Ad will apear here
Next
... आणि त्यांनी झाडांना निरोप दिला!
पुणे मेट्रोसाठी स्थलांतरित होणाऱ्या झाडांना आकाशवाणीतील कर्मचाऱ्यांकडून भावपूर्ण निरोप
आकाशवाणी पुणे केंद्रातील झाडांच्या निरोप प्रसंगी उपमहाव्यवस्थापक आशिष भटनागर, केंद्र संचालक गोपाळ आवटी, वृत्तविभागाचे उपसंचालक नीतीन केळकर, वृत्तनिवेदक मनोज क्षीरसागर आदी

पुणे : कोणी नोकरीतून निवृत्त झालेले असते किंवा कोणी दूरच्या प्रवासाला जाणार असते, अशा वेळी त्या व्यक्तीला निरोप देण्याचा समारंभ केला जातो. पुण्याच्या आकाशवाणी केंद्रात मात्र नुकताच एक आगळावेगळा निरोप समारंभ पार पडला... कुणा व्यक्तीचा नव्हे, तर हा निरोप समारंभ होता केंद्राच्या आवारातील झाडांचा. 


आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे भव्य कार्यालय शिवाजीनगर येथे असून, त्याच्या प्रशस्त आवारातील अनेक मोठे वृक्ष त्याला छाया देत आहेत. त्यातील काही झाडे दोन ऑक्टोबर १९५३ रोजी हे कार्यालय सुरू होण्याच्याही आधीची आहेत. रसिक श्रोत्यांचे सुमधुर सुरांनी मनोरंजन करणाऱ्या आकाशवाणीच्या या इमारतीभोवतालचे अनेक भलेमोठे वृक्ष आजतागायत या वास्तूचे सौंदर्य खुलवीत आले आहेत; पण आता मात्र हे सगळे वृक्ष तेथून हटवले जाणार आहेत. आकाशवाणीच्या देदीप्यमान इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या झाडांना मेट्रोच्या कामासाठी आपले बस्तान हलवावे लागणार आहे. ही ६०-७० वर्षे जुनी असलेली झाडे, नव्हे सखे-सोबतीच जणू... ते जाणार याचे आकाशवाणीतील प्रत्येकाला वाईट वाटत होते. त्यामुळेच या झाडांना निरोप देण्याची आगळीवेगळी संकल्पना वृत्तनिवेदक मनोज क्षीरसागर यांनी मांडताच त्याला सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 


आकाशवाणीत काम करणारे कर्मचारी, कलाकार, आकाशवाणी केंद्राचे उपमहाव्यवस्थापक आशिष भटनागर, केंद्र संचालक गोपाळ आवटी, उद्घोषिका प्रभा जोशी, गौरी लागू, वृत्तविभागाचे उपसंचालक नीतिन केळकर, वृत्तनिवेदक मनोज क्षीरसागर यांच्यासह अनेक जण गुरुवारी दुपारी (आठ ऑगस्ट) आवर्जून या निरोप समारंभाला हजर राहिले होते. अनेकांनी आपल्या आठवणी जागवल्या. अनेकांचे डोळे भरून आले होते. ज्यांना निरोप दिला त्यांना तर काही बोलता येणेच शक्य नव्हते. अतिशय भावपूर्ण वातावरण तेथे निर्माण झाले होते. या माणसांचे प्रेम बघून झाडेही थरारली... उखडले जाण्याचे त्यांचे दुःख कदाचित थोडेसे हलके झाले असेल.


‘आकाशवाणी परिसरातील २२ मोठ्या झाडांचे स्थलांतर करून ती गणेशखिंड येथील आकाशवाणी कॉलनीत लावली जाणार आहेत,’ अशी माहिती मेट्रोचे अधिकारी अतुल गाडगीळ यांनी दिली. 
 
मनोज क्षीरसागर म्हणाले, ‘ही झाडे आकाशवाणीचा अविभाज्य भाग बनली होती. आकाशवाणीच्या कॉलनीत त्यांची पुनर्लागवड करण्यात येणार आहे, हीच समाधानाची बाब आहे.’

वृत्तविभागाचे उपसंचालक नीतिन केळकर म्हणाले, ‘आकाशवाणी पुणे केंद्राच्या आवारातील या अनेक झाडांपैकी काही झाडे केंद्र सुरू होण्याच्या आधीपासूनची आहेत, तर काही नंतरची. या झाडांच्या साक्षीने अनेक जण या वास्तूत आले आणि गेले... पण ही झाडे मात्र इथेच होती, सावली देत. आता मेट्रोच्या कामामुळे ही सगळी झाडे इथून हलवून आकाशवाणी कॉलनीत लावली जाणार आहेत. त्यातील किती जगतील हे माहीत नाही; पण अनेक वर्षे उभ्या असलेल्या या हरित मित्रांना निरोप देणे सगळ्यानांच खूप कठीण होते. त्यामुळे या मित्रांना निरोप देण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला.’ 

‘आम्ही आहोत तुमच्याबरोबर’ हा संदेश या सर्वांनी त्या झाडांना दिलाय. नव्या ठिकाणी रुजण्यात कदाचित त्यांना यामुळे बळ मिळू शकेल!

(झाडांचे स्थलांतर होण्यापूर्वीची स्थिती आणि नीतिन केळकर यांचे मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language