Ad will apear here
Next
रेपो दरात कपात झाल्यास शेअर बाजारात तेजी
येस बँक, स्टरलाइट टेक्नॉलॉजिज, जिंदाल स्टील खरेदीयोग्य

सध्या शेअर बाजार संथ असून, रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय धोरणाची सर्वांना प्रतीक्षा आहे. रेपो दरात कपात झाल्यास बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. या स्थितीत काही निवडक शेअर्स घेण्यायोग्य आहेत. त्याविषयी जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात... 
........ 

अमेरिकेतील ‘फेडरल रिझर्व्ह’ने अकरा वर्षांनंतर व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली आणि अर्थकारण डोव्हिश (Dovish)म्हणजे सकारात्मक पद्धतीने प्रगती करेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांवर आणि भारतीय शेअर बाजारातही दिसत आहेत. शेअर बाजारातील घसरण शुक्रवारी (दोन ऑगस्ट २०१९) संपलेल्या सप्ताहातही कायम होती. 

या आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय धोरण समितीची बैठक आहे. तिथेही कदाचित रेपो दर पाव किंवा अर्धा टक्क्यानेही कमी होण्याची शक्यता आहे. तसे झाले, तर शेअर बाजार बाळसे धरेल. शुक्रवारी मुंबई बाजाराचा निर्देशांक ३७ हजार ११८ होता, तर निफ्टी १० हजार ९९७वर बंद झाला. 

नुकताच येस बँकेचा शेअर ८८.६० रुपयांवर बंद झाला. रोज सुमारे दहा कोटी शेअर्सचे व्यवहार होत आहेत. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ३८वर दिसले तरी ते फसवे आहे. बँकेने २०१८-१९ या वर्षात अनार्जित कर्जांसाठी भरपूर तरतूद केली आहे. त्यामुळे शेअरचा भाव सतत वाढत जाईल. जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी येस बँकेचे शेअर सध्या खरेदी करून वर्षभर थांबावे. वर्षात किमान ४० टक्के नफा सहज व्हावा. 

स्टरलाइट टेक्नॉलॉजिज कंपनीचा जून २०१९ तिमाहीचा नफा १४१ कोटी रुपये झाला. गेल्या जूनपेक्षा तो १७ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या मार्चमध्ये तो १२०.७१ कोटी रुपये होता. या जूनमध्ये विक्री ६३ टक्क्यांनी वाढून १४३१.९९ कोटी रुपये झाली. गेल्या जूनची विक्री ८७६.८९ कोटी रुपये होती. सध्या या शेअरचा भाव १५१ रुपयांपर्यंत खाली आला आहे. स्टरलाइटने अमेरिकेमध्ये आपल्या कंपनीची प्रसिद्धी करण्यासाठी एक ‘लॉबीस्ट’ नेमला आहे. रोज किमान आठ लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर १०.५५ पट पडते. गेल्या बारा महिन्यांतील त्याचा उच्चांकी भाव ४०० रुपये होता. सध्या हा शेअर विकत घेतल्यास ४० टक्के नफा वर्षभरात सहज व्हावा. 

जिंदाल स्टील हा शेअर गेल्या शुक्रवारी २२५ रुपयांवर बंद झाला. कंपनीचा जून २०१९ तिमाहीचा नफा ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. कंपनीने कर्नाटकातील खाणींसाठी बोली लावल्या आहेत. त्यात प्राधान्यक्रमाची कंपनी म्हणून तिला पसंती मिळाली आहे. 

‘जीएचसीएल’ शेअर सध्या २०५ रुपयांना उपलब्ध आहे. कंपनीचा जून २०१९ तिमाहीचा नफा गेल्या जूनपेक्षा ५४ टक्क्यांनी जास्त आहे. एचडीएफसीच्या जून २०१९च्या तिमाहीचे अलेखा परिक्षित उत्पन्न २३ हजार २३९ कोटी रुपये होते. मागील जूनमध्ये ते १९ हजार ७७३ कोटी रुपये होते. वर्षात साडेसतरा टक्क्यांची वाढ दिसते. नक्त नफा या वेळी ३५३९ कोटी रुपये झाला आहे. जून २०१८ तिमाहीसाठी तो १५७० कोटी रुपये होता. 

भारताच्या एप्रिल-जूनमधील कर महसुलातील वाढीचे प्रमाण गेल्या १० वर्षांतील किमान पातळीवर आहे. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन नजीकच्या भविष्यात ७.१ टक्के दराऐवजी ६.९ टक्के दराने वाढणार आहे, असे भाकीत ‘क्रिसिल’ने केले आहे. आतापर्यंत झालेला अनिश्चित पाऊस, जागतिक अर्थव्यवस्थेत येऊ घातलेली मंदी ही त्याची कारणे आहेत. 

- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक शेअर बाजार या विषयातील तज्ज्ञ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language