Ad will apear here
Next
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती


यवतमाळ : 
‘कोल्हापूर, सांगली, नाशिक भागात उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर, नौदलासह बचाव पथके तैनात करण्यात आली असून, सर्व प्रकारच्या उपाययोजना तातडीने राबविल्या जात आहेत. जे जे आवश्यक आहे ते सर्व तातडीने करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले आहेत,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा ऑगस्ट रोजी यवतमाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेच्या सहाव्या दिवसाची सुरुवात यवतमाळ येथून झाली. सात जिल्ह्यांतून, ३५ विधानसभा मतदारसंघातून ९९२ किलोमीटरचा प्रवास करून महाजनादेश यात्रा पाच ऑगस्ट रोजी यवतमाळ येथे पोहोचली. सहा तारखेला सकाळी पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पूरपरिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतला. लष्कर, नौदल, वायुसेना, प्रशासनातील विविध विभागांशी मुख्यमंत्री सतत संपर्कात आहेत. पुराने वेढलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थितीसंदर्भात पत्रकारांना तपशीलवार माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने ४३ फूट ही धोक्याची पातळी ओलांडली असून, पाणी ५२ फुटांपर्यंत चढलेले आहे. परिणामी कोल्हापूर, शिरोळ, हातकणंगले ही गावे प्रभावित आहेत. ‘एनडीआरएफ’च्या पथकांनी मदतकार्याला वेगाने प्रारंभ केलेला आहे. पाण्याने वेढलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. ‘एअरलिफ्टिंग’ची आवश्यकता पडली तर वायुसेनेची हेलिकॉप्टर्सदेखील सज्ज ठेवण्यात आली आहेत. कालपासून या भागातील पंधराशे जणांना सुरक्षितपणे हलवण्यात बचाव यंत्रणेला यश आले आहे.’

‘सांगली आणि नाशिक जिल्ह्यातही गंभीर पूरपरिस्थिती आहे. राज्याचे मुख्य सचिव सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतः पूरग्रस्त भागाकडे लक्ष देत आहेत. ते या भागाचा दौराही करणार आहेत. ठिकठिकाणी ‘एनडीआरएफ’ची पथके आवश्यकतेनुसार रवाना करण्यात आली आहेत,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘केंद्र सरकारकडूनही आवश्यक ती मदत मिळवण्यासाठी बोलणे झाले असून, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनाही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याविषयीची विनंती केली आहे. या संदर्भातील आवश्यक त्या सर्व सूचना संबंधित खात्यांना देण्यात आल्या असून, कुठलीही कमतरता भासू द्यायची नाही असे आदेश दिले आहेत,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
५० हजार जणांची सुटका
कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे येथील पूरसदृश परिस्थितीतून एनडीआरएफच्या जवानांनी आतापर्यंत ५० हजार जणांची सुटका केली आहे, अशी माहिती एनडीआरएफतर्फे देण्यात आली.

‘कलम ३७० हटवण्याचा निर्णय ऐतिहासिक’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ अ हटवण्यासंदर्भात अत्यंत धाडसाने निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. देशाच्या इतिहासातील हे एक सोनेरी पान असल्याचे ते म्हणाले.

‘कलम ३७० रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरला दिला गेलेला वेगळा दर्जा काढून घेतला गेला आहे. काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे, याची पूर्तता खऱ्या अर्थाने कालच्या निर्णयाने झाली आहे. या निर्णयामुळे जम्मू-काश्मिरातील सक्रिय असलेल्या फुटीतरतावाद्यांचा सफाया होणार आहे. वर्षानुवर्षे दहशतवादाचा बळी ठरलेल्या काश्मीरमध्ये यामुळे विकासाचे एक नवे दालन सुरू होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेनंतर यात्रा वाशिम जिल्ह्यातील कारंजाकडे रवाना झाली. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi