Ad will apear here
Next
सिंधुदुर्गात फेरफटका – भाग एक
‘करू या देशाटन’ सदरात आजपासून कोकणाची सैर करू या. सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून...
.............
सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती एक मे १९८१ रोजी झाली. सिंधुदुर्ग परिसराचा पौराणिक कथांत आणि इतिहासात उल्लेख आढळतो. रामायण व महाभारतामध्येही या भागाचा उल्लेख आहे. नेरूर येथे सापडलेल्या शिलालेखावरून हा भाग चालुक्य राजवटीखाली होता असे दिसून येते. येथे शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतर या भागाला खूप महत्त्व आले. शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवर उरणपासून सिंधुदुर्गापर्यंत सागरी किल्ल्यांची शृंखला निर्माण केली. त्यामुळे ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच यांना पश्चिमेकडून अरबी समुद्रातून लष्कर भारतात घुसवता आले नाही. शिवाजी महाराजांचे नौदलप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे, त्यांचे वंशज आणि सरदार धुळुप यांनी अरबी समुद्रावर जणू अधिराज्यच केले. त्यामुळे ब्रिटिश व फ्रेंच पूर्वेकडून भारतात घुसले. आंबा, फणस, कोकम, नारळ, काजू, मासे व पर्यटन ही येथील उत्पन्नाचे साधने. हा जिल्हा बॉक्साइट, मँगनीज या खनिजांनी समृद्ध आहे. 

देवगडमधील हापूस आंबे निर्यात होतात. सिंधुदुर्गाकडून उत्तरेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपर्यंत हापूस आंबे पिकवले जातात. या संपूर्ण कोकणातील हापूस आंब्यांना आता भौगोलिक निर्देशन मिळाले आहे. कारण येथील भौगोलिक परिस्थिती, हवामान आणि पारंपरिक उत्पादन पद्धती या सगळ्यामुळे येथील आंब्यांना वैशिष्ट्यपूर्ण चव आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी

सिंधुदुर्ग किल्ला :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रथम स्थान म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला होय. परकीय आक्रमणापासून समुद्रमार्गे असणारा धोका लक्षात घेऊन कोकणात कुलाब्यापासून गोव्यापर्यंत महाराजांनी अनेक किल्ले बांधले. त्यातील सिंधुदुर्ग हा खूप महत्त्वाचा समजाला जातो. २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवणजवळील कुरटे नावाच्या बेटावर त्यांनी बांधकामाला सुरुवात केली आणि तीन वर्षांत हा किल्ला बांधून पूर्ण झाला. किल्ल्याच्या कामावर १०० पोर्तुगीज, ५०० गवंडी, २०० लोहार व तीन हजार कामगार काम करीत होते. या किल्ल्याच्या पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून, या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले. किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले असे सांगितले जाते. नेर्न नावाचा एक ब्रिटिश व्यापारी या वेळी मालवण येथे आला होता. त्याने कसले काम चालू आहे याची खूप चौकशी करायचा प्रयत्न केला; पण त्याला थांगपत्ता लागला नाही. ४८ एकर क्षेत्रावर बांधलेल्या या किल्ल्याला तीन किलोमीटर लांबीची तटबंदी असून, माथा १२ फूट रुंद आहे. 

सिंधुदुर्गतटबंदीची साधारण उंची ३० ते ५० फूट आहे. चार मच्छिमारांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी योग्य जागा शोधून काढली. त्यांना गावे इनाम देण्यात आली. आता किल्ल्यावरील बांधकामे नष्ट झाली आहेत. तटबंदीला लागून पहारेकऱ्यांच्या खोल्या आहेत. तसेच स्वच्छतागृहेही आहेत. किल्ल्यात राजाराम महाराजांनी बांधलेले श्रीशिवराजेश्वर मंदिर असून, आणखी एक जरीमरीचेही मंदिर आहे. महाराजांच्या मूर्तीचे (या मूर्तीला दाढी नाही) दर्शन फक्त सकाळी सात वाजता पूजेच्या वेळी होते. किल्ल्याच्या मागील बाजूस एक छोटे खिडकीवजा द्वार आहे. येथून राजस्त्रियांसाठी समुद्रस्नानाची व्यवस्था होती. या ठिकाणाला ‘राणीची वेळा’ म्हणतात. किल्ल्यावर पूर्वी दोन फांद्या असलेले नारळाचे झाड होते. मध्यंतरी वीज पडून ते नष्ट झाले. नारळाच्या झाडाला कधीही फांद्या फुटत नसल्याने ते आश्चर्य होते. 

भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गांची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजीमहाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन त्यांनी समुद्रकिनाऱ्यांची पाहणी केली. आता किल्ल्याच्या दक्षिण बाजूला स्कूबा डायव्हिंगची सुविधा आहे. त्यामुळे सागरतळाचे सौंदर्य पाहणे शक्य झाले आहे. (सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मालवण रॉक गार्डन

मालवण :
मालवण नावाची व्युत्पत्ती अनेक प्रकारे सांगितली जाते. काहींच्या मते माडवनपासून मालवण, तर काहींच्या मते ‘मा’ म्हणजे आगर व लवण म्हणजे मीठ व त्यापासून मालवण. शिवाजी महाराजांनी १६५८मध्ये मालवण घेतले व नंतर जवळ सिंधुदुर्ग किल्ला बांधला. मालवण हे एक सांस्कृतिक गाव आहे. येथे नाटके, साहित्य संमेलने भरविली जातात. मालवण हे पर्यटकांचे किनारपट्टीवरील आवडते ठिकाण. मालवणी भाषा, सोलकढी आणि मासे खूप प्रसिद्ध आहेत. मालवणमध्ये मोठा मत्स्यबाजार भरतो. तेथे पाच ते सहा फूट लांबीचे मासेही विक्रीस येतात. मालवण हे पर्यटकांसाठी खवय्यांचे गाव समजले जाते. मालवणचे रॉक गार्डन आणि ज्योतिषविशारद ‘कालनिर्णय’कार जयंत साळगावकर यांनी बांधलेले गणपती मंदिर खूपच बघण्यासारखे आहे. 

साळगावकर गणेश मंदिरातील मूर्ती

तारकर्ली :
मालवणपासून सात किलोमीटरवर तारकर्लीचा किनारा आहे. येथे ‘एमटीडीसी’चे रिसॉर्ट आहे. अनेक हॉटेल्स, दुकाने यांनी हे ठिकाण गजबजलेले आहे. लांबच लांब स्वच्छ समुद्रकिनारा पाहून मन आनंदित होते. येथे वॉटर स्पोर्टस् उपलब्ध आहे. स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, पॅडलबोट, बोटस्कूटर, पॅरासेलिंग असे विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत. ‘एमटीडीसी’ने तर येथे रात्रीच्या मुक्कामासाठी चक्क आरामदायी हाउसबोट उपलब्ध करून दिल्या आहेत. 

तारकर्ली येथील एमटीडीसी रिसॉर्टचे आवार

देवबाग :
मालवणपासून १० किलोमीटरवर हा अतिशय सुंदर, स्वच्छ असा समुद्रकिनारा आहे. येथे अनेक घरांतून पर्यटकांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था केली जाते. डॉल्फिनचे दर्शन येथे हमखास होते. येथून वालावलपर्यंत बोटीची सैर घडविली जाते. 

तारकर्लीचा समुद्रकिनारा

तोंडवळी :
मालवणच्या उत्तरेला १९ किलोमीटरवर हा मऊ, शुभ्र वाळूचा एक सुंदर समुद्रकिनारा आहे. मालवण-आचरा रस्त्यावर हे गाव आहे. तोंडवळी हे गाव देव व्याघ्रेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येथे एक गुंफा आहे. १० ते १२ पायऱ्या चढून गेले, की समोर आयताकृती उभी कोरलेली चौकट दिसते. आतील बाजूला गुंफा आहे. तोंडवळी किनाऱ्यावर फारशी वर्दळ नसते. येथे मंद सागरी हवा सतत वाहत असते. त्यामुळे वातावरण खूप छान असते.

तारकर्ली येथील एमटीडीसी रिसॉर्टमधील एसी बांबू हाउसबोट

आंगणेवाडी :
मालवणपासून १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसुरे या गावातील बारा वाड्यांपैकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे; पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गावच असल्याचा समज सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. श्री भराडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्त्व प्राप्त झालेले आहे. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी अप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो. या देवीचा जत्रोत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होतो. 

कुणकेश्वर मंदिर

कुणकेश्वर :
हे मंदिर साधारण ११व्या शतकात यादव राजांनी बांधले असावे. याबाबत आणखी एक कथा प्रचलित आहे. ती म्हणजे, एक परदेशी व्यापारी (बहुधा अरब देशातील) त्याचे जहाज भरकटल्याने या बाजूला आला. त्याला रात्रीच्या अंधारात दिव्याचा उजेड दिसला. त्याला देव भेटल्यासारखे वाटले व त्याने प्रार्थना केली, ‘मला वाचविलेस तर मी तुझे मंदिर बांधेन.’ त्या दिशेने तो वादळ शमल्यावर आला. त्याला येथे शिवमंदिर दिसले. त्याने तेथेच सुंदर मंदिर बांधले; पण मूर्तिपूजा हे त्याच्या धर्माविरुद्ध असल्याने लोक आपल्याला ठार मारतील या कल्पनेने मंदिराच्या शिखरावरून उडी मारून त्याने आत्महत्या केली असे सांगितले जाते. त्याची येथे कबरही आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी अमात्य बावडेकरांमार्फत केल्याचे दाखले मिळतात. 

कुणकेश्वर किनारा

मंदिराची रचना थोडी दाक्षिणात्य पद्धतीची आहे. मंदिराला समुद्राच्या बाजूला संरक्षक भिंत आहे. मंदिराच्या आवारात गणपती, जोगेश्वरी, भैरव, नारायण, मंडलिक इत्यादी मंदिरे आहेत. हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. (कुणकेश्वर मंदिराविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

चांदेलवाडी : कुणकेश्वरजवळ चांदेलवाडी येथे एक गुंफा असून, यामध्ये नऊ पुरुष व महिलांचे दगडी मुखवटे सापडले आहेत. स्त्रियांच्या कानात रिंग व कपाळावर बिंदी, तर पुरुषाचे केस बांधलेले आहेत

विजयदुर्ग

विजयदुर्ग :
हा किल्ला शिलाहार घराण्यातील राजा भोज याने सन ११९५ ते १२०० या कालावधीत बांधला. भोज राजाने कोकणात १६ किल्ले बांधले होते. त्या वेळी हा किल्ला ‘घेरिया’ या नावाने ओळखला जात होता. कालांतराने हा किल्ला यादवांनी ताब्यात घेतला. नंतर तो विजयनगरच्या राजाच्या ताब्यात गेला. त्यानंतर बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेला. सन १४९० ते १५२६ या काळात बहामनी राज्याच्या विघटनानंतर हा किल्ला विजापूरकरांकडे आला. तो १२५ वर्षे त्यांच्या अमलाखाली होता. सन १६५३ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्यात अनेक सुधारणा केल्या. शिवाजी महाराजांनी याला विजयदुर्ग असे नाव दिले. किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे असून, त्रिस्तरीय तटबंदी आहे. किल्ल्याला २० बुरुज असून, घोड्यांच्या पागाही आहेत. 

विजयदुर्गावर १८ ऑगस्ट १८६८ रोजी फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ पेरी जोन्सन याने हेलियम वायूचा शोध लावला. त्या दिवशी कोकण किनाऱ्यावर विजयदुर्ग येथे खग्रास ग्रहण होते, हे लक्षात घेऊन पेरी जोन्सन तेथे गेले. ग्रहण निरीक्षणाच्या वेळी त्यांना सूर्याभोवती एका नवीन वायूचा शोध लागला, तोच हेलियम वायू. जेथे साहेबाने दुर्बीण लावली होती, त्या जागेला ‘साहेबाची सीट’ म्हणून संबोधले जाते. विजयदुर्ग हा मालवणजवळचाच एक देखणा जलदुर्ग आहे. जवळच सरखेल धुळूपांच्या घरात त्यांच्या वापरलेल्या तलवारी बघण्यासारख्या आहेत. तसेच शिसम व हस्तिदंत यांचा वापर करून तयार केलेला सुंदर देव्हारा आहे. धुळुपांनी २५० वर्षांपूर्वीची काही चित्रेही जतन करून ठेवली आहेत. किल्ल्याला तीन बाजूंनी समुद्र आहे. जमिनीच्या बाजूला पूर्वी खंदक होता. तो आता बुजला आहे. समुद्राकडून हा किल्ला फारच छान दिसतो. सिंधुदुर्ग भेटीत कुणकेश्वर, देवगडमार्गे येथे येता येते किंवा राजापूरमार्गेही जाता येते. (विजयदुर्ग किल्ल्याबद्दलचा सविस्तर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

देवगड किनारा

देवगड :
हे स्थळ हापूस आंब्यासाठी जगात प्रसिद्ध आहे. आंबा भारतात पुरातन काळापासून आहे; पण अफोन्सो दी अल्बुकर्क या पोर्तुगीज दर्यावर्दीने ही जात भारतात आणली. अल्फान्सो या नावाचा हापूस हा अपभ्रंश आहे. देवगडचे माजी आमदार दिवंगत गोगटे यांनी या आंब्याच्या कलमांचा प्रसार केला व त्याचे व्यापारी महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. देवगड हे बंदर आहे. तसेच येथे किल्लाही आहे. त्याची तटबंदी बऱ्यापैकी दिसून येते. किल्ल्यातील इमारती नष्ट झाल्या आहेत. येथील डोंगरावर पवन ऊर्जा प्रकल्प साकारला आहे. 

वाडा : देवगडहून विजयदुर्गाकडे जाताना खाडी ओलांडली की वाडा गाव लागते. येथे निसर्गरम्य परिसरात विमलेश्वराचे मंदिर आहे. येथे काही वीरगळ (योद्ध्यांची स्मारके) आहेत. तसेच कालभैरव गुंफा आहे. येथे गणपतीची सुरेख मूर्ती आहे. तसेच मुख्य द्वाराच्या बाजूसच मोठी हत्तीशिल्पे आहेत. पावसाळ्यात येथील झऱ्यात गरम पाणी वाहू लागते. नेने नावाच्या सत्पुरुषाची येथे समाधी आहे. 

गिर्ये येथील रामेश्वर मंदिर

गिर्ये :
वाघोटण नदीच्या खाडीमध्ये डोंगराच्या पायथ्याशी सरखेल कान्होजी आंग्रे यांनी गोदी बांधली आहे. गोदी अर्धवर्तुळाकार असून, ३५५ फूट लांब व २२७ फूट रुंद आहे. सरदार धुळूप यांनी त्यांच्या कारकिर्दीत या गोदीचा विस्तार केला. येथे रामेश्वराचे कोकणी पद्धतीचे मंदिरही आहे. 

भगवंतगड : अमात्य बावडेकरांनी सन १७०१मध्ये छत्रपती राजरा महाराजांच्या आज्ञेवरून वायंगणी गावाजवळ हा किल्ला बांधला. येथे पायवाटेनेच जावे लागते. 

भरतगड : सन १६८०मध्ये मसुरे गावाजवळ सावंतवाडीचे राजे फोंड सावंत यांनी हा किल्ला बांधला. येथे बुरुजाचे अवशेष व काही तोफाही दिसून येतात. आचरा, मालवण, विजयदुर्ग मार्गावर वायंगणीच्या पुढे हा गड असून, येथे सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे रामेश्वर मंदिर आहे. कोकणी पद्धतीचे हे मंदिर असून, विविध देवतांची शिल्पे आहेत. येथे शके ५८४मधील एक शिलालेखही आहे. या मंदिर परिसरातच सुसज्ज ग्रंथालय आहे. 

रामगड : कणकवली मार्गावर रामगड हा किल्ला आहे. या किल्ल्याला १५ बुरुज आहेत. येथे सात तोफा, दारू कोठारे आहेत. 

सिद्धगड : रामगडजवळच हा छोटा किल्ला असून, कोलारवाडीकडून तेथे जाता येते. 

कसे जाल सिंधुदुर्गात?
कणकवली, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी येथे कोकण रेल्वे स्थानके आहेत. गगनबावडा, फोंडा, आंबोलीमार्गे कोकणात येण्यासाठी घाट आहेत. काही ठिकाणे मुंबई-गोवा महामार्गावर आहेत. जवळचा विमानतळ कोल्हापूर आणि गोव्यात पणजी. कुडाळजवळ चिपी येथे नव्याने विमानतळ बांधला असून, लवकरच कार्यान्वित होईल. मालवण, कणकवली, तारकर्ली, कुडाळ येथे राहण्याची, जेवणाची चांगली सोय आहे. पावसाळा सोडून वर्षभर कधीही जाण्यास योग्य. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language