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. निवडलेल्या लाभार्थ्यांच्या शौचालयाचे बांधकाम चालू करण्यासाठी नेमलेली समिती व नेमलेले अधिकारी यांच्यामार्फत एक जुलै २०१५पासून दैनंदिन आढावा घेणे सुरू करण्यात आले. त्यानुसार बांधकाम करण्यात येणाऱ्या अडचणी व लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन उपाययोजना करणे सोपे होऊ लागले. दैनंदिन आढाव्यामुळे वैयक्तिक शौचालयाच्या बाधकामाचा वेग वाढण्यास मदत झाली. 

अडचणींवर मात
वेंगुर्ले सहपत्र भोगवटादार व मूळ मालक यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून जागेची मालकी व भोगवट्याबाबतचा वाद न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे मालक भोगवटादारांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी परवानगी देत नव्हते. अशा नागरिकांच्या वॉर्डनिहाय  बैठका घेऊन वैयक्तिक जनजागृतीच्या सप्ताहातून मूळ जागेबाबत मालकी हक्क अबाधित ठेवून एक मूलभूत गरज म्हणून भोगवटादारांना शौचालय बांधकाम करू देण्याबाबत मूळ मालकाचे मतपरिवर्तन करण्यात आले व त्यानुसार अशा विवादात्मक परिस्थितीत शौचालय बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली. सरकारी जागेवर फार पूर्वीपासून घरे बांधलेली आहेत. अशा नागरिकांना स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार वैयक्तिक शौचालय बांधण्यास प्रवृत्त करण्यात आले. 

आर्थिक परस्थितीवर मात 
काही नागरिक आर्थिक परिस्थितीअभावी शौचालय बांधू शकत नव्हते. त्यांची गरज ओळखून त्यांना गावातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून साहित्यरूपात मदत (वाळू, सिमेंट, चिरे, दरवाजे, खडी, भांडे वगैरे) मिळवून देऊन शौचालय बांधण्यास प्रवृत्त केले. तसेच नगरपरिषदेमार्फत काही व्यक्तींना खड्डे खोदून, समन्वय साधून मदत करण्यात आली. 

गणेशोत्सव काळातील मदत
शहरात गणेशोत्सव काळात प्रशिक्षित गवंडी व बांधकाम कामगार यांची उपलब्धता नसल्याने बांधकामाचा वेग मंदावत होता. अशा वेळी ग्रामीण भागातील प्रशिक्षित गवंडी व कामगार यांची बैठक आयोजित करून लाभार्थी व त्यांच्यामध्ये समन्वय साधून बांधकामे पूर्ण करण्यास गती देण्यात आली. 

साहित्य पुरवठादारांमध्ये समन्वय 
काही नागरिक आर्थिक परिस्थितीअभावी साहित्यखरेदी करू शकत नसल्याने लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य खरेदी करून देण्यासाठी साहित्य पुरवठादारांची बैठक घेऊन लाभार्थ्यांना तत्काळ साहित्य देण्याबाबत पुढाकार घेण्यात आला. आवश्यक बांधकामाकरिता वेळेत साहित्य उपलब्ध करून दिल्यामुळे ते काम सुरू होण्यास मदत झाली. 

लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान
काम पूर्ण होताच अनुदान सर्व लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा झाले. त्यांना नगर परिषदेमध्ये पाठपुरावा करण्याची आवश्यकता भासली नाही. त्यामुळे अभियानाला गती मिळाली.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर 
सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे केला जात असल्याने या गोष्टीचा फायदा घेऊन नगरपरिषद हद्दीत वॉर्डनिहाय स्वच्छतादूत कर्मचारी व शहरातील काही नागरिक यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले. या माध्यमातून दैनंदिन व वैयक्तिक शौचालयाच्या प्रगतीबाबत चर्चा व येणाऱ्या समस्येबाबत निराकरण करण्यात आले. तसेच वेंगुर्ले नगर परिषदेचे फेसबुक पेज तयार करून यामध्ये वैयक्तिक शौचालयाच्या प्रगतीबाबत माहिती देण्यात आली. वृत्तपत्रांतील बातम्या, फेसबुक, नगर परिषदेची वेबसाइट आदींच्या माध्यमातूनही माहिती देण्यात आली. तसेच टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला. तसेच जनसंवाद या नावाचे मोबाइल अॅपही नगर परिषदेने विकसित केले आहे. अशा प्रकारे सोशल मीडियाचा प्रभावी वापर केल्यामुळे जनजागृती व उद्दिष्टपूर्तीसाठी मदत झाली.

गुड मॉर्निंग पथक
वेंगुर्ले नगर परिषदेने वैयक्तिक शौचालय बांधकामाचा वेग कायम ठेवून ऑक्टोबर २०१५च्या उद्दिष्टपूर्तीसाठी बांधलेल्या शौचालयांचा वापर करणे व पूर्वापार उघड्यावर शौचास जाण्याच्या पद्धतीत बदल होण्याकरिता गुडमॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली. १८ सप्टेंबर २०१५पासून गुड मॉर्निंग पथक नगर परिषद हद्दीत कार्यरत झाले. या पथकाच्या माध्यमातून शहरातील १३ ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात आले. पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी आठपर्यंत या ठिकाणी देखरेख ठेवून, उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांना प्रथम तोंडी व लेखी समज देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच नागरिकांनी उघड्यावर शौचाला बसू नये असे आवाहन रिक्षाद्वारे करण्यात आले. याबाबतची माहिती व्हॉट्सअॅप, फेसबुक, टेलिग्रामवर नोंदवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्ये, प्रभातफेऱ्या काढून जनजागृती करण्यात आली. उघड्यावर शौचाला बसू नये अशी जनजागृती करणारे फलकही संबंधित ठिकाणी लावण्यात आले. एक महिनाभर गुड मॉर्निंग पथकाने कारवाई केल्यानंतर नागरिकांमध्ये बदल झाला. त्यानंतर सरप्राइज गुड मॉर्निंग पथकाद्वारे नियमितपणे त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात येते. 

महिला बचत गट, कर्मचाऱ्यांचा सहभाग
महिला बचत गटांनी आपापल्या वॉर्डमध्ये वैयक्तिक शौचालय जनजागृतीसाठी पुढाकार घेतला व नगर परिषदेला सहकार्य केले. तसेच मे २०१५पासून सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून दोन तास श्रमदान करण्याचे निश्चित केले. सार्वजनिक ठिकाणी साफसफाई, उघड्यावर शौचास बसण्याच्या ठिकाणी फलक लावणे इत्यादी कामे या कर्मचाऱ्यांनी केली. समुद्रकिनारा, बंदर, पर्यटनस्थळे, डच वखार लाइट इत्यादी ठिकाणची साफसफाई करण्यात आली. या अभियानात काम केल्यानंतर उद्दिष्टपूर्तीनंतर प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन संबंधितांचे सत्कार करण्यात आले. शहरातील विविध संघटनांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. नगर परिषदेतर्फे दरमहा पाच लिटर पेट्रोलचा पुरवठा करून कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यात आले. 

कचरा वर्गीकरणाचे नियोजन
वेंगुर्ला नगर परिषदेने कचऱ्याचे वर्गीकरण ओला व सुका या दोनच प्रकारांत न करता ओला, सुका, प्लास्टिक आणि प्लास्टिक व धातू अशा चार प्रकारांत करायला सुरुवात केली आणि तेही कचरा तयार होण्याच्याच ठिकाणी. वर्गीकरण करूनच घराघरांतून १०० टक्के कचरा संकलन सुरू करण्यात आले. याकरिता सर्व कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी करण्यात आली, तसेच नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. सक्रिय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन त्यांच्या माध्यमातून लोकप्रबोधन करण्यात आले. 

कचरा वर्गीकरण व कचरा प्रक्रिया
ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस विद्युत निर्मिती करण्यात येते. सुक्या कचऱ्यापासून ब्रिकेट (कांडी कोळसा) बनवला जातो. शहरात कॅरी बॅगचा वापर बंद आहे. व्यापक जनजागृती, पर्यायी पिशव्या व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या त्रिसूत्रीचा वापर करून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. प्लास्टिकचा इतर कचरा संकलित करून तो क्रशर मशीनमध्ये क्रश करून त्याचा डांबरी रस्ता निर्मितीसाठी वापर करण्यात येतो. अशा प्रकारचा प्लास्टिकचा रस्ता बनवणारी वेंगुर्ला ही पहिलीच नगर परिषद ठरली आहे. प्लास्टिक कचऱ्यातील बाटल्या वेगळ्या करून त्या भंगारमध्ये आठ रुपये दराने विकल्या जातात. काचेच्या बाटल्या व धातूरूप कचरा वेगवेगळा केल्यानंतर पन्नास पैसे प्रति किलो दराने विकला जातो. धातूचे प्रमाण नगण्य आहे. अशा प्रकारे कचरा वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे कचरा डम्पिंग ग्राउंडवर ‘झीरो डम्पिंग ग्राउंड’ ही नवी संकल्पना उदयास आली. 

(लेखक वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत.)

(वेंगुर्ले पॅटर्न आणि झीरो डम्पिंग ग्राउंडच्या या अनोख्या प्रयोगाबद्दलची अधिक माहिती देणारा या लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. वेंगुर्ले पॅटर्नबाबत अधिक जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडिओ पाहा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language