Ad will apear here
Next
काठमांडूच्या रस्त्यांवरून ‘राजपथा’वर...
बालहक्कांसाठी बासू राय लहानपणापासूनच लढला...

अनेक कारणांमुळे बालपण करपून गेलेल्या एका मुलाची ही गोष्ट आहे. काठमांडूच्या रस्त्यांवरून फिरणं आणि भुकेसाठी चोऱ्यामाऱ्या करणं त्याच्या नशिबी आलं; पण त्या वयातही त्याला आपली चूक कळली आणि तो सन्मार्गाला लागला. पुढे कैलाश सत्यार्थींशी भेट झाली आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं. आज अनेकांचं बालपण फुलावं, म्हणून तो दिल्लीत झटतो आहे... ‘चाइल्ड फ्रेंडली मूव्हमेंट’ हाच जणू त्याच्या जीवनाचा राजपथ झाला आहे. जाणून घेऊ या बासू रायच्या प्रेरणादायी वाटचालीबद्दल...
..............
आयुष्य म्हणजे एक शाळाच असते, ज्यात आपण नवनवीन गोष्टी शिकत असतो. फरक एवढाच, की या शाळेतून घेतलेल्या अनुभवांतून कोणी व्यक्ती चांगली होते, तर कोणी वाईट. वाईट मार्गाला लागलेल्या व्यक्तींपुढे अनेक कारणं तयार असतात; पण ज्याला आयुष्यात खरंच काही चांगलं करायचं आहे, तो वाईट परिस्थितीतही चांगलंच करतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बासू राय हा २७ वर्षांचा युवक. मूळचा काठमांडूचा असलेला बासू सध्या दिल्लीला असतो. बालपण करपून गेलेल्या मुलांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी तो झटतो आहे. त्याचं आयुष्य ही एक प्रेरणादायी गोष्टच आहे. 

बासू अवघ्या एका वर्षाचा असताना त्याच्या आईनं स्वत:चं करिअर करण्यासाठी त्याला सोडून दिलं. वयाच्या चौथ्या वर्षी त्याचं पितृछत्रही हरपलं. ना कोणी नातेवाईक, ना कोणी जवळची व्यक्ती. ज्या वयात मुलं आई-वडिलांचा हात धरून चालायला शिकतात, त्या वयात रस्त्यावर राहण्यासाठी जागा शोधणं या मुलाच्या नशिबी आलं. एवढं कमी होतं म्हणून की काय, तो गुंडागर्दी करणाऱ्या मुलांच्या टोळीमध्ये अडकला आणि त्या मुलांनी बासूला बेदम मारलं; पण त्याच्या सुदैवानं एका मुलानं त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं आणि त्याचा जीव वाचला. ही तर त्याच्या आयुष्यात पुढे येऊ घातलेल्या अडचणींची सुरुवात होती. 

रस्त्यावर आल्यावर एक गोष्ट बासूला प्रकर्षाने जाणवू लागली ती म्हणजे पोटातली भूक. ती भागविण्यासाठी त्याने सुरुवातीला चोऱ्यामाऱ्या केल्या; पण एवढ्या लहान वयातच त्याला समजू लागलं, की आपण जे करतोय ते योग्य नाही. म्हणून त्याने प्रामाणिकपणे काम करायला सुरुवात केली; पण जग एवढं निर्दयी असतं, की तिथे लहान-मोठा असा फरक नसतो. कमी मोबदल्यात जास्तीत जास्त काम करून घेणं एवढंच या जगाला माहिती असतं. 

कैलाश सत्यार्थींसोबत बासू रायया सगळ्यामुळे त्याला वाईट मार्गाची निवड करण्यासाठी अनेक कारणे होती; पण त्याने तो मार्ग निवडला नाही आणि तो खचूनही गेला नाही. तो अनाथाश्रमात पोहोचला. तिथे मिळणाऱ्या शिक्षणाच्या सुविधेचा त्यानं गांभीर्यानं उपयोग करून घेतला. लहान मुलांसाठी कार्य करणारे नोबेलविजेते कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांच्याशी वयाच्या नवव्या वर्षी त्याची गाठ पडली. ‘ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर’अंतर्गत त्यानं आपल्यासारख्या अनेक मुलांतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं. कैलाश सत्यार्थींसोबत तीन देशांत तो फिरला. कैलाशजींचा त्याला एवढा लळा लागला, की त्याचं मन काठमांडूमध्ये रमेना. म्हणून तो दिल्लीला निघून आला. दरम्यानच्या काळात त्यानं स्वत:चं शिक्षण पूर्ण केलं. इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव याच्या जोरावर त्याला चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळत होती; पण आपल्याला जे भोगायला लागलं, ते देशातल्याच काय, पण जगातल्या कोणत्याच लहान मुलाला भोगायला लागू नये, यासाठी कार्य करण्याचं ठरवून त्यानं ती नोकरी नाकारली.

कित्येक वर्षं तो कैलाश सत्यार्थींसोबत काम करतो आहे. आता त्याने स्वतः ‘चाइल्ड फ्रेंडली मूव्हमेंट’ सुरू केली आहे. कैलाश सत्यार्थी हेच या मोहिमेचे मार्गदर्शक आहेत. ‘तुम्ही नुसती समाजसेवा करत राहिलात, तर त्याला तेवढं यश मिळत नाही; पण तेच काम तुम्ही एखाद्या ब्रँडखाली करत असाल तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतं आणि जागृती होते,’ असं बासू म्हणतो. बालकामगार या विषयाबद्दल जागृती व्हावी, म्हणून बासूने स्वत:ला आलेले अनुभव ‘फ्रॉम द स्ट्रीट्स ऑफ काठमांडू’ या पुस्तकात मांडले आहेत. अलीकडेच हे पुस्तक ‘काठमांडूच्या रस्त्यांवरून’ या नावाने मराठीतही अनुवादित झालं आहे. (हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी http://www.bookganga.com/R/720UC येथे क्लिक करा.)  ‘चाइल्ड फ्रेंडली मूव्हमेंट’ ही स्वतः सुरू केलेली संस्था बासू स्वत: कमवलेल्या पैशांतून चालवत आहे. बालकामगार, घरातून पळून आलेली मुलं, मानवी तस्करीची शिकार बनलेली मुलं, अनाथ अशा सर्व प्रकारच्या मुलांचं पुनर्वसन करण्याचं काम ही संस्था करते. जास्तीत जास्त मुलांना दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचं त्याचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तो झोकून देऊन काम करतो आहे. ‘चाइल्ड फ्रेंडली मूव्हमेंट’ हाच जणू त्याच्या जीवनाचा राजपथ झाला आहे.बासू म्हणतो...
शिक्षणाला एका चौकटीत न बसवता मुलांची आवड-निवड किंवा त्यांचा कल बघून दिल गेलं पाहिजे. समाजाला साक्षर करण्यापेक्षा सुशिक्षित केलं, तर अर्ध्याहून अधिक समस्या कमी होतील. नुसती सही करायला आलं म्हणजे झालं, असं नाही. मंत्र्याच्या मुलांना जे शिक्षण दिलं जातं, तेच सरकारी शाळांमध्येही दिलं गेलं पाहिजे. म्हणजे जे नेते तयार होत आहेत, ते फक्त मोठ्या शाळांमधून न येता सामान्य लोकांमधूनही येतील. जिथे आई-वडील शिक्षित नसतात, तिथे खाण्यापिण्याचे वांधे असतात आणि हेच आई-वडील अनेक मुलांना जन्म देतात. एक मुलगा भीक मागून दिवसाचे २०० ते ३०० रुपये कमावतो. त्यातून पोट भरतं. मग ज्यांना एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत असते, ते पालक मुलाला शाळेत पाठवायचा विचार कशाला करतील? कित्येकदा अशा मुलांचे आई-वडील व्यसनांच्या आहारी गेलेले असतात. त्यामुळे मुलांनी कमावलेले पैसे त्यांच्यासाठीच वापरले जात नाही. अशा आई-वडिलांचं कौन्सिलिंग करून त्यांना समजावून, त्या मुलांना शाळेत पाठवणं, त्यांचं भविष्य शाश्वत करण्याचं काम आमची संस्था करते. 

जी मुलं बालकामगार होतात किंवा मानवी तस्करीमध्ये ती गावाकडून, गरीब घरातून आलेली असतात. एकीकडे जिथे आपण मोबाइलशिवाय दोन मिनिटं राहू शकत नाही, त्याच देशात अशी अनेक गावं आहेत, जिथे वीजही नसते. मग पैसे कमावण्याचा एकच मार्ग असतो, तो म्हणजे लहान मुलांना कामाला लावणं. यामध्ये मुलींचे खूप हाल होतात. कारण बलात्कारासारख्या वाईट गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो. त्याचबरोबर काही मुलांसोबतही बलात्कारासारख्या गोष्टी घडतात; पण अशा घटनांचं प्रमाण कमी आहे. अशा मुलांचं आयुष्य सावरण्याचं काम आम्ही करतो. मुलं ही देशाचं भविष्य असतात. त्यामुळे देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी मुलांचा वर्तमान आणि भविष्यकाळ चांगला असणं, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. 

कैलाश सत्यार्थी यांनी अलीकडेच आयोजित केलेल्या भारत रॅलीमध्ये आम्ही सहभाग घेतला. बालकामगार पद्धतीबद्दल देशातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या शहरात जाऊन आम्ही या मोहिमेद्वारे जनजागृती केली. मी स्वत: तीस हजार महिलांना लैंगिक शोषण आणि बालमजुरीबद्दल जागरूक केलं. हे काम मी स्वखर्चाने करतो. त्यात कोणती संस्था किंवा सरकार मला मदत करत नाही. 

आतापर्यंतच्या आयुष्यात ‘अनाथ’ म्हणून हिणवून घेणारा मी... आता माझा स्वत:चा परिवार तयार झाला आहे. नुकतीच चेतना माझ्या आयुष्यात आली आणि माझं स्वत:चं कुटुंबही तयार झालं आहे. ती मला माझ्या कामात मदत करत आहे. कैलाश सत्यार्थी यांच्या आशीर्वादाने आणि चेतनाच्या साथीने हे काम खूप मोठ्या प्रमाणावर करून जास्तीत जास्त मुलांना या जाळ्यातून बाहेर काढण्याचं माझं स्वप्न आहे. ते नक्कीच पूर्ण होईल, असा मला विश्वास वाटतो.
 
- गायत्री तेली-पेडणेकर
ई-मेल : gayatri.sateri@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

(बासू रायच्या कार्याची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language