Ad will apear here
Next
ज्येष्ठ पुरातत्त्ववेत्ते डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

डॉ. गो. बं. देगलूरकरपुणे : पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ पुरातत्त्ववेत्ते डॉ. गो. बं. देगलूरकर यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. शुक्रवारी, २६ सप्टेंबर रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी १० वाजता होणाऱ्या शानदार सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.


हा पुरस्कार पुरातत्त्वशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे, अशी माहिती पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली.


एक लाख रुपये रोख आणि सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजींची प्रतिमा, पुण्याच्या ग्रामदेवतांसह असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्हाने त्यांना गौरविण्यात येणार आहे.


पुरस्काराचे यंदाचे ३१  वर्ष आहे. एक वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिक, सीमेवर लढताना जखमी झालेले तीन सैनिक आणि एका वीरमातेलाही या पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. यात वीरमाता लता नायर, मोहम्मद चांदभाई शेख, नाईक फुलसिंग, हवालदार प्रमोद सपकाळ, हवालदार गोविंद बिरादार यांचा समावेश आहे.


पुण्यभूषण पुरस्कारार्थींचे नाव पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने निश्चित केले. या वर्षीच्या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, खासदार वंदना चव्हाण, महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनी दर वर्षी या पुरस्काराची घोषणा केली जाते. या तीन हुतात्म्यांची प्रेरणा समोर ठेवून ‘त्रिदल, पुणे’ या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेने हा पुरस्कार सुरू केला.


काँग्रेस भवन येथे पार्किंग व्यवस्था

हा कार्यक्रम उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार असल्याने सुरक्षाविषयक नियमावली आहे. त्यामुळे वाहनांची पार्किंग व्यवस्था काँग्रेस भवन येथे करण्यात आली आहे. नागरिकांनी निमंत्रणपत्रिका सोबत ठेवाव्यात. तसेच सकाळी साडेनऊच्या आत स्थानापन्न व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


पुण्यभूषण पुरस्काराचा इतिहास

यापूर्वी ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी, राजा दिनकर संग्रहालयाचे कै. काका केळकर, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. बानुबाई कोयाजी, सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉ. मोहन धारिया, डॉ. जयंत नारळीकर, प्रतापराव उर्फ तात्या गोडसे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदु बोर्डे, जयंतराव टिळक, डॉ. जब्बार पटेल, श्री. राहुलकुमार बजाज, डॉ. के. बी. ग्रँट, विख्यात नृत्यसाधिका डॉ. रोहिणी भाटे, डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, विख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. ह. वि. सरदेसाई, श्रीमती निर्मलाताई पुरंदरे, सुधीर गाडगीळ, डॉ. सायरस पूनावाला, प्रतापराव पवार, भाई वैद्य आणि डॉ. के. एच. संचेती, डॉ. प्रभा अत्रे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी सभापती सोमनाथ चटर्जी, मनोहर जोशी, शरद पवार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिलदेव व सचिन तेंडुलकर, परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, वसंतराव साठे, नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रह्मण्यम्, मधू दंडवते, ‘दी हिंदू’चे संस्थापक-संपादक एन. राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सुशीलकुमार शिंदे, सी. पी. आय. (एम) जनरल सेक्रेटरी सीताराम येचुरी, नाट्यदिग्दर्शक गिरीश कार्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. विकास आमटे, आशा भोसले, नारायण मूर्ती, शरद यादव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हरिप्रसाद चौरासिया, अमजद अली खान, शिवकुमार शर्मा आदी मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करून नामांकित पुणेकरांचा सन्मान केला आहे.

(पुण्यभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने घेतलेली डॉ. देगलूरकर यांची विशेष मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा. डॉ. गो. बं. देगलूरकर यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) 

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi