Ad will apear here
Next
सिंधुदुर्गात फेरफटका - भाग दोन
सावंतवाडीचा राजवाडा (फोटो : अनिकेत कोनकर)

‘करू या देशाटन’
सदराच्या मागील भागात आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या उत्तरेकडचा भाग पाहिला. या भागात माहिती घेऊ या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण भागाची. 
...........
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दक्षिण भाग गोवा राज्याला लागून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशावरून येणारे गगनबावडा, फोंडा व आंबोली हे घाट निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी बोलीची ओळख मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’ नाटकामुळे जगाला झाली. (मालवणी बोलीतील व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

मालवणी सोलकढी लोकप्रिय आहे. मालवणी मसाले आणि पदार्थांच्या चवी ज्यांनी एकदा घेतल्यात, त्यांच्या जिभेवर कायम रेंगाळत असतात. त्यासाठी सिंधुदुर्गला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढत आहे. खाण्याबरोबर येथील सागरकिनारेही भुरळ पडत असतातच. वाहतुकीसाठी रस्ते, रेल्वे आहेच. आता हवाई मार्गानेही सिंधुदुर्ग जोडले जात आहे. चिपी येथील विमानतळ पूर्ण होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. 

मोती तलाव. तलावाच्या काठावर मध्यभागी नगर परिषदेच्या इमारतीचा मनोरा. पाठीमागे नरेंद्र डोंगर.  (फोटो : अनिकेत कोनकर)

सावंतवाडी :
सावंतवाडी हे ब्रिटिश काळात एक संस्थान होते. खेम सावंत-भोसले हे या संस्थानाचे संस्थानिक होते. खेम सावंतांनी १८५७च्या लढ्यामध्येही भाग घेतला होता. आताचे सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आणि उत्तर गोव्यातील काही गावे मिळून हे संस्थान बनले होते. सावंतवाडीला ‘सुंदरवाडी’ असेही म्हटले जायचे. नावाप्रमाणेच सुंदर असलेल्या या शहराच्या मधोमध सुंदर मोती तलाव आहे. संध्याकाळच्या रोषणाईत हा तलाव आणखीच खुलून दिसतो. या संस्थानिकांचा राजवाडा आजही पाहण्यास खुला असतो. सकाळी साडेनऊ ते साडेबारा आणि दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत राजवाड्यात जाता येते. राजवाड्यात दुर्मीळ छायाचित्रांची फोटो गॅलरी असून, गंजिफा या जुन्या काळातील खेळाच्या निर्मितीचे केंद्रही आहे. तसेच विविध खेळ, खेळणी आणि लाखकामाच्या वस्तू येथे पाहायला मिळतात. आकर्षक हस्तकला वस्तूंचे दालनही राजवाड्यात आहे. 

ले. कर्नल श्रीमंत शिवराम सावंत खेमसावंत भोसले यांचा मोती तलावाच्या काठावर उभारलेला पुतळा. (फोटो : अनिकेत कोनकर))

संस्थानाच्या काळात १८७४मध्ये मोती तलावाची निर्मिती झाली. राजवाड्यासमोरील ३१ एकराच्या परिसरात धरण बांधण्यात आले. त्याच्या चारही बाजूंनी भक्कम दगडांनी बांधकाम करण्यात आले. याच्या जवळच लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ आहे. फळे आणि भाज्यांच्या अतिशय सुंदर आणि हुबेहूब प्रतिकृती चितारआळीत बनवल्या जातात. सावंतवाडीत काजू, हंगामाप्रमाणे आंबे, फणस, रातांबे, जांभळे उपलब्ध असतात. सावंतवाडीतील नरेंद्र डोंगर प्रसिद्ध आहे. तसेच मोती तलावाच्या काठावरच सावंतवाडी नगर परिषदेची इमारत उभी आहे. सावंतवाडीत कला महाविद्यालय, तसेच आयुर्वेद महाविद्यालय आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येथे शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. 

आंबोली (फोटो : एमटीडीसी)

आंबोली :
आजरामार्गे कोल्हापूर व चंदगडमार्गे बेळगावला जोडणाऱ्या आंबोली घाटातच हे निसर्गरम्य ठिकाण आहे. सदाहरित वृक्षांची शाल पांघरलेला हा परिसर निसर्गप्रेमींना भुरळ घालतो. आंबोली येथील महादेवगड, कावळेसाद, शिरगांवकर, नट, सावित्री असे असंख्य पॉइंट पाहण्यासारखे आहेत. हिरण्यकेशी नदीचा उगम येथूनच होतो. पावसाळ्यात सह्याद्रीच्या उतरणीवर कोसळणारे धबधबे हे आणखी एक आकर्षण. येथे अजूनही आपल्याला संस्थानकालीन भव्य इमारती पाहायला मिळतात. महात्मा गांधींनी काही काळ या ठिकाणी वास्तव्य केले होते. येथूनच ते शिरोडा येथे मिठाच्या सत्याग्रहासाठी मार्गस्थ झाले होते. आंबोली घाटातील प्रवास सुखद आठवण म्हणून पर्यटकांच्या स्मृतींमध्ये घर करून राहतो. (आंबोलीबद्दल अधिक माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नांगरतास धबधबा : आंबोलीपासून १० किलोमीटर अंतरावर हा २०० फूट उंचीवरून डोंगर उतरंडीवर डोंगर कापत जाणारा धबधबा आहे. घाटाचा शोध लावणाऱ्या धनगराचे मंदिरही येथे आहे. असे म्हणतात, की इंग्रजांना घाटमार्ग काढण्यासाठी दिशा दाखवणाऱ्या या धनगराचा इंग्रजांनीच काम होताच खून केला. 

श्री यक्षिणी मंदिरात छतावर लाकडात कोरलेल्या मूर्ती (फोटो : shreeyakshini.webs.com)

चौकुळ :
हे निसर्गरम्य ठिकाण आंबोलीजवळच असून, आता पर्यटनकेंद्र म्हणून विकसित होत आहे. घरगुती निवास व्यवस्था, मालवणी भोजन ही येथील खासियत. पावसाळ्यात परिसराची शोभा वाढविणारे छोटे-मोठे धबधबे पाहण्यास मिळतात. चौकुळच्या आसपास असलेल्या जंगलात गवे, हरणे, भेकरे, बिबट्या, ससे, रानमांजरे आदी वन्य प्राणी वास्तव्य करून आहेत. शिवाय असंख्य वनौषधी येथे सापडतात. 

दाणोली : आंबोलीहून सावंतवाडीकडे येताना दाणोली येथे श्री समर्थ साटम महाराजांची समाधी आहे. या भागातील लोकांची, तसेच आसपासच्या गावांतील लोकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. 

दोडामार्ग : गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवरील हे गाव जंगली हत्तींचा वावर वाढल्याने प्रकाश झोतामध्ये आले आहे. दोडामार्गजवळ एक सुंदर धबधबा आहे. पर्यटक येथे आता गर्दी करीत असतात. 

श्री देवी यक्षिणी (फोटो : shreeyakshini.webs.com)

शिवापूर :
आंबोलीच्या उत्तरेला एक दुर्गम, पण नितांत सुंदर असे शिवापूर गाव आहे. मनोहर व मनसंतोष गडाच्या पायथ्याशी वसलेल्या शिवापूरला जाण्यासाठी कुडाळमार्गे जावे लागते. शिवापूरच्या आसपास अनेक धबधबे आहेत. येथे नैसर्गिक झऱ्याच्या पाण्यावरच नळयोजना केल्या असून, या योजनांना वीजपुरवठ्याची गरज भासत नाही. 

माणगावचे श्री यक्षिणी देवी मंदिर

टेंब्ये स्वामी महाराजांची जन्मस्थळी तयार केलेली मूर्ती. (फोटो : shreeyakshini.webs.com)माणगाव : कुडाळवरून शिवापूरला जाताना वाटेत लागणारे कुडाळवरून सुमारे वीस किलोमीटरवरचे एक महत्त्वाचे गाव म्हणजे माणगाव. दत्तावतारी परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांचे जन्मस्थान या गावात आहे. टेंब्ये स्वामी महाराजांनी घोरकष्टोद्धरण स्तोत्रासारख्या अनेक स्तोत्रांची निर्मिती केली. त्यांची साधना विलक्षण होती. त्या माध्यमातून त्यांनी जनतेची दुःखे दूर केली. त्यांची समाधी गुजरातमधील गरुडेश्वर येथे आहे. महाराजांच्या जन्मस्थानाशेजारीच त्यांची आराध्यदेवता आणि माणगावची ग्रामदेवता श्री यक्षिणीचे प्राचीन मंदिर आहे. येथील नक्षीकाम, छतावरील लाकडातील कलाकारी पाहण्यासारखी आहे. या गावातून निर्मला नदी वाहते. टेंब्ये स्वामींनी या गावात दत्तमंदिर उभारले. नंतर अहिल्याबाई होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार केला. अगदी अलीकडेच या मंदिराचा परिसर अधिक भव्य पद्धतीने साकारण्यात आला आहे. येथे धर्मशाळा असून, राहण्याची आणि महाप्रसादाची सोय आहे. (श्री यक्षिणी मंदिर, तसेच माणगावसंदर्भातील विस्तृत माहितीसाठी https://shreeyakshini.webs.com/  ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. मंदिरातील कलाकुसरीचे विविध फोटो तेथे पाहता येतील.)

रेडी : मुंबई-गोवा जलमार्गातील बंदर म्हणून रेडी प्रसिद्ध आहे. रेवतीद्वीप, रेवतीपट्टण किंवा रेवतीनगर म्हणजेच आजचे रेडी गाव. येथील सागरकिनाऱ्याला हिरव्यागर्द माडांच्या बागांची किनार, समोर लयीत गरजणारा दर्या आणि पसरलेली रूपेरी वाळू यामुळे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. रेडीची आणखी एक ओळख म्हणजे लोहखनिजाच्या खाणी. त्यामुळे हे गाव जगाच्या नकाशावर गेले. ऐतिहासिक वारसा सांगणारा सोळाव्या शतकात बांधण्यात आलेला यशवंतगड या गावातच आहे. श्री देवी माऊली, श्री महादेव आणि द्विभुज गणपती यांची येथील सुंदर मंदिरे भाविकांना आकर्षित करतात. 

रेडीचा गणपती

शिरोडा :
वेंगुर्ल्यापासून १७ किलोमीटरवर सागरकिनारा असलेले शिरोडा हे गाव आहे. तेथून जवळच पाच-सहा किलोमीटरवर सुरूचे बन आणि नारळी-पोफळींनी वेढलेला सुंदर समुद्रकिनारा आहे. ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळविलेले साहित्यिक वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर यांची ही कर्मभूमी. ते येथे काही काळ शिक्षक म्हणून ट्युटोरिअल हायस्कूलमध्ये कार्यरत होते. १९३० साली शिरोडा येथे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाचा सत्याग्रह झाला होता. येथे मिठागरेही आहेत. 

आरवली : शिरोडाच्या उत्तर बाजूस आरवली गाव असून, सुंदर समुद्रकिनारा व कमळाच्या फुलांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. सातेरी देवी आणि विठोबाचे येथे मंदिर आहे. आरवलीचे वेतोबा हे देवस्थान प्रसिद्ध आहे. 

मोचेमाड : आरवलीच्या उत्तरेकडे मोचेमाड बीच असून. गर्दी कमी असल्याने शांत समुद्रकिनारा येथे अनुभवता येतो. 

वेंगुर्ला : वेंगुर्ला शहराची मुख्य ओळख इ. स. १६०० ते इ. स. १८०० या काळात एक व्यापारी बंदर म्हणून होती. परंतु आता केवळ एक मासेमारी बंदर अशीच त्याची ओळख उरली आहे. वेंगुर्ला हे उत्तम दर्जाच्या काजूसाठीही प्रसिद्ध आहे. संध्याकाळी समुद्रावरून येणाऱ्या नौका, अस्ताला जाणारा सूर्य हे दृश्य खूप मनोहर असते. संध्याकाळी बंदरावरच मासेविक्री केली जाते. त्यामुळे ताजे व स्वस्त मासे मिळतात. बंदराला लागूनच स्नॅकसाठी, जेवणासाठी व राहण्यासाठीसुद्धा चांगले पर्याय उपलब्ध आहेत. बंदरापासून काही मिनिटांच्या अंतरावर वेंगुर्ला लाइट हाउस आहे. समुद्राला टेकलेल्या डोंगरकपारी, तसेच सुंदर बीच हे येथील वैशिष्ट्य. तसेच मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटची प्रतिकृती असलेले वेंगुर्ल्याचे मार्केट, निशाण तलावही बघण्यासारखा आहे. शहर परिसरात जवळजवळ ३० - ४० मंदिरे आहेत. 

अतिशय कमी गर्दी असलेले किनारे (कोंडुरा किनारा -आरती प्रभूंचे जन्मगाव, वायंगणी किनारा, सागरेश्वर किनारा, खवणे किनारा) येथे आहेत. या भागातील समुद्रामध्ये हमखास होणारे डॉल्फिनदर्शन हेही येथील आकर्षण आहे. शेती व फलोत्पादन याविषयी आवड असेल तर वेंगुर्ला फळसंशोधन केंद्राला भेट द्यायलाच हवी. येथे काजूप्रक्रिया केंद्र आहे, तसेच मोठी नर्सरीही आहे. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या या केंद्रात फळझाडांच्या नव्या जाती विकसित केल्या जातात. काजूच्या ‘वेंगुर्ला’ नावाने प्रसिद्ध असलेल्या जाती येथेच विकसित करण्यात आल्या आहेत. 

वेंगुर्ला रॉक आणि दीपगृह

वेंगुर्ला रॉक्स :
हे ठिकाण बर्न्ट आयलँड म्हणूनही ओळखले जाते. भारतातील पाच प्रमुख समुद्रीपक्ष्यांची घरटी येथे आढळतात. बऱ्याच पर्यटकांना याची माहिती नाही. येथे जाण्यासाठी तटरक्षक दलाची परवानगी लागते. मुख्यत्वेकरून समुद्री पाकोळ्यांचे हे वसतिस्थान आहे. हे आता संरक्षित पक्षी अभयारण्य म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे. या पक्ष्यांच्या लाळेपासून औषध तयार होते, अशा गैरसमजातून याच्या अंड्यांची व घरट्यांची तस्करी होत असल्याने याला संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. निवती बंदर व वेंगुर्ले येथून येथे मोटरबोटने जाता येते. येथे ब्रिटिशकालीन दीपगृह आहे. 

सागरेश्वर किनारा

सागरेश्वर किनारा :
नियोजित सागरी महामार्गाने जाताना वेंगुर्ला-शिरोडा रस्त्यावर वेंगुर्ला शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर हा सुंदर किनारा आहे. सागरेश्वराचे मंदिर असल्यामुळे किनाऱ्यालाही तेच नाव पडले. मंदिर परिसरात गोड्या पाण्याची विहीर आहे. 

भोगवे : वेंगुर्ला ते मालवण सागरी रस्त्यावर निवती-भोगवे-कोचरा येथील समुद्रकिनारा विलोभनीय आहे आहे. भोगवे गावाजवळ कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो. लांबवर पसरलेली स्वच्छ आणि शुभ्र वाळू आणि किनाऱ्याकडेला असलेल्या माडा-पोफळीच्या बागा समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य आणखीच खुलवितात. 

निवती-भोगवे किनारा

निवती किल्ला :
शिवाजी महाराजांनी सागरी शृंखलेमधील टेहळणीकिल्ला म्हणून हा किल्ला बांधला. डोंगराचा एक सुळका समुद्रात घुसला आहे व त्यावरच हा किल्ला आहे. किल्ल्यावर आता काही अवशेष नाहीत; मात्र येथून पश्चिमेकडे दूरवर सिंधुदुर्ग व लागून असलेला भोगवेचा समुद्रकिनारा अधिक सुंदर दिसतो. तसेच समुद्रात असणाऱ्या व किनाऱ्यावर असणाऱ्या खडकांवर आपटणाऱ्या लाटांचे तांडवही बघण्यासारखे असते. 

निवती बंदर : हे मच्छिमार लोकांचे बंदर आहे व लागूनच छोटा किनाराही आहे. डॉल्फिन शोसाठी हे ठिकाण अधिक सोयीचे आहे. समोरच ५०० ते ७०० मीटर अंतरावर खडकांची बेटे आहेत. हे खडक वेंगुर्ल्यापर्यंत दिसतात. खडक शृंखला व समुद्रकिनारा यामध्ये डॉल्फिनच्या झुंडी बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. अर्धा टन वजनाचे सात-आठ फूट लांबीचे डॉल्फिन्स पाहताना छाती दडपून जाते. हा अनुभव मी आठ वर्षांपूर्वी घेतला. 

धामापूर तलाव आणि काठावरील मंदिर (फोटो : गौरव चव्हाण)

धामापूर :
या निसर्गरम्य गावात भगवती मंदिराजवळ एक वैशिट्यपूर्ण सुंदर तलाव आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पाऊस पडला तरी या तळ्यातील पाणी मर्यादेच्या पलीकडे वाढत नाही आणि कितीही दुष्काळ झाला तरी तळ्यातील पाणी आटत नाही. 

वालावलचे श्री लक्ष्मीनारायण मंदिर (फोटो : अनिकेत कोनकर)

लक्ष्मीनारायण मंदिर (फोटो : अनिकेत कोनकर)

श्री लक्ष्मीनारायणवालावल : कर्ली नदीच्या खाडीच्या काठावर वसलेले वालावल हे अत्यंत रमणीय असे गाव आहे. कुपीचा डोंगर, अत्यंत सुंदर अशी कर्ली नदी, समोरचे काळसे बेट, लक्ष्मीनारायणाचे सुंदर मंदिर अशा अनेक वैशिष्टयांमुळे हे गाव पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. या गावातील लोक शिक्षण, संस्कृती, राजकारण, व्यापार, उद्योग अशा सर्व क्षेत्रांमध्ये चमकली आहेत. दशावतारी नाटक मंडळींमुळे सांस्कृतिक क्षेत्रात हे गाव अग्रेसर आहे. येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे प्राचीन व उत्कृष्ट शिल्पाकृती असलेले कोकणी शैलीतील देवालय आहे. या देवालयातील अंतर्गत रचना, लाकडावरील कोरीव काम, अंतर्गत सजावट, बाजूस असलेला नारायण तलाव, त्यात फुललेली कमलपुष्पे पर्यटकांना आकर्षित करतात. मंदिराच्या उत्तरेला वालावल खाडीचे निसर्गसौंदर्य दिसते. 

श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या पाठीमागील नारायण तलाव (फोटो : अनिकेत कोनकर))

सावडाव धबधबा :
कणकवलीपासून १० किलोमीटरवर राष्ट्रीय हमरस्त्यावरच आतील बाजूला १० मिनिटांत चालत जाण्यासारख्या अंतरावर हे ठिकाण आहे. धबधब्यात जाऊन पाण्याखाली उभे राहून मनसोक्त आंघोळ करणे म्हणजे एक पर्वणीच आहे. धबधब्यापुढील डोह उथळ आहे. धबधब्यामागे असलेल्या नैसर्गिक कोनाड्यात बसून पुढे पडणारे धबधब्याचे पाणी पाहणे एक मजेशीर अनुभव असतो; मात्र पाण्यास जोर असला, तर या भानगडीत पडू नये. लांबूनच मजा पाहावी. 

सावडाव धबधबा

नापणे धबधबा :
वैभववाडीपासून १५ किलोमीटरवर हा प्रपात असून, १०० फूट उंचीवरून पडतो. आजूबाजूला जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट असे आल्हाददायक वातावरण इथे असते. धबधब्याच्या पुढे खोल डोह आहे. धबधब्याच्या वरच्या बाजूस नाधवडे येथे महादेवाचे मंदिर आहे. तेथील एका कपारीतून पाण्याचा प्रवाह वर येतो. तीच नदी पुढे नापणे धबधब्यापर्यंत जाते. हा धबधबा १२ महिने पाहता येतो. येथे व्हॅली क्रॉसिंगचा अनुभव घेता येतो. 

नापणे धबधबा

ऐनारी लेणी :
वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गावात डोंगरामध्ये प्राचीन गुंफा असून, त्यामध्ये कोरीव लेणी आहेत. सुमारे १५० वर्षांपूर्वी या गुंफेचा शोध लागला. आत अंधार असल्याने बॅटरी घेऊनच आत जावे. 

घोणसरीचा शिवगड किल्ला : दाजीपूरहून कोकणात उतरताना हा किल्ला लागतो. या किल्ल्याचा इतिहास फारसा ज्ञात नसला, तरी कोकण वाटेवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी झाली असावी. तरीही इतिहासात याचा थोडाफार उल्लेख आहे. इ. स. १७४०मध्ये बलवंतगडाहून (राजापूर, जि. रत्नागिरी) तानाजीराव खानविलकरांनी चिमाजीअप्पांना पत्र लिहिले आहे. त्यातील उल्लेख असा -  ‘बावडा (गगनबावडा, जि. कोल्हापूर), बळवंतगड, सिवगड तिनी जागे आपांचे पदरी घातले आहे. सिवगड तो सालपीच्या उरावर आहे.’ करवीर घराण्याच्या इतिहासातील इ. स. १८००मधील पत्राप्रमाणे, सावंताच्या हल्ल्याच्या शक्यतेने शिवगडावरील चौक्या वाढवून शेजारील घाटवाटा व पाज यांचा बंदोबस्त करण्यास सांगितले आहे. इ. स. १७३९च्या एका पत्रात शिवगडाच्या घाटात चौकीसाठी अमृतराव भगवंत प्रतिनिधी यांचा १५ लोक नेमण्यासंबंधी महत्त्वाचा उल्लेख मिळतो. 

कणकवली : कणकवली हे तालुक्याचे ठिकाण आहे. कणकवली हे नाव ‘कनकवल्ली’ या संस्कृत शब्दापासून तयार झाले आहे. त्याचा अर्थ सुवर्णभूमी असा आहे. कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा अप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेला गोपुरी आश्रम कणकवलीत वागदे येथे गडनदीच्या तीरावर आहे. कृषी क्षेत्रातून रोजगार कसा उपलब्ध करता येईल, हे त्यांनी गोपुरीत कृतीतून सिद्ध करून दाखविले आहे. कणकवली गावामध्ये भालचंद्र महाराज यांची समाधी आहे. त्या समाधिस्थळावर सुंदर मठाची स्थापना करण्यात आली आहे. जवळच्या सांगवे गावात निसर्गरम्य परिसरात श्रीरामेश्वर मंदिर आहे. दहीकाला उत्सवातील दशावतार हे तेथील मुख्य आकर्षण आहे. वागदे गावातील आर्यादुर्गा मंदिरही सुंदर आहे.

घोडेबाव, कुडाळ

कुडाळ :
कुडाळ हे ऐतिहासिक गाव आहे. चालुक्यकालीन ताम्रपट येथे सापडले आहेत. चालुक्य, शिलाहार, विजयनगर, आदिलशाही, शिवाजी महाराज, खेम सावंत व अखेर ब्रिटिश अशा अनेक राजवटी या ठिकाणी होऊन गेल्या. येथे शिवकालीन ‘घोडेबाव’ नावाची विहीर असून, तेथे घोडे पाणी पित असत. शिवाजी महाराजांच्या काळात कुडाळ-सावंतवाडी हा कोकण पट्टा तळकोकण म्हणून ओळखला जात असे. हा तळकोकण इतका दुर्गम होता, की तिथे पाण्यासाठी ३० ते ४० किलोमीटर लांब जावे लागत आसे. हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’प्रमाणे योजना राबवली. जागोजागी विहिरी बांधून घेतल्या. घोडेबाव ही विहीर त्यातलीच एक. तिचे महत्त्व मोठे आहे. 

पिंगुळी : कुडाळपासून तीन किलोमीटरवर असलेले हे ठिकाण हस्तकलेसाठी, प्रामुख्याने चित्रकथी या आदिवासी कलेसाठी प्रसिद्ध आहे. बाहुल्यांच्या खेळाच्या माध्यमातून सावल्यांचे खेळ, नाच वगैरे प्रकार आदिवासी ठाकर जमातींकडून येथे दाखविले जातात. ही पारंपरिक कला जतन करण्याचा प्रयत्न चालू आहे. येथे राऊळ महाराजांचा मठ असून, भव्य आवारात अनेक मंदिरे आहेत.

ओरोस : या गावात सिंधुदुर्गनगरी या नावाने जिल्हा मुख्यालयाची नियोजनबद्ध पद्धतीने उभारणी करण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालय असल्याने येथे जिल्हा प्रशासनाची कार्यालये आहेत. ओरोस गाव जुनेच आहे; पण नव्याने उभारलेल्या सिंधुदुर्गनगरीची उभारणी ‘सिडको’ने केली आहे.

कसे जाल सिंधुदुर्गात?
सिंधुदुर्ग जिल्हा रस्ते आणि कोकण रेल्वेमार्गाने जोडलेला आहे. लवकरच चिपी विमानतळ कार्यान्वित होणार आहे. निवास, भोजनासाठी मालवण, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी व बहुतेक सागरकिनाऱ्यांवर चांगली व्यवस्था आहे. 

(या भागातील माहितीसाठी सिंधुदुर्गमध्ये राहिलेले माझे सहकारी मित्र निवृत्त अभियंता श्री. दड्डीकर यांचे सहकार्य झाले. ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे संपादक अनिकेत कोनकर यांच्याकडूनही काही माहिती मिळाली आहे.) 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language