Ad will apear here
Next
दिवाळी अंकांची वैभवशाली परंपरा
मराठीतल्या दिवाळी अंकांच्या परंपरेला यंदा १०८ वर्षे पूर्ण होत आहेत. आज दिवाळीचा सण दिवाळी अंकांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. संस्कृतीत इतके अढळ स्थान लाभलेल्या या दिवाळी अंकांच्या वैभवशाली परंपरेचा आढावा घेणारा ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस यांचा हा लेख...
.............
मराठी माणसाला आवडणारा साहित्यउत्सव म्हणजे केवळ साहित्य संमेलने नसून, दर वर्षी दिवाळीत निघणारे दिवाळी अंक हेच आहेत! कारण साहित्य संमेलनांना तीस लाख लोक उपस्थित राहत असतील, तर दिवाळी अंक कोट्यवधी साहित्यप्रेमी मराठी वाचकांपर्यंत पोचतात. विशेषत: ज्यांना साहित्य संमेलनांना उपस्थित राहता येत नाही, त्यांच्यासाठी दिवाळी अंक हीच मोठी पर्वणी असते. ऐन दिवाळीच्या दिवसातील लाडू, चकली, करंजी, चिवडा यांचा आस्वाद घेता घेता दिवाळी अंकातील आपल्या आवडत्या लेखकाची कथा वाचणे यापेक्षा दुसरे स्वर्गसुख कोणते? 

१९व्या शतकात सुरू झालेल्या ‘मासिक मनोरंजन’तर्फे १९०९ मध्ये पहिला दिवाळी अंक निघाला, त्याला यंदा १०८ वर्षे पूर्ण होत आहेत. या अंकाचे काम तेव्हा काशिनाथ रघुनाथ आजगावकर करत होते. त्यांना बंगाली भाषा येत असल्याने त्यांनी बंगाली वाटणारे मित्र असे आडनाव मुद्दाम घेतले. का. र. मित्र यांना दिवाळी अंकाची कल्पनाही बंगाली संस्कृतीतूनच सुचली. तसेच इंग्रजी मासिकांचा ख्रिसमस स्पेशल अंक असतो, तसा आपण दिवाळी अंक काढायला हरकत नाही असेही त्यांना वाटले. त्यातूनच १९०९मधला मनोरंजन मासिकाचा पहिला दिवाळी अंक निघाला! ही परंपरा या मासिकाने १९३५पर्यंत जपली. आता ही परंपरा २०१७पर्यंत यशस्वीरीत्या चालू असून, संपूर्ण महाराष्ट्रात ३०० ते ४०० दिवाळी अंक निघतात! 
मुद्रणकलेचा शोध ४०० वर्षांपूर्वीचा असला, तरी १८०५मध्ये कोलकात्याजवळ श्रीरामपूर येथे विल्यम केरी याने काढलेले ‘ए ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज’ हे पहिले मराठी पुस्तक मानले जाते. त्यात देवनागरी मुद्राक्षरे वापरून प्रथमच मराठी पुस्तक काढण्यात आले. त्यानंतर १०४ वर्षांनी दिवाळी अंक सुरू झाले. म्हणजे २०१७पासून आधीच्या सुमारे अकरा दशकांचा मराठी वाङ्मयविषयक दस्तऐवज हे आपले दिवाळी अंकच आहेत, असे मराठी ग्रंथ प्रकाशनाचे अभ्यासक शरद गोगटे यांचे मत आहे. 

‘दिवाळी-दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ या उक्तींमधील आनंद दिवाळी साजरा करण्यातील अनेक गोष्टींइतकाच दिवाळी अंक हा त्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो! गेली १०८ वर्षे मराठी साहित्याचा हा जागर अखंड होत आहे. हे सातत्य इतर भाषांमध्ये फारसे घडताना दिसत नाही. ‘प्रतिभा’ या नावाच्या दिवाळी अंकाचे संपादक श्री. वा. नेर्लेकर म्हणतात, की दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषेची मिठ्ठास असून, ती खास महाराष्ट्राची साहित्यिक दौलत आहे. शतकोत्तर वर्षाच्या कालखंडात दिवाळी सणात आमूलाग्र बदल झाला, त्याला दिवाळी अंकही अपवाद ठरले नाहीत. दिवाळी व दिवाळी अंक या नात्यांमधील वीण दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालली आहे. मराठी माणसाची दिवाळी दिवाळी अंकाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही! 

मनोरंजन दिवाळी अंक - १९०९दिवाळी अंकांनी मराठी साहित्यातील विविध प्रकार हाताळले असून, त्यातून अनेक लेखक-साहित्यिक नावारूपास आले. गेल्या १०८ वर्षांमधील साहित्यिक, कवी कोण होते यांची नुसती यादी काढली, तरी त्यातून मराठीत किती विपुल आणि व्यापक प्रमाणावर साहित्यनिर्मिती झाली आहे, याचा अंदाज येतो. गेल्या शतकात किमान दहा हजार दिवाळी अंक निघाले असून, आज ते अंक शोधून काढणेही कठीण झाले आहे. वास्तविक अगदी १९०९पासून निघालेल्या दिवाळी अंकांचे एक स्वतंत्र ग्रंथालय निर्माण होऊ शकेल. तशी कल्पना बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी यांनी काढली. त्यात स्वातंत्र्यपूर्व काळ आणि १९५०-६०च्या दशकानंतर अधिकाधिक बहरलेले दिवाळी अंक यांचा अभ्यास केला. जोशी म्हणतात, की मराठी संस्कृतीमधील दिवाळी अंकांचे योगदान मोठे असून, लेखकांच्या दृष्टीने त्यांच्या जडणघडणीची ती एक शाळाच आहे. तसेच वाचकांची भूक भागवणारे ते एक साधन आहे.

दिवंगत ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांचेही दिवाळी अंकांशी असणारे नाते त्यांच्या बालपणापासून म्हणजे १९३८पासून होते. नागपूरकर असणारे ‘दभि’ तिथल्या ‘मोदी नंबर एक’मधील व्हरायटी चौकातील स्टॉलवर दिवाळी अंकांचा फराळ पाहून त्यातले निवडक विकत घेत. अभिरुची, साहित्य, सह्याद्री, वाङ्मयशोभा, सत्यकथा, साधना, मराठवाडा, सुषमा, दीपावली, हंस-मोहिनी-नवल, किर्लोस्कर-स्त्री-मनोहर हे अंक म्हणजे वर्षभराची बेगमी! त्यांना आवडलेल्या कथांमध्ये वामन मल्हार जोशी यांची ‘रागिणी’ ही कथा ‘मासिक मनोरंजन’मध्ये क्रमश: प्रसिद्ध होत असे, तर पु. भा. भावे यांची ‘अकुलीना’ ही पत्रात्मक कादंबरी ‘दीपावली’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती, असे त्यांनी एकदा गप्पांमध्ये सांगितले होते.
 
व्यंकटेश माडगूळकरांची पहिली कथा ‘गावाकडं’ ही पन्नासच्या दशकात दिवाळी अंकातून छापून आली होती, तर पु. ल. देशपांडे यांनीही त्यांची लेखनाची कारकीर्द प्रथम जनवाणी, साधना, हंस, दीपावली, विविधवृत्त, गिरीश, किर्लोस्कर आणि सत्यकथा अशा विविध दिवाळी अंकांमधूनच सुरू केली. ‘बटाट्याची चाळ’ तर दर दिवाळीत छापून मग नंतर त्याचे १९५८मध्ये पुस्तक झाले! एकहाती दिवाळी अंक लिहून देणारे वि. आ. बुवा यांच्या दिवाळी अंकाचे नावही ‘बुवा’ असेच होते! १९६१मध्ये ‘बुवा’चा पहिला दिवाळी अंक निघाला व त्याचे संपादक होते शंकरराव कुलकर्णी. 

रॉय किणीकरांनी लहान मुलांसाठी हाताच्या पंज्याच्या आकाराचा दिवाळी अंक काढला होता! त्यात त्यांनी नवी अंकलिपी दिली होती आणि मागील पानावर स्लेटपाटी चिकटवली होती! प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलालांनी १९५०च्या दशकात ‘दीपावली’ हा दिवाळी अंक सुरू केला, तर त्याच सुमारास त्या काळातील दुसरे गाजलेले चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी ‘रत्नदीप’ हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. पुणेकर ज्येष्ठ चित्रकार शि. द. फडणीस यांची हास्यचित्रे हंस, मोहिनी आणि नवल या अनंत अंतरकर यांच्या दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावर असायचाही हाच कालखंड! विशेष म्हणजे ‘आवाज’ या विनोदी दिवाळी अंकावर सलग तीन वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुखपृष्ठ काढले होते, हे सांगितले तर कुणी विश्वापस ठेवणार नाही. 

व्यंगचित्रं हे दिवाळी अंकाचे दुसरं व्यवच्छेदक लक्षण आहे. दिवाळी अंकांनी मराठीला जितके व्यंगचित्रकार दिले, त्याचे मोल खूप मोठे आहे. प्रभाकर झळके, प्रभाकर ठोकळ, द. अ. बडमंत्री ते अगदी शेवटपर्यंत आपली कारकीर्द गाजवणारे वसंत सरवटे आणि मंगेश तेंडुलकर यांच्यापर्यंतच्या नावांचा त्यात समावेश आहे. दिवाळीच्या आनंदात या साऱ्या व्यंगचित्रकारांनी वाचकांना मनमुराद हसवलं किंवा त्यांच्या ओठांवर मंद हास्य तरी झळकवलं! संपादक-लेखक रविप्रकाश कुलकर्णी म्हणतात, की का. र. मित्र यांनी १९०९मध्ये ‘मासिक मनोरंजन’चा अंक ज्या विविधतेने काढला, त्याच्या पलीकडे आजही कुठला अंक फारसा गेलेला नाही. याला का. र. मित्र यांचा द्रष्टेपणा म्हणायचा की मराठी मनाची फारशी न बदललेली घडी? पण त्यांची कल्पना यापुढेही अखंड चालूच राहील! 

का. र. मित्र १९०९मधील ‘मासिक मनोरंजन’च्या दिवाळी अंकातील संपादकीयात म्हणतात, की या दिवाळीच्या अंकाचे काम एवढ्या घाईने, एवढ्या तातडीने आणि एवढ्या अल्पावकाशत करावे लागले, की अनेक मोठ्या लेखकांच्या लेखनाचाही त्यात समावेश करता आला असता. बडोद्याचे महराज सयाजीराव गायकवाड, श्रीमती रमाबाई रानडे, डॉ. भांडारकर, न्यायमूर्ती चंदावरकर, भोर संस्थानचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे खूप खूप आभार! हा अंक ज्या छापखान्यात छापला, त्या निर्णयसागर या छापखान्याच्या मालकांचेही मित्र यांनी आभार मानले आहेत. मनोरंजनाचा हा दिवाळी खास अंक महाराष्ट्रीयांस प्रिय होवो, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे. बालकवींची सुप्रसिद्ध असणारी ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता या पहिल्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती! 

ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी यांचा दिवाळी अंकांशी वयाच्या १६व्या वर्षापासून म्हणजे १९५० पासून संबंध आला. ते म्हणतात, ‘सत्यकथा, वाङ्मयशोभा, प्रसाद, वसंत, यशवंत, किर्लोस्कर-स्त्री-मनोहर, माणूस, दीपावली, सुगंध हे अंक तेव्हा वाचयला आवडत. तेव्हा ऐन बहरात असणारे ताज्या दमाचे लेखक गंगाधर गाडगीळ, विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर यांना सर्वाधिक लोकप्रिय कथाकार व कवी म्हणून सर्वमान्यता मिळाली होती. शां. दा. पेंडसे, रा. शं. वाळिंबे, प्रभाकर पाध्ये, श्री. रा. टिकेकर ही मंडळी वैचारिक लेख लिहित. १९६०नंतर विद्याधर पुंडलिक, श्री. ना. जोशी. दि. बा. मोकाशी, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर हे दुसऱ्या फळीचे लेखक तयार होऊ लागले, ते दिवाळी अंकातील त्यांच्या साहित्यामुळेच. त्यानंतर पुढे ना. धों. महानोर, ह. मो. मराठे, अरुण साधू, रामदास फुटाणे, वि. आ. बुवा ही तिसरी फळी जोमाने लिहू लागली! कुसुमाग्रज, गंगाधर महांबरे, योगेश्वर अभ्यंकर आणि लोककवी मनमोहन यांच्या कविता आवर्जून वाचल्या जात. कवी ग्रेस, अनुराधा पाटील व त्यानंतरची पिढी ‘मौज’सारख्या दिवाळी अंकांमुळे लोकांपर्यंत पोहोचली.’

न. म. जोशी यांनी त्यांची पहिली ‘अवशेष’ ही कथा १९६३मध्ये ‘प्रसाद’ दिवाळी अंकात लिहिली. ‘प्रसाद’चे संपादक व ज्येष्ठ लेखक य. गो. जोशी यांनी सांगितले, की या कथेतील प्रेमाचा त्रिकोण काढून टाका. न. म. जोशींनी ते मान्य केले. याशिवाय एकता आणि तरुण भारतच्या दिवाळी अंकांतूनही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या दिवाळी अंकातील एका कथेचा अनुवाद १९७८मध्ये दिल्लीतील केंद्रीय हिंदी संस्थानाच्या ‘वार्षिकी’ या अंकात प्रसिद्ध झाला! 

१९५० ते ८० या काळातील दिवाळी अंक हे खरोखर साहित्य विशेषांक होते आणि ते जाहिरातींचा वापर केवळ आधार म्हणून करत. आता जाहिराती जास्त व त्याला तोंडी लावायला साहित्य अशी अवस्था आहे, असे मत न. म. जोशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, की अशा अंकांत निवड फार नसते. कसदार साहित्य छापू असा निर्धार असणारे अंक टिकू शकले नाहीत. त्यात ‘सत्यकथा’ आणि ‘माणूस’ यांचा समावेश करता येईल. त्या काळातील पु. ग. सहस्रबुद्धे आणि नंतरचे गोविंद तळवलकर यांच्यासारखे वैचारिक लेखनही कमी होत चालले आहे. दिवाळी अंकातील साहित्यात पु. भा. भावे, बा. भ. बोरकर, कवी ग्रेस आणि कुसुमाग्रज हे न. म. जोशींचे आवडते लेखक-कवी. दलित साहित्याने दिवाळी अंकाला ऊर्जितावस्था आली; पण नंतर त्यात तोचतोपणा आल्यामुळे त्या साहित्याला साचलेपण आले, असे त्यांनी सांगितले. 

दैनिक केसरीचे उपसंपादक मयूर भावे यांनी दिवाळी अंकांवर खास अभ्यास केला आहे. ते म्हणाले, की दर वर्षी मोठ्या संख्येने दिवाळी अंक बाजारात येतात व स्वत:च्या वैशिष्ट्यांसह ते वाचकांपर्यंत पोहोचतातही. साहित्य, महिला, ज्योतिष, आरोग्य, रहस्यकथा या वैविध्यपूर्ण प्रकारांसह ते वाचलेही जातात. काही दिवाळी अंक दर वर्षी स्वतंत्र विषय घेऊन त्याचा विशेषांक काढतात. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी ‘छावा’ या दिवाळी अंकाने ‘अतुल्य भारत’ या विषयावर विशेषांक काढला होता. तसेच ‘सह्याद्री’चा कथा विशेषांक, ‘ऋतुरंग’चा ‘मी आणि माझे वडील,’ ‘शब्दगंधार’चा ‘माझी जडणघडण,’ ‘अनुभव’चा मुशाफिरी विशेषांक आणि ‘मधुमित्र’चा मधुमेह विशेषांक प्रसिद्ध झाला होता. 

पाचशे पानांपर्यंत दणदणीत अंक काढणारे ‘चपराक’ दिवाळी अंकाचे संपादक घनःश्याम पाटील म्हणतात, की दिवाळी अंक वाचले जात नाहीत, हे म्हणणे खोटे ठरवण्यासाठीच आम्ही इतका मोठा अंक काढतो. गेल्या वर्षी आम्ही ४७६ पानी अंक काढला तो त्याच भूमिकेतून. आप्तेष्टांना दिवाळीची मिठाई देण्याऐवजी दिवाळी अंकांचा फराळ भेट म्हणून द्यावा ही कल्पना आम्ही अधिक उचलून धरली आहे. 

यंदा नोटाबंदी आणि ‘जीएसटी’चा फटका दिवाळी अंकांनाही बसल्याचे सांगितले जाते. विशेषत: त्यामुळे जाहिराती कमी व अंकांच्या किमती जास्त. असे असले तरी, प्रत्येक दिवाळी अंकाचा स्वत:चा असा एक वाचक वर्ग असतो. तो शक्यतो मिळेल त्या किमतीला तो अंक विकत घेतो. यंदाही तसेच घडेल, असे दिवाळी अंक विक्रेत्यांना वाटते. कारण दिवाळी अंक आले, की त्यावर उड्या मारणारे वाचक अजूनही तितक्याच निष्ठेने ते विकत घेताना दिसतात. याचे संपूर्ण श्रेय ‘मनोरंजन’चे सर्वेसर्वा का. र. मित्र यांना जाते. त्यांना त्यासाठी मनापासून धन्यवाद द्यायला हवेत!

(विविध दिवाळी अंक घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi