Ad will apear here
Next
मुंबई पर्यटन : ब्रीच कँडी, कुंबाला हिल, महालक्ष्मी परिसर
ब्रीच कँडी परिसर

‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण मुंबईतील मलबार हिल परिसरात फेरफटका मारला. आजच्या भागात माहिती घेऊ या ब्रीच कँडी, कुंबाला हिल आणि महालक्ष्मी परिसराची...
......
मलबार हिलप्रमाणेच त्याला लागून असलेला कुंबाला हिल परिसर १८० फूट उंचावर आहे. हा भाग मुंबईतील श्रीमंतांच्या वस्तीचा आहे. एका बाजूला ब्रीच कँडी समुद्रकिनारा, त्याला लागून असलेली उद्याने, उत्तुंग टॉवर्स असे दिपवून टाकणारे वैभव येथे आहे. पेडर रोडवर उच्चभ्रू वस्ती आहे. लता मंगेशकरांसह अनेक अभिनेते, राजकीय नेते, उद्योगपतींचे फ्लॅट येथे आहेत. जपान, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, इटली, स्वित्झर्लंड आदी देशांचे वाणिज्य दूतावास, उच्चायुक्त कार्यालये आणि निवासस्थाने येथे आहेत.  

महालक्ष्मी मंदिरमहालक्ष्मी मंदिर : भुलाभाई देसाई मार्गावर पश्चिमेला समुद्राजवळ मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेले महालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर १८३१ मध्ये धाकजी दादाजी या व्यापाऱ्याने बांधले. वरळी बेट मुंबईला जोडताना भराव टाकण्याचे काम चालू असताना येथे तीन देवतांच्या मूर्ती सापडल्या. बहुधा परकीय आक्रमकांपासून बचाव करण्यासाठी या मूर्ती समुद्रात विसर्जित केल्या गेल्या असाव्यात. याबद्दल एक कथा सांगितली जाते. मुंबईचा तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जॉन हॉर्नबी याने मुंबई आणि वरळी ही दोन बेटे समुद्रात भराव करून बांधून काढण्याचा चंग बांधला होता. पूर्वी भरतीच्या वेळेस हे समुद्राचे पाणी पार भायखळ्यापर्यंत पोहोचत असे. त्यामुळे मुंबई बेटातून वरळीकडे जायचे तर होडीशिवाय पर्याय नसायचा. समुद्राचे पाणी जिथून आत घुसायचे त्या भागाला ब्रिटिशांनी ‘दी ग्रेट ब्रीच’ असे नाव दिले होते. 

भरतीच्या वेळी वरळीकडे जाण्यासाठी होडीशिवाय पर्याय नव्हता. ही खाडी भरून काढायचा आणि मुंबई बेटातून थेट वरळी बेटापर्यंत जाता येईल असा गाडीरस्ता करण्याचे हॉर्नबीने ठरवले आणि बांधकाम इंग्लंडच्या कार्यालयाची परवानगी न घेता चालू केले. रामजी शिवजी या ठेकेदारामार्फत हे काम त्याने चालू केले. परंतु समुद्राच्या भरतीच्या वेळी भराव वाहून जायचा. त्यामुळे काम पूर्णत्वास जाईना. रामजी शिवजीला रात्री स्वप्नात देवीचा दृष्टांत झाला. ‘मी माझ्या बहिणींसोबत महासागराच्या तळाशी आहे. तू मला बाहेर काढ आणि मगच तुझा बांध पूर्ण होईल,’ असे तिने सांगितले. रामजीने ही गोष्ट हॉर्नबीच्या कानावर घातली आणि समुद्रात देवीच्या मूर्तींचा शोध घेण्यासाठी परवानगी मागितली. हॉर्नबी असल्या गोष्टींवर विश्वास न ठेवणारा, परंतु कामाची निकड आणि रामजीस नाराज करायला नको, म्हणून त्याने परवानगी दिली. रामाजीने स्थानिक मच्छिमार बंधूंच्या साह्याने समुद्रात जाळी टाकून शोध घेण्यास सुरुवात केली. त्याला स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्या जाळ्यात खरोखरच महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली अशा तीन देवींच्या मूर्ती सापडल्या. रामजी शिवजीने हॉर्नबीला त्या मूर्ती दाखवून त्याचा दृष्टांत खरा झाल्याचे सांगितले आणि या देवींच्या मंदिरासाठी जागा देण्याची विनंती केली. हॉर्नबीनेही सध्याच्या महालक्ष्मी देवळाची जागा मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी दिली व त्या जागी मूर्ती ठेवण्याची परवानगी दिली. 

या परिसरात अनेक धनाढ्य लोक राहतात. अभिनेते, उद्योगपती, गायक आदी अनेक नामवंतांचे येथे वास्तव्य आहे. ही कथा खरी असो वा नसो, मुंबईवर ‘महालक्ष्मी’चा वरदहस्त आहे हे नक्की. 

महालक्ष्मी रेसकोर्स

महालक्ष्मी रेसकोर्स :
हा महालक्ष्मीशेजारील हॉर्स रेसिंग ट्रॅक आहे. महालक्ष्मी फ्लॅट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलदलीच्या प्रदेशात तो तयार केला गेला. २२५ एकरांवर असलेला हा ट्रॅक अंडाकृती असून, त्याची लांबी २४०० मीटर आहे. मुंबईतील उच्चभ्रू वर्गामध्ये पैजेसाठी हा खूप लोकप्रिय आहे. महालक्ष्मी रेसकोर्सचा घोडा रेसिंगचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो आणि तो फेब्रुवारीपर्यंत चालतो. डर्बीचे आयोजन दर वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी केले जाते आणि त्याला शहरातील अनेक चाहते हजर असतात. रेसकोर्स १८८३मध्ये तयार केलेले असून, मेलबर्नमधील काउलफिल्ड रेसकोर्सप्रमाणे समुद्रासमोरील जमिनीवर पसरलेले आहे. ही जागा सर कुस्रो एन. वाडिया यांची होती. महानगरपालिकेकडून रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला परवानगी देण्यात आली आहे. येथे सुमारे पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शासनाला बेटिंगवर करापोटी ५० कोटींचा महसूल मिळतो. रेसच्या हंगामाव्यतिरिक्त नागरिक जॉगिंग ट्रॅक म्हणून याचा वापर करतात. येथील हिवाळीवर विवाह किंवा इतर समारंभ साजरे होत असतात. 

हाजी अली (Photo Credit : A. Savin)

हाजी अली दर्गा :
मुंबईच्या वरळी किनाऱ्याजवळील एका बेटावर हा प्रसिद्ध दर्गा आणि मशीद आहे. हा दर्गा सूफी संत सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या स्मरणार्थ १४३१मध्ये बांधण्यात आला. हाजी अली जगाच्या दौऱ्यावर असताना रशियातील उझबेकिस्तानच्या बुखारा प्रांतातून भारतात येथे पोहोचले होते व येथेच त्यांचे निधन झाले होते. या दर्ग्याला मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायांमध्ये विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे हे मुंबईचे एक महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटनस्थळ आहे. हा दर्गा मुख्य रस्त्यापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर एका छोट्या बेटावर आहे. येथे जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून एक पूल आहे. पुलाची उंची खूपच कमी असून, दोन्ही बाजूंनी समुद्र आहे. ओहोटीच्या वेळी किंवा समुद्राचे पाणी कमी असताना येथे जाता येते. इतर वेळी हा पूल पाण्याखाली गेलेला असतो. दर्गा बेटाच्या ४५०० चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेला आहे. दर्गा आणि मशिदीच्या बाहेरील भिंती मुख्यत्वे पांढऱ्या रंगाच्या आहेत. दर्ग्याजवळ ८५ फूट उंचीचा मनोरा आहे. मशिदीच्या आत पीर हाजी अलींची कबर आहे. ती लाल आणि हिरव्या चादरीने सजलेली असते. कबरीच्या सभोवती चांदीचे नक्षीकाम आहे. मुख्य मंडपात संगमरवरी खांब आहेत. त्याच्यावर रंगीत नक्षीकाम केलेले आहे. तसेच अल्लाहची ९९ नावेही कोरलेली आहेत. 

१९०५ प्रिन्स ट्रायम्फल आर्च

१९०५ प्रिन्स ट्रायम्फल आर्च :
महालक्ष्मी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी परम रामेश्वर मंदिराच्या मागे हा घड्याळाचा एक मनोरा १९०५मध्ये बांधण्यात आला. पूर्वी ब्रिटिश राजवटीत भारतात दोन अधिकृत टाइम झोन होते. एक बॉम्बे स्टँडर्ड टाइम झोन व दुसरा कोलकाता टाइम झोन. तिसरी वेळही होती. ती रेल्वेची वेळ मद्रासच्या वेळेवर (एमटी) प्रमाणित होती. स्वातंत्र्यानंतर सर्वत्र एकच टाइम झोन ठेवण्यात आला. विशेष म्हणजे येथील घड्याळ अजूनही बॉम्बे स्टँडर्ड टाइम दाखवते. 

नॅशनल स्पोर्टस् क्लब

नॅशनल स्पोर्टस् क्लब मुंबई :
या क्लबच्या दिल्ली व मुंबई येथे शाखा आहेत. १९५७मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. इनडोअर खेळांसाठी याची निर्मिती करण्यात आली असून, येथील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये पाच हजार प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. येथे टेनिस, बॅडमिंटन, बिलियर्डस्, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम आणि कुस्ती यांसारख्या खेळांच्या सुविधा आहेत. 

नेहरू तारांगण

नेहरू तारांगण :
वरळी येथील हे खगोलविज्ञान केंद्र तीन मार्च १९७७ रोजी सुरू करण्यात आले. सहा मजली भव्य इमारत असलेले हे केंद्र हाजी अलीच्या पुढे आहे. त्याला लागूनच घुमटाकार इमारत आहे. १९७५मध्ये पी. जी. पटेल यांनी जर्मनीहून कार्ल-झाइस कंपनीचा तारांगणाचा प्रोजेक्टर विकत आणला. तो सीमाशुल्क विभागात अडकला व तो रजनी पटेल यांनी सोडवून घेतला. त्याचा उपयोग करून नेहरू सेंटरतर्फे शैक्षणिक उपक्रम म्हणून तारांगण सुरू करावे असे ठरले. टीआयएफआर, तेथे असलेले डॉ. जयंत नारळीकर, डॉ. कुमार चित्रे आणि डॉ. बालू यांनी त्यासाठी मदत केली. प्रख्यात वास्तुविशारद काद्री यांनी या वास्तूचे संकल्पचित्र तयार केले. सौर शास्त्रज्ञ डॉ. अरविंद भटनागर यांची संचालक म्हणून तेथे नियुक्ती करण्यात आली. तीन मार्च १९७७ रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते तारांगणाचे उद्घाटन झाले. ‘नियतीबरोबर भेट’ (Tryst with Destiny) या कार्यक्रमाने तारांगणाची सुरुवात झाली. 

तारांगणाच्या घुमटात ६०० लोक बसू शकतात. ‘डिजिस्टार-थ्री’ या नवीन तंत्रज्ञानाद्वारे आठ कम्प्युटर्सच्या साह्याने अंतराळातील वैविध्यपूर्ण घडामोडींचे दर्शन सहा प्रोजेक्टरच्या मदतीने घुमटावर दाखविले जाते. खास बनावटीच्या खुर्चीमुळे जवळजवळ झोपल्यासारख्या स्थितीत जाऊन घुमटाकडे बघता येते. तारांगणाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर सर्वप्रथम ग्रहमालेची प्रतिकृती दृष्टीस पडते. चंद्र व मंगळाच्या पृष्ठभागावरील दृश्ये आणि अनेक संशोधकांची तैलचित्रे तेथे लावण्यात आली आहेत. वेगवेगळ्या ग्रहांवर तुमचे वजन किती असेल, हे दाखवणारे वजनकाटे आकर्षण ठरतात. तारांगणातर्फे दर रविवारी सायंकाळी सात ते आठ या वेळेत दुर्बिणीतून विनामूल्य आकाशदर्शन घडविले जाते. तारांगणाच्या वतीने खगोलीय घटना सर्वसामान्य लोकांना दाखवण्याची सोय केली जाते. सूर्य-चंद्राची ग्रहणे, गुरू-शनी ग्रहांचे निरीक्षण, उल्कावर्षाव या व अशा अनेक घटनांच्या वेळी नेहरू तारांगण विशेष सोय करते. तारांगण सुरू झाल्यापासून एक कोटी ३० लाखांहून अधिक लोकांनी येथे भेट दिली आहे. येथे विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ संशोधकांची व्याख्याने व कार्यशाळा सतत भरविल्या जातात. मुलांच्यात जिज्ञासू वृत्ती जागृत व्हावी म्हणून प्रयत्न केले जातात. येथे मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये मंगळवार ते रविवार दररोज चार कार्यक्रम सादर केले जातात. तारांगण सोमवारी बंद असते. 

ऑगस्ट क्रांती मैदान

ऑगस्ट क्रांती मैदान/गोवालिया टँक :
हे मध्य मुंबईतील एक मैदान आहे. त्यात महात्मा गांधींनी येथे आठ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांविरुद्ध ‘छोडो भारत’ आंदोलन छेडले. ब्रिटिशांनी त्वरित भारत सोडून जावे, अन्यथा जनआंदोलन केले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. तिथून ही चळवळ देशभर पसरली.

गोवालिया टँक सुरुवातीला गायींना आंघोळ घाण्यासाठी वापरला जात असे. गो म्हणजे गाय व वालिया म्हणजे पालक यावरून हे नाव पडले आणि गांधीजींच्या चळवळीमुळे ‘ऑगस्ट क्रांती मैदान’ हे नाव पडले. तेथे अस्तित्वात असलेले हे मैदान टाकीवर बांधले गेले होते. ते अजूनही भूमिगत आहे. गोवालिया टँक हे एके काळी प्रमुख ट्राम टर्मिनस होते. हे आता खेळाचे लोकप्रिय मैदान आहे. क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असला, रतरीही पावसाळ्याचा हंगाम मुख्यत: फुटबॉल आणि व्हॉलीबॉलसाठी असतो. मैदानात एक मोठे क्रीडांगण आणि लहान मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे उद्यान आहे. येथे जाण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील सर्वांत जवळचे उपनगरीय रेल्वे स्थानक म्हणजे ग्रँट रोड. 

मणिभवन

मणिभवन :
या ऐतिहासिक वास्तूमध्ये महात्मा गांधीजी दीर्घ काळ वास्तव्य करीत होते आणि तेथूनच त्यांनी भारताची स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. १९१७ ते १९३४ या कालावधीमध्ये महात्माजी येथे वास्तव्यास होते. त्यांचे मित्र रजाशंकर जगजीवन जव्हेरी यांची ही इमारत होती. ही इमारत मुंबईच्या गावदेवी भागात लेबर्नम मार्गावर आहे. असहकार आंदोलन, दांडी यात्रा, तसेच सर्वसामान्यांशी संबंधित अशा स्वातंत्र्यलढ्यातील अनेक गोष्टींशी या ठिकाणाचा संबंध होता. या ठिकाणी स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेत्यांचे सतत येणे-जाणे होते. काँग्रेसमधील उच्चपदस्थांच्या बैठका येथेच होत असत. अनेक महत्त्वाचे निर्णय या इमारतीमध्ये घेतले गेले. याच इमारतीमध्ये महात्माजी कापूस पिंजणे, तसेच चरख्यावर सूत काढणे या गोष्टी स्वतः शिकले आणि नंतर त्याचा प्रसारही त्यांनी केला. १९१९मध्ये जेव्हा त्यांची तब्येत बिघडली, तेव्हा त्यांनी कस्तुरबा गांधींच्या विनंतीवरून येथूनच बकरीचे दूध पिण्यास सुरुवात केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा होता. या सभागृहात देशातील बड्या नेत्यांचा सहभाग असलेल्या अनेक बैठका घेण्यात आल्या. गांधीजींनी येथूनच इंग्रजी ‘यंग इंडिया’ आणि गुजराती ‘नवजीवन’ हे साप्ताहिक सुरू केले. येथे वास्तव्यास असताना त्यांनी अनेक उपवास केले आणि साथीदारांशी सल्लामसलतही केली. चार जानेवारी १९३२ रोजी सकाळी गांधीजींना मणिभवनच्या छतावरील तंबूतून अटक करण्यात आली. २७ आणि २८ जून १९३४ या दिवशी काँग्रेस कार्यकारिणीची आणखी एक बैठक येथे झाली. ही बैठक महात्मा गांधींची या ठिकाणची शेवटची बैठक ठरली. 

मणिभवनच्या तळमजल्यावर एक ग्रंथालय आहे. त्यात महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांशी संबंधित सुमारे ५० हजार पुस्तके आहेत. पहिल्या मजल्याच्या पायऱ्यांवर चढताना महात्मा गांधींच्या जीवनावरील अनेक चित्रे भिंतीवर दिसून येतात. पहिल्या मजल्यावर एक छोटेसे सभागृह आहे. 

दुसऱ्या मजल्यावर महात्मा गांधी बसायचे. त्या जागेवर असलेल्या काचगृहामध्ये आता त्यांच्या वापरातील एक चरखा, एक टेलिफोन आणि हातात धरून वर घेण्याचा लहान पंखा, तसेच गादी आणि उशी आहे. याखेरीज मोठ्या हॉलमध्ये एक प्रदर्शन आहे. त्यात महात्मा गांधींच्या जीवनाशी संबंधित विविध कार्यक्रमांची टेबल मांडलेली आहेत. त्याच खोलीत रवींद्रनाथ टागोर यांना लिहिलेले पत्रही आहे. त्यापुढे सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलेले एक पत्रही पाहायला मिळते. कस्तुरबा गांधी यांनी केलेले सूतही येथे ठेवण्यात आले आहे. 

डबेवाले : मुंबईचे डबेवाले जगप्रसिद्ध आहेत. १८९०मध्ये चाकरमान्यांसाठी महादेव हवाजी बच्चे यांनी सुमारे शंभर माणसांसह दुपारच्या भोजनाच्या डब्यांची वितरण सेवा सुरू केली. (त्यांना डब्बावाला किंवा डाब्बावल्ला असेही म्हटले जाते. पूर्वी टिफिनवाला असेही म्हणत.) हे डबे देणे आणि परत नेणे हे ‘आदर्श नेटवर्क’ समजले जाते. मुंबईत काम करणाऱ्या लोकांना घर आणि रेस्टॉरंट्समधून गरम जेवणाचा पुरवठा याद्वारे केला जातो. डबे सकाळी उचलले जातात. प्रामुख्याने सायकली आणि रेल्वेगाड्यांद्वारे डबे दिले जातात आणि दुपारी रिकामे परत येतात. मुंबईतील भोजन पुरवठादारदेखील या नेटवर्कचा वापर करतात. बॉलिवूड चित्रपट उद्योगातही डबेवाल्यांमार्फत जेवण पुरविले जाते. १९३०मध्ये डबेवाल्यांनी अनौपचारिकपणे एकत्र येण्याचा प्रयत्न केला. नंतर १९५६मध्ये नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स ट्रस्टच्या नावाखाली चॅरिटेबल ट्रस्टची नोंदणी झाली. भुलाभाई देसाई मार्ग, लाला लजपतराय मार्ग, केशवराव खडे मार्ग व ताडदेव रोड ज्या चौकात एकत्र येतात तेथे डबेवाल्याचा पुतळा उभारण्यात आला आहे. 

कसे जाल ब्रीच कँडी परिसरात?
मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी व ग्रँट रोड या स्टेशनला उतरून, तसेच बेस्ट बसमधून येथे येता येते. टॅक्सी सेवाही उपलब्ध आहे. 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

ब्रीच कँडी सूर्यास्त
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi