Ad will apear here
Next
...तोपर्यंतच गझल ऐकवून घ्या...!
उर्दू ही भारतीय भाषा आहे; पण एकीकडे धर्माच्या अवगुंठणात गुंडाळून तिला संकुचित करण्याचे प्रयत्न, दुसरीकडे ही भाषा बोलणाऱ्यांमध्ये होणारी घट आणि तिसरीकडे वास्तवापासून तिचा तुटणारा आधार अशा त्रांगड्यात ही भाषा सापडली आहे. पंजाब विद्यापीठातील एका वादामुळे उर्दूची ही दुरवस्था पुन्हा समोर आली आहे. रशियन, फ्रेंच, जर्मन, चिनी आणि तिबेटन अशा भाषांसोबत उर्दूलाही परकीय भाषांमध्ये टाकण्याचा प्रस्ताव या विद्यापीठाने दिला आहे. त्या अनुषंगाने उर्दू भाषेच्या प्रवासाचा वेध घेणारा आणि स्थितीवर भाष्य करणारा हा लेख...
..........
बहुप्रसवा वसुंधरा या नात्याने भारतात अनेक भाषा नांदतात. चार भाषाकुळातील शेकडो भाषा आसेतुहिमाचल अस्तित्वात आहेत; मात्र त्यातील उर्दूइतकी बदनाम आणि गैरसमज झालेली भाषा क्वचितच एखादी असेल. एकीकडे धर्माच्या अवगुंठणात गुंडाळून तिला संकुचित करण्याचे प्रयत्न, दुसरीकडे ही भाषा बोलणाऱ्यांमध्ये होणारी घट आणि तिसरीकडे वास्तवापासून तिचा तुटणारा आधार अशा त्रांगड्यात ही भाषा सापडली आहे. विशेषतः पाकिस्तानच्या निर्मितीनंतर ‘शत्रूची भाषा’ असा ठप्पा तिच्यावर लागला. त्यानंतर बांगलादेशाच्या रूपाने एका नव्या देशाला जन्म देण्याचे अपश्रेयही याच भाषेच्या नावावर गेले. आता तर तिच्या मायभूमीला म्हणजे भारतालाच ती पारखी झाली आहे. 

पंजाब विद्यापीठातील एका वादामुळे उर्दूची ही दुरवस्था पुन्हा समोर आली आहे. रशियन, फ्रेंच, जर्मन, चिनी आणि तिबेटन अशा भाषांसोबत उर्दूलाही परकीय भाषांमध्ये टाकण्याचा प्रस्ताव या विद्यापीठाने दिला आहे. विद्यापीठाचे विविध भाग एकमेकांमध्ये विलीन करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून ‘स्कूल ऑफ फॉरेन लँग्वेजेस’मध्ये सर्व परकीय भाषांचे अभ्यासक्रम जोडण्यात आले आहेत. त्यात उर्दूचाही समावेश करण्यात आला.

आपल्याला परकीय भाषांमध्ये समाविष्ट करण्याच्या या प्रस्तावावर उर्दू विभागाने स्वाभाविकच आक्षेप घेतला. ‘उर्दू ही परकीय नव्हे तर हिंदी आणि पंजाबीप्रमाणेच भारतीय भाषा आहे,’ असे या विभागाने म्हटले आहे. हा वाद एवढा वाढला, की पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीही त्यात भाग घेतला. ‘उर्दू ही भारतीय भाषाच आहे. त्यामुळे विद्यापीठाचे उपकुलगुरू आणि अधिसभेच्या सदस्यांनी त्यात सुधारणा करावी,’ असे ट्विट त्यांनी केले.त्यावर अर्थातच विद्यापीठाने स्पष्टीकरण दिले. ‘या विभागाचे नाव उर्दू व पर्शियन आहे आणि त्यामुळे तिला परकीय भाषा विभागात टाकले आहे,’ असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले. उर्दूची खरी समस्या हीच आहे. ही भाषा फारसी किंवा पर्शियन आणि अरबी भाषांशी अपरिहार्यपणे एवढी जोडली गेली आहे, की तिची भारतीय ओळख विकसितच होऊ शकली नाही. गंमत म्हणजे आज आपण उर्दू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाषेचे मूळ नाव ‘हिंदी’ हे होते आणि आपण जिला हिंदी म्हणून ओळखतो ती खडी बोली म्हणून ओळखली जात होती.

चौदाव्या शतकातील अमीर खुस्रो या प्रसिद्ध कवीने अनेक ठिकाणी या भाषेचा उल्लेख ‘हिंदी’ असाच केला आहे. तिला ‘उर्दू’ हे नाव दिल्ली व लखनौच्या विद्वानांनी खूप उशिरा म्हणजे १७२५च्या सुमारास दिले. हा शब्द मूळ तुर्की भाषेतील आणि त्याचा अर्थ आहे ‘लष्करी छावणी’. मुस्लिम आक्रमकांची सत्ता भारतात सुस्थापित झाल्यानंतर त्यांच्या राज्यकारभाराची भाषा फारसी होती. या बादशहांच्या महालात देशी भाषांना स्थान नव्हते. तिथे वावर होता तो अरबी-फारसी शब्दांचा - अगदी मुबलक आणि शैलीपूर्ण.

...मात्र जनसामान्यांच्या तोंडी त्यांच्या मातृभाषाच राहिल्या. या राजांची दरबारी मंडळी, पदरी असलेले सैनिक आणि जनसामान्य यांच्यात एका संवादसेतूची गरज होती. त्यातून विकसित झालेली भाषा ती उर्दू. मुख्यतः लष्करी छावण्यांमधून तिचा प्रसार झाल्यामुळे तेच नाव तिला मिळाले. मीर तकी याने तिचा उल्लेख ‘जबाने उर्दू-ए-मुअल्ला’ म्हणजे लष्करी परिसरातील भाषा असा केला आहे. त्यातील बाकीची पदे गळून गेली आणि ‘उर्दू’ हा शब्द उरला. या भाषेच्या उगमासंबंधाने उर्दू विद्वानांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत. काही जणांच्या मते ती मुस्लिम विजेत्यांच्या छावणीत जन्माला आली, तर काही जण म्हणतात, की इस्लामचा प्रभाव वाढल्यावर अरबी-फारसीच्या आधारे ती उगम पावली. (या मतभेदांचा परिणाम त्या भाषेच्या चरित्रावरही झाला आहे).

आपल्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे उर्दूच्या विकासात दक्षिण भारताचा आणि खास करून महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. दक्षिणेतील उर्दूला दख्खनी उर्दू असे म्हटले जाते आणि ती एक वैशिष्ट्यपूर्ण भाषा मानली जाते. दक्षिणेत पंधराव्या शतकातील ख्वाजा बंदेनवाज़ने या भाषेत प्रथम रचना केली. इ. स. १७८०पर्यंत ही साहित्यनिर्मिती चालली होती. किंबहुना ‘वली’ दखनी हा उर्दू साहित्याचा प्रणेता समजला जातो आणि तो औरंगाबादेत राहत होता. त्याने निखळ उर्दूत रचना केल्या. त्यामुळे उर्दू काव्य व भाषा समृद्ध बनली. याबाबत एक गोष्ट अशी सांगतात, की मिर्झा गालिब यांच्या आधीच्या रचना अत्यंत कठीण व अभिजात अशा फारसी शब्दांनी भरलेल्या होत्या. त्या कोणालाच कळत नसत. म्हणून त्याने फारसी शब्द कमी केले. त्यातून त्याच्या रचना सोप्या झाल्या आणि लोकप्रिय बनल्या. ‘दाग’ देहलवी यांनी तर म्हटलेच आहे, की ‘कहते हैं उसे जबाने-उर्दू जिस में न हो रंग फारसी का’

...मात्र नंतर उत्तरेत मीर तकी मीर आणि गालिबसारख्या दर्जेदार शायरची चलती झाली आणि तीत अरबी-फारसी शब्दांचा भरणा झाला. त्यातही एक गोची झाली. मुसलमान बादशहा फारसीला धार्जिणे असल्यामुळे मुसलमानांनी ही भाषा आरंभापासून अरबी-फारसी लिपीतच लिहिली; मात्र हिंदू ते देवनागरीत लिहीत राहिले. आर्य समाजाने एप्रिल १९३६मध्ये आयोजित केलेल्या आर्य भाषा संमेलनाचे अध्यक्ष होते. हिंदी व उर्दूचे सर्वश्रेष्ठ लेखक प्रेमचंद. त्या वेळी त्यांनी केलेल्या प्रतिपादनानुसार, ‘हिंदूंच्या हिंदीचे रूप जसे विकसित होत होते, तसेच मुस्लिमांच्या हिंदीचेही रूप बदलत होते. लिपी सुरुवातीपासूनच वेगळी होती. आता बोलीही वेगळी होऊ लागली. मुस्लिमांची संस्कृती इराण व अरबस्तानाची आहे. त्याचा परिणाम बोलीवरही होत होता. अरबी आणि फारसीचे शब्द येऊन मिळू लागले. आज हिंदी व उर्दू या दोन वेगवेगळ्या भाषा झाल्या आहेत. एकीकडे आमचे मौलवी साहेब अरबी आणि फारसीचे शब्द भरत आहेत, दुसरीकडे पंडितगण संस्कृत व प्राकृताचे शब्द कोंबत आहेत आणि दोन्ही भाषा जनतेपासून दूर जात आहेत.’

उर्दूवर खरा आघात केला तो पाकिस्तानने. वास्तविक पाकिस्तानमध्ये उर्दू ही फार काही लोकांची मातृभाषा नाही. उलट भारतात उर्दू बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तरीही केवळ भारताला खुन्नस म्हणून पंजाबी मुसलमानांच्या आग्रहाने पश्चिम पाकिस्तानने उर्दूचा स्वीकार केला. तसेच पूर्व बंगालवर ती लादली आणि त्यातून झालेल्या संघर्षातून बांगलादेश अस्तित्वात आला. तरीही पाकिस्तानने धडा घेतला नाही. आपल्या देशाचे जास्तीत जास्त अरबीकरण करण्याच्या नादात या भाषेत अरबी शब्दांचा भरणा करण्यात आला.

त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला - आज ही भाषा कोणालाही नकोशी झाली आहे. केवळ शेरोशायरीच्या पलीकडे तिला वाव असल्याचेही कोणाला वाटत नाही. शशी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मुहाफिज’ नावाच्या चित्रपटात उर्दूच्या या विदारक स्थितीचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. कलीम अहमद आजिज़ या शायरने लिहिलेल्या एका गझलमध्ये म्हटले आहे,

ग़नीमत है अभी हम हैं सुना लिजिए ग़ज़ल आजिज़
हमारे बाद उर्दू-ए-मुअ़ल्ला कौन समझेगा?

(आम्ही आहोत तोपर्यंतच गझल ऐकवून घ्या. आमच्यानंतर कोणाला चांगली उर्दू कळणार आहे?)

यातच सर्व काही आले.


– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@didichyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi