Ad will apear here
Next
भाषेचे जगणे व्हावे!
भाषा हा सोहळ्यांचा नाही, तर जगण्याचा विषय आहे. अन् हे फक्त साहित्यातील एक अलंकारिक वाक्य किंवा प्रेरक सुविचार नाही. याला भक्कम शास्त्रीय आधार आहे. ‘दुसरी भाषा शिकणे म्हणजे काही गोष्टींसाठी नवीन शब्द शिकणे असे नसून, गोष्टींबद्दल विचार करण्याचे दुसरे मार्ग शिकणे होय,’ असे भाषातज्ज्ञ म्हणतात... विचारमंथन करणारा विशेष लेख...
.........
यवतमाळ येथे भरलेले ९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कालच (१३ जानेवारी २०१९) संपले. तीन दिवसांच्या या सोहळ्यात विविध कार्यक्रम आणि भाषणांची रेलचेल असते. आता हा दर वर्षीचा सोहळा झाला आहे. त्याचे वादही आता नित्याचे झाले आहेत. किंबहुना वाद झाले नाहीत, तर हा कार्यक्रम अधिकृत आहे की नाही, अशा शंका येण्याजोगी परिस्थिती आहे. या वार्षिक संमेलनात साहित्याशी संबंधित वेगवेगळ्या चर्चा होतात; मात्र ज्या भाषेच्या आधारावर हे साहित्य व संस्कृती उभी आहे, त्याबाबत फारसे बोलले जात नाही. अन् बोलले गेलेच, तर केवळ ‘बोलाची कढी अन् बोलाचा भात’ अशी परिस्थिती असते. त्यातून प्रत्यक्ष पानात काहीच पडत नाही.  

दुसरीकडे असे उत्सवी उपक्रम न करताही काही सरकारे, काही समुदाय आपापल्या भाषेचे स्वत्व आणि अस्तित्वही टिकविण्यासाठी निकराचे प्रयत्न करत आहेत. हरियाणा हे काही चांगल्या बातम्यांसाठी चर्चेत राहणारे राज्य नाही; मात्र याच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नुकताच एक आदेश काढला. खरे तर अशा आदेशांचे अनुकरण अन्य राज्यांनीही करायला हवे. हरियाणातील सर्व सरकारी कामकाज आता हिंदीत होईल, असे या आदेशात म्हटले आहे. खट्टर यांच्या या हिंदी प्रेमामुळे अनेक अधिकारी धास्तीत पडले आहेत, असे म्हणतात. असे आदेश यापूर्वीही अनेक मुख्यमंत्र्यांनी काढले आहेत. दिवंगत भैरवसिंह शेखावत राजस्थानचे मुख्यमंत्री असताना ३५-४० वर्षांपूर्वी त्यांनी असाच नियम बनविला होता. तो म्हणजे राजस्थानातील प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने सर्व कागदपत्रांवर हिंदीतच स्वाक्षऱ्या करायच्या. मुलायमसिंह यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनीही भारतातील सर्व राज्यांशी हिंदीतच पत्रव्यवहार करायचा कटाक्ष बाळगला होता; मात्र नव्याचे नऊ दिवस या न्यायाने त्यांची नवलाई काही दिवस राहिली. नंतर परत ‘पळसाला पाने तीन!’ या पार्श्वभूमीवर खट्टर यांचा निर्णय किती टिकतो हे पाहायचे. 

...मात्र हरियाणाच नाही, सर्व हिंदीभाषक आणि आपल्या महाराष्ट्रासारख्या अनेक गैर-हिंदी राज्यांमध्ये इंग्रजीने सत्ता हातात घेतली आहे. (खरे म्हणजे ब्रिटिश गेले, तरी इंग्रजीची सत्ता कधी गेलीच नाही.) मंत्रालयातील बहुतेक सरकारी फायली इंग्रजीतच असतात. विधिमंडळातील कायदे इंग्रजीत बनतात आणि त्यानंतर त्यांचे ‘सरकारी मराठी’त भाषांतर होते. या सरकारी मराठीची थट्टा उडविणारेही फार काही उत्तम मराठी बोलतात किंवा मराठीसाठी काही करतात, असेही नव्हे. दूरचित्रवाहिन्यांच्या कृपेने  सार्वजनिक घोषणा आणि जाहिरातींद्वारे इंग्रजीने मराठीच्या तंबूत प्रवेश केला आहे. पहिलीपासून इंग्रजी आल्यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थीही यस्स-फिस्स करू लागली आहेत. उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्र हे तर आधीपासूनच इंग्रजीला आंदण दिलेले.

अन् अशा अवस्थेत आपण साहित्य संमेलन साजरे करतो. त्यात या सर्व वस्तुस्थितीचे प्रतिबिंब पडायला नको का? त्यावर विचारमंथन होऊन काही उपाययोजना हाती यायला हव्यात. त्याऐवजी पाहायला मिळतात ते मानापनाचे नाट्यप्रयोग आणि दोषारोपाचे खेळ! मेंदूला खाद्य मिळण्याऐवजी चर्चेला खाद्य! अशाने मराठीचा विकास कसा होणार? 

भाषा हा सोहळ्यांचा नाही, तर जगण्याचा विषय आहे. अन् हे फक्त एक साहित्यातील अलंकारिक वाक्य किंवा प्रेरक सुविचार नाही. याला भक्कम शास्त्रीय आधार आहे. आपण बोलत असलेल्या भाषेचा आपल्या विचारप्रक्रियेवर परिणाम होतो का, यावर संशोधक अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. या संबंधातील सर्वांत पहिला सिद्धांत बेंजामिन ली व्होर्फ नावाच्या अमेरिकी संशोधकाने केला होता. अॅरिझोना प्रांतात बोलल्या जाणाऱ्या होपी या मूळ अमेरिकन भाषेचा अभ्यास त्याने केला होता. त्याच्या या अभ्यासातून त्याने निष्कर्ष काढला होता, की होपीभाषक आणि इंग्रजी बोलणारे लोक त्यांच्या भाषेतील फरकामुळे जगाकडे वेगळ्या पद्धतीने पाहतात. 

यानंतर या दिशेने अनेक अभ्यास झाले आणि संशोधकांना आढळले, की आपली संस्कृती-परंपरा, जीवनशैली, सवयी अशा आपल्या सवयीचे भाग असलेल्या गोष्टी आपण आपल्या जीवनातून घेतो आणि आपण त्या पद्धतीनेच विचार करायला लागतो. आपली अभिव्यक्तीही त्यानुसारच होत असते. भाषा, संस्कृती आणि विचारांची सवय या सर्व गोष्टी बहुतेकदा एकत्रच वाढतात. उदाहरणार्थ, आपल्या भाषेतील सर्वनामांचे घ्या. आपल्याकडे तृतीयपुरुषी एकवचनी तो, ती ही सर्वनामे आहेत; पण आदरार्थी बहुवचनी ते, त्या हेही आहेत; मात्र इंग्रजीत ही भानगड नाही. तेथे सगळे ‘ही’ किंवा ‘शी’! त्यामुळे मराठीभाषकाच्या मनात दुसऱ्याबद्दल आदराची जी भावना निर्माण होते, ती इंग्रजीत केव्हाही शक्य नाही. थोरामोठ्यांना एकेरी बोलायचे नसते, हे संस्कार आपल्या मराठी भाषकांवर होतात, तसे इंग्रजी भाषकांवर होतील असे नाही. 

याचे एक सुंदर उदाहरण भालचंद्र नेमाडे यांच्या ‘टीकास्वयंवर’ पुस्तकात सापडते. अरुण कोलटकर यांच्या ‘जेजुरी’ या इंग्रजी कवितासंग्रहाचा उल्लेख करून नेमाडे यांनी दोन विचारसरणीतील फरक दाखविला आहे. नेमाडे म्हणतात, की ही कविता इंग्रजीत आल्यामुळे ती जेजुरीतील भाविक आणि तेथील वातावरण यांच्याकडे उपहासाने पाहते, काहीशा तुच्छतेने पाहते. एखाद्या मराठी भाषकाने याच विषयावर केलेली कविता अत्यंत वेगळी असती. म्हणूनच फ्लोरा लुईस या भाषातज्ज्ञ म्हणतात, ‘दुसरी भाषा शिकणे म्हणजे काही गोष्टींसाठी नवीन शब्द शिकणे असे नसून, गोष्टींबद्दल विचार करण्याचे दुसरे मार्ग शिकणे होय.’

या परिस्थितीत जर तरुण पिढीच्या झुंडीच्या झुंडी मराठीची कास सोडून इंग्रजीचा पदर धरत असतील, तर त्यांची विचारप्रक्रियाही वेगळी होणार. थोडक्यात म्हणजे मराठी संस्कृतीचा एक लचकाच आपण तोडत आहोत. दर वर्षी लाखो विद्यार्थी या हिशेबाने हे लचके तोडले जात आहेत. निकडीचा विषय तो आहे, आपल्या हातात घ्यायचा विषय तो आहे. ही लचकेतोड थांबवायची असेल, तर भाषा हा वार्षिक सोहळ्यातील एक दागिना होता कामा नये, तो आपल्या जगण्याचा विषय व्हावा! 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language