Ad will apear here
Next
किफायतशीर सेप्टिक टँक
सामान्य सेप्टिक टँक प्रतिकृती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेचा तिसरा वर्धापनदिन दोन ऑक्टोबर रोजी आहे. स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी १५ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर २०१७ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीमही पंतप्रधानांनी घोषित केली आहे. या निमित्ताने आपण जाणून घेऊ या सेप्टिक टँकच्या एका किफायतशीर प्रकाराबद्दल. ग्रामीण भागातील अडचणी लक्षात घेऊन कमी खर्चात तयार होणारा, कमी जागा आणि कमी पाणी लागणारा आणि मलविघटनाची उत्तम सोय असलेला हा सेप्टिक टँकचा प्रकार अत्यंत उपयुक्त आहे. सतीश भावसार यांनी विकसित केलेल्या या खास सेप्टिक टँकबद्दल...
............

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेचा तिसरा वर्धापनदिन दोन ऑक्टोबर रोजी आहे. तसेच सध्या केंद्र सरकारचे ‘स्वच्छ भारत’ अभियान संपूर्ण देशभर जोर धरत आहे. प्रत्येक स्तरातून, क्षेत्रातून हे अभियान राबविले जात असताना तरुणांना लाजवेल अशा उमेदीने एका लहान शहरातील एक वयस्क अभियानाला हातभार लावत आहेत. उघड्यावर शौचास जाऊ नये या आशयाची अभिनेता अमिताभ बच्चन यांची ‘दरवाजा बंद तो बीमारी बंद’ ही जाहिरात आपण अलिकडे टीव्हीवरून पाहत आहोत. त्याआधीपासून म्हणजे साधारण २०१२ पासून अभिनेत्री विद्या बालन ‘जहाँ सोच वहाँ शौचालय’ असं म्हणत ग्रामीण भागातल्या बायकांना शौचालयाचे महत्त्व पटवून देताना दिसत आहे.  अगदी अलीकडे तर यावर अक्षयकुमार आणि भूमी पेडणेकर अभिनित ‘टॉयलेट – एक प्रेमकथा’ हा सिनेमा येऊन गेला. ग्रामीण माणसांचा शौचालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मानसिकता यावर चित्रपटाने मार्मिक भाष्य केले आहे. सामान्यजनांच्या याच गुंतागुंतीच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यात सतीश भावसार यांना मात्र यश आले आहे. 

मूळातच आपल्या देशात नागरिकांना शौचालय वापराचे महत्त्व पटवून द्यावे लागते हे खरंच दुर्देवी आहे. परंतु अनेकदा मलनि:सारणाच्या योग्य सुविधांचा अभाव, मुबलक पाण्याचा अभाव, जागेचा अभाव, सांडपाण्याची दुर्गंधी आणि मुख्य शौचालयाची टाकी बांधण्यासाठी येणारा खर्च या कारणांमुळे आजही अनेक भागात उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या अधिक दिसते. भारतीय मानसिकता आणि भारतीयांची गरज ओळखून भावसार यांनी विशिष्ट प्रकारचा ‘सेप्टिक टँक’ विकसित केला आहे. अडचणीच्या, अपुऱ्या जागेतही हा सेप्टिक टँक बसवता येतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, भारतासारख्या देशात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दूरदूरपर्यंत वणवण करण्याचे वास्तव आजही कायम आहे. अशा स्थितीत शौचालयासाठी मुबलक पाण्याची सोय होणार कशी. परंतु या सेप्टिक टँकची रचनाच अशी आहे की, मूळातच त्यात कमी पाणी लागते. याशिवाय मलविघटनाची उत्तम सोय आणि सर्वसामान्यांना परवडणारी किंमत या चतु:सूत्रीवरच सेप्टिक टँकचे काम चालते. 

पूर्णपणे भारतीय बनावटीच्या असणाऱ्या या टँकचा लाभ आजवर सर्वसामान्य कुटुंबांपासून व्यावसायिकांनी घेतला आहे. शंभरहून अधिक ठिकाणी त्यांनी विकसित केलेले सेप्टिक टँक विनाअडचण कार्यरत आहेत. भावसारांच्या या सेप्टिक टँकची उपयुक्तता ध्यानात घेतली तर अमिताभ बच्चन मांडत असलेले "दरवाजा बंद तो बिमारी बंद’ हे सूत्र प्रत्यक्षात अवलंबण्यासाठी किती सोपे आहे हे लक्षात येईल. 

सतीश भावसारवयाची साठी ओलांडलेले भावसार हे मूळचे जळगावचे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून ते पंप ऑपरेटर म्हणून निवृत्त झाले आहेत. १९९४ मध्ये त्यांनी सर्वप्रथम स्वत:समोर उभ्या राहिलेल्या अडचणीचे उत्तर म्हणून ‘सेप्टिक टँक’चा विचार करत त्याला संशोधनाची जोड दिली आणि त्यानंतर ते आजतागायत या सेप्टिक टँकच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्न करत आहेत. 

साधारण १९९४ मध्ये जळगावच्या नगरपालिकेने घराबाहेरचे सार्वजनिक टोपली संडास (सेप्टिक टँक न वापरता टोपलीत घाण भरून वाहून नेण्याच्या जुन्या पद्धतीचे शौचालय)पाडण्याचा अध्यादेश जारी केला होता. शिवाय मुदतीत जर त्या पाडल्या नाहीत तर त्या पालिका पाडणार होत्या आणि पाडण्याच्या खर्चाचा दुप्पट खर्च वसूल करणार होत्या. त्या वेळी भावसार यांच्या घरातील जागा अपुरी होती. अपुऱ्या जागेत शौचालय कसे बांधायचे, ही त्यांच्यापुढे मोठी समस्या होती. शिवाय शौचालयाची टाकी बांधण्याचा खर्चही त्यांच्या आवाक्याबाहेर होता. अशा परिस्थितीत काय करता येईल याचा ते विचार करू लागले आणि त्यातूनच त्यांच्या या सेप्टिक टँक मॉडेलचा जन्म झाला. याविषयी भावसार सांगतात, ‘मला सिव्हील इंजिनियरिंग विषयात पहिल्यापासून आवड होती. त्यामुळे थोडाफार अभ्यास,थोडंफार ज्ञान होतंच. त्याला संशोधनाची जोड दिली. अनेक पुस्तके वाचली, बराच काळ विचारमंथन झाले. त्यातून मग २०० लिटरची सिमेंटची टाकी तयार केली. त्याला आउटलेट दिले.टाकी कमी जागेत खड्डा करून त्यात सोडणे शक्य होते. त्यावर गरजेनुसार कमी खर्चातील बांधकाम करून शौचालय बांधले. मी स्वत:च्या घरचा प्रश्न सोडवला.

माझा हा किफायतशीर उपाय पाहून काही परिचितांनीही अशा स्वरूपात टाक्या बनवून मागितल्या.त्या तशा बनवूनही दिल्या, मात्र सिमेंटच्या टाक्या खड्ड्यात सोडवायला अवघड जायच्या. त्यासाठी अधिक मनुष्यबळ लागायचे. खर्च वाढायचा.यावर उपाय म्हणून मग फायबरमध्ये या टाक्या बनवायला सुरवात केली. सिंटेक्सच्या पाण्याच्या टाक्यांच्या वापराने खर्च अजून कमी झाला. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू असल्याने त्याला परवडणारे सेप्टिक टँक बनविणे गरजेचे होते. त्या गरजेतूनच ही कल्पना आकाराला आली.’

या सेप्टिक टँकसाठी कमी जागा आणि कमी पाणी लागण्यामागचे नेमके सूत्र काय बरं असेल हे समजून घ्यावंसं वाटलं. भावसार सांगतात, ‘हे सेप्टीक टँक उभट आकाराचे (सिलेंड्रीकल) बनवले आहेत. त्यामुळे शौचालयातून येणारी विष्टाही टाकीत येते आणि मधल्या उभ्या पाईपमधून केवळ पाणी बाहेर पडते. मुळात या टाक्या खड्ड्यात पुरल्या जातात. उन, वारा लागत नाही. हवाबंद असे वातावरण तयार होते. जंतूंना जगण्यासाठी हवेतला ऑक्सिजन आवश्यक असतो. मात्र हवाबंद असल्याने जंतूंना तो मिळत नाही. त्यामुळे ऑक्सिजन मिळविण्यासाठी ते मलविघटन करतात. या जंतूंची पैदासही मोठ्या प्रमाणात होत असल्याने विघटनाच्या प्रक्रियेलाही वेग असतो आणि म्हणूनच बहुतांश मलविघटन होते.  शिवाय या पद्धतीच्या सेप्टिक टँकमध्ये मळ बाहेर पडूच नये अशीच रचना केली आहे. विघटनासाठी पाण्याचा वापर होत असल्याने सांडपाण्याचा प्रश्नही कमी प्रमाणात निर्माण होतो.

त्या टाक्यांना बाहेरून आऊटलेट काढून वाहत्या गटारांमध्ये पाणी सोडता येते. कारखान्याभोवती जर मोकळी जागा असेल, तर अत्यल्प असणारे हे सांडपाणी जमिनीत जिरवताही येते.शिवाय टाक्या जमिनीच्या खाली असल्याने वरची मोकळी जागा ही वापरता येते. 

विशेष म्हणजे हा सेप्टिक टँक उभट असल्याने कधीही ब्लॉक होत नाहीत.  सेप्टिक टँक पसरट असल्यास पाणी वाहून जाते आणि विष्ठा पाईपला कुठेतरी चिकटून राहते. पाणी वाहून गेल्यानंतर आहे त्या जागी गाळ सुकून जातो. त्यावर पुन्हा थर जमा होतो आणि ब्लॉक होतात.  मात्र उभट आणि मध्यवर्ती पाईपमध्येच ती थेट विघटनशील अवस्थेत ठेवले जाते आणि त्यामुळे ब्लॉक होण्याची शक्यता नसते. 

साधारण आठ ते १० माणसांच्या कुटुंबासाठी २०० लिटरच्या दोन टाक्या पुरेशा ठरतात. एका सेप्टिक टँकचा खर्च १० हजार रुपयांपर्यंत येतो. इतर प्रचलित टँकपेक्षाही ही किंमत खूपच कमी आहे. 

गरिब-श्रीमंत प्रत्येकालाच काटकसरीने प्रामाणिकपणे जगायचे असते. माणसांची संख्या वाढल्यास, टाक्यांची संख्या वाढते; मात्र खर्च कमी होत जातो.   जून्या इमारतींमध्येही हे सेप्टिक टँक बसवता येतात. आजपर्यंत केवळ एकमेकांच्या माहितीतूनच (माउथ टू माउथ पब्लिसिटी) १०० ठिकाणी हे टँक बसवण्यात आले आहेत. जळगाव, पुणे जिल्ह्यात या टाक्या बसविण्यात आल्या आहेत.साधारण दहा वर्षांपूर्वी बसवलेल्या टाक्या अजूनही सुस्थितीत असल्याचा प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे.’ 

भावसार यांनी १९९४ मध्ये जरी सेप्टिक टँकचा हा प्रकल्प विकसित केला असला,  तरीही त्यांनी प्रत्यक्ष काम निवृत्तीनंतर म्हणजे २०१०पासून पूर्ण वेळ सुरू केले. बेसिक मॉडेल कायम ठेवून त्यांनी प्रत्येक वेळी लोकांची नेमकी गरज ओळखून त्यानुसार त्यांना टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत. आज शासन शौचालयांच्या जाहिरातीसाठी लाखो रूपये खर्च करत आहे. शिवाय ज्या प्रकारची शौचालये बांधण्यासाठी अनुदान दिले जाते, त्या शौचलयांच्या बांधकामासाठी ती पुरेशी नसतातच. म्हणूनच तर सामान्य नागरिक अजूनही याबाबत उदासीन आहे. अशा स्थितीत भावसारांचे हे मॉडेल अत्यंत उपयुक्त ठरू शकणारे आहे. मात्र सरकारी व्यवस्थेतील अनास्था अनुभवलेल्या भावसारांनी आपल्या परीने शक्य होईल तिथे अल्प दरातील हे मॉडेल उपलब्ध करून देण्याचे काम सुरू ठेवले आहे. 

भावसार सांगतात, ‘ खेड्यात शौचालये बांधण्यातील मोठी अडचण म्हणजे सांडपाणी निचऱ्याची सोय नसते. वाहत्या गटारातही हे पाणी सोडता येत नाही. घरे,  गल्ल्या जवळजवळ असतील तर वाहत्या गटारात सोडता येत नाही. परंतु जर त्यांना सोकपिट बसवून दिले, तर जागच्या जागी पाणी जिरवता येऊ शकते. ती सोय या प्रकारच्या सेप्टिक टँकसाठी अत्यंत योग्य आहे. कारण मुळातच सांडपाण्याची मात्रा कमी असते. दुसरी गोष्ट ग्रामीण-निमशहरी भागात बहुतांश लोक भाड्याच्या घरात राहतात.  तिथे शौचालये नसतात. सार्वजनिक शौचालये किंवा उघड्यावर जाण्याची प्रथा अवलंबली जाते. मालक स्वत: राहत नसल्याने तो शौचालय बांधण्यास उत्सुक नसतो, पण जर परवडणारे दर असतील तर भाडेकरू स्वत:ही या टाक्या घराची रचना न बदलवता बसवू शकतो.  

वरील सर्व फोटो सेप्टिक टँकच्या भावसार मॉडेलचे आहेत.स्पष्ट फायदे आणि उपयुक्तता दिसत असतानाही शासन दरबारी फार अनास्था वाट्याला आली. त्यामुळे कानाला खडा लावला आणि आपल्या परीने काम सुरू ठेवले.’ भावसार यांचे सेप्टिक टँक बसविण्यात आलेल्या जागांपैकी काही नोंद घ्याव्यात अशा जागा आहेत. त्यापैकी अकलूज येथील एनआरआयच्या फार्महाउसवर उभारण्यात आलेले टँक, २०११च्या खानदेश महोत्सवातील शौचालये, सुप्रिम पाईप कंपनीतल्या चाळीस महिलांसाठी बांधलेली शौचालये, पिरंगुट येथील एका फॅक्टरीसाठी उभारण्यात आलेली शौचालये अशी काही उदाहरणे आहेत.   भावसार यांनी विकसित केलेल्या या उपयुक्त सेप्टिक टँकचा अहमदाबाद येथील नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनशी संलग्न असलेल्या ‘सृष्टी’ या संस्थेने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन गौरवही केला आहे. त्यांच्या या सेप्टिक टँकचा चांगला परिणाम दिसत असून त्यांनी पेटंटसाठी अर्ज केला आहे. सध्या तरी लोकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि चांगल्या परिणामाची दाद हेच पेटंट समजून सतीश भावसारांसारखा वयस्क तरुण कार्यमग्न राहण्यात धन्यता मानतो. 

संपर्क :
सतीश भावसार : ९८२२९ ११८४६

- हिनाकौसर खान-पिंजार
ई-मेल : greenheena@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language