Ad will apear here
Next
समतोल आणि दूरदृष्टीचा अर्थसंकल्प
‘कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीज’ची प्रतिक्रिया

पुणे : ‘एमएसएमई सेक्टरव्दारे रोजगार निर्मितीला चालना देणे, ई-व्हेइकलच्या माध्यमातून वाहन उद्योगाला  प्रोत्साहन, महिलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार, स्टार्टअपला गती देण्यासाठी स्वतंत्र वाहिनी सुरू  करण्याची घोषणा अशा वैविध्यपूर्ण घटकांचा समावेश असेलला अर्थसंकल्प हा विकासाचा समतोल साधणारा आणि दूरदृष्टीचा आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘सीआयआय’ अर्थात ‘कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीज’च्या सदस्यांनी व्यक्त केली. 

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला. पाच ट्रिलियन डाॅलरची अर्थव्यवस्था बनविणे, एक देश एक ग्रीडव्दारे सर्वांना वीज पुरवठा करणे, इलेक्ट्रीक वाहनांना विशेष सुट आणि परकीय गुंतवणूकीला चालना देण्याऱ्या  या अर्थसंकल्पाचे सीआयआयचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी स्वागत केले. 

दीर्घकालीन विकास डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचे मत सदस्यांनी या वेळी व्यक्त केले. ‘स्टार्टअपसाठी स्वतंत्र टीव्ही चॅनेलमुळे नवउद्योजकांना नव्या संकल्पना विकसित करता येतील. नव्या संशोधनाला चालना मिळेल. हा अत्यंत उत्तम निर्णय आहे,’ असेही सीआयआयच्या सदस्यांनी आवर्जून नमूद केले. चाळीस कंपन्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी,तसेच पदाधिकारी उपस्थित होते. 

‘सीआयआय’चे चेअरमन आणि जाॅन्सन कंट्रोल्स इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बापट म्हणाले, ‘लहान उद्योगांसहीत रोजगाराला चालना देणारा, तसेच अधिकाधिक रोजगार निर्मिती करणारा हा अर्थसंकल्प आहे. विशेष म्हणजे महिला केंद्रीतही आहे’.

‘सीआयआय’चे व्हाईस चेअरमन आणि झमिल स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टर अलकेश राॅय म्हणाले, ‘सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा हा अर्थसंकल्प आहे. पुढील पाच वर्षात करावयाच्या विकासाच्या योजनांना प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प असून, दीर्घकालीन फायद्यांचा विचार त्यामध्ये केला आहे. अनेक सेवासुविधांमुळे व्यापारवृद्धी चांगली होऊ शकते. केंद्रात एक मजबूत सरकार आले असून, पुढच्या पाच वर्षात टप्पाटप्याने करायच्या विकासाच्या दृष्टीने त्यात पावले उचलली आहेत’.

‘सीआयआय’च्या कर समितीचे समन्वयक आणि इटाॅनचे चीफ फायनान्शिअल आॅफिसर सचित नायक म्हणाले, ‘परकीय गुंतवणुकीला अधिक प्राधान्य दिल्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांनाही संधी मिळेल. रेल्वेसाठी पीपीपी योजनेमुळेही रोजगार उपलब्ध होतील’.

‘सीआयआय’चे समन्वयक आणि महिंद्रा सीआयईचे चीफ फायनान्शिअल आॅफीसर के. जयप्रकाश म्हणाले, ‘आॅटोमोटीव्ह क्षेत्रातही आजच्या अर्थसंकल्पामुळे भविष्यात चांगले बदल पाहायला मिळतील. इलेक्ट्रिक  वाहनाची प्रत्येक नागरिकाला प्रतिक्षा आहे. त्यामुळे या उद्योगाला जागतिक बाजारपेठही मिळेल. मात्र, ही वाहने प्रत्यक्ष रस्त्यावरून धावण्यासाठी सरकारने वेगाने पावले उचलली पाहिजेत. जीएसटीमध्येही काही सुधारणा करण्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सुचविल्याने व्यापाराच्या दृष्टीने हा सकारात्मक बदल असेल’.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language