Ad will apear here
Next
‘धामणेर गावाचे काम पथदर्शी’
सातारा : ‘राज्यातील कोणत्याही गावांनी मला चांगल्या गावाबद्दल विचारले, तर मी धामणेर गावाचे नाव घेईन. राज्यातील इतर गावांनी आदर्श घ्यावा, असे पथदर्शी काम या गावाने केले आहे. त्याबद्दल मी ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. 

सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील धामणेर येथे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. त्या वेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुलांची, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची, तसेच कम्युनिटी बायोगॅस प्रकल्पाचीही पाहणी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकल्पांची माहिती दिली.

‘धामणेरच्या ग्रामस्थांनी अतिशय चांगले काम केले आहे. ते पाहण्यासाठी मी आज आलो आहे. खरे तर मीच गावाचे आभार मानायला हवेत,’ असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले आणि ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. ‘आपली गावे आपण कशी चांगली करू शकतो, याचे धामणेर हे सर्वोत्तम उदाहरण आहे. गावाने गरिबातल्या गरिबाचाही विचार केला आहे. २०२२पर्यंत देशातील प्रत्येक गरिबाला घर मिळाले पाहिजे, ही पंतप्रधानांची संकल्पना येथे साकार होत आहे. जिल्ह्यातील सात हजार घरे सरकारने बांधायला घेतली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांचेही मी अभिनंदन करतो. घरकुलांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना राबवण्यात येत आहे. सरकारची योजना ग्रामस्थांच्या पाठबळावरच यशस्वी होत असते, धामणेरकरांनी आपल्या कामाच्या माध्यमातून राज्यातील इतर गावांना आदर्श घालून दिला आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘राज्यातील उत्तमातील उत्तम गाव ठरणाऱ्या धामणेरकरांनी अन्य गावांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. मी निश्चितपणे केंद्र सरकारला विनंती करून हे प्रशिक्षण केंद्र धामणेरमध्ये होण्यासाठी प्रयत्न करीन. गावाच्या पाठीशी सरकार निश्चितपणे उभे राहील,’ अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. या वेळी सरपंच शहाजी क्षीरसागर यांनी गावातील प्रकल्पांविषयी माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी धामणेरच्या ग्रामस्थांनी सर्व घरांवर गुढ्या उभ्या केल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे आपल्या गावात स्वागत केले. प्रधानमंत्री आवास योजनेमधून घरकुल मिळालेल्या लाभार्थी शालिनी पवार यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे संवाद साधला.

धामणेर गावाला मिळालेले पुरस्कार
 • जिल्हा स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार (२०१६-१७)
 • बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार (२०१६-१७)
 • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार (२००१-०२)
 • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार (२००३-०४)
 • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार (२००४-०५)
 • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा विभाग स्तरावर द्वितीय पुरस्कार (२००४-०५)
 • माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते २४ फेब्रुवारी २००५ रोजी निर्मलग्राम पुरस्कार.
 • जिल्हास्तरीय अस्पृश्यता निर्मूलन प्रथम पुरस्कार (२००२)
 • विभाग स्तर वसंतराव नाईक पाणी व्यवस्थापन प्रथम पुरस्कार (२००३-०४)
 • यशवंत पंचायत राज अभियान विभाग स्तर प्रथम पुरस्कार (२००४-०५)
 • शाहू-फुले-आंबेडकर दलित वस्ती सुधार अभियानात जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार (२००६-०७)
 • राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्रथम क्रमांक (२००६-०७)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language