Ad will apear here
Next
‘कम्युनिटी रेडिओंनी मतदार जागृतीत योगदान द्यावे’
वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांचे आवाहन
कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांसाठी पुण्यात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा.

पुणे : ‘लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. यासाठी कम्युनिटी रेडिओंनी मतदार जागृतीसाठी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी केले.

पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यभरातील कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांसाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सिन्हा बोलत होते. या वेळी निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव एस. के. मिश्रा, ‘स्मार्ट व्होट’च्या अर्चना कपूर यांच्यासह मीडिया कम्युनिटी कन्सल्टंट रुक्मिणी वेमराजू आणि राज्यातील २२ कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांचे ४० प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार मार्गदर्शन करताना

‘कम्युनिटी वाहिन्यांच्या स्वरूपात रेडिओ हे माध्यम पुन्हा प्रभावीपणे उदयास आले आहे. कोणताही दबाव, प्रभाव, प्रलोभनाला बळी न पडता नैतिक मूल्यांच्या आधारे मतदान करण्यासाठी लोकांना जागृत करण्याचे काम कम्युनिटी रेडिओंनी करावे. त्यासाठी रेडिओंनी स्थानिक भाषा, संस्कृती लक्षात घेऊन वैविध्यपूर्ण कार्यक्रम निर्माण करावेत. मतदार जागृतीचा कार्यक्रम निरंतर चालू ठेवायचा आहे,’ असेही सिन्हा यांनी सांगितले. 

‘रेडिओ माध्यमाचे महत्त्व लक्षात घेता भारत निवडणूक आयोग स्वतःची वेब रेडिओ वाहिनी सुरू करणार असून, इंटरनेटच्या माध्यमातून जगातून कोठूनही या वाहिनीचा लाभ घेता येईल. सर्व कम्युनिटी वाहिन्या या वेब रेडिओशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. आयोगाच्या वतीने देशात १५ लाख साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार असून, आतापर्यंत त्यापैकी सहा लाख क्लब स्थापन झाले आहेत. राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतःची कम्युनिटी रेडिओ वाहिनी सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा,’ असेही सिन्हा म्हणाले.

निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार म्हणाले, ‘सर्वसामान्य नागरिकांशी जोडण्याचे कम्युनिटी रेडिओ हे सशक्त माध्यम आहे. त्यामुळे कम्युनिटी रेडिओंनी निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण बाबी लोकांपर्यंत योग्यरित्या पोहोचविण्यासाठी कल्पकतेने कार्यक्रम निर्माण करावेत.’

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर मार्गदर्शन करताना
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, ‘मतदानाचा हक्क, आदर्श आचारसंहिता, तसेच निवडणूक प्रक्रियेविषयी सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा पद्धतीने पोहचविण्यासाठी कार्यक्रमांची निर्मिती करावी. युवक, महिला, वृद्ध आदी लक्ष्य गट ठरवून त्याप्रमाणे कार्यक्रम प्रसारणाची वेळ ठरवावी.’

या वेळी सिन्हा यांच्या हस्ते मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या निवडणूक जनजागृती ध्वनिचित्रफितींचे उद्घाटन करण्यात आले.

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आभार मानले. या वेळी कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांचे प्रतिनिधी, तसेच जिल्हा स्वीप अधिकारी यांनीही आपले अनुभव मांडले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi