Ad will apear here
Next
‘एनएफएआय’कडे महात्मा गांधी यांच्या दुर्मीळ चित्रफितींचा खजिना
गांधीजींच्या अस्थि विसर्जनासह अनेक ऐतिहासिक घटनांचा समावेश

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थि विसर्जनासाठी घेऊन जाणाऱ्या मद्रास ते रामेश्वरम रेल्वेगाडीच्या प्रवासाचे चित्रीकरण, गांधीजींचा दक्षिण भारत दौरा, हरिजन यात्रा अशा अनेक ऐतिहासिक घटनांचे चित्रीकरण असलेल्या चित्रफितींचा दुर्मीळ खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफएआय) मिळाला आहे. महात्मा गांधी यांच्या अप्रकाशित अशा ३० चित्रफितींचे, जवळपास सहा तासांचे हे फुटेज आहे.    

  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम चित्रफितींसह

‘संपूर्ण जग महात्मा गांधींजींची १५० वी जयंती साजरी करत असताना ‘एनएफएआय’ला लाभलेले हे दुर्मीळ फुटेज म्हणजे अद्भूत खजिना आहे. पॅरामाउंट, वॉर्नर, युनिव्हर्सल, ब्रिटीश मुव्हीटोन, वाडिया मुव्हीटोन इत्यादी अनेक प्रमुख स्टुडिओंनी चित्रित केलेली ३५ मिमी सेल्युलाइड फिल्मवरील हे फुटेज असून, यातील अनेक दृश्ये शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरीचा भाग आहेत; परंतु काही दृश्ये अद्याप अप्रसिद्ध आहेत,’असे ‘एनएफएआय’चे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले.


‘आजच्या काळात सेल्युलाइड स्वरुपात मिळालेले हे ऐतिहासिक कालखंडातील फुटेज म्हणजे एक आश्चर्य आहे. ३५ मिमी फुटेज मास्टर पॉझिटिव्ह स्वरूपात असून, लवकरच याचे डिजिटायझेशन करण्यात येईल, तसेच याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी तज्ज्ञ आणि इतिहासकारांना आमंत्रित करण्याची योजना आहे,’ असेही मगदूम यांनी सांगितले. 


महात्मा गांधींची अस्थी व रक्षा विसर्जनासाठी घेऊन जाणाऱ्या मद्रास ते रामेश्वरम या विशेष रेल्वेगाडीचे अर्ध्या तासाचे चित्रीकरण या संग्रहात आहे. हे अत्यंत दुर्मीळ आणि मौल्यवान चित्रीकरण आहे. तामिळनाडूतील चेट्टीनाड, शिवगंगा, चिदंबरम, मानामदुराई जंक्शन, रामनाड, पुडुकोट्टाई जंक्शन या स्थानकांवर हजारो लोक अश्रुभरल्या डोळ्यांनी महात्मा गांधी यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी वाट पहात उभे असलेले यात दिसतात. महत्त्वाच्या स्थानकांवर ही रेल्वे थांबते आणि लोक दर्शन घेत असतानाची दृश्ये चित्रफितीत दिसतात. 


आणखी एक दुर्मीळ चित्रीकरण यात आहे ते म्हणजे महात्मा गांधी यांचे दुसरे पुत्र मणिलाल गांधी यांचे. ‘महात्मा गांधींचा मुलगा’ असे लिहिलेले कार्ड गळ्यात घातलेल्या मणिलाल गांधी यांची एका विमानतळावरील काही दृश्ये यात आहेत. महात्मा गांधी यांचा दक्षिण भारत दौरा, १९४६ मधील जानेवारी-फेब्रुवारीतील ‘हरिजन यात्रा’, यासह मदुराई येथील मीनाक्षी मंदिर, पलानी, कुंभकोणमला दिलेल्या भेटींचे चित्रीकरण, मद्रास येथे सी. राजगोपालाचारी यांच्यासह दक्षिण भारत प्रचार सभेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यास महात्मा गांधी उपस्थित होते, त्याचेही चित्रण यात पहायला मिळते.  

महाराष्ट्रातील सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी आणि कस्तुरबा वेगवेगळी कामे करत असतानाचीही चित्रफित आहे. यामध्ये महात्मा गांधी मशीनद्वारे शेतात नांगरणी करण्यात, वृक्षारोपण करण्यात आणि रूग्णांची सेवा करण्यात गुंतलेले आहेत. अशी दृश्ये आहेत, तर आश्रमात कस्तुरबा गायीला आहार देत असल्याचे एका दृश्यात दिसते. महात्मा गांधी यांचे त्यांच्या नकळत टिपलेले अनेक क्षणही या चित्रफितींमध्ये आहेत.    

महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी एस. राजपुताना जहाजातून इंग्लंडला गेले, त्या प्रवासाचे संपूर्ण फुटेज आहे. त्यात डेकवर महात्मा सूत कातत आहेत, दुर्बिणीतून समुद्राचा नजारा पाहत आहेत,  मुलांसमवेत खेळताना, हसताना दिसत आहेत, तसेच कॅप्टनसमवेत जहाजाचे सुकाणू हाती धरत आहेत, अशीही दृश्ये या चित्रफितीत आहेत. महात्मा गांधी यांच्या अहमदाबाद, पोरबंदर आणि राजकोट भेटीच्या दृश्यांसह त्यांचे घर, शाळा, त्यांचे नाव दर्शविणारी लायब्ररीतील नोंद याचेही फुटेज आहे. त्यासह त्यांनी महाराष्ट्रातील एका ठिकाणच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वार्षिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती, त्याचेही चित्रण आहे. त्याचबरोबर या चित्रफितींमध्ये त्यांच्या मृत्यूनंतरचे दिवस, त्यांचे रक्ताने माखलेले, त्यावेळची वर्तमानपत्रे, बिर्ला हाऊस, राज घाटावरील अंतिम यात्रा याचेही चित्रण आहे.   

या संग्रहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचीही काही दुर्मीळ दृश्ये असून, हरीपुर कॉंग्रेस अधिवेशनातील सुभाषचंद्र बोस यांचेदेखील फुटेज आहे. तत्कालीन प्रमुख नेते पंडित नेहरू, सरदार पटेल, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद यांचीदेखील दृश्ये यात आहेत. रवींद्रनाथ टागोर यांच्यासमवेत गांधीजींची भेट, ब्रिटन आणि फ्रान्समधील गांधीजींच्या भेटीचे क्षणही यात टिपण्यात आले आहेत. या संग्रहात फ्रंटियर गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान अब्दुल गफर खान यांच्या फक्त आवाजाची दोन रिळे आहेत. महात्मा गांधी यांच्या निधनानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात शोकसभा घेण्यात आली, त्याचेही फुटेज आहे. 

(ही बातमी इंग्रजीतून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi