Ad will apear here
Next
गव्हाच्या विक्रमी १० कोटी टन उत्पादनाची शक्यता
रब्बी हंगामातील अनुकूल हवामानामुळे चांगले उत्पादन येण्याचा अंदाज
नवी दिल्ली : देशाचे गहू उत्पादन यंदा १०० दशलक्ष टनांचा (१० कोटी टन) आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास तो आतापर्यंतचा विक्रम ठरेल. केंद्रीय कृषी आयुक्त एस. के. मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. 

‘रब्बी हंगामात आतापर्यंत असलेल्या पोषक हवामानामुळे या हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. २०१७-१८ या पीक वर्षात (जुलै ते जून) गव्हाचे उत्पादन ९९.७० दशलक्ष टन एवढे झाले होते. यंदा ते १०० दशलक्ष टनांचा आकडा ओलांडण्याची शक्यता वाटत आहे. विविध राज्यांच्या सरकारकडून आम्हाला आलेल्या माहितीवरून तसे दिसते आहे,’ असे मल्होत्रा यांनी पत्रकारांना सांगितले. लवकरच केंद्र सरकार रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनाचे आगाऊ अंदाज जाहीर करील. 

यंदाच्या हंगामात गव्हाखालील क्षेत्र आठ लाख हेक्टरनी घटले. त्यामुळे २९६ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड झाली. तरीही आतापर्यंतचे हवामान अत्यंत अनुकूल असल्यामुळे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. 

पुरेसा सूर्यप्रकाश, आवश्यक तितकी थंडी आणि अधूनमधून हलका पाऊस अशा प्रकारे रब्बी हंगामातील हवामान अनुकूल असल्यामुळे तेलबियांचे उत्पादनही चांगले येणे अपेक्षित आहे. मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान यांसारख्या प्रमुख मोहरी उत्पादक राज्यांमध्ये मोहरीचे पीक फुलावर आले आहे. त्यामुळे उत्पादन चांगले येण्याचा अंदाज असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले.

खरीप हंगामात पाऊसमान कमी झाल्यामुळे भात आणि कडधान्यांच्या उत्पादनात मात्र यंदा घट होणार आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा प्रमुख राज्यांमध्ये रब्बी हंगामातील भात लागवडीखालील क्षेत्र मात्र २१ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे तांदळाचे उत्पादन घटणार आहे. तसेच, महाराष्ट्र, गुजरात यांसारख्या राज्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे कडधान्यांचे उत्पादनही घटणार आहे; मात्र आपल्याकडे धान्याचा पुरेसा साठा आहे, असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. 

केंद्र सरकारकडून मिळणारी किमान आधारभूत किंमत उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट असावी, म्हणून गव्हाची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल १७३५ रुपयांवरून १८४० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळासह (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) राज्यातील यंत्रणा किमान आधारभूत किमतीला शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी करतात. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत सुमारे ८० कोटी नागरिकांना दोन रुपये दराने या गव्हाची विक्री केली जाते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language