Ad will apear here
Next
रत्नागिरीत पाच डिसेंबरपासून ‘सीएम चषका’ला सुरुवात
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षातर्फे (भाजप) राज्यभरात सीएम चषक कला, क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत पाच डिसेंबरपासून या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नसून, यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील भाजप, भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) पदाधिकार्‍यांकडे जबाबदारी दिली आहे. शहर व ग्रामीण भागांतील खेळाडूंना यात सहभागी होता येणार आहे.

महाराष्ट्रात उत्तम खेळाडू नजरेसमोर यावेत, संघभावना वाढीस लागावी, ‘भाजप’ सर्वदूर सर्व स्तरांत पोहोचावा या हेतूने हा आव्हानात्मक महोत्सव आयोजित केला आहे. १६ वर्षांवरील विद्यार्थी, व्यक्ती यात भाग घेऊ शकतात. प्रथम विधानसभा, नंतर जिल्हा व अंतिम टप्प्यात राज्य स्तरावर या स्पर्धा होणार आहेत. अंतिम स्पर्धांचा समारोप राष्ट्रीय युवा दिनी म्हणजे १२ जानेवारी २०१९ रोजी होईल. या महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, कॅरम, १०० व ४०० मीटर धावणे, कुस्ती या क्रीडा, तर नृत्य, गायन, चित्रकला व रांगोळी या कला स्पर्धा होणार आहेत.

एका व्यक्तीला क्रीडा आणि कला या दोन्ही प्रकारांत एकापेक्षा अधिक स्पर्धांमध्ये भाग घेता येणार आहे. एकाच संघाला इतर सांघिक कार्यक्रमांत भाग घ्यायचा असेल, तर वेगळा नोंदणी अर्ज भरणे गरजेचे आहे. राज्यभरात ५० लाख युवकांना पक्षासोबत जोडण्याचा उद्देश ठेवून ‘भाजप’तर्फे ‘सीएम चषक’चे आयोजन केले आहे. २८८ विधानसभा मतदारसंघांमधून ७५ दिवसांत ५० लाख स्पर्धकांचे लक्ष्य ठेवले आहे.

रत्नागिरीत आयोजित महोत्सवाची सुरुवात पाच डिसेंबरला होणार आहे. यात आयुष्मान भारत क्रिकेट, जलयुक्त शिवार व्हॉलीबाल, शेतकरी सन्मान कबड्डी, सौभाग्य खो-खो, उडान १०० मीटर धावणे व मुद्रा योजना ४०० मीटर धावणे, स्वच्छ भारत कुस्ती, कौशल्य भारत कॅरमचा समावेश आहे. कला विभागात उज्ज्वला नृत्य स्पर्धा, उजाला गायन स्पर्धा, इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा, मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धेचा समावेश आहे.

या महोत्सवात ७४० चषक आणि ७६ हजार २७८ पदकांची लयलूट केली जाणार असून, ७६ हजार २७८ विजेत्यांना प्रशस्तीपत्र आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीची ५० लाख सहभाग प्रशस्तिपत्रे दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे विजेते आणि उपविजेत्यांना रोख पारितोषिके, विशेष चषक पदके दिली जाणार आहेत. बंदर विकास व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, तसेच ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष बाळ माने, उपाध्यक्ष राजेश सावंत, ‘भाजयुमो’चे जिल्हाध्यक्ष राजेश मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन केले जात आहे. यासाठी प्रत्येक पदाधिकार्‍यांकडे जबाबदारी दिली आहे. प्रा. नाना शिंदे, प्रसाद पाटोळे (राजापूर), अ‍ॅड. दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर (रत्नागिरी), तुषार खेतल (चिपळूण), केदार साठे, शशिकांत चव्हाण (खेड, दापोली), आणि डॉ. विनय नातू व प्रशांत शिरगावकर (गुहागर) हे स्पर्धांचे नियोजन करत आहेत.

नोंदणीसाठी वेबसाइट : https://www.cmchashak.com/registrations
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language