Ad will apear here
Next
ब्रह्मविद्येचा सोपान - श्रीदत्तभार्गवसंवाद
सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे. असा एक अद्भुत ग्रंथ उपलब्ध आहे, ज्यात गोष्टींद्वारे अध्यात्म साररूपाने प्रकट केलेले आहे. हारितायन ऋषींनी ‘त्रिपुरारहस्य’ या नावाने ‘माहात्म्य खंड’ आणि ‘ज्ञानखंड’ हे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यातील ज्ञानखंडात ‘श्रीदत्तभार्गवसंवाद’ हे प्रकरण येते. विषय समजण्यास कठीण असला, तरी बाळकृष्ण भाऊ जोशी यांनी तो सुलभ गद्य मराठीत आणून आपल्यावर मोठा अनुग्रह केलेला आहे....ज्येष्ठ अनुवादक, साहित्यिक रवींद्र गुर्जर ‘किमया’ या सदरात या वेळी करून देत आहेत या ग्रंथाचा परिचय...
.....
प्राचीन भारतीय ग्रंथ म्हणजे ज्ञानाची भांडारेच आहेत. त्यामध्ये असंख्य विषय येतात. एकेका विषयात पारंगत व्हायचे, तर काही वेळा जन्मही पुरत नाही. गीतेच्या १०व्या अध्यायात (विभूतियोग- श्लोक ३२) भगवान सांगतात, की सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे. वेद, उपनिषदादि अक्षर वाङ्मयात या अध्यात्मविद्येचे विवेचन मिळते. ही विद्या आत्मसात करायची झाली, तर योग्य गुरू मिळाला पाहिजे आणि प्रदीर्घ काळ चिंतन-मनन! ‘अध्यात्म at glance’ किंवा ‘दोन दिवसांत आत्मज्ञान’ असे अभ्यासक्रम अद्याप सुरू झालेले नाहीत.

आपले भाग्य थोर आहे, की असा एक अद्भुत ग्रंथ उपलब्ध आहे, ज्यात गोष्टींद्वारे अध्यात्म साररूपाने प्रकट केलेले आहे. हारितायन ऋषींनी ‘त्रिपुरारहस्य’ या नावाने ‘माहात्म्य खंड’ आणि ‘ज्ञानखंड’ हे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यातील ज्ञानखंडात ‘श्रीदत्तभार्गवसंवाद’ हे प्रकरण येते. विषय समजण्यास कठीण असला, तरी बाळकृष्ण भाऊ जोशी यांनी तो सुलभ गद्य मराठीत आणून आपल्यावर मोठा अनुग्रह केलेला आहे. त्याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. बाळकृष्ण भाऊ जोशी (वैकुंठवास- १९ मार्च १९६५) हे पुण्यातील ज्ञानविलास प्रेस आणि प्रकाश टाइप फाउंड्रीचे संचालक होते. त्यांनी ‘गुहेतील गोष्टी’, ‘इनामदारांचा बाळू’, ‘रासोल्लास’ आणि ‘मारुतीचा ओटा’ ही अन्य पुस्तकेही लिहिली आहेत.

पहिल्या माहात्म्य खंडात त्रिपुरादेवीचा महिमा वर्णन केलेला आहे. त्याचे श्रवण-मनन केल्याने ज्यांना ज्ञानग्रहणाचा अधिकार प्राप्त झाला आहे, अशा जिज्ञासू, मुमुक्षु लोकांसाठी ‘श्रीदत्तभार्गवसंवाद’ या ग्रंथाचे प्रयोजन आहे. श्रद्धापूर्वक आणि एकाग्रतेने त्याचे वाचन केले पाहिजे. श्रीगुरू दत्तात्रेय आणि भार्गव (परशुराम) यांच्यातील हा संवाद आहे. गुरूंचे गुरू भगवान दत्त महाराज स्वत: ज्ञानदान करीत आहेत आणि बुद्धिमान परशुराम तत्त्वजिज्ञासेने ते मन:पूर्वक ग्रहण करीत आहेत.

धर्माने सांगितलेल्या विविध आचारांचा उपयोग काय? चित्तशुद्धी म्हणजे काय? जगत्पदार्थांपासून प्राप्त होणारे सुख खरोखर आहे की आभासात्मक? सद्गुरूंची आवश्यकता आहे काय? ईश्वर आहेच कशावरून? त्याचे वास्तविक स्वरूप काय? तो प्रत्यक्ष भेटतो कसा? आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? वेदान्ती जगताला स्वप्न का म्हणतात? हे जगत् कोणी, केव्हा, का, कशापासून उत्पन्न केले? आत्मज्ञान हा रुक्ष विषय आहे, की त्यातून आनंदाचा अनुभव संभवनीय आहे? कर्मनिष्ठा, ज्ञाननिष्ठा, प्रारब्ध, लोकसंग्रह की लोकत्याग करून अरण्यवास करावा? जगाला खोटे म्हणत व्यवहार तर करायचे, या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे या ग्रंथात निश्चितपणे मिळतात.

पुस्तकाच्या आरंभी बाळाभाऊ जोशींनी लिहिलेली विलक्षण अर्पणपत्रिका बघा -
‘ज्या जीवांच्या हृदयात ‘अहं’ या रूपाने नित्य स्फुरत आहे, जाणिवेच्या रूपाने अधिष्ठित झाला आहे आणि आनंदाच्या रूपाने प्रत्ययास येत आहे; तसेच जो जडचेतनादि नाना आकार धारण करून मी, तू, तो इत्यादी रूपांनी विकास पावला आहे आणि नानाविध द्वंद्वे स्वस्वरूपीच कल्पून द्वैत-विकासाची क्रीडा करीत आहे, असा जो आत्मस्वरूप हृदयस्थ राम, की जो तत्त्वदृष्टीने आकाशासारखा सर्वत: एकीएक घनदाट भरला असताही केवळ भक्तिसुखासाठी वेगळेपणा स्वीकारून आप-आपणासी देवभक्तांच्या क्रीडा चालवतो; त्या शुद्ध चिन्मय परमात्मस्वरूपाला, कार्योचित मीपणाचा आश्रय घेऊन, ही ग्रंथरूप कृती, एक सुंदर पुष्प म्हणून समर्पित करतो.’

अत्यंत संक्षिप्त स्वरूपात सूत्ररूपाने प्रकट झालेली ही ब्रह्मविद्याच आहे. ती सविस्तर समजण्यासाठी ‘श्रीदत्तभार्गवसंवाद’ पुस्तक मुळातूनच वाचले पाहिजे. २१ प्रकरणांमधून केवळ १६६ पानांमध्ये संपूर्ण विवेचन केलेले आहे. ‘पर्वतावर सुचलेले विचार’ या पहिल्या प्रकरणात, प्रथम त्रिपुरादेवीला कसे वंदन केले आहे पाहा : ‘ब्रह्मानंद हे जिचे स्वरूप आहे व जी अमर्याद शुद्ध चैतन्यरूप असून, जगद्रूप अद्भुत चित्र, जी स्वत: आरसा होऊन प्रतिबिंब रूपाने दाखवते, तिला नमस्कार!’ त्यानंतर श्रीदत्तभार्गवांची प्रश्नोत्तरे सुरू होतात. त्यात अनेक कथाभाग येतात आणि त्यातून आध्यात्मिक समस्यांची उकल होते. निवडक उपरदेशरत्नांचा परामर्श येथे घेऊ.

विचार हेच सर्वांचे मूळ असून, ब्रह्मपदाच्या गच्चीवर जाण्यालाही हीच पहिली पायरी आहे. अविचार हेच मोठे मरण आहे. भक्तिपूर्वक, विचारांच्या द्वारे मोक्षप्राप्तीचे लक्ष्य गाठता येते. संतांचा सहवास हे सर्व दु:खांचे निराकरण करणारे आदिकारण आहे. परमार्थाचे फळ प्राप्त होण्यास सत्संग हेच बीज आहे.

पुढे राजपुत्र हेमचूड आणि त्याची पत्नी हेमलेखा यांची कथा येते. हेमलेखेला विषयोपभोगात बिलकुल रस नाही. ती आपल्या पतीला, भासमान जगताचे स्वरूप विशद करून, ज्ञानसंपन्न करते. ‘जर एकच पदार्थ स्थळ व प्रसंग बदलल्याबरोबर सुख व दु:ख दोन्ही उत्पन्न करतो, तर सुखाचे व दु:खाचे निश्चयात्मक स्थान कोठे राहिले? विषययोग सर्वच्या सर्व कोणाला कधी तरी प्राप्त झाले आहेत काय? स्त्रीला गाढ आलिंगन दिल्याने पुरुषाला सुख होते म्हणतात; पण तेथेही अंग अवघडून जाणे हे दु:खच आहे. कामविकाराच्या आवेगाने सर्वांनाच शीण होतो. कामभोगानंतर जे श्रम वाटतात, ते व जड ओझे वाहणाऱ्या पशूचे श्रम, दोन्हीही सारखेच.’

पुढे हेमचूडाला वैराग्य उत्पन्न होऊन, पत्नीला आत्मविषयक अनेक प्रश्न विचारून, त्याला खऱ्या चैतन्यरूपाचे ज्ञान झाले. सर्व वस्तुमात्र त्याला आत्मस्वरूप भासू लागले आणि तो जीवन्मुक्त अवस्थेला जाऊन पोचला. त्यानंतर क्रमाने राजा-राणी, मंत्री, नागरिक हे सर्वच ब्रह्मज्ञानी झाले. एवढेच नव्हे, तर पिंजऱ्यातील पोपट-मैना, अन्य पशु-पक्षीसुद्धा ब्रह्मविद्येच्या गोष्टी करू लागले. सारेच ज्ञानी! श्रद्धा आणि विश्वास यांच्या जोरावर अशक्य त्या गोष्टी शक्य होतात. निष्काम उपासक सर्वभावेकरून परमेश्वराला शरण गेला, की तो (ईश्वर) त्याच्या योगक्षेमाचा भार आपल्यावर घेतो. म्हणजे ‘भक्ताच्या निर्वाहाची सोय नव्हे, तर उपासकाची उपासनामार्गात ‘स्थिती आणि प्रगती’ राखतो,’ आणि सर्व जगताचे अवडंबर जो उत्पन्न करतो व पुन्हा लीन (लय) करतो तोच ईश्वर!

हेमचूडाला मोक्षमार्गावर नेण्यासाठी त्याच्या पत्नीने केलेला उपदेश पुढील प्रकरणांमध्ये सविस्तर आलेला आहे. तो एकाग्रतेने, ध्यानपूर्वक वाचला पाहिजे. नीट न समजल्यास पुन:पुन्हा पारायण केले पाहिजे. बाह्य निरोधाने आत्मा प्राप्त होत नाही. कारण तो सदैव प्राप्तच आहे. पांडित्यामुळे ते परम पद कधीच प्राप्त होत नाही. हे सर्व दृशमय जगत ज्ञान व ज्ञेय या दोनच प्रकारांनी बनले आहे. त्यातील ज्ञान म्हणजे जाणीव हे स्वत:सिद्ध आहे. ते नसेल तर मग काहीच नाही. सर्व प्रमाणांना तेच आधारभूत आहे. त्याला अन्य प्रमाण म्हणून नाही. आपले स्वरूप आपणच सूक्ष्म बुद्धीने जाणून घ्यायचे असते. परमपद मिळण्यासाठी त्याला शोधण्याची स्थाने अशी :

- निद्रा व जागृती यांच्या मध्य अवस्थेमध्ये (झोपताना व उठताना)
- एका वस्तूचा आकार सोडून चित्त दुसऱ्या पदार्थावर जाण्याच्या आधी आणि
- हृदयातून निघालेली वृत्ती पदार्थावर पोहोचावयाची आहे अशी...

ही जी स्थिती असते ती जाणणे. तेच परमपद व तेच आत्मस्वरूप. ते एकदा प्राप्त झाले, की पुन्हा मोहित म्हणून व्हावे लागत नाही. 

आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रूप नाही, रस नाही, गंध-स्पर्श वा शब्दही नाही. तेथे सुख नाही की दु:ख नाही. ते स्वरूप ग्राह्यही नाही व ग्राहकही नाही. तेच या सर्वाला आधार आहे; तेच ही सर्व रूपे नटते. हाच सर्वेश्वर होय. हाच विष्णु, हाच शंकर व हाच ब्रह्मदेव. हा बोध झाला की देहाचे व बाह्य जगाचे पूर्ण विस्मरण होऊन, निर्विकल्प समाधी प्राप्त होते.

हा विषय अवघड आहे. शेकडो ग्रंथांचे सार यात आलेले आहे. आपल्या सुदैवाने हा छोटासा ग्रंथ सहज उपलब्ध आहे. हारितायन ऋषी अखेरीस याच्या श्रवण-पठणाचे फल सांगतात. ‘श्रीदत्तभार्गवसंवाद हा सरळ शुद्ध असून, युक्तिवाद व प्रत्यक्ष अनुभव यांनी भरलेला असल्याने, याच्या अभ्यासकाचा अज्ञानजन्य मोह नि:संशय नष्ट होईल. ग्रंथाचे सतत परिशीलन केल्याने बुद्धीचे जाड्य नाहीसे होऊन विचार उत्पन्न होईल व शेवटी सर्वांतर्यामी आत्म्याचे नि:संदेह ज्ञान होऊन पुरुष (व्यक्ती) सर्व बंधांतून मुक्त होईल.’

रवींद्र गुर्जर
आपणही तसेच कृतार्थ व्हा! 

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi