Ad will apear here
Next
‘महाराष्ट्रात दोन वर्षांत कोणीही बेघर असणार नाही’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार
अकोले (अहमदनगर) : ‘महाराष्ट्रात बेघर असलेल्या सर्वांना घरे देण्याचे काम वेगाने चालू असून, २०२१पर्यंत राज्यातील कोणीही बेघर असणार नाही. प्रत्येक गरिबाला राहायला घर मिळेल,’ असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ सप्टेंबर रोजी व्यक्त केला.

महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यात अकोले येथे जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महाजनादेश यात्राप्रमुख व भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि आमदार वैभव पिचड उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘२०२२पर्यंत सर्वांना घर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आहे. आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणात ज्यांची बेघर म्हणून नोंद आहे अशांना घरे देण्याचे काम सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत सात लाख घरे तयार केली असून, अजून चार लाख घरे तयार करतो आहोत. या एसईसीसी यादीत ज्यांची बेघर म्हणून नोंद आहे त्या प्रत्येकाला चालू वर्षाच्या अखेरपर्यंत घर देण्यात येईल. ज्या बेघरांचे नाव एसईसीसी यादीत नाही, त्यांचा यादीत समावेश करून त्यांना पुढच्या दोन वर्षांत घरे देण्यात येतील. ग्रामीण भागात ज्यांच्या घराचे अतिक्रमण असेल, त्यांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांचे कच्चे घर असेल, त्यांना पक्के घर बांधायला पैसे देत आहोत. ज्यांचे गायरान जमिनीवर घराचे अतिक्रमण असेल तर त्यांना मालकी हक्काचा पट्टा देत आहोत. शहरांमध्ये नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात जे सरकारी जमिनीवर झोपडपट्टीत राहत असतील किंवा गायरान जमिनीवर घर असेल, तर त्यांना मालकीचा पट्टा देत आहोत. जे कच्च्या घरात राहत असतील, त्यांना घर बांधण्यास अडीच लाख रुपये आणि संबंधित व्यक्ती बांधकाम कामगार असेल तर घर बांधण्यास साडेचार लाख रुपये देत आहोत.’ फडणवीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक गरिबाला घर मिळाले पाहिजे. घरामध्ये शौचालय, गॅस कनेक्शन व वीज कनेक्शन असले पाहिजे. राज्यात लाखो कुटुंबांना उज्ज्वला योजनतून गॅस कनेक्शन मिळाले आहे. ज्यांच्या घरी उज्ज्वला योजनेतून गॅस कनेक्शन मिळू शकत नाही त्यांना राज्य सरकारच्या योजनेतून वतीने गॅस कनेक्शन देऊ. ज्यांच्या घरी गॅस नाही असे एकही कुटुंब महाराष्ट्रात असणार नाही. सगळ्यांना चुलीपासून मुक्ती देऊन धूरमुक्त महाराष्ट्र घडवू.’

त्यांनी सांगितले, ‘आदिवासी भागांत अर्भकमृत्यू आणि बालमृत्यू कमी होण्यासाठी सर्वांत चांगले काम महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत झाले आहे आणि ही संख्या खूप कमी झाली आहे. राज्य सरकारच्या मदतीमुळे  राज्यात आदिवासी समाजाची ५० हजार मुले नामांकित शाळांमध्ये शिकत आहेत. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत आहोत. ज्या आदिवासी मुलांना होस्टेलमध्ये प्रवेश मिळत नसेल, त्यांना वर्षाला ६० हजार रुपये देतो आहोत. आदिवासी समाजाकरिता अनेक योजना राज्य सरकारने सुरू केल्या असून, येत्या काळात मोठे परिवर्तन झालेले दिसेल.’ 

‘मधुकरराव पिचड यांनी संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेत घालवले. आदिवासी समाजाचे नेते म्हणून त्यांना शेवटच्या गावापर्यंत मान्यता आहे. ते भाजपसोबत आले आहेत. आमदार वैभव पिचड हे अतिशय शिस्तबद्ध, अभ्यासू व शांतपणे मुद्दे मांडून पाठपुरावा करणारे चांगले आमदार आहेत. हे नेते भाजपमध्ये आल्यामुळे मनापासून आनंद आहे,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ‘अकोले हा चळवळीचा तालुका आहे. तालुक्याने काही निर्णय घेतला, की जिल्ह्यावर परिणाम होतो असे लढवय्ये शेतकरी कार्यकर्ते या तालुक्यात आहेत. पूर्वी हा तालुका डाव्या विचारसरणीचा होता आता आणि एवढे परिवर्तन झाले की भारतीय जनता पक्षाचा तालुका झाला.’ 

आमदार वैभव पिचड यांनी प्रास्ताविक केले. धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देताना आदिवासींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावला नाही आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला धक्का लावला नाही, याबद्दल त्यांनी  मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi